अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"

जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”
पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता.

घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही. नेमकं त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत माझा मित्र उमेश काटे याने दिलेलं कॅलेंडर माझा दोन वर्षांचा मुलगा हातात घेऊन अजित दादांच्या फोटो कडे पाहत “अजित दादा” असं बोलला. छातीत चर्रर्र झालं— त्या फोटोमुळे आणि अबीरने दिलेल्या त्या हाकेने मन हेलावुन गेले.

दादा गेले आणि डोळ्यांच्या कडा आपसूक ओल्या झाल्या. आजही असंच वाटतं— जणू आपला घरातलाच माणूस किंवा मित्रांपैकी कोणी तरी गेल्यासारखं. आज सात दिवस होत आले, पण एकही दिवस असा गेला नाही की अजित दादांची आठवण आली नाही. पहिले दोन-तीन दिवस तर इतके भकास गेले की कशातच मन लागत नव्हतं.

राजकारण हा माझा आवडता विषय आहे; पण राजकारणावर भांडणं करणं किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी लेख लिहिणं मी कधीच केलं नव्हतं. कदाचित बारामतीकर असणं आणि सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असल्यामुळे या भावना आपसूक आल्या असतील.
पण अजित दादा हे आपले होते. कामाचा माणूस... धडाडीचा.. दरारा असलेले पण तितकेच दिलदार. आपल्या भागाचा— नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राचा एक चेहरा होते. रांगडे, व्यवस्थापनावर मजबूत पकड असलेले आणि सध्याच्या चिखललेल्या राजकारणातही दूरदृष्टी व शिस्त जपणारे नेते होते.

दादा जेव्हा भाजपसोबत गेले, ते मला वैयक्तिकरित्या अजिबात आवडलं नव्हतं. पण “सत्ता नसेल तर लोकांची कामं करता येणार नाहीत, त्यांच्या तोंडाला काय मी पाणे पुसायची?” हे त्यांचं म्हणणं त्यांना शोभून दिसत होतं. भाजपासोबत गेले काय किंवा नाही— धर्मावर राजकारण न करता समाजकारण करता येतं हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं.

जन्माने बारामतीकर असल्यामुळे पवार साहेबांचा आणि अजित दादांचा मी कायमच चाहता राहिलो आहे. पिंपरी-चिंचवड २०१७ पासून दादांशिवाय हळूहळू भकास होत चाललं आहे, हे मान्य करावंच लागेल. दोन्ही पवार हे बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख यांच्या नंतर राजकारणातील आशेचे किरण होते.
महाराष्ट्रातील माझ्या आवडत्या नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्या जाण्याने मन खूप वाईट झालं होतं; पण दादा गेले आणि डोळ्यांत पाणी तरळू लागलं, अजुनही इतके दिवस वाईट वाटणे हे पहिल्यांदाच घडते आहे.
आज पवार साहेब राजकीय वर्तुळाच्या परिघापर्यंत येऊन थांबले आहेत आणि त्यांचा खरा वारसदार त्या परिघाच्या बाहेर इतक्या निष्ठुरपणे फेकला गेला— ही जाणीव मनाला अधिकच चटका लावते. डोळ्यांत पाणी आहे; पण इतके दिवस एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी वाईट वाटत राहणं खूप काही सांगून जातं.

मला नेहमी वाटायचं की आमचा दादा मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लायक माणूस आहे. आताही असंच वाटायचं की थोड्याच दिवसांत फडणवीस केंद्रात जातील आणि दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. पण हे आता कधीच होऊ शकणार नाही, ही जाणीव मनाला खूप वेदना देते. दादांकडे मुख्यमंत्री होण्याचे सर्वात जास्त कॅलिबर होते.

संपूर्ण महाराष्ट्र शोकव्याकुळ झालेला आहे. एका तडफदार नेत्याला आपण गमावले आहे. असा एखादा नेता घडण्यासाठी कित्येक वर्षे जातात.
दादा जे बोलतात, तेच करतात, एकदा शब्द दिला की ते काम ते पुर्ण करणारच. त्यामुळे 'कामाचा माणुस' हि उपाधी त्यांनी लिलया पेलली, काम करताना हा कुठल्या पक्षाचा..कुठल्या धर्माचा हे त्यांनी कधी पाहिले नाही..
शरद पवार हे त्यांचे राजकीय गुरु, काका होते. त्यांच्याकडून दादांनी असंख्य गुण घेतले. तळागाळात जाऊन शिस्तीने काम करण्याची पद्धत त्यातूनच आलेली असावी. पण “मैने हमेशा मेरे दिल की सुनी है…” असं म्हणत, मनातलं मनात ठेवून पुढच्याला काहीच कळू न देण्याच्या पारंपरिक राजकारणाच्या अगदी विरुद्ध त्यांचं वागणं होतं. जे पोटात आहे तेच ओठांवर—त्यात कोणताही बदल नाही. यामुळे त्यांनी पारंपरिक राजकारणाची चौकट मोडून, कसलीही आडपडदा न ठेवता थेट आणि ‘नो नॉनसेन्स’ राजकारण केलं. कदाचित त्यामुळेच त्यांच्या जाण्याने आज इतकी मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते आणि संपुर्ण महाराष्ट्राला आपला माणुस गमावल्याची भावना आहे.
शरद पवारांसारखा वटवृक्ष गुरु असतानाही अजित पवारांनी आपली स्वतंत्र ओळख आणि स्वतःची शैली निर्माण केली. हे सोपं नक्कीच नव्हतं. सत्ता ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे, याचं भान त्यांना कायम होतं. कदाचित सध्याच्या राजकारणात असे बलाढ्य आणि जमिनीशी नातं घट्ट असलेले नेते आता फारसे उरलेले नाहीत.

राहून राहून अजूनही असंच वाटतं— काही तरी चमत्कार होईल आणि आमचे “नॉट रिचेबल” दादा पुन्हा येऊन म्हणतील, “बेट्याहो…”

हे सगळं लिखाण राजकीय मतप्रदर्शन नाही. हे एका सामान्य माणसाचं तुटलेलं नातं आणि हरवलेली आशा आहे.

-
गणेश जगताप,
बारामती आणि पिंपरी चिंचवड (via: ऊरुळी कांचन), पुणे.