Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

समोसा

स
सारिका होगाडे
Tue, 07/04/2017 - 01:47
नमस्ते मिपाकर, समोसा हा माझा आवडता पदार्थ, कोणाला नाही आवडत? पण कधी घरी करून बघावा हा विचार मनात नाही आला, आत्तापर्यंत! कॅनडाला स्थलांतरित झाल्यानंतर इथे बऱ्याच पंजाबी मैत्रिणी झाल्या आणि भेटीगाठी सुरु झाल्या. बोलता बोलता कळले की नान, सामोसे, छोले भटोरे, पिझ्झा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करावेत. त्याबद्दल टिप्सही मिळाल्या. मग वाट कशाला बघायची? लगेच सुरुवात केली सामोसे बनवायला. फोटोही काढले आणि लिहायलाही घेतले. संपूर्ण प्रक्रिया इथे देत आहे. वाचकहो, तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा! ही पाककृती मिसळपाववर असेलही पण तरीही मी, मी बनवलेल्या सामोसाची कृती देत आहे. सामोसे गरमागरम, तिखट असे छान लागतात. आमच्याकडे एवढे तिखट आणि तळलेले कोणी खात नाही म्हणून कृतीमधले माझे प्रमाण कमी आहे. तुम्ही गरजेनुसार प्रमाण वाढवू शकता. चला तर सुरुवात करूया! साहित्य: १. ३ मध्यम आकाराचे बटाटे २. १ कप मैदा (अथवा अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घ्यावे) ३. पाव छोटा चमचा – ओवा ४. चवीनुसार मीठ ५. ३ छोटे चमचे तेल ६. लसूण ३-४ पाकळ्या (इथे पाकळ्या मोठ्या असतात, भारतातील कदाचित १०-१२ पाकळ्या घेणे) ७. १ इंच आलं ८. २-४ तिखट झणझणीत मिरच्या ९. १ कप मटार १०. मूठभर काजू ११. हळद, तिखट, गरम मसाला, जिरे परतून केलेली पूड, आमचूर पावडर, चाट मसाला – आवडीनुसार कृती: १. सर्वप्रथम ३ मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे. २. १ कप मैदा, त्यात ओवा, मीठ आणि तेल घालून हलक्या हाताने एकत्र करून घेतले. हळूहळू पाणी घालत हलक्या हाताने कणिक मळून घेणे व झाकून ठेवणे. कमीतकमी पंधरा मिनिटे झाकून ठेवावी. ३. लसूण, आलं, मिरच्या बारीक चिरून खलबत्यामध्ये कुटून घेणे. (खलबत्यामध्ये कुटून घेतल्यावर मला समाधान मिळते, तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, आवडीनुसार) ४. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण + आलं + मिरच्या हे वाटण परतून घ्यावे. त्यात हिरवी हिरवी मटार आणि नंतर काजू घालून अजून थोडे परतून घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ घालावे. ते मिश्रित करून त्यात उकडून बारीक फोडलेले बटाटे घालावे. सगळे एकजीव करून १-२ मिनिटे परतून घ्यावे. मग थोडा गरम मसाला आणि जिरेपूड घालावी. अजून थोडे परतून घेणे. मिश्रणाला थंड होवू द्यावे. त्यात आमचूर पावडर आणि चाट मसाला घालून एकत्र करावे. (टीप: थंड मिश्रणात हे एकत्र केले की चव छान लागते.) (काहींना मनुके, बडीशेप, गाजर घालून केलेले सामोसे पण आवडतात. हीच ती वेळ हे सगळे एकत्र करण्याची.) 1 ५. मैद्याच्या पीठाचे काही गोळे करून पोळीसारखे लाटावे, लहान किंवा मध्यम आकाराचे. त्यानुसार सामोस्याचा आकार ठरणार आहे आणि मला बारीक आवरण हवे आहे म्हणून मी पातळ लाटले आहेत. तुम्ही आवडीनुसार जाडही लाटू शकतात. ६. चपातीला मधोमध काप देवून दोन भाग करणे. एका भागाचा एक सामोसा होणार आहे. काप दिलेल्या बाजूने दोन्ही कडा अर्धे मुडपून त्याला पाणी लावून बंद करावे. म्हणजे तळताना मिश्रण बाहेर येणार नाही. त्रिकोणी वाटीसारखा आकार तयार होईल. त्यात आधी बनवलेले सारण भरणे. आणि खुल्या बाजूला पाणी लावून ती बाजूसुद्धा बंद करणे. 2. 3 ७. कढईत तेल गरम करून घेणे. चांगले तापून झाले कि आच कमी मध्यम ठेवावी. या तेलात सगळे सामोसे तळून घेणे, सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत! (टीप: सामोसे कुरकुरीत होण्यासाठी २ वेळा तळून घेतात. पहिल्यांदा थोडे पांढरे असतानाच काढतात आणि गार झाल्यानंतर परत तळून घेतात. मी एकदाच तळलेले आहेत.) 4 ८. गरमागरम झणझणीत तिखट सामोसे तयार! पुदिना चटणी, चिंचेची चटणी अथवा केचप बरोबर खा! 5 घराबाहेर सुंदर देखावा बघत आम्ही सामोसे फस्त केले. 6 सामोसे खाल्यावर माझी मुलगी म्हणते तसे: यम यम यमी, इन माय टम टम टमी! धन्यवाद!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13390 views

💬 प्रतिसाद
ए
एस Tue, 07/04/2017 - 05:45 नवीन
मस्तच की! सामोसे दोन वेळेस तळून घेण्याची टीप माहीत नव्हती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:21 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 07/04/2017 - 06:31 नवीन
छान आहे पाककृती....
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 07/04/2017 - 09:58 नवीन
मस्तं पाककृती आणि लेखनही आवडलं.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 07/04/2017 - 11:34 नवीन
सामोसे आवडतातच . त्यात माझ्या घरी पण बनतात पण थोडी पद्धत वेगळी असावी .म्हणजे काजू ,आमचूर पावडर आम्ही नाही वापरत.
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:24 नवीन
आता नक्की वापरून बघा. कदाचित आवडेल. इथे कॅनडीयन लोकं वेज सामोसा, कॅजून सामोसा, चिकेन सामोसा, बीफ सामोसा या नावांनीच सामोसा विकतात, हे पाहून अप्रूप वाटले.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 07/04/2017 - 17:07 नवीन
मस्त बनले आहेत समोसे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 07/04/2017 - 17:53 नवीन
छान पाकृ. घरातून दिसणारे दृश्यही सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:35 नवीन
कॅनडाची कमाल!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 07/04/2017 - 18:08 नवीन
वा. मस्तच. मी असेच करते पण दोनदा नव्हते तळले. आता असे पण करुन पाहीन
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Tue, 07/04/2017 - 19:06 नवीन
लेखकाचे नाव ना बघताच सामोसे पाहायला खाली स्क्रोल केलं. जेव्हा टेबलाच्या फोटोवर आलो तेव्हा म्हटले अरे हा तर सारिकाच्याच घराचा फोटो दिसतोय. वर जाऊन परत नाव बघितले मग कळले. आता तर घरी यायलाच हवे सामोसे खायला. :) (मिपाकरांसाठी - सारिका माझी चुलत बहीण. ती दूर कुठेतरी जगाच्या एका कोपर्यात राहते असे मी तिला नेहमी चिडवतो. पण जगाचा तो कोपरा किती सुंदर आहे तो या फोटोतून दिसत असेलच.)
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:27 नवीन
हो रे, भाऊराया! आता या उन्हाळ्यात नक्की ये. सामोसे पण खाऊया. 
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Tue, 07/04/2017 - 19:55 नवीन
तळण वगैरे करत नसल्याने तोंडाला कितीही पाणी सुटलं तरी रेसिपीला पास, पण लिहिलंय खूप सुरेख म्हणून हा प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:28 नवीन
_/\_ प्रोत्साहन नक्की मिळाले.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/04/2017 - 21:53 नवीन
टीप आवडली.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Tue, 07/04/2017 - 23:46 नवीन
बादवे कॅनडात कुठे? (जवळ असाल तर तुमच्याकडे खायलाच येऊ =))
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 07/05/2017 - 01:21 नवीन
घराच्या फोटोवरुन तरी तुझ्या जवळ्च असतील असं वाटतंय ;) आणि मी इतक्या सुंदर दिसणार्‍या समोशांसाठी कोस्ट टु कोस्ट प्रवास करायला पण तयार आहे बरं का :)
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 03:05 नवीन
नक्की या!
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 02:36 नवीन
निरोप ठेवला आहे.
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Wed, 07/05/2017 - 03:06 नवीन
इडली समोसा *LOL*
  • Log in or register to post comments
स
सारिका होगाडे Wed, 07/05/2017 - 03:07 नवीन
सर्व प्रतिसादांना धन्यवाद! उमेद आली आणि प्रोत्साहन मिळाले.
  • Log in or register to post comments
र
रायनची आई Wed, 07/05/2017 - 10:15 नवीन
काय मस्त देखावा आहे घराबाहेर.................. समोसे पण टॉपक्लास
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 07/05/2017 - 18:25 नवीन
त्या घरात बसून ते समोसे खायची मजा काही औरच असणार आहे,एअरफ्रायरमध्ये करून पाहीन नक्की.
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 07/05/2017 - 19:59 नवीन
मस्त पाकृ! घरातून इतका सुंदर देखावा दिसत असेल तर मी दिवसभर तोच बघत बसेन :)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 07/06/2017 - 11:22 नवीन
खरच मी पण दिवसभर बसून राहीन बाल्कनीत.मी समोसा पेक्षा देखावाच जास्त वेळा बघितला.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 07/10/2017 - 09:19 नवीन
सामोसे करण्याचि पद्धत छान. तयार झाल्या नन्तर निसर्ग अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा