वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)
Book traversal links for वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)
वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)
वेरूळच्या जैन लेणींपासून सुरुवात करून ब्राह्मणी लेण्यांचे दर्शन घेत कैलासावरून सरकत सरकत म्हणजेच लेणी क्र. ३४ पासून लेणी क्र. १३ पर्यंत उलटा प्रवास करत करत आपण आता पोहोचलो ते वेरूळच्या सर्वात जुन्या लेण्यांपाशी, बौद्ध लेण्यांपाशी.
ह्या लेण्या जुन्या म्हणजे किती जुन्या? तर फार जुन्या नाहीत, फार जुन्या नाहीत म्हणजे ह्या हिनयानपंथीयांच्या नाहीत. ह्या आहेत महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या. महायान कालखंडात बौद्धांमध्ये मूर्तीपूजेचा प्रसार झाल्यामुळे ह्या लेण्यांमध्ये बोधीसत्वांच्या मूर्तींबरोबरच तारा, भ्रुकूटी, जम्भाल्, हरिती, महामयुरी अशा काही आगळ्यावेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात.
चला तर मग ह्या बौद्ध लेण्यांच्या सफरीला.
लेणी क्र. १२ (तीन ताल)
तीन मजल्यांच्या रचनेमुळे ह्या लेणीला तीन ताल असे म्हटले गेले. सुरुवातीच्या काही पायर्या मग खडकातच खोदून काढलेले प्रवेशद्वार, त्यापुढे विस्तीर्ण प्रांगण आणि समोर तीन भव्य मजले अशी ह्याची रचना. हे तीन मजले तरी कसे तर आजचे हॉस्टेल कसे असेल तसेच. जणू जुन्या काळची वसतीगृहेच ही. पण रचना जरी अशी असली तरी येथे विश्रांतीकक्ष फारसे नाहीत. मात्र प्रत्येक मजल्यावर गाभार्यासदृश कक्ष आणि त्यात बुद्धमूर्ती अशी ह्याची रचना आहे. साहजिकच वर्षावास म्हणून ह्यांचा वापर फार कमी होत असावा व ही बुद्ध प्रार्थनेची केंद्रे असावीत हे सहजी लक्षात येते.
१. तीन ताल चे प्रथम दर्शन
सभामंडप खांबांवर तोलून धरलेला असून आतील बाजूस गर्भगृह आणि त्यात बुद्धाची धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेतील आसनस्थ प्रतिमा आहे.
प्रवेशद्वारातून आता जाताच उजवे बाजूस विविध प्रकारची बोधिसत्वांच्या प्रतिमांची मंडळे आहेत. त्यात मध्यभागी पद्मासनस्थ बोधीसत्व आणि त्याच्या बाजूने ८ बैठे बोधीसत्व अशी याची रचना. याच्याच बाजूचे एका भिंतीवर अशाच प्रकारचे एक मंडल असून त्या मंडलाचे वर बोधीसत्व आणि त्याच्या भोवती तारा आणि मंजुश्री ह्या बोधीशक्ती
आजूबाजूच्या भिंतींवर आणि स्तंभांवर देखील अशाच प्रकारच्या प्रतिमा आहेत.
२. सभामंडपाची रचना
३. बोधीसत्व मंडले
दुसर्या मजल्यावर जाण्यास सभामंडपाच्या डावीकडच्या भिंतीतच सोपानमार्ग खोदला आहे. दुसर्या मजल्याची रचनासुद्धा पहिल्या मजल्यासारखीच पण इथे असलेली शिल्पे जास्त सुस्पष्ट आणि देखणी आहेत.
इथेही भिंतींवर पहिल्या मजल्यासारखीच बोधीसत्व प्रतिमा असलेली मंडळे आहेत. उजव्या कोपर्यातील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर आणि त्याच्यासह स्त्री प्रतिमा अर्थात बोधीशक्ती आसनस्थ असून सर्वांनी हाती कमळे धारण केली आहेत.
४.
डावीकडील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर, डावीकडे स्त्री बोधीसत्व तारा वरदमुद्रेत आणि भ्रुकुटी पाण्याचा कुंभ घेऊन स्थापित आहेत.
५. रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी
बाजूच्या भिंतींवर अशीच लहानमोठी शिल्पे असून समोर गर्भगृह आहे. गर्भगृहाचे दार कुलूपबंद असल्याने आतली बुद्धमूर्ती पाहण्यास मिळाली नाही मात्र द्वारपट्टीकेच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसरे बाजूस वज्रपाणी बोधीसत्व आहेत.
६. बोधीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी
-
डावीकडच्या भिंतीतूनच तिसर्या मजल्यावर जायचा मार्ग आहे. येथेच भिंतीत एक दुमिळ शिल्पे आहे. ह्यात गौतमाने सत्य शोधण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केल्याचे दर्शवले आहे. ह्यात गौतम आपल्या घोड्यावर बसून आपले राज्य सोडून पुढे चालला आहे.
७. महान प्रवास
तिसरा मजला अवश्य पाहावाच असा. येथील भिंतींवरील शिल्पपटात बोधीसत्वांच्या भूमीस्पर्श, धम्मचक्रपरिवर्तन अशा विविध मुद्रेतील देखणी शिल्पे आहेत. तर मंडपाच्या समोरील बाजूस डावीकडे सात मानुषी बुद्ध तर उजवे बाजूस धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेत बसलेले सात बोधीसत्व आहेत. बुद्ध असलेले दोन अतिभव्य असे शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटाचंच्या आतील बाजूस म्हणजेच गाभार्याच्या दोन्ही बाजूना तीन तीन बौद्ध देवतांच्या स्त्री प्रतिमा (बोधीशक्ती) कोरलेल्या असून द्वारपट्टीकेच्या दोन्ही बाजूंस दोन्ही हाताची घडी घातलेले बोधीसत्व द्वारपाल आहेत. कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव ह्या हाताची घडी घातलेल्या द्वारपालांवर जाणवतो.
८. तिसरा मजला
९. तिसर्या मजल्याची साधारण रचना व त्यात असलेले शिल्पपट
१०. धम्मचक्रपरिवर्तन मुद्रा
११. ध्यानमुद्रेत बसलेले सात मानुषी बुद्ध
१२. धम्मचक्रपरीवर्तन मुद्रेत असणारे सात बोधीसत्व
१३. गर्भगृहाच्या डाव्या बाजूस असलेल्या तीन स्बोधीशक्ती प्रतिमा
१४. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन बोधीशक्ती प्रतिमा
१५. हाताची घडी घातलेला बोधीसत्व द्वारपाल
गाभार्यातील भव्य बुद्धमूर्ती मात्र दार कुलूप आवून बंद केलेले असल्याने येथेही पाहता आली नाहीच. तीन ताल बघून मग आम्ही वळलो ते लेणी क्र. ११ कडे.
लेणी क्र. ११ (दोन ताल)
ह्या लेण्याची रचना सुद्धा लेणी क्र. १२ प्रमाणेच. पूर्वी ह्या लेणीचा तळमजला ढिगार्यात गाडला गेला असल्याने वरचे दोन मजलेच दृश्यमान होते म्हणून ह्याला दोन ताल (दुमजली लेणे) असे नाव पडले. कालांतराने तळमजला साफ करून आजच्या स्थितीत आणला गेला.
१६. दोन तालचे मुखदर्शन
ह्या लेणीची रचना तीन ताल प्रमाणे असूनही अंतर्भागातलई रचना किञ्चित वेगळी आहे. आतील सभामंडप जास्त रूंद नाहीत मात्र प्रत्येक मजल्यावर मधे गाभारा व आतमध्ये बुद्धमूर्ती आहे. रचना साधारण सारखीच असल्याने येथे प्रत्येक मजल्याचे वर्णन न करता काही निवडक छायाचित्रे देतो.
१७. गर्भगृहातील भूमीस्पर्श मुद्रेतील बुद्धप्रतिमा. बुद्धाने मारविजयानंतर भूमीला स्पर्श करून तिचे आवाहन केलेयाचे हे प्रतिक.
१८. दुसर्या मजल्याची रचना
१९. ओसरीतील स्तंभांवरील वाळूच्या घड्याळ्यासारखी दिसणारे नकसकाम
२१. आतील भिंतींवरील बोधीसत्वाच्या मूर्ती असलेल्या चित्रचौकटी
२२. तिसर्या मजल्यावरून दिसणारे प्रांगण
ह्या भागात आपण १२ व १३ क्रमांकाच्या बौद्ध लेण्या थोडक्यात पाहिल्या. बौद्ध मूर्तीशास्त्राची फारशी माहिती नसल्याने येथे प्रत्येक मूर्तीचे सविस्तर वर्णन देणे मला शक्य झाले नाही. आता पुढच्या शेवटच्या भागात उरलेल्या बौद्ध लेणी पाहून आपण वेरूळ सफरीची सांगता करूयात.
क्रमशः
शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहेवल्ली मस्त आहे लेख. मी यकुबरोबर ह्या लेण्या पाहिल्यात. पुढील बुद्ध आहेत 'अरी मैत्रेय'.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings