हुरड्याचे वडे (पोंक वडे)
हुरड्याचे वडे (पोंक वडे)
साहित्य
२ कप कोवळा हुरडा
१ कप गव्हाचे पिठ
१/२ कप बेसन
१/३ कप ज्वारीचे पिठ
१ मोठा चमचा प्रत्येकी लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
मूठभर कोथिंबीर, बारीक चिरून
१ छोटा चमचा ओवा
१ मोठा चमचा मोहन (तेल)
१ चमचा इनो फ्रुट सॉल्ट / बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
तळायला तेल
कृती
हुरडा म्हंटल, कि डोळ्यासमोर येते ती म्हणजे गर्द अमराई किंवा हिरवा गार शेतमळा, त्याच्या सावलीत, गौऱ्यांवर भाजलेली कोवळी ज्वारीची कणसे, सोबत शेंगदाणा चटणी, गूळ, शेव, दही आणि नंतर पिठलं भाकरी, ठेचा, आणि मसाला वांग्याचे तुडुंब जेवण!
हल्ली मात्र हाच हुरडा शहरांमध्ये पॅकबंद पिशव्यात घरी आणून तव्यावर भाजून, दुधाची तहान ताकावर भागवली जाते. हुरडा हा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ, गुजरात मध्ये ह्याला पोंक म्हंटले जाते. हि पाककृती तिथलीच.
हुरडा मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या. ह्यात सगळी पीठे, आलं, लसूण, मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रणात, १ मोठा चमचा मोहन घालून, ते हाताने मळून घ्या. गोळे होतील अश्या रीतीने पाणी घालून सगळं एकजीव करून घट्टसर मळून घ्या. गोळे करण्यापूर्वी, सोडा/फ्रुट सॉल्ट घालून पुन्हा एकदा एकजीव करून त्याचे गोळे करून मंद आचेवर तळून घ्या!
गरम गरम पोंक वडे, हिरव्या चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्या!
[हे वडे एयर फ्रयर मध्ये होतात, पण खमंगपणा जो यायला पाहिजे, तो येत नाही, म्हणून तळूनच काढावे. ह्याच मिश्रणाचे वडे करण्यापेक्षा थालिपीठं थापून ती शॅलो फ्राय केलीत तरी चांगली लागतील]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI