Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स म्हण्जे काय रे भाउ ?

च
चौकटराजा
Tue, 01/28/2014 - 12:58
🗣 96 प्रतिसाद
भारताच्या राजकारणात १९६९ हे वर्ष फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण पणे अनेक नेत्यांच्या मताना मान असे राजकारण त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षात चालत असे. आजही काही प्रमाणात असे राजकारण फक्त भाजप या पक्षात चालते असे म्हणण्यास हरकत नाही. पण बाकी राहुल गांधी, मुलायम सिंग, जयललिता, लालूप्रसाद, मायावती, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ई ई त्या त्या पक्षातील हुकुमशहाच आहेत. तशा प्रकारची कबुली त्यांचे प्रवक्ते देतच असतात. ( काही कारणाने आपण शरद पवार याना हुकुमशहा या यादीत नको टाकायला ! ) इंदिरा गांधी च्या उदयानंतर काँग्रेस पक्षात " वरून खाली" राजकारणाची सुरूवात झाल्याचे दिसते. " हाय कमांड" हा शब्द " रिमोट कंटोल" हा शब्द त्याची फळे आहेत. सध्याचा आप पक्ष हा केजरीवालानी भारतात चालविलेला अपारंपारिक राजकारणाचा प्रयोग असून हा प्रयोग भारतातील शिकलेले नागरिक करीत आहेत. काही न शिकलेल्या व पारंपारिक राजकारणाने फसविले गेलेल्या कमी शिक्षितांचा ही पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षापेक्षाही मोठ्या प्रमाणावर या पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी होताना दिसते आहे. आप पक्ष या प्रयोगातील एक साधन आहे. कारण आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्‍यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश नागरिकाना मान्य नाही. त्यातून "माहितीचा कायदा" नावाची कल्पना घटनेचा परम आदर असणार्‍याना देखील चकित करणारी अशी आहे. पाच वर्षे मत दिल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही .सरकारच्या कारभाराचे मुल्यमापन वेळोवेळी करणार ! कर प्रणाली, निवडणूक प्रक्रिया ई महत्वाच्या मुद्यांवर आंदोलने करून घटनेत बदल कारावयाला लावणार व लोकांचे खरेखुरे प्रतिनिधी तिथे पाठवणार हा संदेश प्रस्थापित राजकारणाला देण्याचा हा प्रयोग आहे.म्हणून दिल्ली विधानसभेत इमानदार व बेईमान अशा दोनच जाती आम्ही मानतो असे केजरीवाल यानी सांगितले आहे. हिंदू- मुस्ल्लीम सवर्ण- दलित या भेदांपेक्षाही मूलभूत भेद कोणता आहे व तो प्रगतीला कसा घातक आहे याचे विवेचन या केजरीवाल यांच्या एका वाक्याने होईल.ध्रुवीकरण हे वैचारिक धाटणी पेक्षा वर्तणुकीतील धाटणीने करा असा कोणीतरी केजरीवाल याना पुढे करून या देशाला बजावीत आहे. आपल्या देशात खरे तर डावी विचार सरणी, उजवी विचार सरणी व मध्यम मार्ग असे राजकारण झाले तर मी म्हणेन ठीक आहे.साधनसंपत्तीचा वापर व वितरण कसे व्हावे हे सांगणारे हे तीन मार्ग आहेत. त्याना काही तरी तार्किक पाया आहे. पण बर्‍याच बाबीत सारखीच आर्थिक व सामाजिक धोरणे असणारे भाजपा व कोंग्रेस हे एकमेकाना पर्यायी पक्ष कसे असू शकतात? हे न सुटणारे कोडे आहे.कॉग्रेस पक्षाने बाहेर धाडलेले ,त्यातून नाराज होऊन बाहेर पडलेलेच एकूण चार पंतप्रधान आपण निवडून दिलेले आहेत.म्हणजे त्या पक्षाच्या विचारानेच त्या वेळेही तिथे राज्य केलेले दिसते. भारताचा प्रधानमंत्री डाव्या पक्षाचा झाला तरच खर्‍या अर्थाने विरोधी पक्षाचे राज्य भारतावर आले असे म्हणता येईल. जगात डावी विचारसरणी मार खाताना दिसतेय मग अशा विचारसरणीचे सरकार भारतात येणेच दुरापास्त आहे.मग सामान्य माणसे खाजगीत बोलताना असे म्हणतात की " भाजपा व काँग्रेस " हे एकाच माळेचे मणी असून त्यानी सत्ता येन केन प्रकारेण जिंकण्याचा डाव करण्याचा फार्स लोकांपुढे चालविला आहे.जिंकेल त्याला ६५ टक्के हरेल त्याला ३५ टक्के अशी विभागणी मिळणार्‍या मलिद्याची नंतर करू. असा त्यांचा एक अलिखित अजेंडा आहे. कारण भाजपाकडून उभा रहाणारा साधा नगरसेवक देखील सत्ता नसताना कॉग्रेस इतकाच खर्च निवडणूक पूर्व करमणूक, सहली यावर करताना दिसतो. हा पैसा त्याला सत्ता नसताना मिळतो कोठून ? आतापर्यंत भाजपाने खर्‍या अर्थाने कोंग्रेसचा एकही खासदार वा आमदार वा मंत्री राजकारणातून " भ्रष्ट " आहे म्हणून हद्दपार केल्याचे उदाहरण असेल तर सांगा. उलट गडकरी प्रकरणात हेच लोक एकमेकाना अशी मद्त करीत असतात हेच बाहेर आले ना ? ६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत खासदार, आमदार हे लोकांशी मिसळत असत . भेटत असत. त्याना फारसे आर्थिक अधिकार ही नव्हते. खासदार वा आमदार हा लोकांचा वैधानिक प्रतिनिधी असे. कायदेमंडळ असे खरोखरचे स्वरूप संसद व विधानसभेचे असे. एस टी च्या गाडीत पुढचे पाच सीट मधे एक दोन सीट्स यांच्या साठी राखून ठेवली जास्त. त्यानंतर त्याना निधी वाटपाचे अधिकार मिळाले. इतर अनेक ठिकानी लुडबुड करण्याचा अधिकार त्यानी स्वत:कडे घेतला व लोक नुसते पहातच राहिले. पाच वर्षातून एकदा चेहरा दाखवायचा. ठराविक एरियात पैसे, लुगडी, वाटायची व निवडून यायचे. या मधे ५१ टक्के मते न मिळाली तरी चालत असत. त्यामूळे डिव्हाईड अ‍ॅन्ड रूल ही ब्रिटीश पद्धति आपल्या राजकरणाने ही स्वीकारली. मग एका विशिष्ट जातीला प्रतिनिधीत्व नाही मिळाले तर पक्षशिस्त तर पाळायची पण त्याच जातीचा एखादा अपक्ष उमेदवार मते फोडण्यासाठी उभा करायचा असे खेळ चालू झाले. या सर्वाचे कारण असे की गुप्त मतदानाचा आपण केलेला बाउ. लोकानी पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हायचे. आपल्या मगदुराप्रमाणे समस्या सोडविण्यात भाग घ्यायचा, पदे मिळवायची निवडणुका घेऊन, अशा रितीने पक्ष उभारायचा असे न होता. गणपती उत्सवातून, गरबा उत्सवातून, प्रसिद्ध व्हायचे हळू हळू कोणत्या तरी पक्षात बस्तान बसवायचे. पैशाच्या जोरावर व दादागिरीने पक्षास नमवायचे, व खर्‍या कार्यकर्त्याना बाजूस सारून जात धर्म व पैसा वर दादागिरी यांच्या संकराने वर वर जायचे हा खाक्या निर्माण झाला. यात पतसंस्था काबीज करणे, साखर कारखाने पटकाविणे, शिक्षणसंस्था, दूध उत्पादक संस्था बळकविणे यातून पदाधिकारी व त्यांचे पुढेमागे धावणारे हितसंबंधी यांचे टो़ळके निर्माण झाले.आमचे स्फुर्तिस्थान व त्याखाली शुभेच्छुक यांचे फोटोची लाईन असे फ्लेक्स निर्माण करून त्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची युक्ती सर्वच पक्षात उदयास आली. याचा पुढचा टप्पा म्हण्जे या टो़ळक्याला भक्कम संरक्षण देण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी सोयीचे लोक राज्यपाल पदी नेमणे, सोयीचा राष्ट्रपती निवडणे ई पासून ते राजकीय सूड म्हणून कोणी कुणाचे करियर संपवू नये म्हणून लोकप्रतिनिधीना वेगळा न्याय देण्याचे विधेयक ही संसदेत आले. एका अंतुले यांच्या उदाहरणाचा दाखला देऊन केवढी चुकीची पायरी आपले संसद सदस्य ओलाडित होते हे आपण सार्‍यानी पाहिले. वास्तविक सर्व नोकरशहा व लोकप्रतिनिधी यांच्यावर खरोखरीच कुणी किटाळ आणत असेल तर त्याला फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचा पर्याय निर्माण करून एक तर सन्मानाने त्याला सार्वजनिक जीवनात परत संधी देणे वा अशा किडक्या आंब्याला गजाआड पाठविणे दोन्ही बाबी साध्य झाल्या असत्या. पण असे कोणतेही व्हिजन या तथाकथित जाणत्या राजांकडे नाही. सगळयात विशेष दु:खाची गोष्ट अशी की भारतातील बर्‍याचशा विचारवंताना हे काहीतरी सन्मान देऊन मिंधे करून घ्यायचे. जरा काही नवा विचार , आंदोलन आले की राज्यघटनेचा अवमान झाला असा डंका पिटण्याची काही विचारवतांकडून (?) व्यवस्था करायची.लोकानुनयी निर्णय व लोकांसाठी निर्णय यात गल्ल्लत करायची. अशी खेळी हे पारंपारिक राजकारण करत आहे. काही सामान्य लोकांचे हितसंबंध त्यामुळे राखले जात असतीलही पण बर्‍याच सामान्य जनाना आपली फसवणूक होत आहे याचीही जाणीव होत आहे. त्या जाणीवेची सुरूवात आण्ण्णा हजारे यांच्या आंदोलनाने झाली आहे. केजरीवाल यानी अगदी आताच दिलेल्या मुलाखतीत " ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे. देश प्रथम मग पक्ष मग सदस्य या त्रयीला आप कितपत न्याय देते यावर सारे अवलंबून आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20223 views

🗣 चर्चा (96)
स
सुनील गुरुवार, 01/30/2014 - 08:55 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे " पक्ष" ही सोय आहे तिला कायदेशीर अर्थ काहीही नाही. " पक्ष" या शब्दाची काहीही ठोस व्याख्या आपल्या संविधानात नाही
असे अण्णा हजारे म्हणतात!! भारतीय संसदेने पक्षांतर-विरोधी कायदा पूर्वीच मंजूर केलेला आहे. त्याअर्थी "पक्ष" म्हणून काही आहे त्याला संसदेची मंजूरी आहे, हेच सिद्ध होते. शिवाय, घटनेने स्थापीत झालेला निवडणूक आयोग जेव्हा "राष्ट्रव्यापी पक्षाची" व्याख्या करतो आणि त्याला (त्याच्या सर्व उमेदवारांना) देशभर एकच निवडणूक चिन्ह बहाल करतो तेव्हा त्या आयोगालाही "पक्ष" म्हणून काही आहे याची जाणीव आहे, हेच सिद्ध होते.
पक्षाने काढले तरी खासदार बडतर्फ होत नाही. यातच पक्ष या शब्दाची कायदेशीर लायकी काय आहे हे कळून येते
हे पक्षांतर-विरोधी कायद्यानंतर झाले. पूर्वी असे नव्हते. यातच "पक्ष" ही संकल्पना संसदेला मंजूर आहे, हेच सिद्ध होते. जगात पक्षविरहीत लोकशाही असलेला देश कुठला आहे काय? असो.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 01/30/2014 - 11:17 नवीन
पक्ष जगात आहेत हे कबूल त्याप्रमाणे " पक्ष" या टर्मची व्याख्या करणारे एकही कलमा त्या त्या देशांच्या संविधानात नाहीच असे म्हणण्याला पुरावा नाही. प्रशन असा आहे की असा पुरावा भारतीय संविधानात आहे की नाही ? बाकी सी बी आय ची स्थापनाच मुळी बेकायदेशीर आहे. असा काहीसा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यात काही तथ्य आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. म्हणजे ही बाब वेळोवेळच्या ५४३ खासदारांच्या कशी लक्षात आली नाही. असेच पक्षांतर बंदी कायदा करताना पक्ष याची काही व्याख्या आहे की नाही याचीच काळजी घेतली गेली नाही असे असू शकेल की नाही ? बाकी आपल्या माहितीत एक दुरूस्ती -- १९५२ चा निवडणुकांपासून आज तागायत आपण पक्षाला निवडून देत नाही व्यक्तीलाच देतो.हे त्रिवार सत्य आहे. सबब पक्षांतर बंदी कायदा येण्यापूर्वी ही खासदाराचे खासदारपण पक्ष कादून टाकू शकत नव्हता आजही नाही. पक्ष फक्त पस्तावा झाल्याचा ठराव करू शकतो. ते सुद्धा संसदे मधे नव्हे तर त्यांच्या " खाजगी" सभेत.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 01/30/2014 - 12:00 नवीन
बाकी सी बी आय ची स्थापनाच मुळी बेकायदेशीर आहे. असा काहीसा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्णय गुवाहाटी उच्चन्यायालयाने दिला होता. त्याला, माझ्या माहितीप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने विरोध दर्शविला आहे. गुवाहाटी उच्चन्यायालय ज्या तत्परतेने एकाच खटल्यात दोन्ही बाजूनी स्टे ऑर्डर देते, ती बघता 'न्यायालयाच्या अवमाना'चा बडगा असूनही मी तरी गु.उ.न्या.ला सिरीयसली घेऊ शकत नाही.. बाकी चर्चा वाचत आहे.. चालू द्या..
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/31/2014 - 02:45 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/30/2014 - 11:43 नवीन
माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. !!! निवडणूकीचे नियम म्हणजे काही "अढळ" लेखन नव्हे. ते बहुमताच्या संमतिने बनवलेले त्याकाळात उपयोगी असे मानदंड असतात, जे भविष्यात बहुमताने बनवलेले नवे नियम आस्तित्वात येईपर्यंत लागू असतात. वस्तुस्थिती आणि कालमानाप्रमाणे न बदलले जाणारे नियम चांगल्या / खर्‍या / प्रगतिशील लोकशाहीचे लक्षण असणार नाहीत. म्हणून आपल्याला अन्याय वाटणार्‍या नियमांबद्दल लोकशाही पद्धतीत बसणार्‍या कृतींनी विरोध दाखवायला अथवा ते बदलण्यास केलेल्या प्रयत्नांना बंदी लोकशाहीत बसत नाही. मात्र याबरोबरच हे ही खरे की जोपर्यंत नवीन नियम लोकशाही तत्वांप्रमाणे मान्य होवून अंमलात येत नाहीत तोपर्यंत सर्वांनी अगोदर मान्य झालेले नियम मानूनच व्यवहार करणे योग्य असते.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/30/2014 - 18:13 नवीन
माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. आत्ता निवडणुका लढवताना संपुआ ला सत्तेत असल्याने त्यांना योग्य वाटतील असे नियम बदलता येऊ ही शकतात पण त्यांनी कुठल्याही कारणाने तसे बदलले नाहीत, आणि म्हणून ते तसेच राहीले तर येणार्‍या निवडणुकात त्याच नियमांनी निवडणुका लढवाव्या लागतील. त्यात जी काही हार-जीत होईल ती ज्या नियमांच्या अंतर्गत निवडणुका घेतल्या गेल्या त्याच नियमात होईल असे म्हणणे योग्य आहे. पण उद्या बहुमत आणि पाठींबा असेल आणि संपुआच्या ऐवजी रालोआ अथवा तिसरी आघाडी सत्तेवर असली आणि त्यांनी त्या पाठींब्याच्या जोरावर बदल केले तर ते नवे नियम हे पुढील निवडणुकीस लागू ठरू शकतील... असा बदल लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. नियम, कायदे आणि घटना यातील प्रत्येक वाक्य आणि अगदी विरामचिन्हांच्या जागांसहीत काळ्या दगडावरची रेघ आहे असे समजण्याचे कारण नाही. अगदी निवडणुकांच्या बाबतीत साधे उदाहरण देयचे झाले तर निवडणूक आयुक्तांबद्दल देता येईल. शेषन यांनी त्यांना असलेल्या हक्कांचे अर्थ लावत निवडणूक आयोगाला दिशा दिली. मग कायद्यात अथवा घटनेत बदल करत एका ऐवजी तीन आयुक्त आणण्यात आले. यात बरोबर-चूक संबंध नाही पण तत्कालीन (राजीव) सरकारला असलेल्या हक्कात त्यांनी ते बदल केले. उद्या नियमाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे नकोत असे म्हणू शकाल... असे अजूनही सांगता/लिहीता येईल कदाचीत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/03/2014 - 06:33 नवीन
इस्पिक एक्का व विकास या दोघांच्याही मताशी सहमती आहेच. त्याची मते माझ्याच मताची पुरवणी/विस्तार आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/03/2014 - 08:12 नवीन
त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. बाकी सगळे ठीक. पण तुमच्या अगोदरच्या प्रतिसादातले (येथे ठळक केलेले) अट्टाहासपूर्ण वचन लोकशाहीत अजिबात बसत नाही. त्याला माझ्या प्रतिसादात विरोध आहे. वर तो विरोध पुरा स्पष्ट झाला नसावा असे वाटल्याने आता येथे परत लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/03/2014 - 08:18 नवीन
नै कळ्ळे. अजूनही आपल्यातील विरोध स्पष्ट नाही. तुम्हाला आवश्यक ते बदल घडवून आणायसाठी निवडणूकीला उभे राहुन जिंकणे आवश्यक आहे. अगदी निवडणूक पद्धतीतही बदल घडवायसाठी "सध्याचे नियम" वापरूनच निवडणूकीला उभे रहावे लागेल. सद्याच्या नियमांनी निवडणूकीला उभे न राहता नुसते "नियम बदला नियम बदला" करून काय होणार? मात्र जनतेने तुमची मते नाकारल्याने हरल्यावर या नियमांमुळेच हरलो असे ओरडायचे असेल तर त्यापेक्षा उभेच राहु नका कारण नियम आधीच घोषित केलेले आहेत आणि सर्वांना सारखेच आहेत.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Mon, 02/03/2014 - 08:43 नवीन
To END the race, you have to WIN the race. To win the race, you have TO BE IN the race.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/03/2014 - 08:57 नवीन
१. असलेले नियम योग्य नाहीत हे मत मांडण्याचा व त्यांचा कायदेशीर रितीने विरोध करण्याचा जेवढा हक्क प्रत्येक नागरीकाला आहे तेवढाच न पटणार्‍या नियमाने बद्ध निवडणूकीलाही उभे राहण्याचा हक्क त्याला आहे. म्हणूनच, एकाला वगळून मगच दुसरे करा (एक्सल्कुजिव) असे म्हणणे योग्य नाही. २. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंनाच नियम करण्याचा आणि बदलायचा अधिकार असतो. पर्यायाने, शासनात निवडून आल्यावर नियमात बदल करणे हे शासनावर बाहेरून दबाव आणून नियम बदलून घेण्यापेक्षा जास्त सोपे असते. ३. लोकशाहीने दिलेल्या पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय वापरण्याचा अधिकार नागरिकाला नाही असे म्हणणे लोकशाहीविरोधी आहे. मला वाटते आता मुद्दा पुरेसा स्पष्ट झाला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/03/2014 - 09:08 नवीन
आणि एक... जर नियम योग्य नाहीत हे मत असेल तर, "निवडणूकीला उभे रहा" अथवा "राहू नका" अथवा "ते मत निवडणूक हरल्यावर परत प्रतिपादन करा" यात काहीच विरोधाभास नाही... कारण सर्व पर्यायांत मत न बदलता तेच आहे. जीवनात अनेकदा आपल्याला पसंत नसलेल्या परिस्थितीत जगावे लागते. याचा अर्थ ती परिस्थिती योग्य आहे असे म्हणायलाच पाहिजे असे नाही आणि त्या परिस्थितीशी कायदेशीर पद्धतीने तडजोड करत जगताना तिचा मुकाबला करणे योग्य नाही असेही नाही. थोडक्यात, "यायचं तर या, नाहीतर गेलात उडत" ही "खळ्ळ-खट्याक" पद्धत आकर्षक वाटली तरी ती सर्वसमावेशक नाही आणि लोकशाहीवर्धक तर नाहीच नाही :) असो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/03/2014 - 12:55 नवीन
काय बोलताय?
लोकशाहीने दिलेल्या पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय वापरण्याचा अधिकार नागरिकाला नाही असे म्हणणे लोकशाहीविरोधी आहे.
मी कुठे अधिकार नाही म्हटले आहे? मात्र निवडणुकीला उभे राहताना मी जिंकुन आल्यावर माझा पक्ष निवडणूक पद्धतीत हे हे बदल करणार आहे हे घोषित करा व जनतेला ते योग्य वाटले तर ती तुम्हाला नक्की जिंकुन देईल. ते घोषित करूनही जर हरलात तर जनतेला ते मत सध्या मान्य नाही हे मान्य करा व ५ वर्षांनी जनतेला पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करा. मात्र तोपर्यंत आहे तीच निवडणूक पद्धत वापरणे अनिवार्य आहे. एखाद्याची सद्य पद्धतीने निवडणूक लढवायचीच तयारी नसेल तर तो निवडणूक कशी लढवणार? आपण तेच ते बोलत अहोत. माझा या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/03/2014 - 13:28 नवीन
मात्र निवडणुकीला उभे राहताना मी जिंकुन आल्यावर माझा पक्ष निवडणूक पद्धतीत हे हे बदल करणार आहे हे घोषित करा व जनतेला ते योग्य वाटले तर ती तुम्हाला नक्की जिंकुन देईल. ते घोषित करूनही जर हरलात तर जनतेला ते मत सध्या मान्य नाही हे मान्य करा व ५ वर्षांनी जनतेला पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करा.
याला अगदी +१. एक समांतर मुद्दा भाजपच्या अजेंड्यातील तीन महत्वाचे मुद्दे--राममंदिर, ३७० कलम आणि समान नागरी कायदा या गोष्टींसाठी आपल्या सध्याच्या पध्दतीमध्ये घटनादुरूस्ती करावी लागेल (निदान ३७० आणि समान नागरी कायदा या दोन गोष्टींसाठी) आणि त्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागेल. भाजपकडे अर्थातच दोन तृतीयांश बहुमत नव्हते.तेव्हा लोकांचा त्या क्षणी या मुद्द्यांना पाठिंबा नव्हता हे उघड होते.अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून इतर ९७ मुद्द्यांवर सहमती होत असेल तर सरकार स्थापन करून ते ९७ मुद्दे पुढे न्यायचा प्रयत्न भाजपने केल्यानंतरही आता सत्ता मिळाली म्हणून रामाला भाजपवाले विसरले अशी टिका होत होतीच. आणि एन.डी.ए च्या अजेंड्यावर हे तीन मुद्दे नसतील पण भाजपच्या अजेंड्यावर असतील तरीही "हिडन अजेंडा" अशी टिकाही होत होतीच. तेव्हा अशा प्रकारची टिकाही समर्थनीय नाही हे मान्य आहे का? (माझे स्वतःचे राममंदिर आंदोलनाविषयीचे मत भाजपच्या मताप्रमाणे नक्कीच नाही तरीही हे एक जनरल ऑब्झर्व्हेशन लिहिले आहे).
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 02/03/2014 - 15:37 नवीन
निवडणूक लढवताना भारतीय संविधान, निवडणूक नियम वगैरे मान्य असणे महत्वाचे असते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयास वास्तवात कम्युनिझम आणायचा होता. आता देखील कुठल्यान्कुठल्या रुपात त्यांना कम्युनिझम बरोबर येणारी अंतस्थ एकाधिकारशाही आणि नक्षलवादासारखा हिंसाचार मान्य असतो. पण किमान कागदोपत्री ते लोकशाही मान्य आहे असे म्हणतात. किंबहूना जेंव्हा केंव्हा (वर्ष आठवत नाही पण) केरळात प्रथम कम्युनिस्ट निवडून आले तेंव्हा जगात प्रथमच कम्युनिस्ट हे लोकशाहीपद्धतीने निवडून आल्याचे म्हणले गेले. तेच चित्र अनेक वर्ष होते कारण भारत हा लोकशाही देश असूनही शीतयुद्धात आणि नंतरही कम्युनिस्टांवर बंदी नव्हती. तसेच दुसरे उदाहरण शिवसेनेचे. मला वाटते शेषन यांच्या काळापासून निवडणुकीचे नियम कडकपणे पाळणे चालू झाले. तो पर्यंत शिवसेनेने पक्षिय (आणि कदाचीत इतरही) लोकशाही कागदोपत्री मान्य केली नव्हती. ती बाळासाहेबांना करावी लागली. अर्थात कदाचीत भाजपा आणि कम्युनिस्ट सोडल्यास (त्यांच्यात देखील अंशतःच, पण आहे) काँग्रेससकट इतर सर्वच पक्षांमधे पक्षिय लोकशाही म्हणजे एक मोठ्ठा विनोद आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/06/2014 - 11:06 नवीन
अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून इतर ९७ मुद्द्यांवर सहमती होत असेल तर सरकार स्थापन करून ते ९७ मुद्दे पुढे न्यायचा प्रयत्न भाजपने केल्यानंतरही आता सत्ता मिळाली म्हणून रामाला भाजपवाले विसरले अशी टिका होत होतीच.
माझ्या आठवणी प्रमाणे भाजपाने हे मुद्दे कधीही वगळलेले नाहीत. नेहमी भाजपाच्या घोषणापत्रात ते असतात. एन्डीएच्या घोषणापत्रात ते वगळले जातात. ते ठीकच आहे. (फक्त २००४ च्या भाजपा घोषणापत्राचे आटह्वत नाहिये.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/03/2014 - 14:41 नवीन
>>>मी कुठे अधिकार नाही म्हटले आहे? त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका. हे तुम्ही केवळ मुद्दा ठासून सांगण्याकरता भावनेच्या भरात लिहिले असावे असे समजून पूर्णविराम :)
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 02/03/2014 - 15:41 नवीन
दोन हक्क लोकशाही देते. एक म्हणजे अण्णांसारखे आंदोलन करून हवे ते बिल पास करण्याचा प्रयत्न करणे, ज्यात पक्षिय लोकशीहीची गरज नसते. अथवा सरळ निवडणुकीच्या राजकारणात उतरून प्रस्थापित नियमांनी निवडणुका जिंकून मग हवे तसे नियम बदलणे... दोन्ही मधे स्वागतार्ह चेक्स आणि बॅलन्सेस आहेत (पक्षि: कोणीही उठून काही करू शकेल इतके सोपे नाही) असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 01/30/2014 - 07:49 नवीन
मूळ लेख अन प्रतिक्रिया / चर्चा फारच उद्बोधक धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 01/30/2014 - 09:35 नवीन
ऋषिकेश यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत. प्रतिसाद आवडले. सुनील यांचाही प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 01/30/2014 - 20:49 नवीन
वर उद्धृत केलेली नारायण व राजेंद्रप्रसाद यांची वाक्ये यांच्याशी मी आजिबात सहमत नाही. जर संविधान अपेक्षित परिणाम साधत नसेल तर दोष लोकांचा आहे असे मानणे साफ चूक आहे. अत्यंत अंधश्रद्ध आणि भोळसट आहे. संविधानात पुरेसे अंकुश वा नियंत्रण नसल्यामुळे राजकारणी बेबंद, बेजबाबदार असतील तर सोयिस्कररित्या लोकांना दोष द्यायचा आणि मोकळे व्हायचे हे मला साफ नामंजूर आहे. योग्य त्या लोकशाही मार्गाने संविधानात बदल हे झालेच पाहिजेत ज्यायोगे सरकारच्या सगळ्या शाखांना आपल्या सत्तेचा दुरुपयोग करुन लोकांना त्रास देणे अवघड केले जाईल. अनेक मोठे पक्ष अनेकदा आपल्या सोयिसाठी कुठल्यातरी कठपुतळी आघाडीला सरकार बनवायला समर्थन देते आणि सोयीचे असेल तेव्हा पाठिंबा काढून घेऊन निवडणुका पुन्हा घ्यायला लावते. ही एक त्रुटी आहे आणि ती दुरुस्त करायला काहीही हरकत नाही. घटना ही आंबेडकरांनी लिहिली आहे त्यामुळे ती जवळपास ईश्वरी दर्जाची आहे आणि त्यात काही बदल संभवत नाही असा विचार अनेक राजकारणी मांडतात त्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. इतकेच नव्हे तर असे मानणे लोकशाहीकरता अत्यंत घातक आहे. संविधान हा धर्मग्रंथ नव्हे जो ईश्वराने कुण्या प्रेषिताच्या कानात सांगितला आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 01/31/2014 - 05:58 नवीन
हे त्या हाफमॅडना कळेल तर नशीब!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/31/2014 - 06:23 नवीन
निवडणुकीपूर्वी दिलेले लेखी आश्वासनाच्या बाजूनेच लोकसभेत मतदान करण्याचे बंधन. उदा. पुण्याहून अ नावाचे उमेदवाराने आपल्या तर्फे " अमेरिकेशी अणू करारास मी पाठिंबा देईन " असे आश्वासन दिले व ब या उमेदवारानेही असेच आश्वासन दिले तर नंतर लोकसभेत मतदान होताना अ वा ब जो कोणी निवडून येईल त्त्याचे मत ही कराराच्या बाजूनेच आहे असे सभापती गृहीत धरतील .यात या खासदाराला वा त्याच्या पक्षाच्या नेत्याला निवडणोकोत्तर कोणतेही साटेलोटे हे ठराव मांडणार्‍याशी करता येणार नाही. अशीच गोष्ट एफ डी आय वगैरे महत्वाच्या मुद्याना लागून होईल. इतकेच नव्हे घटनेतील एखादे कलम बदलणे, निवडणूक प्रक्रिया बदलणे ई अत्यंत महत्वाच्या बाबतीत मी कोणत्या बाजूचा आहे हे उमेदवाराला निवडणूकीपूर्वीच कायदेशीरपणे स्पष्ट करणे भाग पाडले पाहिजे.त्यानुसार आपला खासदार -मुख्य अर्थाने वैधानिक प्रतिनिधी निवडताना त्याचे नुसते वैयक्तिक चारित्र्य पाहून उपयोगाचे नाही त्याचा वैधानिक कल हा त्यापेक्षाही महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 01/31/2014 - 07:43 नवीन
माझ्या मते असे करणे अव्यवहार्य ठरेल. अणुकराराचेच उदाहरण देऊन ते सांगतो: १. अणुकराराची कल्पना मनमोहनसिंगांच्या जुलै २००५ मधील अमेरिका भेटीदरम्यान अध्यक्ष बुश यांनी मांडली. २००४ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा असा कोणता अणुकरार येईल याची कल्पना निवडणुका लढविणार्‍या उमेदवारांना असायची शक्यता कमीच.तेव्हा निवडणुका होतानाच पुढील पाच वर्षात नक्की कोणते प्रश्न उभे राहणार आहेत याविषयी आधीच कल्पना कशी असणार? मग उमेदवारांचे नक्की कोणत्या प्रश्नांवर मत मागवायचे हे कसे ठरविणार? तसेच अनेकदा परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलतात्/तसे बदलणे अपेक्षित असते. निवडणुकांच्या वेळची परिस्थिती आणि चार वर्षांनंतरच्या परिस्थितीत जर फरक असेल तरी जुन्याच ठोकताळ्यांवर अवलंबून राहून दिलेल्या मतावरच खासदारांनी ठाम राहिले पाहिजे हा आग्रह का? २. उमेदवार असताना (विशेषतः पहिल्यांदा निवडणुक लढविणार्‍यांना) संसदेबाहेर राहून मते ज्या निकषावरून बनविली जात असतील ते निकष आणि संसदेत गेल्यानंतर मते बनवायचे निकष यात फरक असू शकतो. उदाहरणार्थ परराष्ट्र आणि इतर मंत्रालयांशी संबंधित संसदीय समित्यांमधील चर्चेचे मिनिट्स, विविध मंत्रालयांची कागदपत्रे इत्यादी गोष्टी आम जनतेपेक्षा खासदारांना मिळणे नक्कीच सोपे आहे. अशी अधिक माहिती मिळाल्यानंतर अधिक योग्य निर्णय करता येणे अपेक्षित आहे (प्रत्यक्षात किती खासदार तसे करतात ही गोष्ट वेगळी). तसे असेल तर उमेदवार असताना त्यांचे मत जे काही मत असेल त्यात बदल होणारच नाही हे कशावरून? असा बदल होण्यामागे काही अभ्यास, काही कन्व्हिक्शन असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? असा बदल मंत्रीपद किंवा अन्य कोणत्या प्रलोभनामुळे होणार असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे.पण जर जेन्युईन बदल होणार असेल तरीही तुमच्या पध्दतीत त्याला पायबंदच असेल त्याचे काय?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/31/2014 - 09:51 नवीन
जनतेने निवडलेय. अनपेक्षितपणे सत्ता मिळण्याची लक्षणे निर्माण झाली. जाहीरनाम्यात त्यासाठी साहजिकच काही उल्लेख नव्हता .सबब जनतेचा कौल घ्यायचा निर्णय केजरीवाल ने घेतला. हा एक पर्याय होउ शकतो. तो तरी व्यवहार्य आहे ना ? की डायरेक्ट सोनियांचा सल्ला घेऊन सरकार स्थापनेचा दावा करायचा हा १९५२ पासूनचा शिरस्ता पुढे चालू ठेवायचा ? व त्यांच्या " शीला बाईना हात लावल्यास जावे लागेल" अशा अटीना 'व्हय जी " असे म्हणायचे. ( राज्यपाल पद्धत ).
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 01/31/2014 - 14:05 नवीन
जाहीरनाम्यात त्यासाठी साहजिकच काही उल्लेख नव्हता .सबब जनतेचा कौल घ्यायचा निर्णय केजरीवाल ने घेतला. हा एक पर्याय होउ शकतो. तो तरी व्यवहार्य आहे ना ?
माझ्या मते नाही.जाहिरनाम्यात नंतर येणार्‍या सगळ्या आव्हानांचा अंतर्भाव होणे शक्य नाही.काहीही म्हटले तरी आजच्या परिस्थितीला अनुसरून जाहिरनामा केला आणि दोन वर्षात एकदम वेगळेच आव्हान उभे ठाकले तर आजच्या जाहिरनाम्यात त्याचा उल्लेख असणे शक्य नाही.अशा परिस्थितीत राज्यकर्त्याकडे त्या परिस्थितीला तोंड द्यायचा खमकेपणा असला पाहिजे. अनेकदा लोकांना आपला एखादा निर्णय पटला नाही किंवा समजला नाही तरी तो अंततः लोकांच्या हिताचाच आहे ही खात्री असेल तर तो निर्णय विरोध असतानाही पुढे रेटायची क्षमताही नेत्यामध्ये असली पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते.त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले.या बिलाला पंडित नेहरूंचाही पाठिंबा होता. तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेता या हिंदू कोड बिलाला प्रचंड विरोध होणे स्वाभाविक होते आणि तसा तो झालाही. फाळणी आणि स्वतंत्र भारतापुढे असलेल्या इतर समस्या लक्षात घेता त्या परिस्थितीत शक्य तितक्या प्रकारे आणि शक्य तितक्या प्रमाणात नेहरूंनी ते बिल पुढे रेटले.अर्थात आंबेडकरांना पूर्णपणे अपेक्षित असलेले बिल कधीच झाले नाही पण तरीही नेहरूंनी त्या निर्णयाला प्रचंड विरोध होत असूनही या सुधारणा शक्य होईल तितक्या पुढे रेटल्या.याचे कारण हे बिल अंततः समाजाच्या हिताचे आहे ही खात्री त्यांना होती. तीच गोष्ट ज्या ज्या राज्यकर्त्यांनी आपला ठसा इतिहासावर उमटवला आहे त्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत लिहिता येईल. पण यासाठी समाजापेक्षा जास्त दूरदृष्टी असलेला नेता पाहिजे.समाजाला आज दिसते त्याच्या पलीकडचे नेत्याला दिसले पाहिजे आणि आपण जे करत आहोत ती गोष्ट योग्य आहे हे कन्व्हिक्शन नेत्यामध्ये पाहिजे. अर्थातच या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या चौकटीत करायच्या असल्यामुळे विरोध असला तरी त्याला कसे उत्तर द्यायचे, जनमत कसे उभे करायचे या गोष्टीही करणे ओघाने आलेच. लोक सांगणार आणि नेता ऐकणार अशी परिस्थिती म्हणजे इंजिनाने डबे ओढण्याऐवजी डब्यांनी इंजिन ढकलण्यासारखे झाले.केजरीवालांनी केलेल्या प्रकाराला लोकांचा निर्णयप्रक्रीयेत सहभाग इत्यादी कितीही गोंडस नावे दिली तरी माझ्या मते हा शुध्द आडाणीपणा आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/31/2014 - 15:34 नवीन
पण यासाठी समाजापेक्षा जास्त दूरदृष्टी असलेला नेता पाहिजे.समाजाला आज दिसते त्याच्या पलीकडचे नेत्याला दिसले पाहिजे आणि आपण जे करत आहोत ती गोष्ट योग्य आहे हे कन्व्हिक्शन नेत्यामध्ये पाहिजे. अगदी सहमत... नेता हा केवळ जनतेला जे हवे ते चमच्याने भरवण्याचे काम करत असेल तर त्याने मते मिळू शकतील पण देश पुढे जाईलच याची खात्री नाही. नेता या शब्दात द्रष्टेपण देखील येते. ते ज्यात असते तो/ती नेतृत्व करण्यास योग्य.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/31/2014 - 16:32 नवीन
उधारन द्याकि एखादं.( स्माइली टाकयचा मोह आवरता घेतो)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/04/2014 - 04:50 नवीन
अनपेक्षितपणे सत्ता मिळण्याची लक्षणे निर्माण झाली. जाहीरनाम्यात त्यासाठी साहजिकच काही उल्लेख नव्हता .सबब जनतेचा कौल घ्यायचा निर्णय केजरीवाल ने घेतला याबद्दल कोणालाही आक्षेप नसावा. परंतु सदरहू नेत्याने निवडणूकात दुसरा मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यावर जी काही नाटके केली की मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ काय घेतली मग नंतर जनतेचा कौल घेतो असे काय दाखवलं निव्वळ ढोंगीपणाच वाटला. प्रस्थापित सरकारी पक्षाची जशी ढोंगे तशी यांची ढोंगे. आता त्यांचे समर्थक पिसाळून आमचा पक्ष म्हणजे कशी होली काऊ आहे हे सांगत येतील. फक्त त्रयस्थपणे पाहणार्‍याला एका प्रस्थापित सोंगाऐवजी नवे सोंग पहायला मिळाले इतकेच. त्यांनी आमच्यापुढे सत्ता मिळवण्यासाठी आमच्या तत्वांशी सहमती आणि त्यानुसार आचरण बदलण्याची तयारी असणार्‍या कोणत्याही पक्षाचा पाठींबा विनाअट मिळाला तर घेऊ असे सांगितले असते तर एकवेळ त्यांचे वागणे सयुक्तिक आणि त्यांच्या स्वतःच्या तत्वांशी सुसंगत तरी वाटले असते. असो. बाकी लोकशाहीवर चाललेली उद्बोधक चर्चा यामुळे भरकटू नये अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/04/2014 - 11:50 नवीन
काहींच्या लग्नात फेटे घालतात काहींच्या नाही. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने करतात वा नाही. शेवटी कोणी पसायदान म्हणते कोणी वंदे मातरम कोणी जनगणमन. तेंव्हा अशा गोष्टीना कितपत महत्व द्यायचे ? गांधीजींचा विचार महत्वाचा आहे. पंचा, प्रार्थना, सुतकताई हे त्यांचे विचार प्रकट करण्याचे काही मार्ग आहेत. तसे ते केजरीवाल यांचे असणे स्वाभाविक आहे. उदा. ते लोकाना साथीयो, असे म्हणतात म्हणून ते कमुनिस्ट झाले काय? आणि सुरेशभाई कलमाडी सुरेशदादा जैन याना भावाचा दर्जा देउनही त्यानी काय केले आहे ? आंदोलनाना थेरं म्हणायचं झालं तर अमोरिकन राज्यक्रांति ,फ्रेच राज्यक्रांति याना ही थेरं म्हणावयास पाहिजे .
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/04/2014 - 15:27 नवीन
तेंव्हा अशा गोष्टीना कितपत महत्व द्यायचे ? सहमत... मात्र असे महत्व जेंव्हा रालोआच्या राज्यात कुठल्याशा शिक्षणमंत्र्याच्या का अशाच सभेत "सोकॉल्ड प्रथमच"* सरस्वती वंदना झाली तेंव्हा दिले गेले होते आणि असे दिले जाते. वंदेमातरमच्या बाबतीत देखील असे केले जाते. त्यामुळे ही माध्यमांनी आणि राजकारण्यांनी (त्यातही खरे म्हणजे स्युडोसेक्यूलर्स/कॉमिज नी) लावलेली सवय आहे. * "सोकॉल्ड प्रथमच" म्हणायचे कारण असे की ही प्रथा आधीपासून होती. किमान इंदरकुमार गुजराल यांच्या काळात देखील त्यांच्या उपस्थितीत असेच झाले होते. पण तेंव्हा ते "सेक्यूलर" असल्याने चालले.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/04/2014 - 16:02 नवीन
प्रत्येक गोष्टीला इतके महत्व का द्यायचे या प्रश्नाची व्याप्ती बरीच दूरची आहे.प्रत्येक गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाला मान्य नसलेली गोष्ट अशी परिस्थिती आता येऊ लागली आहे.राज्यघटना ना? कोण विचारतो त्या राज्यघटनेला? दिल्लीत लोकपाल आणण्यासाठीचा कायदा करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून (गृहमंत्रालयाकडून) क्लिअरन्स हवा अशी राज्यघटनेतली तरतूद असली तरी काय झाले? आम्ही म्हणतो ना म्हणून राज्यघटना वगैरे गेली तेल लावत. आम्ही ते विधेयक डायरेक्ट दिल्ली विधानसभेतच आणणार!! आता राज्यघटना ही पण गोष्ट त्या "प्रत्येक गोष्टीच्या" व्याख्येत येते का हे चौरांनी स्पष्ट केले तर चांगले होईल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 02/04/2014 - 17:45 नवीन
त्या क्लिअरन्स च्या बाबतीत त्यानी कायदेशीर सल्ला घेतला आहे.असे समजते. बाकी घटनेतील अनेक तरतुदींवर अनेक अभ्यासकात मतभेद असतातच. त्यामुळे हा मुद्दा चर्चिला जाईलच व कदाचित फेटाळला ही जाईल. त्यातून आप काही शिकत जाईल. आता माझी शंका- ज्या प्रमाणे " पक्ष" या बाबतीत राज्यघटनेचे कोणते कलम काय म्हणते याचा आतापर्यंत काही पत्ता मला तरी लागलेला नाही. त्याच प्रमाणे " आवाजी" मतदान ही काय भानगड आहे? अशा मतदानाची घटनेत तरतूद आहे? असली तर मला त्याचा संदर्भ मिळेल का ...... ? आणि नसली तरतूद तर कोणत्या जिनियसचे हे डोके आहे ?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 02/04/2014 - 18:36 नवीन
त्यामुळे हा मुद्दा चर्चिला जाईलच व कदाचित फेटाळला ही जाईल. त्यातून आप काही शिकत जाईल.
कायदे करणे ही एक गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. कायदा करताना कदाचित फेटाळले जाणे, मग त्यातून शिकणे असा धरसोडपणाच्या गोष्टी लोकसभेच्या ३५०-४०० जागा लढवून आपली राष्ट्रीय पातळीवरील महत्वाकांक्षा उघड करणार्‍या पक्षाला शोभणार्‍या आहेत का? सोमनाथ भारतींनी मालवीय नगर-खिडकी एक्स्टेंशन भागात रात्री घातलेल्या धाडीनंतर नक्की प्रक्रीया काय आहे हे मला माहित नव्हते अशा प्रकारची कबुली दिली होती. राज्यकारभार अशा पध्दतीने होत असेल तर त्यात तुम्हाला काहीच गैर वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे.यांना राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहेत.उद्या दुर्दैवाने यांच्या पक्षाचा अर्थमंत्री झाला तर भारतीय अर्थव्यवस्था कशी चालवावी हे मला माहित नाही, मला फिस्कल आणि मोनेटरी पॉलिसिमधला फरक माहित नाही अशा प्रकारची वक्तव्ये करणार नाही याची खात्री काय?
आता माझी शंका- ज्या प्रमाणे " पक्ष" या बाबतीत राज्यघटनेचे कोणते कलम काय म्हणते याचा आतापर्यंत काही पत्ता मला तरी लागलेला नाही.
१९८५ साली राजीव गांधी सरकारने ५२ वी घटनादुरूस्ती करून पक्षांतरबंदी कायदा आणला आणि राज्यघटनेत दहावे परिशिष्ट जोडले. पक्षांतरबंदी कायद्याचा पूर्ण बेसच पक्ष यावर आहे.तेव्हा पक्षाची कशी व्याख्या केली आहे हे बघायला हवे.वेळ मिळेल त्याप्रमाणे यावर लिहितोच.
त्याच प्रमाणे " आवाजी" मतदान ही काय भानगड आहे? अशा मतदानाची घटनेत तरतूद आहे?
संसदेच्या किंवा राज्य विधीमंडळांच्या सभागृहांमध्ये एखादा प्रस्ताव मतदानाला येतो (उदाहरणार्थ मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव) तेव्हा सभागृहाचे अध्यक्ष--"या ठरावाच्या समर्थनात असलेल्या सदस्यांनी 'आयेस' (हो) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सदस्य आयेस... असे म्हणतात.त्यानंतर "या ठरावाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी 'नोस' (नाही) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला विरोध करणारे सदस्य 'नोस' असे म्हणतात. यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.याला आवाजी मतदान म्हणतात. कुणाही एका सदस्याने प्रत्यक्ष मतदानाची मागणी केली तर मतदान घ्यावे लागते अन्यथा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. या प्रकाराला आवाजी मतदान म्हणतात. १२ जून १९९६ रोजी देवेगौडा सरकारवरील आणि २२ एप्रिल १९९७ रोजी गुजराल सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला होता. सगळ्या गोष्टींचा राज्यघटनेत उल्लेख असतोच असे नाही.राज्यघटनेत संसदेत बहुमताने ठराव मंजूर करावा असे लिहिले आहे पण प्रत्यक्ष मतदान कसे घ्यावे ही गोष्ट राज्यघटनेत असायची गरज आहे असे वाटत नाही.जेव्हा शक्य होईल तेव्हा राज्यघटनेत फक्त गाईडलाईन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची हे संसदेनेच पारित केलेल्या कायद्यावर किंवा परंपरेवर सोडले जाते. राज्यघटनेत निवडणुकांसाठी मतदान घ्यावे असा उल्लेख आहे.पण मतदान नक्की कसे घ्यावे (मतपत्रिका की मशीन), कधी घ्यावे, किती टप्प्यांमध्ये घ्यावे इत्यादी गोष्टी निवडणुक आयोगावर सोडलेल्या असतात.
आणि नसली तरतूद तर कोणत्या जिनियसचे हे डोके आहे ?
आपल्याकडे बर्‍याच गोष्टी इंग्लंडमधील परंपरांप्रमाणे आलेल्या आहेत.कदाचित आवाजी मतदान ही गोष्टही हाऊस ऑफ कॉमन्समधून आली असावी.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/05/2014 - 04:15 नवीन
निवडणुकांसाठी मतदान घ्यावे असा उल्लेख आहे.पण मतदान नक्की कसे घ्यावे (मतपत्रिका की मशीन), कधी घ्यावे, किती टप्प्यांमध्ये घ्यावे इत्यादी गोष्टी निवडणुक आयोगावर सोडलेल्या असतात. म्हणजे समजा मी उद्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष झालो तर मला ५१ टक्याची अट ठेवता येईल का ? की ते ठरविण्याचा अधिकार संसदेचा आहे ? जर तो असेल तर पहिली संसद ज्या आधारावर निवडली गेली तो आधार कुणी ठरविला? त्या वेळच्या निवडणूक आयोगाने की राज्यघटनेने ? त्यावेळी ही ज्याला जास्त मते तो विजेता ही व्याख्या कोणीतरी ठरविली असेलच ना ? मग ती ठरविणारी शक्ती लोकनियुक्त होती की एखादा अभ्यासगट की एखादे आंदोलनकारी?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 02/05/2014 - 06:22 नवीन
म्हणजे समजा मी उद्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष झालो तर मला ५१ टक्याची अट ठेवता येईल का ? की ते ठरविण्याचा अधिकार संसदेचा आहे ?
नाही तो अधिकार संसदेचा आहे. घटनेच्या ३२७ व्या कलमानुसार "Subject to the provisions of this Constitution,Parliament may from time to time by law make provision with respect to all matters relating to, or in connection with, elections to either House of Parliament or to the House or either House of the Legislature of a State including the preparation of electoral rolls, the delimitation of constituencies and all other matters necessary for securing the due constitution of such House or Houses." म्हणजेच निवडणुकविषयक कायदे-नियम बनवायचा अधिकार संसदेचा आहे. आपली पध्दत--सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार निवडून येणे (फर्स्ट पास्ट द पोस्ट) नक्की कुठल्या कायद्यात दिली आहे हे शोधायचा बराच प्रयत्न केला.राज्यघटनेत त्या पध्दतीचा उल्लेख मला मिळाला नाही.Representation of people act, 1951 मध्ये बघितले.तिथेही त्याचा उल्लेख मला मिळाला नाही. पण या पध्दतीचा कुठल्यातरी कायद्यात उल्लेख असला पाहिजे नाहीतर इतक्या वर्षात कधीतरी कोणीतरी निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडीला या कारणावरून आव्हान दिले असतेच. नक्की कोणत्या कायद्यात याचा उल्लेख आहे हे शोधायचा प्रयत्न करतो.नाहीतर निवडणुक आयोगाकडे आर.टी.आय अर्ज टाकायलाही हरकत नाही.
जर तो असेल तर पहिली संसद ज्या आधारावर निवडली गेली तो आधार कुणी ठरविला? त्या वेळच्या निवडणूक आयोगाने की राज्यघटनेने ?
राज्यघटना तयार करण्यासाठी निवडून गेलेली घटनासमितीच १९५२ मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत संसदेचे काम बघत होती.त्यामुळे १९५१ चा लोकप्रतिनिधी कायदाही घटनासमितीनेच पास केला होता.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/05/2014 - 08:24 नवीन
बिल साहेब माफ करा माझी चिकाटी ही मला सोडवत नाहीय व तुमचा प्रतिसाद उत्तम आहे. म्हणजेच संसदेत उद्या समजा एखाद्या पक्षाचे ५४३ सभासद निवडून आले. तर ते एकपक्षीय निवडणूकी(?) चा कायदा पास करू शकतील काय ? संसद तीन चतुर्थांश मतांनी आजही राज्यघटना बदलू शकते.मग समजा आरक्षण मागणारेच कमी झाले वा आरक्षण विरोधी मतात १०० टक्के मतदान झाले तर समान नागरी कायदा. धर्म एक खाजगी बाब ठरविणे ई कायदे होउ शकतील ना ? भाग जर तर चा आहे पण आपली शंका विचारणे राहून गेले असे होउ नये म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 02/05/2014 - 08:37 नवीन
संसद तीन चतुर्थांश मतांनी आजही राज्यघटना बदलू शकते
संसद राज्यघटना बदलू शकत नाही. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये असा निर्णय दिला की संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात बदल करायचा अधिकार नाही.त्याच निकालात न्यायालयाने राज्यघटनेचा मूळ गाभा म्हणजे नक्की काय हे पण स्पष्ट केले होते. तेव्हा जोपर्यंत राज्यघटनेचा मूळ गाभा बदलत नाही तोपर्यंत संसदेला कोणतीही घटनादुरूस्ती करता येईल. तेव्हा संसदेला राज्यघटना बदलायचा अधिकार नक्कीच नाही पण त्यात वर म्हटल्याप्रमाणे दुरूस्ती करायचा अधिकार आहे. तेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे आहे. :) अवांतरः केशवानंद भारती खटल्याचा निकाल दिल्यानंतर मुख्य न्यायाधीश एस.एम.सिकरी निवृत्त झाले.या खटल्याचा निकाल १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता.हे न्यायालयाचे सर्वात मोठे खंडपीठ होते.हा निकाल इंदिरा गांधींना आवडलेला नव्हता.मुख्य न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करताना इंदिरा सरकारने आपल्याला न आवडलेला निकाल दिलेल्या न्यायमूर्ती शेलाट, हेगडे आणि ग्रोव्हर या तिघांना डावलून त्या निकालाविरूध्द मत दिलेल्या न्यायाधीशांपैकी सर्वात वरीष्ठ अनील नारायण रे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली. त्याविरूध्द त्या तीन न्यायाधीशांनी राजीनामा दिला होता.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 02/05/2014 - 09:29 नवीन
इंदिरा सरकारने आपल्याला न आवडलेला निकाल दिलेल्या न्यायमूर्ती शेलाट, हेगडे आणि ग्रोव्हर या तिघांना डावलून त्या निकालाविरूध्द मत दिलेल्या न्यायाधीशांपैकी सर्वात वरीष्ठ अनील नारायण रे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली
हे बरोबर. आणि त्याचे कारणदेखिल वरील खटल्याचा निकाल हेच असावे. परंतु, हे तीनही न्यायाधीश पुढील काही महिन्यांतच एका पाठोपाठ एक असे निवृत्त होणार होते, म्हणून रे यांची नियुक्ती केली असे कारण देण्यात आले होते. जे अगदीच सयुक्तिक नव्ह्ते असे म्हणता येणार नाही! (वरील पोस्ट केवळ आठवणींवर भरवसा ठेऊन लिहिलेली आहे. कोणताही दुवा याक्षणी नाही)
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Wed, 02/05/2014 - 09:42 नवीन
तर मग संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात बदल कसा करता येउ शकतो का त्यासठी क्रान्ती हाच एक पर्याय आहे?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 02/05/2014 - 10:16 नवीन
तर मग संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात बदल कसा करता येउ शकतो का त्यासठी क्रान्ती हाच एक पर्याय आहे?
एका अर्थी हो. याचे कारण राज्यघटनेचा मूळ गाभा म्हणजे नक्की काय हे न्यायालयाने स्पष्ट केले त्यात नागरिकांचे मूलभूत हक्क, भारताचे सार्वभौमत्व सर्वोच्च स्थानी असणे, धर्मनिरपेक्षता आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. कोणत्याही लोकशाहीसाठी या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत अशा आहेत.या गाभ्याला धक्का लावणे म्हणजे देशातील लोकशाहीलाच नख लावणे असा त्याचा अर्थ होईल.त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे असे मला वाटते. समजा देशात वेस्टमिन्स्टर पध्दती सोडून अध्यक्षीय लोकशाही आणायची असेल तरी ती घटनादुरूस्ती घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न पोहोचवता करता येऊ शकेल का?माझ्या मते अध्यक्षीय पध्दती आणायची झाली तरी नागरिकांचे मूलभूत हक्क, धर्मनिरपेक्षता इत्यादी तत्वांमध्ये बदल करायची गरज नाही.घटनेच्या गाभ्यात फेडरलीझम (राज्य आणि केंद्र यांच्यात सत्ता आणि जबाबदारीची विभागणी) हे तत्वही अध्यक्षीय पध्दतीत राहतेच. त्यामुळे अगदी अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी तशी घटनादुरूस्ती करायची असेल तरी (तसे करणे म्हणजे ८०% घटना परत लिहिणे असले तरी) तसे करता येणे शक्य असावे. याविषयी घटनातज्ञांचे मत काय आहे याविषयी कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Wed, 02/05/2014 - 10:21 नवीन
धर्मनिरपेक्षता नक्की कशी स्पष्ट केली आहे याचा दुवा देऊ शकाल का प्लीज?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 02/05/2014 - 10:39 नवीन
धर्मनिरपेक्षता नक्की कशी स्पष्ट केली आहे याचा दुवा देऊ शकाल का प्लीज?
राज्यघटनेच्या सरनाम्यात इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणीच्या वेळी केलेल्या ४२ व्या घटनादुरूस्तीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेत समाविष्ट केला.तरीही राज्यघटनेतील इतर कलमे (नागरिकांचे मूलभूत हक्क) धर्मनिरपेक्षता पुरेशी स्पष्ट करतात.उदाहरणार्थ कलम २५-२६ मध्ये सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करायचा मूलभूत हक्क दिला आहे तसेच कोणाविरूध्दही तो/ती अमुक एका धर्माचा/ची आहे म्हणून भेदभाव करता येणार नाही. त्यावरून १९७६ पूर्वीही पुरेशी धर्मनिरपेक्षता राज्यघटनेत होती असे म्हणायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Wed, 02/05/2014 - 10:50 नवीन
प्रश्न बरेच आहेत पण धग्यावर अवान्तर होइल म्हणून थाम्बतो.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/06/2014 - 05:55 नवीन
हवालदार साहेबः हे वाचा
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/05/2014 - 11:24 नवीन
शेवटी मुद्दा क्रांति या उपायावर आल्यानंतर मला वाटते आता आवरते घ्यावे. माझ्या मते अलिकडे एका वर्षात इतका न भरकटलेला धागा मी मिपावर पाहिला नाही. यात क्लिंटन यांच्या स्मरण शक्ती मुळे खरी जान आली. कारण नुसते मत मांडून उपयोगाचे नाही. काही घटितांचा मागोवा ही घेतला तर आपल्या निरिक्षणाना पुष्टी येते. बाकी सर्व प्रतिसादकांचे ही मी आभार मानतो. कोणताही वैयक्तिक अभिनिवेश न आणता सर्वानीच माझे व परस्परांचे प्रबोधन करण्याचा मस्त प्रयोग इथे केला. जगातील कोणतीही क्रांति कोणत्याही राज्यघटनेचा आदर व अनादर करून होत नसते.ती स्वयंभू असते. तिला प्रश्तापितांकडून त्या त्या वेळी विरोध होतो.कित्येक वेळा त्यासाठी रक्त ही सांडावे लागते. स्वातंत्र्य बधुंत्व समता वगैरे साठी काहीनी ते सांडले आहे. असो. पुन्हा एकदा सर्वाना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा