Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट

र
रामदास
Tue, 02/17/2015 - 10:55
💬 14 प्रतिसाद
संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. निघताना एकदा घरी फोन करावा काय असा विचार डोक्यात असताना मोबाइल वाजतो. अनोळखी नंबर. एकदा फोन टाळण्याची इच्छा होते, पण सवयीच्या नाइलाजाने फोन घेतो. समोरचा आवाज ओळखीचा नाही, पण निरोप घणघणत डोक्यात जातो. कुणीतरी अचानक गेलं आहे. बर्‍याच वर्षात संपर्कही नाही. पण आयुष्याच्या मैलोगणती विणलेल्या पटात उभे-आडवे धागे गेलेल्या माणसानी विणले आहेत. घरी फोन करतो. "उशीर होईल. झोपा. वाट बघू नका." सगळी निरवानिरव होऊन घरी पोहचेपर्यंत रात्रीचे दोन-सव्वादोन. बाथरूममध्ये गीझर चालू करून बादली भरेस्तो अवघडून सोफ्यावर बसतो. अजून मन सुन्न आहे. बधिर आहे. स्मशानातली धुरकट हवा मनावर राखेसारखी पसरली आहे. अनैच्छिक प्रतिक्रियेत टीव्ही चालू करतो. म्यूट करतो. चॅनेल्स बदलत जातात. चित्रपट सुरू असतो. मधला कुठलातरी सीन चालू असतो. बाथरूममधल्या वाहणार्‍या पाण्याचा सरगळ आवाज. बाकी सगळं शांत. नकळत त्या सीनमध्ये मन गुंतत जातं. नंतर गुंतूनच राहतं. बेडरूमचा दरवाजा उघडून बायको बाहेर येते. नळ बंद करते. प्रश्नार्थक चेहेरा करते, पण बोलायची इच्छाच होत नाही. तीपण बाजूला बसते. चित्रपट उलगडतच जातो. मरण, स्मशान, आंघोळ, थकवा सगळं विसरून दोघंही चित्रपट बघत राहतो. असे अनेक चित्रपट अपरात्री बघितले आहेत. काहींची नावं लक्षात राहिली, तर काही "कोल्हटकर गेले त्या दिवशी रात्री बघितलेला" अशीच आठवण राहिली. त्यातलेच हे काही चित्रपट. २००७ साली प्रदर्शित झालेला हा एक इस्राएली चित्रपट.चित्रपटाला कथा म्हणावी अशी कथा नाही. ’जागते रहो’मध्ये जशी एका रात्रीची गोष्ट आहे तशीच ही गोष्ट. (’जागते रहो’ आणि हा चित्रपट यांत यापलीकडे काही साधर्म्य नाही.) इजिप्सियन पोलिसांच्या बँडची आठ जणांची टीम अनोळखी गावात पोहचते. परंतु आपल्याला ज्या गावात जायचे होते ते हे गाव नाही हे लक्षात येईपर्यंत रात्र झालेली असते. परतीच्या प्रवासासाठी उजाडेपर्यंत व्यवस्था होणार नसते. एका छोट्याशा हॉटेलात जेवणाची सोय होते, पण रात्र काढण्यासाठी लॉज वगैरे काहीच नसते. हॉटेलची मालकीण दिना त्यांची राहण्याची व्यवस्था तिच्या हॉटेलमध्ये आणि इतर परिचितांच्या घरी करते. आणि इथे सिनेमाला सुरुवात होते. तौफीक म्हणजे बँडचा कॅप्टन. दिना म्हणजे हॉटेलची मालकीण. बँडमधला वयाने अगदी धाकटा हालेद आणि इतर पात्रं यांच्या एका रात्रीच्या सहवासाची ही कथा आहे. धक्का देणारे किंवा टचकन डोळ्यात पाणी आणणारे प्रवेश नाहीत. पण अपरिचित माणसं एका रात्रीच्या काही तासांत जवळ येता येता दूर जातात - अवघडलेल्या संभाषणातून एकमेकांच्या आयुष्याचा पोत तपासतात - सकाळ होताच दूर जातात आणि उरतो फक्त एकटेपणाचा अनुभव. इजिप्त असो किंवा इस्राएल, माणसांचे वागण्याचे नमुने वरकरणी वेगवेगळे असले तरी शेवटी मनाचे पापुद्रे उलगडायला जावेत, तर काहीच फरक नाही ह्याची जाणीव करून देणारा पडद्यावर साकारलेला अनुभव म्हणजे हा सिनेमा. हा सिनेमा बघावा तो तौफीकची भूमिका करणार्‍या ससून गबाई या नटाच्या अभिनयासाठी! तौफीक सिनीअर आहे. त्याच्यावर बँडच्या इतरांची जबाबदारी आहे आणि परदेशातल्या अनोळखी लोकांसोबत रात्र काढायची आहे हा ताण त्याच्या (केवळ) चेहेर्‍यावरच्या अभिनयातूनही कळतो.दिना एकटी आहे. संवादासाठी, सहवासासाठी आतुर आहे. पण हे समजूनही तो हालेदला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. काही प्रवेश लांबलचक आहेत. असे प्रवेश म्हणजे कोणत्याही नटाच्या अभिनयाची कसोटी असते. यूट्युबवर हे प्रवेश बघितले, तरी ससून गबाईच्या अभिनयाची खोली कळेल. या सिनेमाला नायक नाही. पण बँडच्या कॅप्टनच्या आसपास फिरत राहणारा हा सिनेमा बघावा तो केव़ळ अभिनयासाठी. चित्रपटाचा शेवट एका गाण्याने होतो. आपल्याला अनोळखी अशा स्वररचनेतले हे गाणे त्या गाण्याच्या क्लॅपिंगसाठी बघावे-ऐकावे असे आहे. मानवी जीवनातील एकटेपणाचे चित्रण अंगावरच कोसळते. (इंग्रजी सबटायटल्समुळे जरा जास्तच.) चित्रपटाबद्द्ल इतर माहिती अर्थातच गुगलल्यावर कळेल. पण कसदार पटकथेचा नमुना म्हणुन एक नमुना देत आहे. "You know, maybe this is how your concerto ends." "I mean, not a big end with trumpets and violin." "Maybe this is the finish, just like that suddenly." "Not sad, not happy," "Just a small room with a lamp, a bed, a child sleeps, and tons of loneliness." (पाहावे मनाचे -www.pahawemanache.com या संस्थळावर हा लेख काल प्रकाशीत झाला आहे.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8163 views

💬 प्रतिसाद (14)
स
सूड Tue, 02/17/2015 - 11:03 नवीन
चित्रपट बघावा असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 02/17/2015 - 11:06 नवीन
चित्रपटाच्या ओळखीपेक्षा पहिला पॅरा आवडला. मस्तं लिव्हलाय तो परिच्छेद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/17/2015 - 11:33 नवीन
चित्रपटाची करुन दिलेली ओळख आवडली...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 02/17/2015 - 12:09 नवीन
लेखकाचे नाव पाहून लेख उघडला. छान ओळख करून दिलीत चित्रपटाची.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/17/2015 - 12:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Tue, 02/17/2015 - 12:39 नवीन
छान ओळख. चित्रपट सुंदरच आहे. ही बँडपार्टी अरब आहे, आणि हॉटेलची मालकीण इस्राएली. शत्रू देशातले असूनही सामान्य लोक एकमेकांचं सुखदु:ख समजून घेतात, हे यात हळुवारपणे दाखवलंय. चित्रपट 'David and Fatima' या प्रेमकहाणीच्या तुलनेत चांगला वाटला. थोडं अवांतर - यात ते रस्ता चुकतात ते अरबी भाषेतल्या दोषामुळे. अरबीत 'प' हे अक्षर नाही, त्याची जागा 'ब'ने भरून काढतात. पार्कींगचा बार्किंग, पिझ्झाचा बिझ्झा असा उच्चार करतात. इथे गावाचं नाव बदलून घोळ होतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/17/2015 - 13:24 नवीन
पहिला उताराच जास्त आवडला. ''स्मशानातली धुरकट हवा मनावर राखेसारखी पसरली आहे'' च्यायला, यातुन लवकर बाहेर पडता येत नै. रामदास काका, असंच काही तरी याच विषयावर जरा वेगळं लिहा हो तुमच्या समर्थ लेखनीने एकदा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/17/2015 - 15:24 नवीन
अगदी हेच वाटले !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 02/17/2015 - 15:52 नवीन
''स्मशानातली धुरकट हवा मनावर राखेसारखी पसरली आहे'
अगदी हेच्च बोलतो. लेख वाचून झाला तरी हे वाक्य अजूनही डोक्यात घुटमळतंय.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/17/2015 - 15:56 नवीन
>>लेख वाचून झाला तरी हे वाक्य अजूनही डोक्यात घुटमळतंय.
अगदी. आतापर्यंतच्या स्मशानवार्‍या उभ्या राहल्या डोळ्यासमोर!!
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 02/17/2015 - 16:32 नवीन
चित्रपट पाहिला आहे. उत्तमच आहे. अभिनय न विसरता येण्याजोगा.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 02/17/2015 - 21:23 नवीन
चित्रपटाची ओळख आवडली नक्की बघणार आता.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/18/2015 - 01:00 नवीन
असंच एकदा कोणाच्या यात्रेला जाऊन मनावरची राख झाडत इतरांबरोबर स्मशानाबाहेर आलो. कोपऱ्यावरच्या टपरीवर आल्यावर एकजण "आता एक मस्त चहा घेऊ या " किती ओझं उतरलं ते राखेचं लवकर. लेख कल्लाच नाही तुम्हाला असं म्हणेल लगेच कोणी. आता यावरून आणि एक सिनेमा आठवला "दे डाइड हैपिली एवर आफ्टर" अर्थात मृत्युचं महत्त्व. बैंड पाहिला आहे थेटरात आणि भूवनशोम ही.एकाच प्रसंगी वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात काय चाललेलं असतं ते सावकाश दाखवतात आणि चित्रपट लक्षात राहतात. अत्यंत संथ चित्रिकरण फारच चांगला परिणाम कारक ठरते.
  • Log in or register to post comments
N
NAKSHATRA Fri, 01/22/2021 - 14:32 नवीन
छान ओळख. चित्रपट सुंदरच आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा