ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!
या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.
माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात. संध्याकाळी असेल मालिका ,तर नवऱ्याचं चहा ,पाणी, खाणं ,हे सगळं त्या ब्रेक मध्ये उरकलं जातं आणि काही काही मालिकांमध्ये सुद्धा किंवा सिनेमांमध्ये सुद्धा जाहिरात करताना एकही ब्रेक नसलेला सिनेमा किंवा एकच ब्रेक असलेला सिनेमा असं मुद्दाम लालूच दाखवण्यासाठी त्याची जाहिरात करतात. जाहिरातीमध्ये जो अँकर असतो ना तो काय म्हणतो "कही भी मत जाना , मैं अभी गया और अभी.आया" म्हणजे ज्या जाहिरातींच्या जीवावर तुम्ही प्रेक्षकांना मालिका दाखवता त्याच जाहिरातींच्या विरुद्ध तुम्ही बोलता? म्हणजे जाहिरात सुरू झाली की प्रेक्षक उठणार आणि कुठेतरी जाऊन येणार ते बोर होणार .ते जाहिराती बघणार नाहीत आणि मग पुन्हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे मालिका सुरू झाली की ते येणार, बघणार असं सरळ म्हणणार? जाहिराती लोक बघत नाहीत असं कबूल करणार ?"मनाच्या मोटारीला विचारांचा ब्रेक लावा" असं वाक्य मी एका शाळेत लिहिलेलं लहानपणी पाहिलेलं होतं .ब्रेक या शब्दाचा पहिला वापर मी त्यावेळेला बघितला. ब्रेक च्या स्पेलिंगनं तर मला अनेकदा दगा दिलाय बर का लहानपणी! म्हणजे break की brake?
मालिकेतल्या ब्रेक मध्ये अत्यंत कमी कपड्यातल्या कमनीय देह असलेल्या आणि तो दाखवणाऱ्या सुंदर सुंदर मुली येतात मग हसतमुख चेहऱ्याच्या खूप काम करूनही न दमलेल्या माता येतात आणि मग हसरी आई काय काय काय बोलते, आणि ती सांगते हे वापरा ते वापरा.पोषक पेयं पिणारी शहाणी मुलं ब्रेक मध्ये दिसतात. कंटाळवाण्या ट्रॅफिक मध्ये दोन दोन तास अडकलेले पण तरीही त्यांचे हसतमुख फ्रेश चेहऱ्याचे नवरे कामावरून घरी येतात त्यांना आपला ब्लेझर वगैरे काढायला आणि हातातली बॅग घ्यायला सुंदर बायको तयार असते. या ब्रेक मध्ये आपल्याला शिकवलं जातं .सकाळपासून रात्रीपर्यंत काय वापरावं. कोणती पेस्ट वापरावी, कोणता माऊथ फ्रेशनर ,कोणता चहा प्यावा आणि कोणता गिळ गिळीत पदार्थ ब्रेकफास्ट ला खावा.कोणता मसाला, हळद ,तिखट, मीठ ,हिंग ,तूप,तेल सगळं कुठलं वापरावं याचं ज्ञान ब्रेक मधून मिळतं. अगदी संडास बाथरूम आणि कमोड पर्यंत सुद्धा .ते स्वच्छ करण्यासाठी काय वापरावं याचं ब्रेक मध्ये आपल्याला ज्ञान पाजलं जातं आणि आपण जेवत असतो ,खात असतो ,चहा पीत असतो ,तरीसुद्धा आपल्याला ते कमोड घासलेले बघावे लागतात . मला असं वाटतं की ब्रेक हे ज्ञानाचे भांडार आहे. त्याच्यात सर्व माहिती मिळते.
आणि मला सुद्धा रुटीनचा नोकरीचा कंटाळा आलेला होता आणि ब्रेक हवा होता माझ्या आई ह्यालाच उद्देशून म्हणायची ,"या चुलीपासून मेली सुटका नाही .कंटाळा आलाय. असं वाटतं की कुठेतरी लांब पळून जावं. म्हणजे तिलाही ब्रेक हवा असायचा .ते पळून जाणं वगैरे वगैरे होतं ना,त्यालाच आता ब्रेक म्हणतात "ब्रेक"चं स्पेलिंग काही का असेना मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. तसा मी मध्यंतरी घेतला होता .मी मध्यंतरी थोडसं लिहिणं थांबवलं होतं ,पण आता पुन्हा तुमच्या भेटीसाठी आली आहे .ब्रेक नसलेली मस्तपैकी लेखणी घेऊन!"हिच्या बडबडीला ब्रेक लावा",असं मला उद्देशून म्हणायची वेळ तुमच्या वर येऊ देणार नाही, अशी खात्री देते.
ताजा कलम:
काय म्हणता,मी मध्यंतरी लिखाणातून ब्रेक घेतला होता,हे तुमच्या लक्षातही आलं नाही? ओह! हाय हाय!