Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

दम (दिलेली) बिर्याणी.

स
स्पंदना
Mon, 12/03/2012 - 10:01
" हे बघ तू उगा मला त्या गणपा अन सानिकाची कारणे नको देउ." माझा नवरा मला जेवता जेवता सुनवत होता. "अरे पण ऐक तरी...." मी मध्येच त्याच बोलण तोडायचा प्रयत्न केला. पण तोवर माझ्या नवर्‍याने सानिकाच्या पराठ्याचा तुकडा तोडुन तो गणपाच्या खिम्यात खुपसला होता. तुकडा भरुन गणपाचा खिमा तोंडात कोंबत त्यान पुन्हा मला फैलावर घ्यायला सुरुवात केली." ये बद, तुगलन मनजे काय सापसपाई कलनाली...ऑम ऑम्...वाटली का तुला? अग सुगरण म्हणजे कशी अशी लोणच्यासारखी स्वयंपाकघरात मुरलेली पाहिजे. खाराशिवाय जस लोणचं तशी तेलाचे, तिखटामिठाचे डाग असल्याशिवाय सुगरण" नवर्‍याने तारे तोडावे तसे शब्द तोडले. कप्पाळ माझ!!! काय उपमा तरी सुचताहेत तर मंडळी सीन आहे, रविवार दुपारच्या जेवणाचा. आता उगा कोणी इथे,'गणपा सुखरुप आहे का' याची चौकशी करु नये. आम्ही जेंव्हा तेंव्हा गंपाच्या खिम्यावर ताव मारत असतो, आणि तरी सुद्धा गणपा तिकडे निवांत जिवंत असतो. तसे आमच्याकडे सारे पदार्थ असे कुणाच्या तरी नावाला जोडलेलेच असतात. जागुचे मासे, रेवतीच्या इडल्या, सनिकाचे पराठे, अन स्वातिचे केक आम्ही जेंव्हातेंव्हा फस्त करत असतो. पण आज नवर्‍याला हा नविनच उद्योग सुचला होता. काय म्हणे तू सुद्धा तूझ्या (तू म्हणजे मी म्हणजे ...जाउ दे कप्पाळ!) पाककृती सादर कर. अहो काय खाण्याची गोष्ट आहे होय मिपावर पाककृती सादर करण? काय ते चकचकीत स्वयपाकघर? काय ते मसाला ठेवण्याचे चमचे? काय ते निळ्यनिळ्या ज्वाळांचे गॅस, अन काय ती साफसफाई? मी स्वयंपाक्घरात शिरले की माझा निव्वळ मुरारबाजी झालेला असतो. इकडे कुकरमध्ये डाळ तांदुळ, तिकडे कणकेच्या डब्यातून पिठ घेउन त्यात मिठ-तेल, त्यातलच थोड मिठ तांदळात अन तेल डाळीत. इकडे कांदे चिरायला घ्या तोवर तिकडे फ्रिजमधली भाजी काढुन घ्या. तोवर गॅसवर भांडे तापायला ठेउन, कणकेत पाणि मिसळा, तापलेल्या भांड्यात्........कळल ना? अन हा(पक्षी नवरा..नवरा माणुसच आहे पक्षी नाही....जाउ दे कप्पाळ!) मला सांगतोय असल्या गदारोळातुन तयार होणार्‍या पदार्थांचे मी फोटो काढावेत अन त्याच्या पाककृती मी मिपावर चढवाव्या. शक्य आहे का? " अरे पण असली बिर्याणी....." पुन्हा नवर्‍यान सानिकाच्या पराठ्याचा तुकडा गणपाच्या खिम्यात बुडवुन तोंडात कोंबला, " मग य्यांय्या कली मिलनाल्....खायला. तू टाकच ही पाककृती. मग बघ" शेवटी हो ना करता करता मी रेसेपी टाकायला तयार झाले. आता एव्हढा नवरा या बिर्याणीचा आग्रह का धरतो आहे, याचा थोडा उहापोह. तर झाल काय आमच लग्न थोडफार मुरायला लागल होत तेंव्हाची कथा. आता लग्न मुरायला लागल कस समजाव? तर जेंव्हा दोघेही न घाबरता एकमेकाच्या खोड्या काढायला लागतात तेंव्हा. तोवर एकमेकाला जपत दिवस निघत असतात, पण लग्न मुरायला लागल; की एकमेकाच्या खोड्या काढण सुरु होत. कुठ त्याच्या चहात मिठ घालुन स्वतः साखर घालुन निवांत पित रहाणे ( तो बिचारा हीला मिठ कस लागत नाही या विचाराने हैराण) सकाळी डबा भरताना त्याच्या आत, ठोसा मारणारा हात दाबुन भरणे असले सगळे उद्योग दुतर्फा सुरु झाले अन तरीही खुसुखुसु हसुन खपले जाउ लागले की समजाव लग्न मुरायला लागलय. हां तर काय सांगत होते लग्न मुरायला लागल तेंव्हाची गोष्ट. आता जरा मला मुळ स्वयंपाक जमायला लागला होता अन आकांक्षांना (आकांक्षा म्हणजे मुलगी नव्हे...मुरादे...म्हणजे ...जाउ दे कप्पाळ!) पंख फुटायला लागले.भाकरी जमते, पोळी जमते; आता पुरणपोळी करुन बघावी का? रस्सा जमतो, मसाला जमतो, आता बटर चिकन करुन बघावे का? असे विचार मनात रूंजी घालु लागले होते. आमच्या माहेरी अन सासरी तश्या लय बिर्याण्या शिजायच्या. तुपाचा असा हातावर थर चढायचा, अन खोबर कोथंबीरीच्या थरातल मटण अस अल्लद पोटात रिचायचं. तर अशी थराची(थर म्हणजे लेअर्स्..म्हणजे ...मटण अन भात्...जाउ दे कप्पाळ!) बिर्याणी आता मलापण जमत होती. त्यातच एक दिवस टाईम्स मधे ही एक नवी रेसीपी वाचली, अन त्या रविवारी मी नवर्‍यान आणलेल्या मटणातल पाऊण किलो मटण ताब्यात घेतल. हेऽऽऽ वाद झाला. अस कच्च मटण घालुन कधी बिर्याणी करतात का? पासुन आईला (स्वतःच्या, माझ्या नव्हे) फोन करतो बघ! पर्यंत धमक्या झाल्या. पण मी काही बधले नाही. ही नविन प्रकारची बिर्याणी मी करणार म्हणजे करणारच! तर सारा वेळ नवरा अक्षरशः एका कोपर्‍यात बसुन मटण वाया गेल म्हणुन हळहळत होता, अन मी काय व्हायच ते होउ दे, तसाही बोकड स्वर्गालाच पोहोचलाय अश्या निर्धाराने ही बिर्याणी करत होते. अन काय मजा? जसजसा बिर्याणी शिजल्याचा वास दरवळायला लागला तसतसा नवरा कोपरा सोडुन हळु हळु पुढे सरकायला लागला. मग मात्र तिला(बिर्याणीला...) गॅसवरुन उतरायचा अवकाश अस्सा तुटुन पडला(नवरा ) म्हणुन सांगु! मग तेथुन पुढे अगदी मला लाडीगोडी लावुन बिर्याणी करण्याचा आग्रह सुरु झाला, अन आमच्या घरातुन तुपाच्या बिर्याणीची हद्दपारी झाली. अशीच एकदा संध्याकाळी ही बिर्याणी करत होते, अन शेजारच्या शेट्टी आंटींचा जावई त्यांच्याकडे आला होता. त्याने शेवटी माझ्ह्या घराची बेल वाजवुन घरात काय शिजतय ते विचारल. त्याने सांगितलेल सांगते एक शब्द माझा नाही. "मै नेचे लिफ्ट के लिये खडा था उधरसे सोच रहा हूं। ये बढिया स्मेल क्या है। पुरी बिल्डींग मे खुशबु फैली है।" शेवटी शेजारचा जावई आमच्या टेबलावर जेउन गेला हे काय सांगायला हव? तर मंडळी आता गप्पा बास. फार बोलता बाई तुम्ही. अश्यान मूळ कामं कशी व्हायची म्हणते मी. तर घ्या सामानं. १ किलो मस्त पालव्याच मटण (गोट अथवा बोकड. शक्यतो मेंढी(शीप) नको) १ ते १ १/४ (सव्वा) किलो सुरेख बासमती तांदुळ मॅरीनेशन:- ४ मध्यम कांदे. ithe १ वाटी तेल. कांदे छानसे पातळ उभे कापुन घ्या. तेल गरम करुन त्यात हे कांदे ब्राउन??? हां सोनेरी रंगाचे होइतो तळुन घ्या. तळल्यावर कांदा काढुन घ्या अन तेल जपुन ठेवा. (येस्स्स हे तेल जपुन ठेवा त्यात काहीही दुसर तळु नका.) ithe आता बाकिचा मसाला- २ टी स्पुन हळद १ टेबल्स्पुन लाल तिखट. (हवं असल्यास जास्त घ्या. मी कमी तिखट खाते. (हो कोल्हापुरची असुनही)) २ ग्रॅम वेलदोडे ( अरांऊंड १५ ते वीस होतील) ३ ग्रॅम लवंगा (३० होतील) हे प्रमाण ऐकुन घेरी येत असली तरी अपर्णावर विश्वास ठेवा मंडळी अन एकदा करुनच बघा. ५ ग्रॅम दालचिनी. जवळ जवळ ३ इंच होइल. चविनुसार मिठ. ithe हा मसाला बारिक कुटुन घ्या. दिड इंच आल २ हिरव्या मिरच्या हे दोन्हीही खलबत्त्यात कुटुन घ्या. १ वाटी दही. आता तळलेला कांदा, लवंग दालचीनी अन वेलदोड्याची पावडर, आल-मिरची, मिठ हळद अन तिखट हे सगळ मटणात मिसळुन चांगल मिक्स करा. त्यात दही मिसळुन पुन्हा एकदा निट मिक्स करुन बाजुला ठेवुन द्या. जवळ्जवळ तासभर मुरु द्या. तोवर थोडा खडामसाला फ्लेव्हर करता वापरुन भातासाठी पाणी उकळवा. ithe धुवुन निथळलेले तांदुळ त्यात घालुन अगदी खळ्खळीत मोकळा भात करुन घ्या. थोडी कणी असतानाच भात वेळुन उपसुन ठेवा. आता एक दोन टोमॅटो पातळ चकत्यांमध्ये कापुन घ्या. एका जाड तळाच्या (मी सँडविच बॉट्म वापरते) पातेल्यात तळाला या टोमॅटोच्या चकत्या पसरुन लावा. त्यावर मॅरीनेट केलेले मटण पसरवा. ithe आता त्यावर भात पसरवुन घ्या. हाताने हलका दाबुन भात नीट सेट करा. आपण मघाशी कांदा तळलेल तेल जे जपुन ठेवल होत ना? ते आता बाहेर काढा अन या भातावर व्यवस्थीत सगळीकडे धारधरुन ओता. अगदी कडेपर्यंत सगळीकडे तेल पोहोचल पाहिजे. ithe लावा झाकण. काय कणिकेचे बगैरे चोचले करायचे असतील ते या वेळी करुन घ्या. मी नाही केले क्यो की टाईम इल्ला। भुक लगील्ला। गॅसवर एक तवा आधी गरम करुन घ्या अन त्यावर हे बिर्याणीच भांड चढवुन गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. ithe घड्याळ्यात बघा. जी काही टाईम असेल त्यात बरोब्बर ६० मिनिट मिसळा. अगदी एक तास झाल्यावरच गॅस बंद करा. तोवर अगदी कुणीही वास येतोय, जळली असेल अस काहीही म्हंटल तरी लक्ष नही देने का बाबा! ithe एकदा तरी कराच. एकदा तरी खाच. __/\__ अपर्णा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23954 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Tue, 12/04/2012 - 16:42 नवीन
गौरीबाई, खरंतर अपर्णाताई या पाकृतल्या नव्हेतच. त्या आहेत लिखाणातल्या. तुम्ही जश्या खाँ साहेबांच्या भक्त, तश्या त्या माँसाहेबांच्या भक्त आहेत. त्यांच्या नातीने.....सॉरी, मुलीने मदत केली की पुढील पाकृ येईलच. ;) (हलके घ्या).
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 12/04/2012 - 17:46 नवीन
ते एक लोणचं असतं जितकं मुरलेलं तितकं चविष्ट लागतं :) बादवे, अक्षयरावांचा जयजयकार असो... त्यांच्या दमामुळे एवढी मस्त बिर्याणी मिपावर अवतरली (चढवली गेली) :) मस्त पाककृती अपर्णाताई!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 12/19/2012 - 04:38 नवीन
मला कधीही बिर्याणी, मसाले भात असे प्रकार चांगले जमत नाहीत, सगळेच खिचडीच्या आसपास जातात असे वाटते, कितीही चांगले बनविण्याचा प्रयत्न केला तरीही.
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 12/19/2012 - 06:39 नवीन
एकदा मी पण केला होता. घरच्यांना व मित्रमंडळींना दम देउन देउन खायला भाग पाडल होत. रेसिपी फक्कड जमली आही. अभिनंदन. श्रा.मों तुमच्याशी १०००......दा सहमत. नेमक मनातल बोललात.
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया गुरुवार, 12/20/2012 - 09:04 नवीन
मी भाज्या घालून करून बघितली. छान झाली होती.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 02/23/2015 - 15:25 नवीन
हि कृती वाचली होती ... आज दुपारी आठवण आली तर तव्यावर कुकर कच्चे मटण एवढेच कि वर्डस आठवत होते ...शोध शोध शोधली हो २ ३ तासांनी 'नवरा' आठवला ...मग मटण + नवरा शोधले तर चट्कन सापडले आम्ही खातो पण शिजवू शकन नै नं घरी ...त्यामुळे आता हे कुणाला तरी सांगणे आले ...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 02/23/2015 - 15:45 नवीन
नवरा+मटण
=))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 18:30 नवीन
कॅनिबालिझम असं जर का गुगल वर शोधलं असततं तर बर्‍याचं चविष्ट रेसिपि मिळाल्या असत्या नै? =))
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/24/2015 - 03:18 नवीन
देवा माझ्या!! नवरा + मटन ????? :))))
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Mon, 02/23/2015 - 20:31 नवीन
काय खुसखुशीत लिहिलंय ! अशी बिर्याणी जरूर करून बघण्यात येईल लवकरच :) योगायोगाने या विकांती बिर्याणी प्रयोग करण्याची हुक्की मलाही आली होती पण मटण खात नसल्याने प्रयोग साहित्य बदलून अंडे वापरले … घ्या म्हणजे "हि पाकृ अंडे घालून बनवता येईल का" या प्रश्नातून आधीच सुटका … तर हा आमच्या बऱ्यापैकी (७५ - ८०% म्हणूया) सफल प्रयत्नाचा फटू … Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 02/23/2015 - 22:08 नवीन
आधी 'याच शीर्षकाने वाचलेली पाककृती नव्या लेखिकेकडून उद्भवली काय?' असं वाटलं, पण लक्षात आलं की "स्पंदना" म्हणजे "अपर्णा अक्षय" यांचा नवा अवतार असावा... (की या अपर्णाताई वेगळ्या अहेत?)
  • Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा Wed, 02/25/2015 - 12:03 नवीन
आपण कणीक न लावता बिर्यानी बनवता पण खरा दम त्यातच आहे. बाहेर सुगंध येण्या पेक्षा तो भातात मिसळला तर अधिक जास्त चव येते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा