Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आडनाव रिटायर करावे काय?

च
चिन्मय खंडागळे
Sun, 01/19/2014 - 18:34
🗣 76 प्रतिसाद
'जात नाही ती जात' हे वाक्य क्लिशे होण्याइतकं वापरलं गेलं आहे तरी त्यातलं सत्य कमी होत नाही. किंबहुना अशी वाक्यं क्लिशे होण्यामागे ती नको तितकी खरी असतात, हेच खरं कारण असतं. याचा अर्थ आपण जातिनिर्मूलन करण्याचा प्रयत्नच सोडून द्यावा असा नाही, पण जातीपाती आपल्या समाजात एवढ्या घट्ट चिकटून राहण्यासाठी जे कॅटॅलिस्ट आहेत, त्यांच्यापैकी जमतील तेवढे हळूहळू बाजूला काढणं करता येऊ शकतं. आपल्या समाजाची एक खासियत सांगता येईल की, आडनावावरून जात ओळखण्यात आपण सर्व तरबेज असतो. कुणीही नवी व्यक्ती भेटली की, तिच्या आडनावावरून, आपल्या डोक्यात तयार असलेल्या आडनावांच्या एन्सायक्लोपीडियातून आपण पटकन त्याची जात हुडकतो आणि काही गुणवैशिष्ट्यं त्या व्यक्तिला बहाल करून टाकतो. मग ते स्टिरिओटाईप्स घालवण्याची जबाबदारी त्या व्यक्तिची. आडनाव ही संकल्पना आपल्याकडे केव्हा आली, हे मला माहीत नाही. कदाचित परकीय आक्रमणांनंतर आली असावी. पौराणिक वाङ्मयातल्या कुठल्याही व्यक्तिरेखेला आडनाव असलेलं पाहिलं नाही. प्रि-इस्लामिक भारतातल्या कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिचं आडनाव ऐकलेलं आठवत नाही. शिवकालात प्रत्येक व्यक्तिचा उल्लेख व्यवस्थित आडनावासहित केलेला आढळतो. अर्थात माझं इतिहासाचं ज्ञान अति तोकडं असल्यामुळे याविषयी फारसं काही ज्ञान मला पाजळता येणार नाही, जाणकार अधिक प्रकाश पाडू शकतील. एखाद्या व्यक्तिची किंमत जेव्हा 'तो' कोण आहे, यापेक्षा 'तो कोणत्या कुळातला आहे' यावर अवलंबून होती, त्या काळात आडनाव ही संकल्पना महत्वाची होती हे खरं. आजच्या काळात 'आडनाव' या संकल्पनेपासून फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होत असावेत का? भारतात सर्वत्र आडनाव ही संकल्पना वापरली जात नाही, याची मला जाणीव आहे. दक्षिण भारतात आडनाव वापरत नाहीत. भारताबाहेर पाहिलं तर काही समाजात आडनाव हे व्यक्तिच्या नावाच्याही आधी येतं. (उदा. कोरिया, चीन इत्यादि आशियायी देश) तर कुठे नुसती तीन नावं पुरत नाहीत म्हणून महंमद अमुक बिन् तमुक बिन् फलाणुद्दिन असं आज्या-पणज्याचंही नाव येतं. एकंदरीत नाव, मधलं नाव, आणि आडनाव हे केवळ व्यक्तिला आयडेंटिफाय करणारे प्लेसहोल्डर्स आहेत आणि ते कसेही वापरलेले चालतात. आपण आपल्या समाजापुरता विचार करू. समजा आडनाव ही कन्सेप्टच बाद करून टाकली तर? किंवा त्याऐवजी काही दुसरा पर्याय वापरला तर? दुसरा कुठला पर्याय, याचा विचार करण्याआधी 'हे सगळं कशासाठी? आडनावात इतकं वाईट काय आहे?' हा प्रश्न सर्वात आधी येईलच. आडनावांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे वर दिल्याप्रमाणे, आडनावावरून होणारं डिस्क्रिमिनेशन, हा आहे. आता वैयक्तिक पातळीवर कदाचित हा काही मोठासा विषय नाही, पण सामाजिक दृष्ट्या याचे तोटे अनेक आहेत. निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, हे बरेच लोक त्याच्या आडनावावरून ठरवतात. एखाद्या कंपनीत एखाद्या पदासाठी पन्नास-साठ अर्ज आले, तर त्यातले कोणते शॉर्ट-लिस्ट करायचे हे ठरवणार्‍याचं लक्ष अर्जदाराच्या आडनावाकडे जात नसेलच, असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात आडनाव गेल्याने एका दिवसात जातीभेद गायब होतील, असं समजणं मूर्खपणा ठरेल, पण जातीपाती प्रपोगेट करायला आडनाव या संकल्पनेची मदत होते, हे निर्विवाद आहे. जातिनिर्मूलनाकडे हळूहळू का होईना, आपण सरकत जात आहोत. त्याच्या आड येणारं हे आडनाव बादच का करून टाकू नये? काही लोक म्हणतील, आमचं आडनाव आम्हाला प्रिय आहे, ते बाद करणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव? आणि, या मुद्द्यात तथ्य आहे. बर्‍याच लोकांना आपलं आडनाव आणि त्याच्याबरोबर मोफत येणारी ग्लोरी प्रिय असते. 'निंबाळकरांचं रक्त आहे म्हणावं!'... 'महाराजांच्या वेळपासूनची हिस्ट्री आहे'...'पुरंदरच्या लढाईत...' वगैरे वाक्यं म्हणत पूजेत ठेवलेली गंजकी तलवार आणून दाखवली जाते. हे करताना आपण सांगली नगरपालिकेच्या मूषकनिर्मूलन विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी आहोत हे आठवायची गरज नसते. अग्निहोत्री असल्याचा अभिमान बाळगणार्‍याच्या घरात चारमिनारखेरीज कुठला अग्नि पेटत नसेल, आणि 'धर्माधिकारी' म्हणवून घेणारा धर्माचरण करत असेलच, असं नाही. पण तरीही आपलं आडनाव टाकून द्यायची कोणावर जबरदस्ती नाही, म्हणून वरच्या प्रस्तावात थोडासा बदल करतो. *सरकारी पातळीवर* आडनाव बाद करून टाकावे. आडनाव ही गोष्ट धर्म, कुलाचार, कुलदैवत, गोत्र, प्रवर यांप्रमाणे वैयक्तिक असावी. अधिकृत सरकारी कामकाजात कुठेही आडनावाची गरज पडू नये. बरं मग आडनावाला पर्याय काय? एक म्हणजे काही पर्याय असण्याचीच गरज नाही. वर म्हटल्याप्रमाणे फक्त आपलं नाव आणि वडिलांचं नाव वापरता येईल (दाक्षिणात्यांसारखं) किंवा, आणि माझ्या मते आडनाव गाळण्याचा सर्वात चांगला फायदा, म्हणजे आडनावाऐवजी आईचे (प्रथम) नाव वापरता येईल. पासपोर्ट, रेशनकार्डवर आडनावाऐवजी आईचं नाव आलं तर काय बिघडेल? सध्या आईच्या नावाला कुठे काही स्थान नसतं. स्त्री नवर्‍याकडे जाते तीच आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव टाकून. म्हणजेच जणू आपलं पूर्वीचं सर्व अस्तित्व पुसून टाकून. ज्या काळात स्त्री ही 'मालमत्ता' होती त्या काळासाठी हे सुसंगतच आहे, पण आता?... पेपरात कधी बातमी येते 'दिपक बाबुराव पारधी याचे दैदिप्यमान यश. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपल्या समाजातील पहिला डॉक्टर' वगैरे. दिपकबरोबर पिताश्रींचंही नाव झळकतं. मग भले बाबुरावसाहेब अक्खा टायम दारू टाकून पडत असतील आणि संसाराचा सगळा गाडा पार्वतीबाईने चार ठिकाणी घरकाम करून ओढला असेल. पण तिच्या नावाची, तिच्या अस्तित्वाची कुठेही नोंद नाही. मग? आडनावाऐवजी आईचं नाव वापरणं सध्याच्या काळाशी जास्त सुसंगत ठरेल काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14970 views

🗣 चर्चा (76)
प
प्यारे१ Mon, 01/20/2014 - 08:15 नवीन
>>>बबलू डेव्हिड खरात, जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय. हे बबलू डेव्हिड खरात हे खरंच नाव असलेल्या व्यक्तीला २००२-०३ मध्ये मी भेटलोय. जॉन प्रभाकर नाईक, आशिष जोसेफ ह्या नावाचे मित्र आहेत. असं वाचावं.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/20/2014 - 09:04 नवीन
नारायण वामन टिळक, हे कसं वाटतं? ;)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/20/2014 - 10:01 नवीन
म्हणजे एकदम पुणे मराठी उपासना मंदिर अर्थात सेंट अँड्र्यूज चर्चामधे गेल्यासारखं वाटतं.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/20/2014 - 09:46 नवीन
हा हा हा. म्हणजे पुणे शिवाजीनगरचा रहिवासी १२४२४१ ४११०१६ असा आपला नंबर व आडनावी पिनकोड सांगेल.
  • Log in or register to post comments
व
वडापाव Mon, 01/20/2014 - 12:14 नवीन
त्यापेक्षा सगळ्या नागरीकांना नंबर द्यायचा.
म्हणजे मग दोन धर्म निघतील - सम आणि विषम. त्यात संयुक्त, मूळ अशा जाती निघतील. २ ने भाग जाणारे, ३ ने भाग जाणारे, एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, इ. अशा पोटजाती निघतील. धर्म-जाती-वर्ण किंवा अशी कुठलीही समाज-वर्गवारी, यांवरून लहान स्वरूपात निर्माण होणा-या भेदभावांना भडकावणारे लोक जोवर या भेदभावांतून स्वतःची पोळी पिकवणं मनाची लाज बाळगून थांबवत नाहीत, किंवा त्यांना आपण थांबवत नाही, तोवर हे चालूच राहणार. माणसांना नावं द्या, नाहीतर नंबर.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 01/20/2014 - 12:28 नवीन
:D
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/20/2014 - 09:52 नवीन
आजच्या सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात आडनावावरुन जात ओळखून लेखकांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांनी केला होता. त्या संदर्भात http://mr.upakram.org/node/1208#comment-20002
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 01/20/2014 - 11:45 नवीन
घाटपांडे तुम्ही ज्योतिष धागा सोडून या बंडलाच्या मागे का बरे? :D
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/20/2014 - 17:12 नवीन
बाकी बी विषय असतातची की.लईच ज्योतिष ज्योतिष म्हनल कि कंटाळा येतो आमचे मिपावरील लेखन
  • Log in or register to post comments
प
परिंदा Mon, 01/20/2014 - 09:54 नवीन
सर्वांनी आपला आधारकार्ड हाच आपले नाव म्हणून वापरावा. कसे? :)
  • Log in or register to post comments
र
रविंद्र प्रधान Mon, 01/20/2014 - 10:27 नवीन
डॉ. रोड हे नाव ऐकले आहे कधी? साधारणपणे ४० वर्षांपुर्वी तमिळनाडूत कयदा आणला गेला की रस्त्यांच्या नावातून आडनावे काढून टाकावीत. तो लगेच अंमलात आणला गेला आणि डॉ.नायर रोड हा डॉ. रोड झाला. हे नाव सुमारे वर्षभर वापरात होते.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Mon, 01/20/2014 - 11:08 नवीन
विशेषत: क्न्पुबाजांची।
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 01/20/2014 - 13:33 नवीन
कोणतेही भेदा भेद वस्तुतः मनातून जाणे हेच खर यश. बर्‍याच बाबीत संस्कृती आणि धर्म अथवा जातीची सरमिसळ केली जाते.कुंकू (टिकली) लावणे रांगोळी काढणे यांचा धर्माशी संबंध काय ? बहुसंख्य हिंदु स्त्रीया कुंक लावतात अथवा रांगोळी काढतात एवढाच ? जाती धर्म भेदा भेदांशी संबंध नसलेल्या सांस्कृतीक बाबी कशा लक्षात आणून देता येतील आणि शेअर करता येतील ते पाहणे वाढदिवस फ्रेंडशीपडे सारखी सेक्यूलर सेलिब्रेशन्स जातीधर्मा पलिकडे जाऊन भावनिक धागे घट्ट करण्यास साहाय्य करू शकतात हे पहावयास हवे असे वाटते. आडनावाच्या बळावर भेदा भेद करण सोप जात हे वास्तव आहे पण दाक्षिणात्य राज्यांमध्ये केवळ आडनाव घालवण्याची पुरेशी फळे मिळाली आहेत का? या बद्दल साशंकता वाटते.अशा धर्मात जेथे आडनाव नाही तेथे पण उपभेद टिकून आहेत.त्या दृष्टीने आडनाव टाळणे वरवरची मलमपट्टी तर ठरणार नाही ना. आडनावांची गरज पडणार्‍या आणि आडनाव नको असलेल्या दोन्ही जागा आहेत. आडनावा सहित एकाच नावाची असलेली एक पेक्षा अधिक माणस पण असतात पण अजून थोडे क्रायटेरीआ लावलेली त्यांना वेगवेगळ ओळखण कठीण जात.आडनाव नसल्याची एक अडचण येते ती इतिहास संशोधनात दोन ग्रंथ लिहिणार्‍या व्यक्तींची नावे एक सारखी दिसतात तेव्हा ते दोघे वेगवेगळे का एकच हा प्रश्न वारंवार उपस्थीत होताना दिसतो.अलिकडच्या काळातली बाब म्हणजे की संगणकीकरणाच्या जमान्यात एक सारखी नावे त्रास दायक होतात त्यात आडनाव नसल्याची अजून एक भर त्रास दायक होते.प्रॉपर्टी पत्रव्यवहार पासपोर्ट व्हीसा इत्यादीकरता लागणारे आयडेंटीफिकेशन तपास यंत्रंणांचे शोधही कठीण होऊ शकतात. विकिपीडिया सारख्या साईट्वर संदिग्धता कमी करून योग्य व्यक्तीची माहिती योग्य व्यक्तीच्याच नावावर जाते आहे हे पाहण्या करता पुर्ण नावाची गर भासते त्याच वेळी तुम्ही म्हणता तसे लेखन आणि संपादन करणार्‍यांनी टोपण नावे वापरणे विकिपीडियास वाद विवाद टाळण्याच्या दृष्टीने बरे पडते हा झाला प्रॅक्टीकल भाग.मराठी विकिपीडियावर उघडल्या जाणार्‍या दर नऊ खात्यातील सहा खाती आडनावा सहीत असतात आणि तीन खाती आडनावा शिवाय असतात. सर्वच जातीधर्माच्या लोकांना आडनावांसहीत सदस्य खाती उघडणे आवडते असे दिसून आले . काही महिने नविन खाते उघडताना टोपणनाव वापरण्याचे आवाहन करून पाहीले पण ६:३ या रेशो मध्ये काहीच फरक पडला नाही.तात्पर्य आपण येथे चर्चा केल्या म्हणुन मराठी माणसे या बाबतीत कितपत बदलतील या बाबत शंका वाटते तरीही आडनाव नसण्या पेक्षा जाती धर्म न्यूट्रल आडनावांनी आडनावे बदलण्याचा मी समर्थक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 01/20/2014 - 13:39 नवीन
जाती धर्म न्यूट्रल आडनावांनी
उदा?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 01/20/2014 - 13:43 नवीन
आता पर्यंत आडनाव म्हणून वापरले न गेलेले शब्द
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Tue, 01/21/2014 - 00:48 नवीन
याच्यापेक्षा आईचं नाव वापरण्याचा पर्याय सोपा वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/21/2014 - 06:20 नवीन
एक रस्ता चुकलेल मुल तुम्हाला वाटेत भेटल मदतीची विनंती केली तुम्ही मदत करू इच्छिता त्याला त्याच्या घरी नेऊन सोडू इच्छिता पण त्याने त्याच्या बाबांच आणि आईच नावच तेवढ सांगितल त्यावरून काही बोध होतो ? पण आडनाव सांगितल तर त्या आडनावाची गावातली चार कुटूंब शोधण सोप जात. अर्थात आधारकार्डच्या जमान्यात हा शोध संगणकावरून अधिक सोपा व्हावयास हवा. आडनावांनी कुलपरंपरेच कुलपरंपरा प्रत्येकात अपेक्षित संस्कार प्रत्येकवेळीच पेरू शकते असे नाही पण समाजाकडून अपेक्षांच ओझ लादल्या गेल्यामुळे काही जण काही वेळा प्रेरणा घेऊ शकतात किमान पक्षी समाज लज्जेस्तव काही चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळण्याची शक्यता वाढते.समजा कुणी शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्ती आहे त्याला हे करणे शोभेल ते करणे शोभणार नाही हा सामाजिक दबाव अंशतः काम करू शकतो. अर्थात आडनावा पेक्षाही कुलपरंपरा जात आणि धर्माची वीण गरजेपेक्षाही अधिक करकचून बांधताना दिसतात. आडनाव न वापरणे किंवा आईचे नाव वगैरे वापरणे दोनचार पिढ्या चालू शकते आयडेंटीफाय करण्या करता समाज काय ओळख वापरतो त्या नुसार नवी आडनावे पुन्हा येऊन चिटकू शकतात.पण कर्मानुसार आडनाव चिटकण्याचे दुष्परिणाम आपल्या समाजाने अनुभवले आहेत.मुल्यांनुसारी आडनावे जसे कि सत्य करूणा साहस शौर्य अशी आडनावे कुटुंबांना आवडीची मुल्ये सांभाळण्यास साहाय्यभूत होऊ शकतात एकदा एक आडनाव आहे म्हटल्यानुसार दुसरे आडनाव चिटकण्याची शक्यता कमी होते किंवा कसे असा विचार येतो.
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 01/20/2014 - 13:38 नवीन
सहमत... विशेषकरून शेवटच्या परीछेदाशी. काही जन आईचं नाव लावतात . जसं कि संजय लीला भन्साळी . आडनाव वडिलांचं आणि मधलं नाव आईचं .. असा पर्याय असू शकतो. किवा मध्ये वडिलांचं नाव आणि आडनाव आईचं. असा सुधा पर्याय होऊ शकेल
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/23/2014 - 19:08 नवीन
काही फायदे, काही तोटे. आडनाव टाकणे ही फुलप्रूफ व्यवस्था नाही. माणसांच्या मनातली जात जात नाही तोपर्यंत या सगळ्या मलमपट्ट्या ठरणार. रोगावर उपचार नव्हे.
  • Log in or register to post comments
स
सतरंगी_रे Fri, 01/24/2014 - 01:50 नवीन
जात हा प्रश्न आहेच पण जन्मदात्या आईची भूमिका काय ? असाही "व्यक्तिगत" प्रश्न होता. त्यामुळे माझ्या मुलीचे नाव : नाव आईचे नाव वडिलांचे नाव असे आहे. पारपत्र, जन्मदाखला आदि ठिकाणी. आणि हो, यातून काहीही सिद्ध करण्याचा मानस नाही. मुलीला (वय १ वर्ष ५ महिने) पुढे स्पष्टीकरण देण्यात येईल, यानंतर तिचा निर्णय ती घेईल. खुलासा : आई - मुलीची आई - माझी पत्नी आणि वडील - मी स्वत: (हे न कळण्याइतके हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी) [सध्या] परदेशात राहणारा पुणेरी [खूप आहेत, मी एकटा, पहिला, विशेष, भारी, शेवटचा वगैरे नाही] असल्याने तिरकस प्रतिक्रीया स्वाभाविक आहे, नाही का ?
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Fri, 01/24/2014 - 05:44 नवीन
>>त्यामुळे माझ्या मुलीचे नाव : नाव आईचे नाव वडिलांचे नाव असे आहे. पारपत्र, जन्मदाखला आदि ठिकाणी. इंटरेस्टिंग! असे करताना सरकारी बाबू लोकांनी काही खळखळ केली का?
  • Log in or register to post comments
स
सतरंगी_रे Fri, 01/24/2014 - 17:14 नवीन
खळखळ कोणी केली नाही. वेड मात्र लागलं काही लोकांना... पण आता ते चालायचंच. आणि हो ... माझा एक मित्र आणि त्याची बहीण असेच नाव लावतात साधारण गेली ३० वर्षे .... आणि ते सुद्धा पुण्यात...! आता बोला..! आणि वागतातही तसेच (जात धर्म न मानता). उदा. दाखल्यावर जात = भारतीय, दोघांचे विवाह आंतरजातीय त्यामुळे जात जाईल का ? कोणी घालवायची ? असा विचार न करता असा स्वार्थ साधायला काय हरकत आहे ? म्हणतात ना "You are what you do when it counts" प्रेरणा त्यांच्याकडूनच (वागण्याची आणि फक्त निर्रथक मताची पिंक न टाकण्याची सुद्धा) !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/24/2014 - 17:38 नवीन
ब्राव्हो आणि अभिनंदन ! "You are what you do when it counts" हे नक्कीच +१००० !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 01/24/2014 - 05:10 नवीन
आडनाव रिटायर करावे काय? जर तुम्हाला तुमचे खंडागळे हे आडनाव आवडत नसेल तर तुम्ही ते कोर्टात बदलुन "चिन्मय रिटायर " करुन घेवु शकता. फक्त त्याला अ‍ॅफेडेव्हिट करुन घेवुन पेपरात बातमी द्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Fri, 01/24/2014 - 05:39 नवीन
खिक! *smile*
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 01/24/2014 - 05:41 नवीन
भावना समजल्या !! पण आडनावावरुन जशी जात समजते तसच नाव, आडनाव या दोन्हीवरुन धर्म, भाषा, प्रांत तसच इतर आणखी काही समजु शकते.. अशी प्रतवारी होणारच त्यात काही चूक नाही .. पण त्यावरुन समोरच्याशी कसं वागायच हे ठरवलं जातं तिथे प्रॉब्लेम आहे.. त्यामुळे नाव वडिलांच नाव / आईचं नाव, आडनाव हे फक्त व्यक्तिला uniquely identify करण्यासाठी आहे एवढ ध्यानात ठेवावं.. एखाद्या व्यक्तिला कसं वागवायचं / judge करायचं ते महत्वाचं.. काहीजणं फक्त नाव ऐकुन त्याच्या जात धर्म भाषा प्रांत ओळखुन तो/ती असेल/ अशीच असेल असा शिक्का मारुन मोकळे होतात.. काहीजण व्यक्तिला नुसतं बघुन असे शिक्के मारतात.. काही थोड्याशा ओळखीनंतर शिक्के मारतात.. त्यामुळे कधी असे fuzzy logic वरुन मत बनवायचं आणि कधी पूर्ण माहितीवरुन मत बनवायचं हा सारासार विवेक असणं महत्वाचं.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा