भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे. या प्रकरणातील व्यक्ती नरमांस भक्षण करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे भयानक कृत्य का केले गेले असेल हा प्रश्न राहून राहून सतत मनात येतो. असे करून यातील दोषी व्यक्तींना कोणते सुख मिळाले? खाणे, पिणे आणि शरीरसुख उपभोगणे हेच मानवी सुखाचे टोक आहे का?

अशा घटनांमुळे पाश्चात्यांच्या भोगवादाची परिसीमा लक्षात येते. आणि मनुष्याच्या शाश्वत सुखाची संकल्पना मांडणाऱ्या भारतवर्षामध्ये आपण जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो ! पाश्चात्यांच्या दृष्टीने मनुष्याच्या अंतरिम सुखाची संकल्पना ही इंद्रियसुखावर येऊन थांबते. याउलट भारतीय तत्वचिंतनामध्ये सुख ही संकल्पना केवळ भौतिक किंवा इंद्रियजन्य आनंदापेक्षा आत्मानंदाचा विचार करते. यामध्ये सुखाचा विचार अधिक सूक्ष्म, खोल आणि शाश्वत पातळीवर केला गेला आहे. इंद्रिय सुखापेक्षा आत्मिक सुखावर भारतीय तत्वज्ञान भर देते. आत्मिक सुख म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून प्राप्त होणारे सुख. उपनिषदांमध्ये आत्मा हा नित्य, शुद्ध आणि आनंदस्वरूप मानला आहे. जेव्हा मनुष्य देह, मन आणि बुद्धी यांपलीकडे जाऊन आत्मस्वरूपाची ओळख करून घेतो, तेव्हा त्याला आत्मिक सुखाची अनुभूती येते.
‘कोहम्’ (मी कोण आहे?) पासून सुरु झालेला प्रवास ‘सोहम्’ (मी परमात्मा आहे) पाशी येऊन थांबतो. हा प्रवास बाह्य जगातून अंतर्जगाकडे नेणारा आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची एकेक पातळी मनुष्य गाठत जातो. या सुखाची अनुभूती इंद्रियांनी अनुभवता येत नाही; ती अंतःकरणाच्या शुद्ध अवस्थेत प्रकट होते

भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात..
“सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्।”
म्हणजे मनुष्याचे जे परमसुख आहे ते बुद्धीने जाणता येते, ते इंद्रियांपलीकडचे आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोगाचे सोपान चढून या सुखासनावर मनुष्य बसू शकतो.

कठोपनिषद सांगते —
“श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः।”

(मनुष्यापुढे श्रेयस आणि प्रेयस असे दोन मार्ग असतात.)

प्रेयस म्हणजे इंद्रियसुख; श्रेयस म्हणजे आत्मिक कल्याण व आनंद. आत्मिक सुख हे श्रेयस मार्गाने मिळते. वेदांनुसार अज्ञान हे दुःखाचे मूळ आहे, आणि ज्ञान म्हणजे आत्मिक सुखाचा स्रोत. श्रेयस मार्ग खडतर असला तरी हा मार्ग माणसाला आत्मज्ञानी बनवतो. प्रेयसातच अडकून राहणारे अंतिमतः भोगवादीच बनतात.

ईशावास्य उपनिषद म्हणते
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥

(जो विद्या व अविद्या दोन्ही जाणतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो. अविद्येने तो मृत्यूवर विजय प्राप्त करतो तर विद्येने मोक्षपदास जातो.)

येथे अविद्या म्हणजे जीवन व्यवहारासाठी लागणारे भौतिक ज्ञान आणि विद्या म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे आत्मज्ञान. कसे जगायचे याचे उत्तर अविद्या देते. का जगायचे याचे उत्तर विद्या देते. याचा समतोल ज्याला राखता आला त्याला शारीर मर्यादा राहत नाहीत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती भौतिक सुख नाकारत नाही, तर त्याला मर्यादा घालते. वेद देखील भौतिक सुखाला नाकारत नाहीत, पण ते अपूर्ण आणि क्षणभंगुर असल्याचे स्पष्ट करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्षादि चार पुरुषार्थांची संकल्पना भोग नाकारत नाहीत तर धर्माच्या चौकटीत राहून मोक्ष पदापर्यंत पोहोचवतात.

भारतीय समाजमनावर आणि एकंदरीत येथील जीवनशैलीवर या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळेच कोणतेही कुकर्म करताना भारतीय मन शंभर वेळा विचार करते . आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात भारतीय तत्वचिंतन अधिकच अर्थपूर्ण ठरते. पाश्चात्य भोगवादाच्या तुलनेत भारतीय त्यागवाद नक्कीच सरस ठरतो. म्हणूनच माणसातील माणूसपण विसरून त्याला परब्रह्मपदावर नेऊन ठेवणारे भारतीय तत्वज्ञान संपूर्ण विश्वास अनुकरणीय आहे! स्वामी दयानंद सरस्वतींनी ‘वेदांकडे चला’ असा संदेश दिला आहे. तो सर्वकाल सुसंगत आहे. आज स्वामीजींची २०२ वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन !