भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट

वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते .
भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३  किंवा अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .

गाडी येण्याची सूचना मिळाली . काही सेकंदासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूस असलेल्या काचेचे व आलेल्या गाडीचे दोन्ही दरवाजे एकाच वेळी अघडल्या गेले .

आम्ही आत शिरलो . काही सेकंदात दरवाजे बंद झाले . गाडी जणू काही आमच्यासाठी आरक्षित अशी संपूर्ण मोकळी . बहुदा शनिवारचा दिवस असल्याने बरीच कार्यालये बंद असावीत .

फोटोच्या नादात आमचा एकजण फलाटावरच राहिला होता . आम्ही सायन्स सेन्टर स्टेशनला उतरून त्याची वाट पहिली . दहा मिनिटात पाठीमागच्या गाडीने तोही येऊन पोहचला . बरे झाले आम्ही प्रत्येकाकडे ज्याचे त्याचे तिकीट दिले होते . कारण स्टेशनहून बाहेर पडताना देखील तिकीट स्कॅन करावे लागते , सरकत्या जिन्याने वर आलो . प्रवास खूपच सुखकारक झाला होता .

अगदी बाजूलाच विज्ञान केंद्र आहे .

एक थ्री डी शो आणि अजून एक दुसरा शो मिळून प्रत्येकी रु . १ ३ ० /- चे तिकीट काढले .
केंद्राच्या आवारात बाग आहे आणि तेथे विज्ञानावर आधारित पुष्कळ खेळ ठेवले आहेत . जसे तरफेचा उपयोग करून वजन उचलणे . साखळी - कप्पीचा उपयोग . एकाच उंचीवर बांधलेले पण विविध लांबीचे झोके . लंबकाचा आंदोलनकल त्याच्या लांबीवर अवलंबून असतो त्याचे प्रात्यक्षिक . येथेच एक दीड तास सहज वेळ घालवू शकतो .

नंतर केंद्रात प्रवेश केला . येथेही काही प्रात्यक्षिकं आहेत . आणि वरच्या काही मजल्यांवर मानव इतिहास वगैरे चितारले आहे . दोन्ही शो पाहिले . सर्व आवडले .
थोड्याच वेळात वेगवेगळ्या शाळांच्या सहली येण्यास सुरुवात होऊन बरीच गर्दी झाली . शाळांचे शिक्षक मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना रांगेने शिस्तीत केंद्रात घेऊन जात होते . त्यामुळे मुले बागेतील खेळांना मुकली होती . त्यामुळे एक सांगावेसे वाटते . पालकांनी मुलांना सहलीस जरूर पाठवावे पण स्वतःही निदान एकदा तरी त्यांना स्वतंत्रपणे फिरवून आणावे .
केंद्राच्या बाहेरून टॅक्सी घेतली आणि तारांगणाला पोहचलो . शनिवार , रविवारी येथे घुमटाकार गृहात खागोलशास्त्र व ताऱ्यांबद्दल मराठीतून माहितीपूर्ण दिली जाते . विषय होता आज रात्रीचे आकाश आणि दुसऱ्या भागात ब्रह्माण्डा विषयी माहिती. हा शॊ सुद्धा खूप आवडला .
समोरच गोलाकार आकाराची नेहरू केंद्राची इमारत आहे .


येथे कला दालनात आमच्या परिचितांपैकी एकाचे चित्र प्रदर्शन (व विक्री ) होते . त्यांचा चित्र विषय होता 'सखी ' . मला चित्रांमध्ये जास्त काही समजले नाही पण आमच्या अचानक भेटीने ते मात्र खूप खुश झाले .
अजून वरच्या मजल्यावर 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'  हे एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे जेथे भारताचा इतिहास, संस्कृती आणि कला यांचा वेध घेता येतो .
सर्व पाहून कालीपिलीने परत CSMT आलो . (पूर्वीचे बोरीबंदर जास्त सुटसुटीत वाटते )