Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

टोका प्रवरासंगमचे अद्भूत शिवमंदिर

प
प्रचेतस
गुरुवार, 02/07/2013 - 10:27
💬 82
देवगिरी बघून आणि नगर फाट्यावर बिरूटे सर आणि श्रुतीताईंना भेटून आम्ही औरंगाबादेहून आता परतीच्या मार्गाला लागलो. पण एक ठिकाण अजूनही बघायचे राहिले होते ते म्हणजे गंगापूर फाट्याच्या थोडेसे पुढे असलेले टोका गावातील शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिर. वास्तविक औरंगाबादला येतानाच हे मंदिर बघायचे होते पण वेळेअभावी ते परतीच्या वेळी पाहायचे ठरले. हे मंदिर गोदावरी आणि प्रवरेच्या संगमानजीकच आहे. अगदी महामार्गाला लागूनच, प्रवरेवरच्या पुलानजीकच. सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो. हे मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करून मंदिराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. सिद्धेश्वर मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंती शैलीची. ह्या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिराच्या एका बाजूला विष्णूचे आणि दुसर्‍या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत आणि ह्या तिन्ही मंदिरांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत. १. संगमावरील सिद्धेश्वर मंदिर a २. सिद्धेश्वर मंदिर संकुल a आम्ही पहिल्यांदा आता मुख्य मंदिर पाहायचे ठरवले. मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे. स्तंभांवर भारवाहक यक्ष छत तोलून धरताना कोरलेले आहेत. २२०० वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली आलेली ही भारवाहक यक्षांची परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत झिरपलेली आहे. ब्राह्मणी लेण्यांत आणि हिंदू मंदिरांत काही वेळा यक्षांची जागा यक्षिणी अथवा योगिनी घेताना दिसतात. सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले कोरीव काम इतके आकर्षक नाही. मंदिराचे गर्भगृह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलिंग स्थापित केले आहे. ३. मंदिर सभामंडप a ४. शिवमंदिरासमोरील देखणा नंदी a ५. मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल a ६. सभामंडप व गर्भगृह a ७. भारवाहक यक्ष a--a ८. मंदिराच्या बाजूस असलेलया ओसर्‍या a या मंदिराचे जे काही देखणेपण आहे ते त्याच्या बाहेरच्या भिंतीवर असलेल्या शिल्पांमध्ये. मंदिरांच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस दशावतार पट्टिका कोरलेली आहे. दशावतार पट्टिकेवरची शिल्पे अतिशय देखणी आहेत. विष्णूचे मत्स्यावतारापासून कल्की अवतारांपर्यंतचे दहा अवतार येथे पाहावयास मिळतात. ९. मत्स्यावतार वास्तविक विष्णूने मत्स्याचे रूप धराण करून मनु राजाला प्रलयातून वाचवले अशी ही कथा आहे पण शिल्पातला वार करणारा दैत्य कोण आहे ते कळत नाही. a १०. कूर्मावतार येथे कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून समुद्र घुसळत असलेले एका बाजूला देव तर दुसर्‍या बाजूला दानव कोरलेले आहेत. . a ११. वराह अवतार हे शिल्प लै भारी आहे. वराहाने आपल्या दातांवर अर्धचंद्राकृती पृथ्वी उचललेली आहे त्या पृथ्वीवर हत्ती, घोडे, मनुष्य, वनस्पती आदी सजीव सृष्टी नांदत आहे. याच पृथ्वी तोलून धरलेल्या अवस्थेत वराह हिरण्याक्षाशी गदायुद्ध खेळत आहे. a १२. नृसिंहावतार येथे स्तंभातून प्रकट झालेला नृसिंह हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचे आपल्या नखांनीच पोट फाडताना दाखवला आहे. एका बाजूला लहानगा प्रल्हाद हात जोडून उभा आहे. a १३. वामन अवतार हे शिल्प उद्धस्त अवस्थेत असल्याने नीट कळू शकत नाही पण वेदीवर बसलेल्या बळी राजाच्या मस्तकावर वामनाने पाय ठेवल्याचे या शिल्पाचे अंधुकसे अवशेष दिसतात. a १४. परशुराम अवतार इथे सहस्त्र हात असलेल्या कार्तवीयाचा परशुराम परशुच्या साहाय्याने वध करताना दाखवलेला आहे. तर बाजूलाच सहस्त्रार्जुनाने परशुराम पिता जमदग्नीची बळजबरीने हरण केलेली धेनु दाखवलेली आहे. a १५. रामावतार दशानन रावणाशी युद्ध करताना राम लक्ष्मण कोरलेले आहेत तर हनुमान एक वृक्ष उपटून रावणावर फेकत आहे. रावणाला नऊ मानवी तोंडे तर एक पशूचे तोंड कोरलेले आहे जणू ते त्याच्यातले क्रौर्याचे निदर्शक आहे. रावणाच्या हातात त्रिशुळ, खड्ग, गदा, धनुष्यबाण, भाला, चक्र, मुद्गल अशी विविध शस्त्रे दाखवली आहेत. a १६. कृष्णावतार यात बालकृष्ण यशोदेबरोबर दाखवला आहे तर शेजारच्या शिल्पात त्याने कंसाचा राजमुकुट खेचून त्याच्या केशसंभाराला पकडून खेचताना कोरलेले आहे तर खालचे बाजूस कंसाचे मस्तक खंडित केलेले दाखवलेले आहे. a १७. बुद्धावतार मध्यभागी बुद्ध व बाजूला त्याचे दोन अनुयायी एक स्त्री व एक पुरुष ध्यान करताना दाखवलेले आहेत. गंमत म्हणजे बुद्धाचा समावेश जेव्हा विष्णूच्या अवतारांमध्ये केला गेला तेव्हा विष्णूचे चार हात पण बुद्धाला चिकटले ते चारही हात येथे कोरलेले आहेत. a १८. कल्कीअवतार हा विष्णूचा दहावा अवतार. पुरांणाप्रमाणे हा भविष्यातला अवतार आहे. हा नेहमी पांढर्‍या छत्रधारी सालंकृत घोड्यासह दाखवला जातो. शस्त्रधारी कल्की काहीवेळा घोड्यावर बसलेला तर काही वेळा लगाम हातात धरलेल्या अशा दोन्ही स्वरूपात दाखवला जातो. a १९. मंदिरातील दशावतार पट्टिका a २०. मंदिरातील दशावतार पट्टिका a मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. डाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे. त्यामागची कथा नेमकी कोणती हे ध्यान्यात येत नाही परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे ती ह्याच मंदिराची प्रतिकृती असावी. कारण शिल्पामधले कोरलेले मंदिर प्रत्यक्षातही याच रचनेचे आहे. मंदिरात दर्शनाला राजा (बहुधा पेशवे) हत्तीवरून दर्शनाला येताना दाखवला आहे. बरोबर त्याचे भालदार चोपदार आणि सेवक आहेत तर मंदिराच्या मागच्या बाजूला गरूडाने दोन्ही हातांवर विष्णू आणि लक्ष्मीला तोलून धरलेले आहे तर मस्तकी शेषनाग धारण केलेला आहे. २१. संपूर्ण शिल्पपट a २२. मंदिराचे दर्शन घेताना दाखवलेला राजा आणि पाठीमागे गरूडाचे शिल्प a याच भिंतीवर अजूनही काही शिल्पे कोरलेली आहेत. २३. गणपतीची पाद्यपूजा करताना दाखवलेली स्त्री. टिपीकल पेशवेकालीन वेशभूषा a २४. बालकृष्णाचे गोकुळातले प्रसंग a २५. कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला a २६. अर्जुनाचे गर्वहरण पुराणातली मूळ कथा अशी की अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा गर्व होऊन तो हनुमानाला म्हणाला की रामाने इतके सामर्थ्य असतानाही बाणांनी सेतू उभारण्याऐवजी दगडांचा सेतू का उभारला. आता माझ्या बाणांचे सामर्थ बघ, मी तुला कधीही न तुटणारा बाणांचा सेतू उभारून दाखवतो. अर्जुनाचे हे गर्विष्ठ बोलणे पाहून हनुमानाने त्याला आव्हान दिले. जसजसा अर्जुन बाणांचा सेतू उभा करी तसातसा हनुमान त्याखाली बसून तो सेतू उद्धस्त करून टाकी. हीच कथा येथे मूर्तस्वरूपात कोरलेली आहे. a २७. भीम गर्वहरण ही महाभारतातली कथा आहे. आरण्यकपर्वात द्रौपदीच्या हट्टापायी कुबेराच्या संरक्षित सरोवरातली सौगंधिक कमळे आणायला जाताना भीम जातो. तेथे भीमाला कुबेराच्या यक्षांशी लढावे लागू नये म्हणून काळजीपोटी हनुमान वृद्ध वानराचे रूप धारण भीमाचा मार्ग अडवतो तसेच आपली शेपटी उचलता येत नाही हे सांगून त्यालाच शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगतो. पण हनुमानाची शेपटी उचलू न शकल्याने शेवटी भीमाचे गर्वहरण व हनुमान मूळ रूपात प्रकट होऊन आपले दैदिप्यमान रूप त्याला दाखवतो व यक्षांच्या संकटाविषयी सावध करतो. a मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतींवर पण काही रोचक शिल्पे आहेत. इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत. २८. नृत्यमुद्रा a २९. टाळ, मृदंग आदी वाद्ये वाजवतांना a ३०. केशसंभार करताना आणि वीणा वाजवताना दाखवलेल्या स्त्रीया a ३१. कृष्णाचे गोपिकांबरोबरचे गोकुळातील प्रसंग a ३२. हाच तो शिल्पपट a द्रौपदीस्वयंवर इथल्याच भिंतीवर कोरलेले द्रौपदी स्वयंवराचे शिल्प अतिशय सुरेख आहे. द्रौपदी दासीसह गजरथात बसलेली दाखवली आहे. अर्जुन छतावरील मत्स्याचा डोळ्यावर नेम धरून खालच्या दिशेने पाहात उभा आहे. त्याच्या बाजूला युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव बसलेले आहेत. बाजूला द्रुपद राजा आणि त्याचे सैन्य तसेच स्वयंवराला आलेले इतर राजे दाखवले आहेत तर वरच्या बाजूला कृष्ण आणि संकर्षण कोरलेले आहेत. ३३. संपूर्ण शिल्प a ३४. लक्ष्यभेद a याच भिंतीच्या एका कोपर्‍यात रामायणातील अशोकवनाचा प्रसंग कोरलेला आहे. सीता अशोकवाटीकेतल्या एका वृक्षाखाली बसलेली असून हनुमान त्या वृक्षाच्या फांदीवर बसून आपली ओळख तिला करवून देत आहे. ३५. a विष्णूमंदिर आता मंदिराच्याच उजव्या बाजूला असलेले विष्णूमंदिर पाहायला आम्ही सुरुवात केली. हे मंदिर सुद्धा लहान लहान शिखरांच्या रचनेने बनलेले आहे. मंदिर तसे लहानसेच असून विष्णूमूर्तीच्या समोर हात जोडलेल्या अवस्थेत गरूडाची मूर्ती स्थापन केलेली आहे. ३६. विष्णूमंदिर a ३७. विष्णूमूर्ती a ह्या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर कोरलेल्या दिक्पालांच्या मूर्ती. ३८. पश्चिम दिशेचा स्वामी वरूण, त्याचे वाहन हत्ती. वरूणाचा पाश आणि त्याची गदा सुद्धा यात कोरलेली आहे. a ३९. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी त्याचे वाहन एडका यांसह a ४०. दक्षिण दिशेचा स्वामी यम त्याचे वाहन रेडा यांसह a ४१. हा नैऋत्य दिशेचा स्वामी निऋती. हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो (हा बहुधा असूर होता) याचे प्रमुख शस्त्र खड्ग असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे. a ४२. वायव्य दिशेचा स्वामी वायु हातात ध्वज घेऊन उभा आहे. त्याचे वाहन बहुधा बैल आहे. a ४३. पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याच्या ऐरावत हत्तीसह उभा आहे. a ४४. ईशान्य दिशेचा स्वामी ईशण अथवा रूद्र हाती त्रिशुळ, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे. a ४५. उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे नक्रासह (मगर) यांसह उभा आहे. a वरील दिक्पालांपैकी अग्नी, कुबेर आणि वरूणाच्या वाहनांमध्ये विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने दिली आहेत. अग्नीचे वाहन काही ठिकाणी बैल तर वरूणाचे नक्र अथवा मगर (वरूण जलदेवता असल्याने) असे दाखवलेले आहे. याच विष्णू मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि मर्कटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहे. मर्कट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसावेत. ४६. a देवीमंदिर या विष्णूमंदिरातील विलोभनीय मूर्ती बघतच आम्ही मुख्य शिवमंदिराच्या पलीकडच्या बाजूस असलेले देवीचे उपमंदिर पाहण्यास निघालो. ह्या मंदिराची रचना पण साधारण विष्णूमंदिरासारखीच असून याच्या भिंतीवर देवी तसेच अष्टमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ४७. देवीचे मंदिर a ४८. ही चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे. (प्रेतवाहन) a ४९. वाराही a ५०. मातृकांमधली एक माहेश्वरी शस्त्रे त्रिशूळ, डमरू, खङग वाहन नंदी a ५१. हाती कमंडलू धारण केलेली ही कौमारी. हिने एका हातावर बीजपूरक (म्हाळूंगाच्या फळांचा घोस ) धारण केले आहे जे नवनिर्माणाचे /पुन:निमिर्तीचे, मांगल्याचे प्रतिक आहे. a ५२. कमळावर बसलेली महालक्ष्मी a ५३. सिंह हे वाहन असलेली ही नारसिंही a ५४. हत्ती हे वाहन असलेली ऐन्द्री अथवा इन्द्राणी a ५५. गरूड वाहन असलेली ही वैष्णवी a ५६. याच मंदिराच्या सभामंडपातील चारही भिंतींवर वरील बाजूस विविध शिल्पपट कोरलेले आहेत. त्यातला हा एक a ही सर्व मंदिर संकुल बघून मंदिराभोवतीच्या तटावर गेलो. तिथून दिसणारी मंदिराची ही दृश्ये. ५७. विष्णूमंदिर a ५८. देवीचे मंदिर (डावीकडचे) आणि मुख्य मंदिर a हे सर्व अद्भूत शिल्पसौंदर्य डोळ्यांत साठवत आम्ही सिद्धेश्वर मंदिरातून निघालो. थोड्या जवळच अजून दोन मंदिरे आहेत पण त्यांचे बांधकाम पेशवेकालीनच तरी साधे आहे. ५९. हे तिथे असलेले घंटेश्वर शिवमंदिर a इतके सुबक कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातली मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाहीत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे तरीही तिथे असे कोरीव काम बघायला मिळत नाही. नाही म्हणायला नाशिकमधली नारोशंकर, सुंदरनारायण अशी मंदिरे बरीच देखणी आहेत पण तिथेही मूर्तीकाम कमीच. एकंदरीतच हे मंदिर बघणे हा एक अनुभव आहे. पुणे -औरंगाबाद मार्गे प्रवास करत असताना तर तो चुकवू नये असाच. **या मंदिरात इतरही असंख्य शिल्पे असून विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नसल्याने महत्वाच्या सर्व शिल्पांचा येथे थोडक्यात आढावा घेतला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47730 views

💬 प्रतिसाद
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/07/2013 - 10:35 नवीन
खुपच सुंदर रे. साला तुझ्याकडे माहितीचा खजिना आहे आणि सौंदर्य्दृष्टी देखील
  • Log in or register to post comments
प
प्रशांत गुरुवार, 02/07/2013 - 11:00 नवीन
+१ असेच बोल्तो
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/07/2013 - 19:26 नवीन
+१११ टू प्रशांत.... आणी माहिती सहित फोटूंसाठी...फेटा उडवण्यात येत आहे... :-)
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 09/09/2016 - 09:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
N
nishant गुरुवार, 02/07/2013 - 10:38 नवीन
शिल्प आणि त्यांची थोड्क्यात दिलेली माहिती आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/07/2013 - 10:44 नवीन
तुमच्या शोधक आणि आभ्यासु वृत्तीला सलाम!!
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर गुरुवार, 02/07/2013 - 10:55 नवीन
तुमच्या शोधक आणि अभ्यासु व्रुत्तीला सलाम !
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 02/07/2013 - 11:00 नवीन
आधी मंदीरात देवाचे दर्शन घेण्याव्यतीरिक्त काही करत नव्हतो....पण तुमच्या बरोबर राहुन देवदर्शना सकट मंदिर डोळसरुपाने पहायला शिकलो .
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/12/2013 - 01:08 नवीन
अगदी योग्य शब्दात पकडलय भावनांना! वल्लीशेठ आगे बढो!
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 02/07/2013 - 11:01 नवीन
वल्ली ह्या नावाकडून असे लेख येणं हे नेहमीचच झालय.you have set the bar. गावाचं नाव बहुतेक कायगाव्-टोक असं आहे. दंडकारण्यात मारिच राक्षसाचा पिच्छा करीत असताना रामने बाण सोडला. तो बाण लागून मारिचाचे शीर/टोक धडावेगळे झाले ती हीच जागा . म्हणून ह्याचे नाव "टोक" अशी काहीजणांची श्रद्धा आहे. पण अशा जागाही खूप खूप आहेत. काहीच समजत नाही. पंचवटी-नाशिक वगैरे तर माहित असेलच. शिवाय आंध्रात भद्राचलम इथे जागा दाखवतात, जिथून रावणानं सीतेचं अपहरण केलेलं. दक्षिणेत महत्वाचं तीर्थस्थान बनू पाहतय ते.
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 02/07/2013 - 15:02 नवीन
वल्ली ह्या नावाकडून असे लेख येणं हे नेहमीचच झालय.you have set the bar.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/07/2013 - 11:02 नवीन
वल्ली, तो ४४ नंबरचा फोटो चुकलाय का बे? ४३ नं. च्या इंद्राचाच फोटो रिपीट झालाय असे वाटते. बाकी लेखाबद्दल काय लिहिणे, डोळे निवले अक्षरश:.!!!!!! मस्त मस्त मस्त एकदम. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/07/2013 - 11:08 नवीन
धन्स रे. चुकून त्याच फोटोची युआरएल टाकली गेली होती. बदल केलाय आता. @मन१: बरोबर- कायगाव टोका त्या गावाचे नाव. पण सगळे जण 'टोका' म्हणतात, गावातले बोर्डसुद्धा फक्त टोका ह्या नावाचेच आहेत.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 02/07/2013 - 11:10 नवीन
मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद,मंदिर सभामंडप विशेष आवडला ! एक प्रश्न आहे वल्लोबा वरच्या मंदिरात आणि हळेबिडू येथील मंदिराची काही शिल्पे समान आहेत पण शिल्पाच्या कोरीवकामात म्हणजे क्वालिटी मध्ये एवढा फरक का ? उदाहरणा दाखल हि २ चित्रे पहा Image removed. नृसिंहअवतार Image removed. वराहअवतार
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/07/2013 - 11:16 नवीन
लै सोप्पय. हळेबीडूची मंदिरे होयसाळ राजांनी बांधलेली होती. हे राजे अत्यंत वैभवशाली असून शिल्पकलेचे ते सुवर्णयुगच होते. तर ही टोकाची मंदिरे पेशवेकाळातली आहेत. बहुधा पेशव्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी बांधलेली असावीत. खुद्द पेशव्यांना तर पैशाची कायमच चणचण भासे तसेच मधल्या काळातल्या इस्लामी आक्रमकांमुळे इथल्या शिल्पकलेचा तसा र्‍हासच झाला होता.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 02/07/2013 - 13:16 नवीन
आणि मग होम्स म्हणाला, "एलिमेण्टरी, माय डिअर वॅटसन!" होम्सने स्पष्ट केल्यावर सगळं कसं सोपं वाटतं, अगदी तसेच तुझ्या लेखणीतून आले की हे तपशील नीट समजत जातात! कितीतरी नव्या गोष्टी कळल्या याही लेखातून :)
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 02/07/2013 - 14:50 नवीन
अगदी बरोबर !!! - मालोजी वॅटसन
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/07/2013 - 13:23 नवीन
कोणत्याही प्रदेशातील शिल्पाकृती यावर सर्वात जास्त प्रभाव स्थानिक दगडाचा असतो. पहा मायकेल एंजेलो याने केलेली इटालियन मार्बल मधील शिल्पे व आपल्याकडील राजस्थानी मार्बल मधील जैन शिल्पे. तोच फरक महाराष्ट्र व कर्नाटकातील शिल्पकृती मधे दिसून येतो. महाराष्ट्रातील बेसाल्ट व कर्नाटकातील ग्रानाईट यांच्या गुणवत्तेत मुळात फरक आहे. बेसाल्ट पेक्षा ग्रानाईट हा अधिक शिल्पयोग्य टणकपणाने बनलेला आहे. कर्नाटक हे ग्रानाईट व फरशी या दगडांचे माहेरघर आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. (त्यासाठी हिरापन्ना हा चित्रपट पहावा.) मी बेल्लारीचा किल्ल्ला पाहिलेला नाही पण आपलेकडील किल्ला व बेल्लारीचा किल्ल्ला यांच्यातील गुणात्मक फरक दिसून येईल याची खात्री आहे.ग्रानाईट इज ग्रानाईट!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 02/07/2013 - 13:38 नवीन
कोणत्याही प्रदेशातील शिल्पाकृती यावर सर्वात जास्त प्रभाव स्थानिक दगडाचा असतो. पहा मायकेल एंजेलो याने केलेली इटालियन मार्बल मधील शिल्पे व आपल्याकडील राजस्थानी मार्बल मधील जैन शिल्पे. तोच फरक महाराष्ट्र व कर्नाटकातील शिल्पकृती मधे दिसून येतो. महाराष्ट्रातील बेसाल्ट व कर्नाटकातील ग्रानाईट यांच्या गुणवत्तेत मुळात फरक आहे. बेसाल्ट पेक्षा ग्रानाईट हा अधिक शिल्पयोग्य टणकपणाने बनलेला आहे. कर्नाटक हे ग्रानाईट व फरशी या दगडांचे माहेरघर आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. (त्यासाठी हिरापन्ना हा चित्रपट पहावा.) मी बेल्लारीचा किल्ल्ला पाहिलेला नाही पण आपलेकडील किल्ला व बेल्लारीचा किल्ल्ला यांच्यातील गुणात्मक फरक दिसून येईल याची खात्री आहे.ग्रानाईट इज ग्रानाईट!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/07/2013 - 11:26 नवीन
अद्भूत मंदीराचे अद्भूत वल्लीबुवांनी केलेले अद्भूत वर्णन. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 02/07/2013 - 11:44 नवीन
फोटो आणि माहिती निव्वळ अप्रतिम.... :)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 02/07/2013 - 11:47 नवीन
फोटो आणि माहीती आवडली.
  • Log in or register to post comments
न
नानबा गुरुवार, 02/07/2013 - 11:51 नवीन
माहिती आणि फोटु लय म्हंजे लयच भारी. चवथ्या फोटुतल्या नंदीवरचं कोरीव नक्षीकाम कसलं भारी आहे राव. हे शिल्प कठीण दगडात न कोरता मऊ विट किंवा त्याहूनही मऊ लोण्याच्या गोळ्यावर कोरावं इतकं सुबक कोरलंय.. वल्ली साहेब, खूपच मस्त.. या ठिकाणी न जातासुद्धा अगदी जाऊन आल्याचा अनुभव आला.. :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 02/09/2013 - 23:24 नवीन
आपण एखादा कार्यक्रम पहायला जावे अन तेथे भली गर्दी असावी. आपली बसण्याची जागा थेट पाठीमागे असावी. तेथून कार्यक्रमात नाचणार्‍या नर्तीकांचे चेहेरे (किंवा खेळाडूंचे (क्रिकेटचा मला तिटकारा असल्याने तो शब्द टाळलाय.)), हावभाव, खेळ अजिबात दिसू नये. केवळ आवाज येतो त्यावर समाधान मानावे. मग थोडी चांगली जागा पाहून तेथील मैदानात लावलेल्या मोठ्या टिव्ही पडद्याकडे पहावे. तेथेच जास्त स्पष्ट दिसते पण ते केवळ कॅमेरामनच्या अँगलने. मग या पेक्षा घरी टिव्हीवर तो कार्यक्रम पाहणे काय वाईट? असलीच स्थिती आता वल्लींचे लेख, फोटो अन वर्णन पाहून होते. आम्ही त्या त्या ठिकाणी काही जावू शकत नाही पण घरबसल्या अचूक वर्णने असलेली लेखमालिका वाचून मन प्रसन्न होते. मोठा व्यासंगी प्रयत्न आहे हा. आपण एखादे पुस्तक जरूर लिहा जेणेकरून पुढेमागे तो ऐतिहासीक खजीना होईल. (नाहीतरी पुराणकालीन वास्तूंची देखभाल कशी करावी हे आपणा भारतीयांना चांगलेच समजते. :-) )
  • Log in or register to post comments
ह
हासिनी गुरुवार, 02/07/2013 - 12:04 नवीन
सुंदर छायाचित्रांसह सुंदर माहिती!
  • Log in or register to post comments
M
michmadhura गुरुवार, 02/07/2013 - 12:05 नवीन
खूप छान माहिती.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 02/07/2013 - 12:10 नवीन
अशी सचित्र माहिती सहज सोपी आणि मनोरंजक बनवण्यात इथे फक्त तुम्हीच! तुमच्या व्यासंगाला सलाम .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2013 - 12:12 नवीन
च्यायला, हा वल्ली बोलतो कमी आणि लिहितो लै भारी. कमलेश्वरची एक हिंदी 'बयान' नावाची खूप सूंदर कथा आहे, त्या कथेचा नायक आत्ता आठवला. त्या कथेचा नायक फोटोग्राफर आहे, एकदम भलत्या रोम्यांटीक मूड मधे आला की तो आपल्या बायकोकडे एक डोळा बंद करुन नुसता टक लावून बघत असायचा. हा वल्ली असाच आहे. :) शिल्प पाहतांना या माणसाला सोबत असलेल्या माणसांचा विसर पडतो आणि एक डोळा बंद करुन क्याम्यार्‍याबरोबर हा एका अद्भूत जगात प्रवेश करतो आणि चित्र, शिल्प, यांच्याशी वल्लीशेठचा संवाद सुरु होतो. आणि आपल्यासमोर येतो असा जब्रा माहितीचा खजाना. माझ्या गावापासून सात कि.मि. अंतरावर हे गाव आहे. टोका हे गावाचं पूर्वीचं नाव. नदीच्या पात्रात असलेलं गाव सततच्या पुरामुळे उठलं आणि त्याचं एक नवं कायगाव आणि जुन कायगाव अशा नव्या गावात रुपांतर झालं. आणि हे जे मंदिर आता आहे, ते प्रवरासंगम या गावाच्या हद्दीत येतं. [आमचा गाववाला मन याने जी पौराणिक कथा सांगितली त्याचाही संदर्भ इथे आहेच. सतराशे साठ वेळा हे मंदिर पाहिलं आहे, कधी तरी याच्यावर धागा टाकावं असं मनातही आलं आहे. आज धागा वाचल्यावर मी इतकं बेष्ट आणि माहितीपूर्ण लिहू शकलोच नसतो असे वाटते. वल्लीशेठ, मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 02/07/2013 - 13:18 नवीन
मस्त प्रतिसाद! :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 02/08/2013 - 20:20 नवीन
च्यायला, हा वल्ली बोलतो कमी आणि लिहितो लै भारी. लै लै लोकं सहमत होतील या वाक्याला. :-D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 02/10/2013 - 17:06 नवीन
वल्ल्यानं दोन तीन वेळा असंच केलेलं आहे. वृत्तांतामध्येच तो अधिक फुलतो असे स्पष्ट मत आहे. वल्लीची मयतरिण देखील प्रत्यक्ष भेटीपेक्षा वृत्तांताचीच जास्त वाट पाहते असं ऐकिवात आलं आहे. :) अ‍ॅज युज्वल ढासू माहिती..! आमच्या वाईला या की वो एकदा. काशी विश्वेश्वराच्या देवळातला देखणा नंदी पहा.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/07/2013 - 12:17 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/07/2013 - 12:21 नवीन
त्या शंकराच्या मंदीराच्या प्रवेश द्वारावर गणपती आहे का? (फटु ६) असे कसे? जनरली सिंहमुख/व्याल असतो ना? बाकी धाग्याबद्दल सुरेख याशिवाय शब्द नाही
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/07/2013 - 13:17 नवीन
त्या शंकराच्या मंदीराच्या प्रवेश द्वारावर गणपती आहे का? (फटु ६)
हो. गणपतीच आहे तो. मंदिर अर्वाचीन (पेशवे) काळातील असल्याने दरवाजावर गणेशपट्टीका कोरलेली आहे. गणेशपट्टीका शिवकाळापासून (कदाचित यादवकाळाच्या शेवटापासून) कोरली जाऊ लागली. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव इत्यादी राजवटींमध्ये बांधल्या गेलेल्या मंदिरांत मात्र व्याल अथवा किर्तीमुखे कोरलेली दिसतात.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 02/07/2013 - 12:53 नवीन
ग्रेट, वल्ली.. अत्यंत सुंदर, माहितीपुर्ण चित्रलेख..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/07/2013 - 13:03 नवीन
वल्लीदादा खूपच छान ओळख करुन दिलीयस. फोटो पण अप्रतिम आले आहेत. खूप खूप धन्यवाद. अवांतरः श्री सिध्देश्वर हा शिवाचा अवतार मानला जातो की कसे? आमचे सोलापूरचे श्री. सिध्दरामेश्वराचे मंदीर आहे पण श्री सिध्देश्वराचे मंदीर लातूर वगैरे बरेच ठिकाणाचे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/07/2013 - 13:23 नवीन
सिध्देश्वर हा शिवाचा अवतार मानला जातो की कसे
शिवाचे अवतार प्रचलित नाहीत तर शिवाची विविध रूपे प्रचलित आहेत. उदा. रूद्र, इशण, भैरव इत्यादी. ईश्वर हा शब्द ईशान्येचा स्वामी ईशण (इशान्य दिशेचा संभाळ करणारा- थोडक्यात इशान्य दिशेचा पती/वर) याअर्थी आला असावा (असा माझा अंदाज). कुठल्याही देवळाच्या नावात ईश्वर हा शब्द दिसला की ते मंदिर हमखास शंकराचेच आहे असे समजावे. उदा: कोपेश्वर, भुलेश्वर, रामेश्वर, अमृतेश्वर इ.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 02/07/2013 - 13:20 नवीन
सुरेख शिल्पे आणि माहिती. फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/07/2013 - 15:19 नवीन
आपले सर्व लेख खोदकाम करुन परत एकदा वाचून काढणार आहे. हा लेख अतिशय आवडला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 02/07/2013 - 15:21 नवीन
औरंगाबादच्या ट्रीपच्यावेळी हे ठिकाण हुकलंच म्हणायचं... :( लेख संग्राह्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/07/2013 - 16:15 नवीन
वाह्ह्...अप्रतिम आनंद मिळाला. :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 02/07/2013 - 16:27 नवीन
आपले लेख वाचून वाचकांना इतका आनंद मिळतो. आम्ही तर प्रत्यक्ष तुमच्यासोबतच हे सारं पाहीलं आहे. त्याचा आनंद काय वर्णावा...
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/08/2013 - 07:33 नवीन
आपले लेख वाचून वाचकांना इतका आनंद मिळतो. आम्ही तर प्रत्यक्ष तुमच्यासोबतच हे सारं पाहीलं आहे. त्याचा आनंद काय वर्णावा...
=)) =)) अगदी अगदी लवकरच आम्ही "मौनाची भाषांतरे" लिहायला घेणार आहोत =))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 02/07/2013 - 16:28 नवीन
ही अशी शिल्पे निवांतपणे अन रुचीने पाहणे म्हणजे दृष्टीला एक सोहळाच आहे..
  • Log in or register to post comments
म
मिसळ गुरुवार, 02/07/2013 - 17:24 नवीन
सुन्दर एक गुरुस्ती शिल्प क्र २५ हे कालिया मर्दन न वाटता कॄष्ण गोपिकांच्या साड्या/नेसू पळवून झाडावर बसला आहे त्या प्रसंगाचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 02/07/2013 - 18:12 नवीन
मस्त रे, एक प्रश्न विचारावा असा विचार आला होता, पण मग विचार केला एक तरी संपाद्क असावा खोडी न काढलेला.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 02/08/2013 - 18:35 नवीन
एक प्रश्न विचारावा असा विचार आला होता
कुठलाही आडपडदा न ठेवता ह्या वल्ल्याला काहीही विचारावं, तो नक्कीच उत्तरं देतो. अर्थात हे मी फक्त शिल्पांच्या बाबतीत सांगतोय. बाकी आपल्याला काय ठावं नाय हा. ;)
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 02/07/2013 - 22:08 नवीन
वल्लीराव, फोटो आणि बारीकसारीक शिल्पांपासुन मुख्य शिल्पांविषयीची माहीती वाचुन तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच वाटते. मिपाकरांचे नशिबच थोर म्हणायचे.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/08/2013 - 07:35 नवीन
सुरेख रे वल्या जबराट च लिहिलं आहेस.. फोटो तुफान एकदा नक्की जायला हवं हे मंदिर पाहायला तू इकडे आलास कि एकदा आपण अंबरनाथ शिव मंदिराला पण भेट देऊन येऊया :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/08/2013 - 08:11 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा