Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०२ : ऑकलंड - वाईतोमोच्या काजव्यांच्या गुहा - रोतोरुआ

ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/02/2013 - 17:00
💬 34
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)... ==================================================================== ...इतका थकवा आला होता तरी झोपण्याची केवळ धडपडच चालू होती. दर तासाला झोपमोड होत होती. सव्वाचार वाजले तरी हॉटेलच्या रिसेप्शनवरून काही फोन येत नाही असे बघून स्वतःच फोन फिरवला. विमानतळावरून बॅग आली का म्हणून चौकशी केली तर बेलबॉय म्हणाला, "हो आलीय, घेऊन येतो". बॅग खोलीत ठेवताना म्हणतो कसा, "साडेतीनलाच बॅग आली पण उगाच कशाला तुमची झोपमोड करायची म्हणून फोन केला नाही." आता याचे मी काय करू? इकडे मी बॅग आली नाही म्हणून तळमळतोय आणि हा झोपमोड करायला नको म्हणून बॅग घेऊन बसला होता ! मात्र बॅगेला बघूनच इतके भरून आले की त्याला मनोमन माफ करून टाकले ! परत एकदा झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण सगळ्या कटकटींमुळे वाढलेल्या अ‍ॅड्रिनॅलिनच्या स्तराने असेल किंवा जेटलॅगमुळे (दम्माम आणि ऑकलंड यातील वेळेत १० तासांचा फरक आहे) असेल झोप येईना. मग सरळ उठून सकाळचे नित्यनियम आटपून टाकले. आतापर्यंत मन:स्थितीची गाडी रुळावर आली होतीच पण मोबाईल आणि कॅमेर्‍याच्या बॅटर्‍याही पूर्ण चार्ज झाल्या होत्या. पावले सहजच खोलीच्या गॅलरीकडे वळली. ऑकलंडचा मध्यवर्ती भाग काहीश्या उंच इमारतींनी गजबजलेला असला...  तरी उपनगरांत मात्र झाडीत वसलेल्या एकदोन मजली इमारतीच आहेत....  अशा आधुनिकता आणि निसर्ग यांच्या संगमाबरोबर सुंदर सागर किनारा लाभल्यामुळेही या शहराला एक अनोखे सौंदर्य लाभलेले आहे. न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर असलेल्या या शहराची लोकसंख्या १४ लाख म्हणजे न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ एक त्रितियांश आहे. न्यूझीलंड मधील मूळ निवासी 'मावरी' जमातीची सर्वात जास्त लोकसंख्याही याच शहरात आहे. २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात या शहराला राहण्यासाठी जगातले तीन नंबरचे शहर म्हणून नावाजले होते. गॅलरीतून दिसणारा प्रसन्न परिसर डोळ्यात साठवला आणि सहलीचा मूड जमू लागला. कालच्या गडबडीत खाणे थातूरमातूरच झाले होते. आता ऐकू येणारा आवाज हा आजूबाजूच्या झाडांतील पक्षांचा नसून पोटातील कावळ्यांचा आहे हे ध्यानात आले आणि त्वरित न्याहारी हादडायला रवाना झालो. कालच्या सहलपूर्व सभेत मी गैरहजर असल्याने न्याहारी करताना सहल निर्देशकाने जमेल तेवढ्या लोकांची ओळख करून दिली. बाकीचे बसमध्ये भेटणार होतेच. बहुतेक सर्व मनमोकळे लोक होते त्यामुळे सहल मजेत होईल असे मत झाले आणि मागचे सर्व विसरून आता सहलीची मजा लुटायचा मूड पूर्णपणे जमला. ग्लोबसने सहलीच्या फीमध्येच सामानवाहतूकीची सोय अंतर्भूत केलेली असल्याने ठरलेल्या वेळेस बॅगा खोलीबाहेर ठेवल्या की आपले काम संपले. त्यानंतर त्या मोजून बसमध्ये ठेवण्याची आणि गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तेथील खोलीवर आणून देण्याची व्यवस्था सहल निर्देशक बस चालक आणि हॉटेल कर्मचार्‍यांकरवी चोख करून घेत असे. हातातल्या पिशव्या सोडून बाकी सगळे सामान बसच्या पोटात टाकून आरामात प्रवास सुरू झाला. आज प्रथम ऑकलंड शहराची सफर करून मग पुढे जायचे होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर लगेच समोर आला तो हा स्कायसिटी टॉवर... तोच तो, ज्याच्या टोकावर असलेल्या फिरत्या रेस्तरॉमध्ये जेवायचा माझा कालचा बेत विमानकंपनीने उधळवून लावला होता...   ३२८ मीटर उंच असलेला हा टेलेकॉम टॉवर दक्षिण गोलार्धातली सर्वात उंच वास्तू समजली जाते आणि तो ऑकलंडच्या आकाशरेखेचा एक अविभाज्य घटक आहे. गजबजलेल्या पण नीटनेटक्या शहरी भागातून जातानाचे फोटो...  .  ऑकलंडचे बंदर आणि त्याचा परिसर खास बघण्यासारखा आहे. तेथील मुख्य गोष्टी म्हणजे चारचाकीच्या आठ लेन असलेला हार्बर ब्रिज... ` १९९५ साली शिडांच्या बोटींच्या स्पर्धेत अमेरिकेच्या बलाढ्य संघाला हरवून टीम न्यूझीलंडने जागतिक कीर्तींचा 'अमेरिकाज् कप' जिंकला तेव्हापासून तर तेथे आपल्या चारचाकीवर कमी आणि खाजगी बोटीवर जास्त प्रेम केले जाते ! न्यूझीलंडला आपल्या दर्यावर्दीपणाचा फार अभिमान आहे हे अनेक गोष्टींवरून सहज स्पष्ट होते. उदाहरणार्थ, हे बंदरावर मोक्याच्या ठिकाणी अभिमानाने ठेवलेले एका अजस्त्र जहाजाच्या नांगर वर-खाली करण्याच्या यंत्रणेतले भले मोठे चक्र...  आणि जगात सर्वात जास्त दरमाणशी संख्या असणार्‍या खाजगी बोटी (सहल निर्देशकाच्या माहितीप्रमाणे न्युझीलंडमध्ये दर दोन माणसांमागे एक खाजगी बोट आहे !) ...  आणि त्यातल्या काही बोटी ऑकलंड आकाशरेखेच्या पार्श्वभूमीवर बंदरात विहार करताना दिसत होत्या...  तेथून जवळच मायकेल जोसेफ सॅवेज या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधानाला अर्पण केलेल्या बागेत गेलो. अत्यंत साधेपणाने बनवलेले हे स्मारक खूपच नीटनेटके होते आणि अनेक सुंदर फुलझाडांनी सजलेले होते...  मुख्य म्हणजे जरा उंचीवर असलेल्या या बागेतून शहर आणि बंदराचे मनोहारी दर्शन होते...  .  मावरी लोकांचे सामाजिक केंद्र...  येथून पुढे आम्ही वाइकातो या निसर्गरम्य विभागातून वाईतोमोच्या काजव्यांच्या गुहा बघायला निघालो. ही त्या वाटेवरची काही क्षणचित्रे...   .  .  .  तीन कोटी वर्षांपूर्वी भूगर्भाच्या हालचालीमुळे येथील समुद्रतळातील चुनखडीचे खडक पाण्याच्या वर येऊ लागले आणि पावसाच्या व नदीच्या पाण्याने त्यांची झीज होऊन त्यांच्या पोटात गुहा निर्माण झाल्या. ही प्रकिया जगात अनेक ठिकाणी झाली आहे. पण येथील गुहांना विशेष महत्त्व दिले आहे त्यांत घर करून राहिलेल्या स्वयंप्रकाशीत किड्यांनी. Arachnocampa luminosa हे जीवशास्त्रीय नांव असलेल्या डासांच्या आकाराच्या कीटकांच्या असंख्य अळ्या वाइतोमोच्या गुहेच्या छतावर वस्ती करतात. या अळ्या त्यांच्या शरीरात होणार्‍या रासायनिक प्रक्रियेने प्रकाश निर्माण करतात. त्या छतापासून लोंबणारे चिकट धागे निर्माण करतात. प्रकाशामुळे आकर्षित झालेले कीटक या धाग्यांना चिकटतात आणि अळ्यांचे भक्ष्य बनतात. या किड्यांमुळे गुहेचे छत अंधार्‍या रात्री तार्‍यांनी भरलेल्या आकाशासारखे दिसते. हा निसर्गाचा चमत्कार आपण या गुहांतून वाहणार्‍या नदीच्या प्रवाहातून जाणार्‍या होडीत बसून आपण पाहू शकतो. मात्र या किड्यांवर फ्लॅशचा परिणाम होऊन ते प्रकाश निर्माण करण्याची प्रक्रिया काही तास बंद करतात म्हणून या बोटीच्या सफरीत फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आंतरजालावरचे हे एक चित्र वानगीदाखल साभार देत आहे...   तेथून निघून वाटेत ओटोरोहांगा नावाच्या एका छोट्या गावात अल्पोपहाराठी थांबलो...  न्यूझीलंडवर निसर्गाने काहीही हातचे न राखता कृपा केली आहे आणि न्यूझीलंड त्या सौंदर्याची पुरेपूर काळजी घेत आहे याची जाणीव ऑकलंड-रोतोरुआ या बस प्रवासाच्या सगळ्या मार्गावर वारंवार होत होती.  .  .  रोतोरुआ आले आणि ही जाणीव प्रकर्षाने झाली...   आज दिवसभरचा प्रवास बसने होता तरी या सगळ्या निसर्गसौंदर्याने तो सफरीची मजा वाढवूनच गेला. त्यामुळे भुर्रकन विमानातून न आणता हा प्रवास बसने ठेवण्याच्या ग्लोबासच्या कल्पकतेचे कौतुकच वाटले. रोतोरुआला पोहोचेपर्यंत साडेचार वाजले होते. थोडा वेळ आराम करून आणि शॉवर घेऊन तरतरीत होऊन बाहेर पडलो. मावरी कलादर्शनाचा (कंसर्ट) आणि खास मावरी (हांगी) जेवणाचा बेत असलेल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी साडेसहाला सगळे लॉबीत जमलो. कार्यक्रमाचे ठिकाण हॉटेलच्या जवळच अगदी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक मावरी स्वागत समारंभाने झाली...  .  .  जुन्या काळी मावरी अनोळखी अतिथीला प्रथम "तुला खाऊ का गिळू" अश्या आविर्भावात डोळे वटारून, जीभ बाहेर काढून, शड्डू ठोकून आणि वेगवेगळे भयकारक आवाज काढून "म्या लय भारी हाय" हे दाखवून देत आणि मग झाडाची छोटी डहाळी त्याच्यासमोर थोडे अंतर ठेवून जमिनीवर ठेवत असत. जर त्या नवख्याने डोळ्याला डोळा भिडवत न घाबरता ती डहाळी उचलली तर त्याने मैत्रीचा प्रस्ताव मान्य केला आहे असे समजून त्याची खातीरदारी सुरू करायची... अन्यथा एकतर तो घाबरट आणि म्हणून मैत्रीला लायक नाही किंवा आक्रमक आहे असे समजून त्याला मारून खायचे अशी ही प्रथा. आमच्यातल्या एकाला थोडे प्रशिक्षण देऊन त्याला आमचा नेता बनवले आणि मोठ्या गमतीने हा प्रसंग सादर केला. आमच्या नेत्याने डहाळी उचलल्यावर "ठीक आहे, आता तुम्हाला न खाता तुम्हालाच आमचे खास हांगी पद्धतीने शिजवलेले जेवण खायला देऊन तुमचा सन्मान करू." असे जाहीर केले ! नंतर जेवणाच्या हॉलशेजारच्या हांगी मुदपाकखान्यात नेऊन त्यांची जेवण बनवण्याची प्रकियाही दाखवली...  .  .  या पद्धतीत सरपणाने गरम केलेल्या दगडी गोट्यांवर पदार्थ ठेवून नंतर ते झाकून ठेवून शिजवतात. मात्र आता स्वच्छता आणि आरोग्यासंबद्धीच्या कडक सरकारी नियमांमुळे वर दिसणारे दगडी गोटे सोडले तर इतर सर्व साधने अत्याधुनिक होती आणि उष्णतेसाठी लाकडांऐवजी गॅस वापरतात. जेवण बुफे पद्धतीने आणि भरपूर निवड असणारे व चवदार होते त्यामुळे मजा आली. जेवण झाल्यावर मग मावरी संस्कृती, त्यांचे संगीत व नृत्य याची ओळख देणारा बहारदार कार्यक्रम झाला त्याची काही क्षणचित्रे...  .  .  .  .  .  सगळा कार्यक्रम संपेपर्यंत साडेदहा वाजले असावे. हॉटेलवर परत येताना सर्वांच्या तोंडी किती मजा आली याचीच चर्चा होती. खोलीत परतल्यावरच गेल्या तीन दिवसांच्या दगदगीचा थकवा जाणवू लागला. पण सहलीची छान सुरूवात झाल्याने खुशीने झोपी गेलो. (क्रमशः ) =================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)... ====================================================================

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11443 views

💬 प्रतिसाद
म
मोदक गुरुवार, 05/02/2013 - 17:10 नवीन
भारी!!! वाचतोय! (आता माझे नाव पायजे हां ;-) )
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/02/2013 - 17:12 नवीन
बर बाबा. तुला खास स्वतंत्र धन्यवाद! आता खूश? +D
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/02/2013 - 17:38 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक गुरुवार, 05/02/2013 - 17:10 नवीन
लवकर पुढचे भाग टाका.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 05/02/2013 - 17:28 नवीन
मजा आली वाचताना पुभाप्र :)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 05/02/2013 - 17:57 नवीन
जबदरस्त... हाही भाग अप्रतिम. तुमच्यासोबत आमचीही सफर सुरु आहे... आता पुढे कुठे जायचं? :) :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/02/2013 - 19:03 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 20:32 नवीन
>>>>अन्यथा एकतर तो घाबरट आणि म्हणून मैत्रीला लायक नाही किंवा आक्रमक आहे असे समजून त्याला मारून खायचे अशी ही प्रथा. रेसिपी?????????? आपले शेफ्स सुधारणा सुचवतील ;) वेल सफर छान सुरु आहे. आहोतच बरोबर.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/02/2013 - 23:03 नवीन
मस्तय एकदम न्यूझीलंड. ते झिंगालाला हुर्रर्रर्र च्या डान्सचे फोटो पण लै भारी. फोटो बघताना मागं म्युझिक ऐकू येत होतं. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/03/2013 - 00:30 नवीन
खुसखुशीत लेखनशैलीमुळे वाचताना मजा आली अन त्यास सुंदर चित्रांची साथ मिळालेली आहे. मावरी जमातीची वेशभूषा रेड इंडियन्सच्या वेशभूषेशी जवळीक साधणारी वाटली. न्युझिलंडचे राष्ट्रीय चिन्ह फर्न वॄक्षाचे पर्ण आहे, त्याबद्दल तिथे काय भावना आहेत यावर पुढील भागात माहिती दिल्यास हर्ष वाटेल. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 09:56 नवीन
सरकारी इमारती आणि एअर न्युझीलंड सोडून इतर कोठे हे फर्नच्या पानाचे राष्ट्रीय चिन्ह दिसले नाही. न्युझीलंडचे मावरी लोक हे तैवानमधून प्रथम मेलॅनेशियामध्ये (पॉलिनेशिया) आणि तेथून नंतर इ स १२५० ते १३०० मध्ये न्युझीलंडच्या उत्तर बेटात समुद्रमार्गे स्थलांतरीत झालेल्या जमातींचे वंशज आहेत. अमेरिकन रेड इंडियन्स सायबेरिया-मगोलिया-उत्तर चीन येथून अलास्कात जाऊन नंतर संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिकाभर पसरले. हे स्थलांतर मुख्यतः १२,००० वर्षांपूर्वी त्या काळात सायबेरिया आणि अलास्का यांना जोडणार्या जमिनीवरून झाले. आता हे दोन भूभाग बेरींग समुद्राने विभागलेले आहेत.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 05/03/2013 - 00:31 नवीन
न्यूझीलंडच्या निसर्गसौंदर्याबद्दल ऐकले होते. ते खरेच तसे आहे हे पाहून छान वाटले. सगळे फोटू, माहिती ग्रेट!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/03/2013 - 05:47 नवीन
मजा येतीय वाचताना. ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/03/2013 - 06:04 नवीन
सुहासश्री, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ माणुस Fri, 05/03/2013 - 06:15 नवीन
माझ्या स्वप्नातीत अश्या ठिकाणी तुम्ही पोहोचला आहात. सर्व काही हेवा वाटावा असेच :) सुपर्ब फोटोज :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 08:15 नवीन
सामान्य वाचक, सानिकास्वप्निल, सुहास झेले, मुक्त विहारि, प्यारे१, अभ्या.., श्रीरंग_जोशी, रेवती, वल्ली, संजय क्षीरसागर आणि सुज्ञ माणुस : आपल्या सर्वांना सहलीतील सक्रिय सहभागाबद्दल अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Fri, 05/03/2013 - 09:30 नवीन
माहिती अत्यन्त सुन्दर तसेत उत्कन्ठापूर्वक आहे.एक विचारायचे आहे कि हे काजवे वर्शभर दिसतात कि कसे कारण्,भारतात किन्वा कोकणात हे साधारणपणे पावसापुर्वि दिसतात.असो पुढे चालुदे वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 10:57 नवीन
आपण पावसाळ्यात पाहतो ती आपल्याकडच्या काजव्यांची पूर्ण कीटक अवस्था. न्युझीलंडामधल्या या गुहेत Arachnocampa luminosa या नावाच्या किटकाची अळी अवस्था असते आणि ही अवस्था ६ ते १२ महिने चालू असते... म्हणजे हा निसर्ग चमत्कार बारमाही असावा. मात्र नक्की माहिती नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 10:58 नवीन
आपण पावसाळ्यात पाहतो ती आपल्याकडच्या काजव्यांची पूर्ण कीटक अवस्था. न्युझीलंडामधल्या या गुहेत Arachnocampa luminosa या नावाच्या किटकाची अळी अवस्था असते आणि ही अवस्था ६ ते १२ महिने चालू असते... म्हणजे हा निसर्ग चमत्कार बारमाही असावा. मात्र नक्की माहिती नाही.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 05/03/2013 - 09:49 नवीन
मस्त झालाय हा पण भाग. पु.भा.प्र. :)
  • Log in or register to post comments
च
चेतन माने Fri, 05/03/2013 - 10:17 नवीन
जेवणाच्या थाळीचा फोटू नाय टाकलात!! असो. उन थोडं रणरणतं वाटतय का? (किंवा माझ्यावरच कदाचित आत्ताच्या मुंबईतल्या गर्मीचा परिणाम असेल, म्हणून मलाच तसं वाटतंय!). सर्व फोटू झकास आलेत. पुभाप्र :):):)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 11:48 नवीन
जेवणाच्या थाळीचा फोटू नाय टाकलात!! पुढच्या भागात येईल :) उन थोडं रणरणतं वाटतय का? न्यु़झीलंडच्या जरा पुढे सरकलेल्या उन्हाळ्यामुळे तापमान १० ते १५ डि. से. होते आणि आकाश निरभ्र होते... म्हणजे तेथे फिरायला छान वातावरण.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 05/03/2013 - 10:53 नवीन
हॉलिवूड चित्रपटांत बघून न्यूझिलंड माझे ड्रिमलँड आहे. तिथल्या सफरीची सुरुवात छान झाली आहे. आता पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. सगळ्या भागांवर प्रतिक्रिया देणं जमलं नाही तरी ते आवर्जून वाचले जातील याची खात्री असू द्या :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/03/2013 - 11:23 नवीन
आता पुढे कुठे जायचं आहे?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 11:50 नवीन
बर्‍याच ठिकाणी जायचे आहे... आता तर नुसती सुरुवात झालीय :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 11:51 नवीन
Mrunalini आणि स्मिता. : अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
N
nishant Fri, 05/03/2013 - 12:01 नवीन
हांगी पदधतिच्या जेवणात नक्कि काय असते? फोटो आणि वर्णन आवडले... :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 16:48 नवीन
हांगी ही फक्त शिजविण्याची पद्धत वेगळी आहे; शिजवलेले पदार्थ नेहमीचेच म्हणजे भाज्या (मुख्यतः भोपळा), मांस, मासे वगैरे असतात. ही पद्धत काहिशी कोकणात वालांची पोपटी लावतात तशीच आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/03/2013 - 12:06 नवीन
लै भारी चित्रलेख...जियो..!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/03/2013 - 16:51 नवीन
धन्यवाद तात्या !
  • Log in or register to post comments
श
श्रिया Sat, 05/04/2013 - 08:26 नवीन
खूप मस्त झाला आहे हा भाग! फोटो हि खासच. किड्यांनी निर्माण केलेला प्रकाश फोटोत असल्याप्रमाणे निळसर असतो कि अजूनही काही छटा असतात?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/04/2013 - 08:36 नवीन
किड्यांचा प्रकाश पांढरा आणि काहिशी निळसर छ्टा असलेला असतो... इतर रंगछ्टा नसतात. पण त्यामुळे गुहेचे छत म्हणजे अंधार्‍या निरभ्र रात्रीसारखे तार्‍यांनी भरलेले दिसते.
  • Log in or register to post comments
क
कोमल Sun, 05/05/2013 - 17:34 नवीन
खूप छान वर्णन, आणि फोतु पण.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/06/2013 - 08:09 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा