प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!
मधले वर्ष तयारीत जाऊन आम्ही ११ फेब्रुवारीला सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात चढलो. १२च्या सकाळी पोहोचलो. या विमानात पेप्सी कंपनीने त्याच्या भारतातल्या ५० वितरकांना मॅच पाहण्यासाठी नेले होते. त्यातल्या काहींशी आमची सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर ओळख झाली होती. ते नागपूरहून आले होते. आम्ही इथून आणि वर्धन तिथून साधारण एकाच वेळी अॅडलेडला पोहोचलो. वर्धनने भेटायला सांगितलेल्या जागी त्याला शोधायला हे निघून गेले आणि मी सामान घेऊन एक आसन पकडून बसले. वर्धनबरोबर त्याचा एक मित्र अरुल रेड्डी हाही त्याची पत्नी नमितासोबत येणार होता. या दोघांशीही कधी भेट झाली नव्हती.
मी जिथे वर्धनची वाट पाहत बसले होते, तिथेच हे पेप्सी प्रायोजित लोक त्यांना न्यायला येणार्या माणसांची वाट पाहत होते. यात गुजरात, राजस्थान इथूनच्या गावातून आलेलेही लोक होते. ते पहिल्यांदाच परदेशात आले होते. अॅडलेड विमानतळावर तरुण स्त्रीपुरुषांच्या गळा भरून घेतलेल्या गाठीभेटी पाहून त्यांच्यात चलबिचल सुरू झाली. एकमेकांना कोपरे मारत, खुणावत ते ती दृश्ये पाहू लागले, त्यावर शेरे देऊ लागले.
इतक्यात आमच्या अगदी जवळच एक पाठमोरी तरुणी उभी राहिली. उंच बांधा, गोरीपान, बांधेसूद पाय, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधल्या काजोल टाईप, एलाईन फ्रॉक आणि त्यातून डोकावणारी मांडीपर्यंतची पँटी दिसतेय, असा पोशाख होता. 'किती सुरेख पाय आहेत ना या मुलीचे, किती बांधेसूद आहे?' असा विचार मनात येतो न् येतो तोच या लोकांची तिच्याकडे पाहून खुणवाखुणवी चालू झाली. एकमेकांना टाळ्या देत त्यांनी शेरेबाजी सुरू केली. आता त्या मुलीला भाषा समाजात नसली, तरी हे लोक आपल्याबद्दल बोलताहेत हे त्यांच्या नजरांवरून तिला कळले आणि तिने यांच्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकत पूर्णपणे पाठ केली. तिला जरी हिंदी किंवा गुजराती येत नसले, तरी मला येत होते ना!
“ए, क्या कर रहे हो? तुम लोगोंको इसलिये लाया गया है यहाँपे? अपने देशका नाम खराब करनेके लिये आपका ऐसा बर्ताव काफी है, चूप रहो सबके सब.” असे जरा वरच्या आवाजातच मी सांगितले. एव्हाना काल ओळख झालेले, कोणालातरी शोधायला गेलेले नागपूरकर तिथे आले आणि म्हणाले, ”काय झालं काकू? तुमच्या ओळखीची आहे का ती मुलगी?”
“ती कशाला माझ्या ओळखीची असेल? पण तुम्ही तर माझ्या ओळखीचे आहात ना, माझे देशवासी? तुमच्यातल्या काहींच्या वागण्यामुळे जर माझ्या देशाबद्दल गैरसमज होत असेल, तर एक भारतवासी म्हणून तुम्हाला त्याची जाणीव देणं हे माझं काम आहे. त्या लोकांसाठी ही दृश्ये नवीन असली, तरी त्यांनी स्वतःला सांभाळायला हवं. आतापर्यंत दूरच्या लोकांबद्दल चाललेलं होतं, तिथपर्यंत ठीक होतं. पण त्या मुलीच्या लक्षात येईल आणि तिचा आपल्या देशाबद्दल गैरसमज होईल अशी शेरेबाजी करायला माझा विरोध आहे.”
“सॉरी काकू, त्यांच्या वतीने मी माफी मागतो आणि त्यांनाही समजावतो.” नागपूरकर म्हणाले आणि त्यांना समजावून तिथून घेऊन गेले.
इतक्यात वर्धनला घेऊन माझा नवरा आला आणि माझ्यासाठी सरप्राईझ असलेली माझी भावी भाचेसून मला पाहायला मिळाली. जिच्यासाठी मी माझ्या देशवासीयांना समजावले होते, तीच ती. आमची रास लगेचच जुळली. नमिता आणि अरुलचीही ओळख झाली. ती आणि तो दोघे मुंबईकरच, त्यामुळे त्यांची रास जुळायलाही वेळ लागला नाही.. तिथे फिरण्यासाठी बुक केलेली गाडी ताब्यात घेऊन आम्ही हेनली बीचकडे निघालो.
होम स्टे असल्याने हेनली बीचवरचे घर ताब्यात आले. (होम स्टे हा वेगळ्या लेखाचा विषय आहे.) फ्रेश होऊन तिथल्या बीचवर एक फेरी मारली. इतका सुंदर समुद्र.. गॅलरीत उभे राहिल्यावरही दिसत असे. बाजूने जॉगिंग ट्रॅक, त्याची एका बाजूला समुद्रकिनारा नि दुसर्या बाजूला समुद्राभिमुख घरे, जी जास्तकरून भाड्याने पर्यटकांसाठी दिली जातात. दोन सुरेख जेट्टी, त्यापैकी एक फक्त हौशी मासेमारीसाठी. शनिवारी संध्याकाळी इथे लोक कौटुंबिक सहलीसाठी येतात, बादल्या, थर्मोकोल बॉक्स, गळ घेऊन मासेमारी करून रविवारच्या जेवणाची सोय करतात.
वर्धन म्हणाला, ”आत्या, तो बघ रोहित शर्मा चाललाय.”
”अरे, पकड ना त्याला.”
“चल गं. इथे फोटो काढायला बंदी आहे. फोटो नाही काढता येणार.” वर्धन आळसावूनच तंगड्या पसरत म्हणाला.
“अरे, फोटो नसला तर नसला, आपण तर भेटू.”
मी उठून भराभर चालत, अखेरीला पळतच तो नजरेच्या टप्प्यात आल्यावर, ”रोहित, रोहित” अशा हाका मारायला सुरुवात केली. रोहित थांबला. न थांबून करेल काय बिच्चारा? माझ्या मागे नवरा, नून्ग, आणि काहीतरी खरेदी करणारे नमिता, अरुल आत्या का धावतेय ते न समजल्याने धावत आले.
“हॅलो, रोहित. परवाची मॅच पाहायला आम्ही खास मुंबईहून आलोय. धोनीला माझा एक निरोप दे. त्याला म्हणावं, वर्ल्ड कप जिंकायला खेळू नकोस, प्रत्येक मॅच जिंकायला खेळा, म्हणजे वर्ल्ड कप आपलाच आहे. आणि परवाची मॅच तर जिंकायलाच खेळा.” या माझ्या निरोपावर रोहित हसून म्हणाला, ”खास मुंबईकरांचा दमदार निरोप हं. आणि परवाची मॅच हरणं शक्यच नाही.” मग मॉलचा नियम धुडकावून आम्ही फोटो काढले. हे समजल्यावर वर्धन इतका हळहळला की सांगता सोय नाही.
मॅचच्या दिवशी नून्ग आम्हाला सोडायला आल्यामुळे स्टेडियमच्या अगदी जवळ उतरता आले. एक रस्ता आणि एक पूल पार करून स्टेडियममध्ये जाता आले. रस्ते, ट्रॅम्स, भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांच्या जल्लोशाने भरून गेले होते. तिरंगा हातात घेऊन, तिरंगी फुगे हातात घेऊन, तिरंगी विग घालून, भारतीय खेळाडूंची जर्सी घालून; I N D I A लिहिलेले जर्सी घालून लोक घोळक्याने जल्लोश करत चालले होते. 'भारतमाता की जय', 'इंडिया इंडिया' या जयघोषाने वातावरण भरून गेले होते. वाटेत पाकिस्तानी खेळाडूंची जर्सी घातलेले पाकिस्तानी नागरिक दिसले की या गजराला उधाण येत होते. आम्हीही त्यात सामील झालो.
गमतीजमती करत स्टेडियमपाशी पोहोचलो. इथे तर ढोल, ताशे, पिपाण्या, शिट्ट्या यांचे संमेलनच भरले होते.
हा सगळा जल्लोश पाहून लहानपणी ब्रेबॉर्नवर आणि वानखेडेवर पाहिलेल्या मॅचेसची आठवण येऊन, सुरक्षेच्या कारणावरून आपण किती मोठ्या आनंदाला भारतात मुकलो आहोत, याची जाणीव झाली. फक्त पाण्याची बाटली न्यायला परवानगी नव्हती. सगळीकडे निळ्या आणि पोपटी रंगाचे साम्राज्य पसरले होते. भर दुपारी मॅच असल्याने उन्हाचा त्रास होईल का? अशा विचारात जागेवर येत असताना दुसर्या मजल्यावर 'सर डोनाल्ड ब्रॅडमन गॅलरी' दिसली. एखाददुसरा फोटो काढत नाही, तर नवरा या गोंधळात गर्दीत बायको हरवली तर मॅच चुकेल या भीतीने हाताला धरून ओढत पुढे घेऊन गेला.
स्थानापन्न झालो. चिअरगर्ल्स तयार होत्या. एका छोट्या स्टेजवर तिथल्या टी.व्ही.च्या लोकांनी बस्तान बसवले होते, तिथे पंजाबी पारंपरिक वेषात ढोलवाले आणि नृत्य करणार्या तरुणी होत्या. लाऊड स्पीकरवर 'चक दे इंडिया' चालू होते. मस्त माहौल बनत चालला होता.
आपले आणि पाकिस्तानी खेळाडू सामनापूर्व व्यायाम करत होते. अजून स्टेडियम भरत होते.
सचिनचे पाठीराखे आपली त्याच्यावरची निष्ठा अजूनही प्रदर्शित करत होते. त्यांना एकदा सचिनने पडद्यावर दर्शनही दिले. सेलेब्रेटीही दिसत होते.
इतक्यात एक तरुण आणि दोन तरुणी, लाल आणि पांढर्या गणवेशातील शाळकरी मुलांना घेऊन ड्रेसिंग रूमकडे गेले. तितक्यात सौरव गांगुली, वासिम अक्रमसह आणि भारतीय टी.व्ही.ची टीम हजर झाली.
ऑस्ट्रेलियन टी.व्ही.साठी शेन वॉर्न आणि त्याचे सहकारी उपस्थित झाले. पाठोपाठ वर्ल्ड कप घेऊन दोन सुंदरी एका तरुणासह हजर झाल्या. शाळकरी मुले मैदानाच्या एका बाजूला रांगेत उभी राहिली. मावरी या न्यूझीलंडच्या मूळ रहिवाशाने त्यांच्या पारंपरिक वेषात, त्यांच्या पारंपरिक वाद्याचा गजर करून कार्यक्रमाला सुरुवात केली..
आता नाणेफेक करण्यासाठी आपला कर्णधार धोनी आणि पाकिस्तानी कर्णधार मिस्बाह-उल-हक मैदानात आले आणि “जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा” अशी गगनभेदी आरोळी एकमुखाने सार्या भारतवासीयांच्या तोंडून निघाली.
मग आपले तसेच पाकिस्तानचे राष्ट्रगीत झाले. काय वर्णावा आपले राष्ट्रगीत म्हणतानाचा तो अभिमानाचा क्षण! पुन्हा एकदा तो क्षण अंगावर रोमांच उठवून गेला. लहानपणी पाहिलेल्या सामन्यांच्या आठवणी जाग्या झाल्या, अर्थात कसोटी सामन्यांच्या. माझ्या बालपणातले माझ्या विस्मरणात गेलेले क्षण पुन्हा आठवून दिल्याबद्दल मी वर्धनशी आजन्म कृतज्ञ राहीन.
वरचा हा फोटो राष्ट्रगीत सुरू व्हायच्या आधीचा आहे. कारण राष्ट्रगीत म्हणताना फोटो काढणे शक्य नव्हते.
या पीचवर ३०० धावा केल्या तरी पुरतील, अशा प्रकारच्या गप्पा चालू झाल्या. नमिताने मला विचारले, ”आत्या, आपण जिंकणार ना?”
“अर्थातच” या माझ्या ठासून दिलेल्या उत्तरावर ती म्हणाली, ”नक्की ना?”
“अगं, परवा आपल्याला रोहित शर्मा काय म्हणाल होता ते तू विसरलीस का?” गोंधळामुळे जरा ओरडूनच मी तिला उत्तर दिले. ते ऐकून मागच्या बाजूला बसलेल्या दोघींनी आम्हाला त्याबद्दल विचारायला सुरुवात केली. मग त्याच्याबरोबरचा फोटो दाखवल्यावर त्याही शांत झाल्या. ”घरी बसून बघितली तर इतकी धमाल नसते नं? पण आता एवढे इथे आलोय आणि हरलो तर आपल्यालापण हसतील ना लोक?” त्यातली एक म्हणाली.
‘‘चिंता करू नका. सामन्याचा मस्त आस्वाद घ्या. आपण हरणार नाहीच आहोत.” असे मी म्हटल्यावर ती पाकिस्तानी मुलगी माझ्याकडे झेंडा हलवून दाखवत हसू लागली. तिच्याकडे बघत सगळेच हसलो. वातावरण सैल झाले. इतक्यात पाकिस्तानी खेळाडू मैदानात उतरले. प्रेक्षकांनी टाळ्या-घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. प्रत्येक बॉल, प्रत्येक शॉट, प्रत्येक कॅच, प्रत्येक विकेट - इतकेच काय, प्रत्येक हालचाल टिपत, त्यावर टीकाटिप्पणी करत सामना रंगत होता.
बाकीचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे, पण आम्ही जे काही अविस्मरणीय क्षण अनुभवले, त्यात तुम्हालाही सहभागी करून घेण्यासाठी दुपारपासून रात्रीपर्यंत आभाळाचे बदलते रंग दर्शविणारी काही प्रकाशचित्रे. नाहीतर हल्लीच्या 'आँखो देखा हाल'मध्ये आपण षटकांच्या व्यतिरिक्त काही पाहू शकत नाही जाहिरातींशिवाय.
दररोज पाऊस पडणार्या ऑस्ट्रेलियाच्या मोसमात सामन्याचा थरार वाढवण्यात वातावरणही सहभागी झाले होते.
आमच्या पुढे दोन रांगा सोडून इंग्लंडमधून आलेला एक मोठा पाकिस्तानी ग्रूप आपल्या भारतीय मित्रांसह आला होता. सगळे पंचवीस ते तीस वयोगटातले. त्यांनी बरेच बॅनर बनवले होते, त्यात एक होता 'O U T'. आपली गोलंदाजी सुरू होण्याआधी मी तो मागून घेतला. त्यांनी विचारले, “आप इसका क्या करोगी?”
माझे उत्तर होते, ”अरे भाई, आपने जो इसे बनानेके लिये मेहनत की है ना, उसे अब हम रंग लायेंगे. अब ये सारी दुनिया में ये दस बार दिखेगा.” त्यावर आजूबाजूच्या सार्या भारतीयांनी पुन्हा “जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा”च्या घोषणा देऊन आमची विंग दणाणून सोडली.
आम्हीही पोटपूजा केली. गमतीची गोष्ट म्हणजे पाणी दहा डॉलर्सला आणि बिअर पाच डॉलर्सला मिळत होती.
सामना परत सुरू झाला. आमचे पाकिस्तानी सहप्रेक्षक रंगात आले होते. ती झेंडा हातात धरून बसलेली छोटी झेंड्याचा हातही न बदलता झेंडा उंचावत, “पाकिस्तान जीतेगा, पाकिस्तान जीतेगा” असे ओरडत होती. हळूहळू जसजशा विकेट पडू लागल्या, तसतसा उत्साहात फरक पडू लागला. प्रत्येक वेळी तो 'O U T’चा बोर्ड आम्ही उंचावत होतो आणि ज्याने तो लिहिला होता, तो खजील होत होता. भरवशाचा फलंदाज असलेल्या पाकिस्तान संघातला, ’सगळ्यात लहान खेळाडू’ शाहिद आफ्रिदी जेव्हा आउट झाला, तेव्हा बसलेल्या धक्क्याने त्या छोटीचे बाबा उठून उभे राहिले आणि मांडीवर छोटा बाळ झोपलाय हेच विसरले. ते बाळ पुढची रांगेतल्या पायरीवर खुर्चीच्या पोकळीतून घसरून पडले आणि रडू लागले. इतक्या जल्लोशात त्याचा आवाज कोणालाच ऐकू गेला नसता; पण ज्या खुर्चीमागे ते पडले, त्या खुर्चीवर आघात झाल्यामुळे त्यावर बसलेल्या बाईने त्याला बाहेर काढून वडिलांपुढे धरले. एव्हाना ते खालीही बसले होते. पण तरीही ते इतके निराश झालेले की त्यांना आपल्या मांडीवर बाळ होते, आता नाही याची जाणीवच नव्हती. बाळाच्या आईने बाळाला घेतले. सुदैवाने त्याला काहीच लागले नव्हते, कारण ते त्या बाईंच्या भल्यामोठ्या पर्सवर पडले होते.
शेवटी आठवी विकेट पडल्यावर इतर पाकिस्तानी प्रेक्षकांसह ते तिथून निघाले. पाकिस्तान हरल्याबद्दल मला त्या छोटीचे फार वाईट वाटले. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिला पाहत होते. ती मागे वळून वळून आम्हाला झेंडा उंचावून दाखवत होती. झेंडा धरलेला तिचा हात काही खाली आला नव्हता.
सामना जिंकल्याच्या आनंदात आम्ही तिथून निघालो. वर्धनच्या चेहर्यावर एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होता.
त्याच भरात त्याने दुसरे स्वप्न पाहिले आणि मलाही दाखवले - ”आत्या, आपण पुढच्या वर्ल्ड कपला लॉर्डसवर बसून मॅच पाहायची हं”. मीही त्यात सहभागी होत म्हटले, ”तथास्तु!”

अब ये सारी दुनिया में ये दस बार दिखेगा.हाहा :) जबर्रदस्त अनुभव आहे :)