Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा

स
सार्थबोध
Sat, 10/26/2013 - 05:25
💬 7 प्रतिसाद
गुरुवार. कंपनीतला नेहमीचा दिवस. दुपारच्या जेवणात आमच्या आप्पाने ट्रेकचा विषय काढला. कामाचा ताण खूप होता; कुणाचे काही काम, तर कोण गावी जाणार होता. आम्ही हो-नाही, हो-नाहीला सुरुवात केली. मी, विक्या, वैभ्या, बापू, पप्या, अण्णा, आप्पा ( हायटेक सॉफ्टवेअरमध्ये असलो तरी घरगुती टोपणनावांची प्रथा आम्ही कायम ठेवली आहे.) चर्चेला सुरुवात झाली. पाऊस नुकताच सुरु झाला होता, शनिवार धरून ‘तिकोणा’ गाठायचे ठरले. जेवण आटोपून जागेवर आलो. कोणी गूगलवर नकाशे बघू लागला, कोणी आधी कोण जाऊन आले आहेत त्यांचे फोटो बघू लागला. आता खरी सुरुवात झाली होती. मी खायला काय न्यायचे, पाणी की ताक, इत्यादी गोष्टी बघू लागलो. यादी काढली. दुपारी चहा मारायला जमलो आणि कोणी काय आणायचे ते ठरवून दिले. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण नक्की येणार आहे की नाही, हे पक्के ठरवले. गाड्या कोण घेणार, इत्यादी गोष्टी ठरल्या. शनिवार सकाळी ५ला मोबाईल कंपनीचा फायदा करून देत प्रत्येकाने एकामेकाला फोन करत निरोप देत जमायला सुरुवात केली. एक एक जण जमत जमत एकत्र येऊन गाड्या तिकोण्याच्या दिशेने पळवल्या. तिकोणा म्हणजे तसा लहान किल्ला. गडावर फार मोठे क्षेत्रफळ नाही, पण एक गस्तीचा मोक्याचा टापू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असावे. आम्ही गाड्या पायथ्यापासून जरा लांब लावल्या आणि हातात काठी आणि पाठीवर आमची दप्तरे घेऊन चालू लागलो. आम्ही थोडे लवकर पोहोचलो. हेल्मेट वगैरे काही गोष्टी तिथे एका घरात ठेवल्या. त्याचे काही पैसे घेऊन स्थानिक लोक सेवा पुरवीत होते, त्यांना काही रोजगार त्यातून मिळत होता. आम्ही चुलीवरचा ‘कडक चा’ मारला आणि चालू पडलो. जोरदार घोषणा दिल्या, किल्ला चढायला सुरुवात झाली. तिकोण्याची एक बुलंद बाजू दिसत होती. दुरून डोंगर साजरे त्याप्रमाणे अगदी सोपी चढण वाटत होती. एकेकाळी सुवर्णयुग उपभोगलेला तो किल्ला आम्हाला जणू खुणावत होता - या रे मुलानो, या. शनिवार-रविवार, तोसुद्धा फक्त पावसाळ्यातला - त्याशिवाय कोणी फिरकत नाही माझ्याकडे.. या. आम्ही पायथ्याला आलो. सगळ्यांनी वाकून नमस्कार केला आणि एक एक टप्पा चढायला सुरुवात केली. थोडी दाट झाडी चालू झाली आणि चिमुकल्या पक्ष्यांचे मधुर आवाज चालू झाले. आमच्यातला कोणी तसे आवाज काढून त्यांना प्रतिसाद देत होता. निसर्ग का काय म्हणतात तो हाच, याचा प्रत्यय आला. पाऊस थोडा पडून गेल्यामुळे जमीन राड झाली होती. आमच्यातली काही वजनदार मंडळी आपला तोल सावरत त्या मातीच्या परीक्षेत नापास होत होती. आम्ही स्वत:शी काही नियम केले आहेत. एकदा गड चढायला सुरुवात केली की मोबाईलवर किंवा कसलीही गाणी लावायची नाहीत. बोलण्याखेरीज इतर आवाज न करता शांतपणे वारा, पक्षी, झाडांची पाने, कीटक यांचे आवाज ऐकत चालायचे. कोणीही कसलेही व्यसन करायचे नाही. अधूनमधून घोषणा - जय भवानी, जय शिवाजी !!!, हर हर महादेव!!!; किंवा आमचा अण्णा इतिहासातील गोष्टी सांगण्यात पटाईत, त्या सांगायला आणि ऐकायला मुभा होती. मध्येच कुठे झाडाखाली बसून दोन घोट पाणी पिऊन परत चढायला सुरुवात करायची. आम्हाला या आधी बऱ्याचदा गरुड, खंड्या (किंगफिशर - मी फक्त पक्ष्याबद्दल बोलतोय), रानकोंबडी, घुबड, घार, जंगली कबुतर, कोकिळा, पोपट इत्यादी पक्षी पाहायला मिळाले आहेत. आम्ही वाटेने जाताना अनेक खेकडे बिळातून बाहेर येऊन आपल्या नांग्या उभारून "खबरदार पुढे याल तर... हे आमचे घर आहे" असे जणू आव्हान देत होते. आम्ही त्या बिचाऱ्यांना त्रास न देता पुढे जात होतो. एक वरचा माथा आला. एक मोठी विहीर आणि डोंगराच्या कपारीत २/३ गुहा आणि एक देऊळ होते, तिथे चहा आणि नाश्त्याची सोय होती. आम्ही देवाचे दर्शन घेतले. गुहेत राहणारा माणूस किल्ल्याची माहिती सांगत होता, “वर किल्लेदार/रक्षक आहेत” म्हणाला. म्हणजे माकडे बरीच आहेत असा त्याचा अर्थ होता. आम्ही त्या माणसाला काही पैसे देऊ केले. तो घेत नव्हता; पण देवळाची दक्षिणा म्हणून घेण्यास भाग पाडले. दोन जंगली कुत्री होती, त्यांना थोडाफार खाऊ देऊन पुढे निघालो. जरा वर आल्यावर दोन दगडी भलेथोरले गोल पडले होते. अधिक पाहणी केल्यावर ते ‘चुना मळण्याचे जाते’ होते, असे लक्षात आले. आम्ही आणखी वर आलो आणि एक मोठी दगडी चढण लागली. एका बाजूला खोल दरी होती. मागून आणखी काही लोक येताना दिसत होते. त्यातील काही जण "अजून किती राहिले?" असे विचारत होते. "आलेच आता, सावकाश या भावांनो" असे सांगत काहीही निष्काळजीपणा न करता एकमेकाची काळजी घेत वर आलो. चढून येणाऱ्या लोकांशी बोलले की त्यातील काही नवख्या लोकांना थोडा आधार वाटतो. वर आल्यावर वरच्या आणखी एका छोट्या टप्प्यावर एक देऊळ दिसले. ते शिवाचे प्राचीन मंदिर आहे. बाजूला एक तळे होते. आम्ही वर आलो, घोषणा दिल्या. किल्ल्याचे रक्षक - वानरगण आमच्याकडे अपेक्षेने पाहू लागले. शनिवार होता, मारुतीराया दिसला असे वाटले. आम्ही त्यांना आणलेला काही खाऊ, केळी खायला दिली. थोडा वेळ आम्ही झाडाखाली बसलो. एव्हाना बरीच गर्दी जमा झाली होती. छान धुके होते. किल्ल्यावर अगदी पांघरुणासारखे ढग पसरले होते. मधूनमधून बारीक पाऊस, ढग बाजूला झाले की बाजूची शेती, लहान लहान घरे दिसत होती. वाटेने चढत येणाऱ्या काही लोकांच्या घोषणा ऐकू येत होत्या. वातावरण एकूण प्रसन्न होते, श्री सत्यनारायणाच्या पूजेसारखे. आलेले लोक कोणी बिस्कीट, कॅडबरी खात होते, चिप्स, कुरकुरे असले चमचमीत पदार्थ खात होते. मला आता काही गोष्टी खुपू लागल्या. काही जण मोठ्यांदा चित्रपटातील गाणी लावून तेथील निसर्गातील शांतता भंग करत होते. प्लास्टिक पिशव्या , इतर कचरा टाकून घाण करत होते. आम्ही उठून बाजूला तळ्याकडे गेलो. तळ्यातही चिप्सच्या रिकाम्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या यांचा ढीग पडल्या होत्या. भरीस भर म्हणून बरेच ‘सुशिक्षित अडाणी’ लोक सिगरेट पीत होते होते. त्या मंद धुक्यात सिगरेटचा धूर सोडून शहरात जे अमाप आहे, ते ‘प्रदूषण’ पसरवत होते. सुशिक्षित आणि अडाणी या माझ्या मते दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अडाणी म्हणजे ज्याला लिहिता-वाचता येत नाही; तर सुशिक्षित अडाणी म्हणजे जो शिकूनसुद्धा अडाणी माणूसही वागणार नाही असा वागतो, असा माणूस. अत्यंत वाईट अनुभव होता हा. एवढा अमोल ठेवा आपला! आपण लोक त्याची वाट लावत आहोत, याची जाणीव झाली. रोजच्या दगदगीतून बाहेर येऊन किल्ल्यांवर येणे आणि जे शहरात आहे तेच इथे करणे - कचरा टाकणे, प्रदूषण करणे, ही कसली मानसिकता? हा तर शुद्ध बिनडोकपणा आणि असमंजसपणा आहे. किल्ला-दुर्ग म्हणजे आपले पूर्वज. त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याच्या हरेक लढतीत अहम भूमिका बजावली. एक एक किल्ला म्हणजे घरातील एक एक वडील माणूस, याप्रमाणे महाराजांनी त्यांची काळजी घेतली होती. मावळे जिवाचे रान, रक्ताचे पाणी करून त्या दुर्गांना मजबूत करीत असत. अशा कित्येक किल्ल्यांवर अनेक जण जन्मास आले असतील, त्यांनी पावन केलेल्या या मातीत लोक खरेच किती घाण करत होते. माझे रक्त तापत होते. पण आज-कालचा समाज काही केल्या इतक्या सहजतेने असल्या विचारांना किंमत देणारा नाही. आजकालच्या ‘वीकेंड आणि एन्जॉय’ विचारसरणीने किल्ल्यांना मात्र नक्कीच त्रास सहन करावा लागत असेल. मला आठवण झाली - मी एकदा नेदरलॅँडला असताना तिथे ‘अर्न्हेम’ या ठिकाण गेलो होतो, तिथे लोकांनी राडारोडा आणि बांधकामाचे इतर काही साहित्य वापरून दोन मजली असेल एवढी एक टेकडी निर्माण केली होती, तिला पायऱ्या बनवल्या होत्या आणि बऱ्याच कंपनीतील लोक शुक्रवारी तिथे कोण पटकन टेकडी चढेल याची शर्यत घेत होते, मजा करत होते, फोटो काढत होते, टेकडीचे कौतुक करीत होते. नेदरलॅँडमध्ये असे किल्ले वगैरे काही नाहीत. सगळा सपाट प्रदेश. त्या लोकांना त्या टेकडीचे एवढे कौतुक. आपण मात्र आपल्या संस्कृतीने भरभरून दिले आहे, त्याची अवहेलना करीत आहोत. मन विषण्ण झाले. माणसामाणसात, वागायच्या पद्धतीत असेलला फरक ध्यानात आला. ती टेकडी मनातून हसत असेल, आणि इकडे आमच्या इतिहासाचे साक्षीदार हे दुर्ग रडत असतील, असे वाटले. आम्ही उठलो. वर शिवाच्या मंदिरात गेलो. पाण्याने पिंडीला स्नान घातले. ताकाचा अभिषेक केला. गडावर जाताना आम्ही आवर्जून फुले, उदबत्या घेऊन जातो. उदबत्त्या लावून छान पूजा केली. बाहेर गोंगाट चालू होता. आम्ही ‘श्रीसूक्त’, ‘लक्ष्मी सूक्त’ आणि आरती मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली, तसा बाहेरच्या वातावरणात बदल जाणवला. अगदी काही थोड्या वेळात मोबाईलवरची गाणी बंद झाली. लोक शांत झाले. काही जण आरतीला येऊन उभे राहिले होते. तर, आपण नक्की कुठे आलो आहोत याचे काहींना भान आले असावे. आम्ही जोरदार घोषणा देऊन बाहेर आलो. हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत या भावनेने बाकी लोक आमच्याकडे पाहत होते. एक-दोन जण पुढे येऊन आम्ही कुठले, काय करतो याची विचारपूस करू लागले. तुम्ही फार चांगले काम करता इत्यादी प्रतिक्रिया मिळू लागल्या. सिगरेट पिणाऱ्या व्यक्तीने एका गडावर सिगारेट पिऊन चूक केली, परत किल्ल्यावर कधी पिणार नाही, अशी शपथ घेतली. अनेक नवीन मित्र मिळाले. ईमेल आयडी घेऊन पुढच्या ट्रेकला आम्हाला आधी कळवा, असेही ठरले. आम्ही तळ्यावर गेलो तेव्हा तिथे काही मुले तळ्यात उतरून पाण्यात पडलेला कचरा काढत होते. ‘श्रीशिव प्रतिष्टान’ या संघटनेची ती मुले होती, असे कळले. आम्हीही यातून काहीतरी शिकून आजूबाजूचा प्लास्टिक कचरा गोळा करून रिकाम्या पिशव्यात भरायला सुरुवात केली. एकूण गडावरचा सूर जरा बदलला होता. आमच्या आणि कचरा गोळा करणाऱ्या मुलांच्या वर्तणुकीने काही लोक शहाणे झाले होते. फार बरे वाटले. खऱ्या अर्थाने एक-दोन जण जरी ‘दुर्ग म्हणजे सांस्कृतिक ठेवा’ असा विचार करू लागले असतील, तर आमचा ‘ट्रेक’ सफल झाला, असे वाटले. थोड्या वेळाने हात-पाय धुवून आम्ही जेवण घेतले, जागा साफ केली, माकडांना काही अन्न दिले आणि गोळा केलेला कचरा घेऊन उतरायला सुरुवात केली. खरेच, मित्रांनो! आपण गडावर जाताना नक्कीच काही गोष्टींची काजळी घेतली पाहिजे. गडावर ध्वनिप्रदूषण करू नये, नाहीतर शहरातून गायब झालेल्या चिमण्या आणि इतर लहान पक्षी उद्या आपल्याला गडावरसुद्धा बघायला मिळणार नाहीत. तिथली झाडे वगैरे तोडू नयेत, प्लास्टिक किंवा अन्य कुठलाच कचरा टाकू नये. अन्नपदार्थ शिल्लक राहिल्यास तेथील वन्य प्राण्यांना देता येतात का, ते पाहावे. एकूणच गडावर जाऊन काही तरी नाश करण्यापेक्षा काही चांगले काम करता येते का, ते पाहावे. आत्ता उन्हाळा जोरदार चालू आहे. पहिला पाऊस आला की अनेक ‘ट्रेक’ ठरतील. आपण नक्की या गोष्टींचा विचार करू आणि त्याचा प्रसार करू. या वेळेला आम्ही कडुलिंबाची, पिंपळाची आणि इतर काही झाडे नेऊन गडावर लावायचे ठरवले आहे, म्हणजे पावसाळ्यात झाडे वाढून उन्हाळ्यापर्यंत वाढून तग धरू शकतात. कुणास ठाऊक, कदाचित काही वर्षांनी परत तिकडे गेलो तर तेच झाड मोठे होऊन आपल्याला सावली देईल. एक वेगळा आनंद आहे या सगळ्या गोष्टीत. आपण पिझ्झा, पार्ट्या, अनेक प्रकारचे डे इत्यादी पाश्च्यात्त्य गोष्टी बऱ्याच स्वीकारल्या आहेत. आपल्या राष्ट्राच्या संस्कृतीचे जतनसुद्धा (आपल्याला माहीत असूनही) त्यांच्याकडून परत एकदा शिकू या. ‘वेस्टर्न’ असा शिक्का बसला की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी पटकन खपतात किंवा सवयी लागू पडतात. खरे तर दु:ख याचेच आहे. अनुकरण न करता आपणच काही गोष्टी ठरवल्या आणि राबवल्या पाहिजेत. तर निश्चय करू या आपण सगळे जण, की गडकोट किल्ले हा एक सांस्कृतिक ठेवा आहे आणि आपण तो नक्की जतन करू आणि लोकांमध्ये याबाबतीत जागरूकता जागवू. गडकोट किल्ले अबाधित राहोत!!! बोला, हर हर महादेव!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3703 views

💬 प्रतिसाद (7)
च
चित्रगुप्त Fri, 11/01/2013 - 11:08 नवीन
छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे अनिष्ट गोष्टींविषयी नुस्ती कुरकुर करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीत चांगला बदल घडून यावा, म्हणून प्रत्यक्षात काहीतरी करणे महत्वाचे. हे कार्य तुम्ही करत आहात, हे वाचून फार समाधान वाटले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/02/2013 - 08:37 नवीन
लिखाण आवडले. असे ट्रेक्स जाणीवपूर्वक जास्त लोकांना घेऊन आयोजित करा. त्यातूनच निदान १० पैकी २ तरी तो वारसा पुढे चालू ठेवतील!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 11/03/2013 - 03:48 नवीन
माझा अतिशय आवडता किल्ला.... बाकी हल्लीच्या उत्साही (?) ट्रेकर्स मंडळींबद्दल न बोललेच बरे. ट्रेक म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट झालेत हल्ली... असो अजून काय बोलावे.... :-|
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Wed, 11/06/2013 - 17:20 नवीन
चक्रम हायकर्स चे एक सदस्य श्री अमेय गोखले यांची एक सूचना आपण ट्रेकर मंडळीनी अनुसर्ण्याजोगी आहे ट्रेक चे फोटो टाकताना त्यावर पुढील वाक्य ते कायम टाकतात "keep this place clean No Litter ,No Plastic ,no Wrappers फोटो पाहणाऱ्या पर्यंत हे आवाहन आपोआप पोहोचते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/09/2013 - 04:22 नवीन
पण ते जरा एक १०-१२ फोटो हवे होते....
  • Log in or register to post comments
ज
जॅक डनियल्स Sat, 11/16/2013 - 19:57 नवीन
चांगले विचार आहेत, आणि लेख पण मस्त जमून आला आहे. पण
अन्नपदार्थ शिल्लक राहिल्यास तेथील वन्य प्राण्यांना देता येतात का, ते पाहावे.
हा मुद्दा काही पटला नाही. तसेच हे केल्यामुळे पुढे वन्य प्राण्यांना त्रास होऊ शकतो. निसर्गातून खाद्य कसे मिळवायचे हे प्राण्यांना चांगले माहित असते, आणि तेच त्यांचे नैसर्गिक खाद्य असते. तुम्ही त्यांना लेज चे चिप्स आणि पोळ्या खायला घातल्या तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते किंवा ते आळशी बनू शकतात. अशा ठिकाणी माकडांना, अतिउत्साही लोकं आधी खायला घालतात, आणि मग काही दिवसाने, तिच माकडे लोकांच्या हातून खाद्य हिसकावून घ्यायला लागली की त्यांना पकडायला लोकं बोलवायला लागतात. माझ्या मते तर, वन्य प्राण्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे,उगाच त्यांच्या लाइफ ढवळाढवळ करायला जाऊच नये.
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध गुरुवार, 12/05/2013 - 10:28 नवीन
जॅक डनियल्स , तुमचा मुद्दा योग्य आहे, किंबहुना माझ्याकडून या बाबतीत विस्तृत लिहिणे राहिले आहे, हे आले शक्यतो आम्ही फळे, शेंगा देत असतो माकडांना आणि पक्ष्यांना तांदूळ इत्यदि… लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 34 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा