राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
फक्त चार ओळी....पण खुप काही सान्गुन जातात...!
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
पाडगावकरांच्या गाण्यांतल्या वेचक ओळी फार सुरेख निवडल्या आहेत. तुम्ही उल्लेख केलेल्या ओळींबरोबरच 'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवंही अतिशय आवडतं.
संपता पूजा स्वरांची हात तू देशील का
दाटुनि काळोख येता, तू घरी नेशील का
पूर्णतेसाठीच या मी, सर्व काही साहिले
शिवाय 'आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना' या वर्णनाला काय म्हणावे!
'जाहल्या काही चुका'मधलं शेवटचं कडवं मलाही अतिशय आवडतं. मी ते आधी शॉर्टलिस्ट केले होते. 'तीन्ही लोक आनंदाने भरुन राहूदेरे' यासारखी कांही गाणी संपूर्णपणे अक्षर अन अक्षर 'आउट ऑफ धिस वर्ल्ड' आहेत. पण आपण एका लेखात त्यातली किती घेणार?
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रतिभेला सलाम.
त्यांची सलाम कविता फार आवडली. :)
तसेच त्यांची एक 'गवताचे फूल' नावाची कविता माझ्या फार पूर्वी वाचनात आली होती.
'भिऊन तुझ्या शक्तिला
लवून करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे'
अशा आशयाचे एक कडवे आहे त्यात. कोणाला ही कविता पूर्ण माहीत असेल तर कळवावे. 'गवताचे फूल' असे नाव आहे कवितेचे.
पुण्याचे पेशवे
कोंबडीच्या अंड्यामधुन बाहेर आले पिल्लु,
अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लु!
कोंबडी म्हणाली पिल्लुबाय,
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे;
आणुन देइन तुला हवे असेल ते खाणे!
पिल्लु म्हणाले, 'आई,
दुसरे नको काही,
छोट्याश्या कपामधे चहा भरुन दे,
मला एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे!'
मला विलक्षण भावणार्या काव्यपंक्ति,
पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला,
गगनाचा गाभारा...
क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात...
अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली...
-डांबिसकाका
मला विलक्षण भावणार्या काव्यपंक्ति,
पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे, फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला,
गगनाचा गाभारा...
क्या बात है! याला बीईंग लार्जर दॅन लाईफ म्हणतात...
अवांतरः तुम्हाला माहिती आहे का की पाडगांवकर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तिथे दोन वर्षे करून झाल्यानंतर रक्तातील काव्य स्वस्थ बसू देईना म्हणून सोडून आर्ट्स ला गेले. तरी मुळची कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांची प्रतिभाही निराळीच झाली...
-डांबिसकाका
हे माझे आवडते काव्यसंग्रह आहेत.
छोरी मधली त्यान्ची एक कविता
तुला पाहिले मी हसतांना
ढ्गाळलेल्या उदास दिवशी
तुला पाहिले मी हसतांना
तशीच हट्टी करुन जिवण
जीव कुणाचासा घेतांना
आठवणीतिल निळे चांदणे
तीक्ष्ण बर्फ झाले गोठुनी
आणि हरवल्या क्षितिजावरची
जखमही आली पुन्हा दाटुनी
मला वाटले पुन्हा करावी
जखम तुझ्या हृदयातिल जागी
उकरुनि वरचे निळे चांदणे
अहेर द्यावी रात्र अभागी
डोळ्यातिल पण तुझ्या चांदण्या
दिसल्या थकलेल्या कोमुजुन
डोळ्याखाली डोहच काळे
ज्यात बुडाली नजर विस्कटुन
न बोलताही मला म्हणालीसः
स्मिते रंगवुन अशीच घ्यावी
जमेल त्याने ठिकर्यांवरती
रंगाची ठिगळे पसरावी
आणि भासले मला म्हणालिस
तशी च त्या अगतिक वाटेवर
'थकले रे..' शब्दांचे झाले
काळोखाचे खोल सरोवर
आणि कळले उरला केवळ
काळोखच दोघांना बुडवुन
डोळ्याखाली डोहच काळे
तिथे उभे एकटे सुनेपण
-मंगेश पाडगावकर
काळ्यानिळ्या वेदनेचा
झाला काळोखाला डंख
तेव्हा शपथ घालून
तोडलेस माझे पंख
ओ़ळखीच्या अंधारात
अनोळखी झालीस तू
..खोटे खोटे हासतांना
खोल किंचाळले हेतू
सारेच का खोटे होते?
काय सारी भूल होती?
पांगार्याला काट्यांआधी
लाल फुले आली होती?
माझ्या मनी काळोखात
भिनलेला डंख उरे-
वेदनेच्या पांगार्याचे
मला काटे, तुला फुले
(मंगेश पाडगावकर, छोरी)
तू असतिस तर
तू असतिस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाणे नवथर गाणे
बकुळीच्या पुष्पापरि नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
ही जिप्सी मधली माझी एक आवडती कविता आहे.
सोनाली,
अप्रतिम कविता...सार्याच कविता इथे दिल्याबद्दल धन्यवद.
सारेच का खोटे होते?
काय सारी भूल होती?
पांगार्याला काट्यांआधी
लाल फुले आली होती?
पाडगांकरांच्या प्रतिभेला सलाम.
- (सर्वव्यापी)प्राजु
अचानक हा धागा सापडला आणि वर आणावासा वाटला..
एक कविता - ६६ साली म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली तरी आजही तितकीच लागू होते
पोपट
प्रवासात आगगाडीतून येताना
शेताच्या लाल लाल बांधावर
दिसला एक हिरवाहिरवागार पोपट.
मग पोपट हिरवेगार उडाला.
पोपट माझ्या मनात शिरला.
पोपट माझ्या मनात फिरला
मन हिरवेगार करीत,
विचार हिरवेगार करीत,
स्वप्ने हिरवीगार करीत.
पोपट बसला खांद्यावर
आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड...
मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?"
तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?"
भलताच मिस्कील होता पोपट.
हिरवाहिरवागार पोपट.
प्रवासभर पोपट बोलत होता खूप.
प्रवासभर मीही बोलत होतो खूप.
पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?"
मी म्हटले, "नोकरी करतो."
पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?"
मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो.
खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना
शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो.
हलकटांना सज्जन म्हणतो.
समर्थाच्या श्वानांना सलाम करतो.
झकास करतो मूल्यांची पोपटपंची.
पहिलीला पगार घेतो :
रहाणीची मान जरा उंच करतो. "
पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले :
मला भलतीच भीती वाटली.
वाटले, हा भूल घालून नेईल मला
हिरव्या हिरव्या पंखांवरून
लाल लाल बांधावर.
माझे एक प्रमोशन ड्यू होते :
पोपटाची मला खूप भीती वाटली.
पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले :
डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले
आणि तो उडून गेला.
हिरव्या हिरव्या पंखांवर
निळे निळे आभाळ झेलीत
लाल लाल बांधाकडे
पोपट एकटा उडून गेला.
--
मंगेश पाडगावकर
९-१०-१९६६
(साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम)
मैत्र, हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !
पाडगावकरांची गीते माझ्याही आवडीची.
पण 'सलाम' साठी मात्र माझा पास ! अशा कविता लिहिल्याशिवाय साहित्य अकादमी मिळालेच नसते का ? ती सलाम ही कविता तर खरोखर डोक्यात जाते. विदुषक पण तशीच. या कविता वाचताना गीतकार, प्रेमकवी पाडगांकरांमध्ये कोणा जिल्ब्यापाडू नवकवी संचारला की काय असं वाटून दचकुन जातो आपण.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत, आवड वगेरे वगेरे... :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी