त्रिकूट - भाग १
"चिवचिव"
"चिवचिव"
तिची तंद्री अखेर मोडलीच त्या आवाजाने. मान वेळावून न पाहता तिने तो आवाज पुन्हा ऐकला.
हं! आल्या चिमण्या. रोजच येतात म्हणा. आणि रोजच आपण त्यांना खायला टाकतो. आज फरक फक्त इतकाच आहे की रोज ऑफिसला धावतपळत जायची घाई असते. धावतपळत?! स्वतःशीच हसली ती.
रावी.
तिचं नाव.
एक नावाजलेली उद्योजिका. ती इंजिनीअर झाली तेंव्हाच ठरवून मोकळी झाली होती की आयुष्यभर कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करणार. सुरूवातीची काही स्ट्रगलची वर्षे सोडली की स्वतःची कंपनी सुरू करायची. तिच्या धडाडीने आणि गुणवत्तेने ते फारसं अवघडही नाही गेलं म्हणा तिला. तिच्या क्षेत्रातली उदयोन्मुख कंपनी असूनही एक नाव होतं तिच्या कंपनीचं. अर्थात तिने तशी गुणवत्ता जोपासली होती. पुढचे प्लॅन्स बनवायला सुरूवात झाली होती. गेल्या १० वर्षात प्रचंड वेगात गेलं होतं तिचं आयुष्य.तिने स्वतःला जरासुद्धा उसंत मिळू दिली नव्हती. खरंतर मोकळ्या वेळाची भितीच वाटायची तिला. पुन्हा ते सगळे विचार.
तो जुना काळ.. तो गुंता.. नकोच ते.
छे!
पुन्हा मन भरकटायला लागतंय की काय असं वाटलं रावीला. पण क्षणात तिनं स्वतःला सावरलं. तिला स्वतःला सावरायची सवयच लागली होती म्हणा. ती दोघं तिच्या आयुष्यातून निघून गेल्यापासून हेच तर करत आली होती ती. ती दोघं गेल्यावर उन्मळून पडलेलं तिचं आयुष्य. जे सावरायला मदत करणारं कोणीच नव्हतं तिच्याजवळ. स्वतःच स्वतःची समजूत काढत पुन्हा उभी राहिली होती ती.
सर्रर्र!
कसला आवाज आहे हा? दरवाजाखालून कोणीतरी एक कागद सरकवला होता. रावी उठली. काय ताप आहे, एक दिवस रजा घेतली तर आरामात पडू देत नाहीत लोक, असे विचार मनात येत असतानाच तिने बघितलं की तो कागद नाही पाकिट आहे. कुठल्याशा प्रवास कंपनीच्या जाहिरातींच.
अरे काय ही माणसं? खालच्या मजल्यावर टपालपेट्या आहेत की सगळ्यांच्या. तरी इथे दारापर्यंत कशाला येतात? वॉचमनला खडसवायला हवं. टपालपेटी. स्वतःशीच खुदकन हसली ती. काहीकाही शब्द आवर्जून मराठीतूनच बोलायची ती. थेट तिच्या बाबांसारखी. बर्याच शहरात कामानिमित्त राहिल्यामुळे तिची भाषा अगदी मेट्रोपॉलिटन झाली होती. आता हीच ती शुद्ध तुपातली मराठी बोलणारी रावी हे कोणाला सांगूनही पटलं नसतं.
सहजच बाबांची आठवण आली तिला. कालच तर त्यांचा फोन येऊन गेला. नेहमीचं बोलणं झाल्यावर त्यांचा कातर आवाज."तुझी घुसमट बघतोय मी बाळा. पण रावी हे असं स्वतःला किती दिवस त्रास देणार आहेस तू? तुलाही आनंदी असायचा हक्क आहे हे कधी समजणार तुला?" बाबांचे नेहमीचेच प्रश्न आणि त्यावर ठरलेलं उत्तर असल्यासारखं रावीचं मौन.
"जोपर्यंत मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त झालंय असं वाटत नाही तोपर्यंत नाही बाबा. तोपर्यंत तुमची रावी अशीच राहणार. तुम्ही मला इतक्या गोष्टी दिल्यात आजपर्यंत. आईच्या माघारी मला मोठं केलंत, एक संपन्न माणूस म्हणून घडवलंत. फक्त आता ही साथ सोडू नका. मला मान्य आहे माझं हे असं घुसमटत राहणं नाही पटत तुम्हाला. पण मी तरी काय करू? ती दोघं माझ्या आयुष्यातून निघून गेली ते जाताना सगळा आनंद, धमाल, मस्ती सगळं घेऊन गेली. आता उरलंय ते यंत्रवत आयुष्य. आय अॅम सॉरी बाबा. पण मला अजून वेळ हवाय.खरंच सॉरी"
"ठेवतो गं. काळजी घे" असं म्हणत रावीच्या बाबांनी फोन ठेवला. तिला जाणवलं बाबांच्या डोळ्यातलं पाणी. पण तिचा नाईलाज होता. ती इकडे लांब कामानिमित्त आणि बाबा गावी. एक सुस्कारा सोडून रावी सोफ्यावर बसली. बास आता, आणखी विचार करायची शक्ती नाही असं म्ह्णून आता फक्त आराम करायचा असं ठरवून तिने हातातल्या पाकिटावर नजर टाकली.
Experience the real nature with us
Experience the adventure with us
Experience Kashmir with us.
काश्मीरच्या ट्रीप्स नेणार्या कोणत्यातरी कंपनीची जाहिरात.
आणि रावीनं ते पाकिट फेकून दिलं. कोपर्यातल्या पेपर्सच्या ढिगावर जाऊन पडलं ते.
क्रमशः
एक नावाजलेली उद्योजिका.... तिच्या क्षेत्रातली उदयोन्मुख कंपनी असूनही एक नाव होतं तिच्या कंपनीचं.हे आणिती इकडे लांब नोकरीनिमित्त आणि बाबा गावी.याचा संबंध / अर्थ लागला नाही. बाकि सुरुवात लहान पण छान आहे. पुभाप्र.