पूल
हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'तो' असतो तिथे
धुकेही असते त्याच्या बरोबर
हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ...
बर्याचदा 'ति'चा आवाज
गारुड करतो त्या धुक्यातून
त्याच्या पोटात एकच प्रश्न
या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो?
हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'ती' असते तिथे
त्याने दिलेले पिंपळपान घेऊन
जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद
खुप जपलयं तिने ते पान
ऊन-वार्यापासून, पावसापासून
कधी कधी तिला प्रश्न पडतो
तिच्या हातातले पिंपळपान
जास्त जिवघेणी शिक्षा,
कि,
तिच्या डोळ्यातली डबडबलेली
'त्या'ची प्रतिक्षा?
पूलावरचा मिणमिणता दिवा
थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते
दिवा तसाच तिथे फडफडत असतो
हम्म... हा पूल कधीच शांत नसतो
----
आता त्या पूलाचा ताबा
नभातला चंद्र आणि
पूलाखालून वाहणारे पाणी घेते
त्यांच्या ओढाताणीत पूलाची फरफट होते
त्याची अडचण हि की दोन्ही किनार्यांना
या ओढाताणीत धरुन कसे ठेवायचे?
ह्या विवंचनेचा अंधांर त्याला
पुन्हा एकदा घेरतो
हम्म... हा पूल कधीच शांत नसतो
----
असं म्हणतात कि पूल दोन किनार्यांना
जोडण्यासाठी असतात..
पण ते खरं नाही
किनारे किनार्यांच्याच जागेवर राहतात
पूल मात्र बिचारे उगाच
आपला जीव टांगणीला लावतात
-----
खरचं
हा पूल कधीच शांत नसतो
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१८/०५/२०१३)
किनारे किनार्यांच्याच जागेवर राहतात पूल मात्र बिचारे उगाच आपला जीव टांगणीला लावतातक्या बात है ! हे एकदम भावलं !!