मी माझं काम गुण्या गोविंदाने करत असताना, सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असताना. (मी कितीही कठीण काम असलं तरीही ते सुरळीत च करतो. आरामात च करतो, यामुळे काही वेळेला काही लोक नाराज होतात पण मी नेहमी क्लायंट आणि अंतिम आउटपुट चा विचार करतो, असो) एक दिवस मला गोऱ्या बॉस चा फोन येतो,
मी एक माणूस पाठवतो आहे,
मी - कशाला?
बॉस - त्याला "ठेवून घे"
मी - म्हणजे?
बॉस - नंतर सांगतो,
आयला लोक बाई ठेवतात, माझा बॉस मला एक जरड 63 वर्षाचा म्हातारा ठेवायला सांगत होता,
सांगितल्या प्रमाणे हा अमेरिकन म्हातारा आला, ठोंब्यासारखा समोर बसला,
त्याला विचारले - काय येतं तुला?
म्हातारा (त्याचे नाव जॉन) - तू देशील ते काम करेन!
डोक्याची भजी झाली माझ्या, एकतर काहीतरी करून आम्ही आमचे जॉब टिकवतो त्यात ही असली लोढणी? त्यांना काम शिकवा आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घ्या!
त्याला म्हणालो की आता तू जेवून घे आणि घरी जा उद्या बघू,
तो आज्ञाधारक पणे घरी गेला,
मी तणतणत बॉस कडे गेलो, माझा चेहरा बघून त्याला समजले की मी वैतागलो आहे,
बॉस - बस
मी - बोला
बॉस - तो सगळीकडून धुतकारला गेलाय!
मी - कोण?
बॉस - जॉन,
मी - बरं मग? मी काय करू?
बॉस - तुला हवा तसा वापर.
मी - वापरू? अरे काय बोलतोय तू?
बॉस - हे बघ , तो तीन चार प्लान्ट फिरून आलाय, सगळीकडे कामात चुका केल्यात, कोणालाच नको आहे,
मी - म्हणून तुम्ही तो कचरा फेकल्या सारखा माझ्याकडे फेकलात? माझ्या कामाचे त्याला काहीच येत नाही. आणि तो आता 63 वर्षाचा आहे, करा की रिटायर!
बॉस - तो अजून 2 वर्षे काम करेल, मग 65 ला रिटायर होईल, असे केल्याने त्याचे पेंशन भक्कम वाढेल ,आता रिटायर झाला तर त्याचा तोटा आहे.
मी - अरे पण मी काय करू? मला वेळ नाही त्याला शिकवायला, माझ्या एस ओ डब्ल्यू मध्ये नाही हे,
बॉस - मी विनंती करतोय, प्लीज नाही म्हणू नकोस, काहीही काम दे,
मी गप्प होऊन परत माझ्या जागेवर.
मीच का? माझ्याकडेच का पाठवले याला ?
हा नेमभळट आहे? हा कोणाला नाही म्हणू शकत नाही, याला कनविन्स करणे सोपे आहे, याला धमकी देणे सोपे आहे, हा घाबरट आहे, हा स्वभावाने गरीब आहे, आधी नाही म्हणेल मग गप गुमान तयार होईल,
हे सर्व गुण माझ्या ठायी ठायी भरले आहेत असे बॉस ला वाटत होते का? असेलही.
------------
दुसऱ्या दिवशी हापिसात गेल्यावर बघतो तर हा दत्त म्हणून समोर,
काय रे किती वाजता आलास?
जॉन - सकाळी 5 वाजता आलोय, तुझी वाट बघतोय,
मी - हे बघ, मी सकाळी 8 ला येतो तुझ्यासाठी मी कामाच्या वेळा बदलणार नाही,
जॉन - चालेल तू 8 ला ये, मी 5 ला येईन आणि दुपारी 2 ला जाईन,
म्हणजे हा साला पाट्या टाकणार होता, मग त्याला मी सटरफटर कामे देऊ लागलो, अमुक ठिकाणी जा आणि आमक्याकडून ही वस्तू घेऊन ये. त्या प्लान्ट मध्ये जा आणि हे देऊन ये. तो विना तक्रार कामे करू लागला, जे देईन ते काम करून परत समोर येऊन बसायचा. मला आता त्याची दया येऊ लागली.
आपण कोणालाच नको आहोत ही भावना भयावह असते, आपण कोणालाच आवडत नाही, आपण निकम्मे आहोत, आपल्या मागे लोक निदानालस्ती करतात, आपण चेष्टेचा विषय झालोय हे वास्तव सहन कारायला वाघाचं काळीज लागतं, तो ते सर्व सहन करत होता, फक्त रडायचा बाकी होता.
मग हळू हळू त्याबद्दल माहिती काढली की बाकीच्या प्लान्ट मध्ये त्याने काय केले.
एका ठिकाणी त्याने एका मोठ्या तेल वाहून नेणाऱ्या पायपाला गाडी ठोकली होती, आणि त्यातून बरेच तेल वाया गेले होते, कंपनीचे बरेच नुकसान झाले होते.
त्याला विचारले की असे का झाले? तर म्हणे त्याची तंद्री लागली होती, गाडी चालवत होता पण मनात घरचे लोक आठवत होते. घरी नातेसंबंध ताणले होते पाहिल्या बायको सोबत.
सध्याची बायको (म्हणजे दुसरी )ठीकठाक होती.
मी - मग पाहिलीकडे का गेलास परत ?
जॉन - कारण दोन मुले तिच्याकडे आहेत, त्यातला एक ड्रग घेतो, तर तिला सांगितले की त्याच्याकडे लक्ष दे, तर ती भांडायला लागली, मी माझे बघून घेईन, मुलांची चिंता करायची तुला गरज नाही वगैरे.
दुसऱ्या प्लान्ट मध्ये याने एक व्हॉल्व चालूच ठेवला, त्यातून गॅस गळती झाली, त्यामुळे संपूर्ण भागच धोक्यात आला होता. थोडक्यात हा माणूसच धोकादायक बनत चालला होता, त्याला कुठे तरी लपवायचा, म्हणून माझ्याकडे पाठवला होता. पूर्वायुष्यात त्याने बरीच चांगली कामे केली होती म्हणून कंपनी त्याला या कठीण काळात 2 वर्षे सांभाळून घेणार होती. मॅनेजमेंट कडे माणुसकी होती.
काही दिवसांनी तो एक मोठा स्पीकर घेऊन आला,
जॉन - हा घे तुझ्या साठी!
मी - का?
जॉन - असुदे, तू एकटा असतोस घरी, गाणी ऐक!
मी - जॉन, मी असे काही घेऊ शकत नाही, तू घेऊन जा, कोणाला कळले तर?
जॉन - नाही म्हणू नकोस, कोणी काही बोलणार नाही, घेऊन जा घरी.
मी – “ “
म्हणजे हा मला विकत घेऊ पहात होता.
मी तो हापिसात च ठेवला आणि कोणी नसताना त्यावर गाणी ऐकू लागलो.
एके दिवशी सकाळी हा माझ्यासमोर आला आणि म्हणाला की "मला जायला लागेल, मुलाने ड्रग चा जास्त डोस घेतला आणि त्याला हॉस्पिटलात दाखल केलंय, पहिल्या बायकोचा फोन आलाय".
मी - जा, काही लागलं तर सांग.
तो गेला,
पाहिली बायको जी म्हणाली होती की मी माझ्या मुलांचे बघीन, तिला आता हा आठवला होता, मग तीचा दुसरा नवरा काय करत होता? का तो फक्त नवराच? म्हणजे त्याने मजा करायची आणि याने पोरांची काळजी घ्यायची. विश्वामित्री पवित्रा म्हणतात तो हाच असावा ?
पुढचा एक महिना जॉन आणि त्याची सध्याची (दुसरी) बायको दिवस रात्र इस्पितळात पोराची शुश्रूषा करत होते. एक महिना तो काही कामावर आला नाही. असाही असून नसून काही फायदा नव्हताच, गोठ्यात वळू असतो तसा होता तो.
बरं, व्यक्तिमत्व असं की 63 चा आहे कोणी म्हणणार नाही, पन्नाशीचा म्हणून सहज खपून जाईल, रॉकस्टार सारखे लांब केस, मागे बांधलेली पॉनी टेल, डोळ्यावर सतत काळा चष्मा, घरी 5 गिटारी, त्या गिटारीवर याचे प्राणापेक्षा प्रेम, कधी कोणाला हात लावून देणार नाही. कोणत्यातरी कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मस देत असताना सध्याची दुसरी बायको त्याच्यावर भाळली. मला वाटायच की हे फक्त चित्रपटातच होतं. इथं प्रत्यक्षात झालं होतं.
मग काय, तिला नव्हता नवरा, याला नव्हती बायको, आले एकत्र.
दुसरी बायको 55 वर्षांची पण लावण्यवती, देव पण ज्यांना देतो त्यांना छप्पर फाडून देतो.
एक महिन्याने परत आला, संपूर्ण हॉस्पिटल चा खर्च याने केला होता. मला राहून राहून त्याच्या पहिल्या बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याला बघायची इच्छा होत होती, (आयतखाऊ साला)
जॉन येताना परत 100 डॉलर चा शर्ट घेऊन आला.
जॉन - तुझ्यासाठी, तू मला सुटी दिलीस म्हणून.
मी तो नम्रपणे नाकारला, हे जरा जास्तच होत होतं, मला कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली यायचं नव्हतं.
सुंदर बाईकडून स्वीकारलं जाणं जेवढं सुखावह असतं, तेवढंच सध्याच्या बायकोने मुलांसमोर नाकारणंही दुःखद असतं,
त्याने दोन्ही झेललं होतं,
दोन गोजिरवाणी मुलं ज्या माणसामुळे झाली त्याला एका रात्रीत सोडून दुसऱ्या पुरुषासोबत जायचा निर्णय कसा काय घेत असतील बायका? यालाच स्त्रीमुक्ती म्हणतात का? मध्ये जे काही झालं असेल त्याला दोघेही जबाबदार असतीलच, पण टोकाचा निर्णय घेण्याअगोदर चर्चा करता येऊ नये का? त्यांनी केली असेल? असेलही, असो.
पाश्चात्य जगात लग्न आणि घटस्फोट हातात हात घालून येतात, चर्च फक्त लग्न लावण्यापूरतं असतं, पुढे कार्य सिद्धीस नेण्यास किंवा सत्यानाश करण्यास जोडपं समर्थ असतं. (हे वाक्य आमच्या गुरुचं )
परत एके दिवशी जॉन मला म्हणतो की अरे माझ्याकडे काही फर्निचर आहे पण मला ते ठेवायला जागा नाही, तुझ्याकडे ठेवतोस का? तू ते वापर, नको असेल तेव्हा मला परत कर.
मी म्हणालो चालेल,
बघायला गेलो तर अति उच्च दर्जाचे दोन काऊच होते, मी म्हणालो की कोणातरी ट्रक वाला बघतो आणि तुला सांगतो, मध्ये बरेच दिवस झाले, माझा ओळखीचा ट्रक वाला कुठे उलथला होता माहीत नाही.
जॉन म्हणाला की माझ्या मुलाच्या मित्राकडे ट्रक आहे, त्याला सांगतो घेऊन यायला, पण यासाठी मला माझ्या मुलाच्या सावत्र बापाची परवानगी काढावी लागेल.
काय ती लफडी!
मी म्हणालो, "अरे जॉन, मुलगा तुझा ना? ट्रक तुझ्या मुलाच्या मित्राचा ना? मग त्याचा सावत्र बाप मध्ये येतो कुठे?
जॉन- तरीही परवानगी काढावी लागेल.
दुसऱ्या दिवशी सावत्र बापाने परवानगी दिली,जी मागायची गरज नव्हती.
तरीही त्याने विचारले म्हणे, की कुठे चाललाय? किती वेळासाठी चाललाय?
मनात म्हणालो, अरे हरामखोरा, तोच मुलगा हस्पिटलात एक महिना पडला होता तेव्हा कुठे उलथला होतास?
असो आपल्याला काय?
मुलगा त्याचा,
पाहिली बायको त्याची,
दुसरी बायको त्याची,
सावत्र बाप त्याच्या मुलाचा,
परवानगी सख्खा बाप मागतोय, सावत्र बापाकडे.
आपण कशाला उगाच युनो सारखे मध्ये पडायचे? आपल्याला काय सोफे आपल्याकडे आल्याशी मतलब.
सोफा बघायला जॉन च्या घरी गेलो, तर सोफा त्याने स्टोरेज मध्ये ठेवला होता, इकडे स्टोरेज भाड्याने देणे हा एक मोठा धंदा आहे, काही समान ठेवायला घरात जागा नसेल तर स्टोरेज भाड्याने मिळते, काही स्टोरेज AC असतात, हवाबंद, म्हणजे तुमच्या समानाला धूळ लागणार नाही.
आपल्यासारखे नाही, नको असलेले सामान गच्चीवर ठेवले, जिन्यात ठेवले, सोसायटीच्या हापिसात ठेवले, जिमखान्यात ठेवले, पार्किंग मध्ये ठेवले, असलं इकडे काही चालत नाही.
2000 चा सोफा ठेवण्यासाठी महिन्याला 500 रुपये भाडे द्यायला तयार असतात.
तर जॉन मला म्हणाला की स्टोरेज कडे सोफा बघायला जाण्याआधी तुला मेरीला (दुसरी, म्हणजे सध्याची बायको) भेटायचे आहे का?
मी म्हणालो, चालेल!
या 63 वर्षाच्या म्हाताऱ्याला 55 वर्षांची अतिसुंदर मेरी भेटली होती.
जॉन म्हणाला की, मेरी ला भेटूया पण ती आता खूप बिझी आहे, आम्हा दोघांचे जेवण बनवते आहे, तरी चल, उभ्या उभ्या भेटू.
मला वाटले की जेवण बनवतेय म्हणजे प्रचंड पसारा असेल, कांदा कापला असेल, भात लावला असेल, फोडणीची तयारी असेल, भाजी चिरून ठेवली असेल. पण कसलं काय! मेरी दोन टिन चे डबे उघडण्यात व्यग्र होती, ते दोन टिन चे डबे ती एका पातेल्यात पालथे करणार होती, गरम केले की झालं जेवण तयार. हे सर्व करण्याला हा “जेवणात बिझी असणे” म्हणत होता.
आमच्या सारखं दोन भाज्या, पोळ्या, भात वरण करायला सांगितलं तर काय अवस्था होईल हिची? असो, आपल्याला काय ? सोफ्याशी मतलब !
दुसऱ्या दिवशी साडेसहा फुटाचा तरणाबांड देखणा मुलगा आणि जॉन सोफा घेऊन माझ्या दारात हजर, मला हातही लावू न देता त्यांनी ते सोफे माझ्या घरात बसवून दिले.
मी जॉन च्या मुलाला म्हणालो, तुला खूप चांगला बाप मिळाला आहे रे, काळजी घे त्याची, देवासारखा माणूस आहे.
सुरवातीला जॉन बद्दल जे मत होते ते आता 180 कोनात बदलले होते, बाकीच्या लोकांनाही त्याचा असाच अनुभव आला असावा, म्हणून ते त्याच्या पडत्या काळात त्याला 2 वर्षे सांभाळून घ्यायला तयार होते, जॉन माझ्या पोटावर पाय देणार नव्हता, असंही त्याला माझे काम झेपणार नव्हते, माझ्या पदरचे मी काही त्याला देणार नव्हतो, माझा असाही काही वैतागायचा अधिकार नव्हता, मी सुरवातीला उगाच वैतागलो का? कदाचित हा माणूस माझं काम शिकून माझ्या च पोटावर पाय देईल अशी भीती मला वाटली का? असेलही, मी ही माणूसच आहे, मला ही संसार आहे.
असो.
---------
दुसरा ओळखीचा म्हातारा, पीटर. माझा जिम चा इन्स्ट्रक्टर, वय 75.
मला घरातील सर्व घडामोडी सांगायचा. मलाच का सांगायचा ते माहीत नाही, कदाचित जवळचा वाटत असेन.
तर त्याची बायको आणि त्याचं पटत नव्हतं. त्याला विचारलं की बोलता का एकमेकांशी ? तर म्हणे गेले वर्षभर बोललो नाहीत एकमेकांशी,ती वर राहते मी खाली राहतो,
मनात म्हणालो की एकत्र तरी कशाला राहता? आणि याला “पटत नाही” असं म्हणत नाहीत, जवळपास काडीमोड झाल्यात जमा आहे.
ती मधूनच कधीतरी खाली येते आणि याला म्हणते की मला तुझ्यासोबत राहायचे नाही, घटस्फोट हवा आहे!
हा म्हणतो की, जा ! घे घटस्फोट.
पण तिला कुठे जायचे ते समजत नाही. मग कशाला तोरा मिरवते? बरं, घराची सर्व बिले हाच भरतो, घरात राशन पाणी हाच भरून देतो. आणि लग्नाआधी ती होमलेस होती म्हणजे याने तिला अक्षरशः रस्त्यावरून उचलून आणली होती, तरी एवढी मिजास!
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात ना ? मग त्या एवढ्या सैल कशा असतात ? त्या लगेच सुटतात ? हयात एकत्र घालवल्यावर वेगळं का व्हावंसं वाटत असेल?
पीटर आणि त्याची बायको यांना एकत्र करण्यासारखे काही राहिले नसावे ?
गप्पा मारा, बाजारहाट एकत्र करा, एकत्र टीव्ही बघा, एकत्र जेवण बनवा. हे सर्व केल्याने कुठेतरी खटका उडेल, भांडण होईल आणि भांडण झाले कि परत सर्व सुरळीत होईल(?). कारण भांडण करणे हे एकत्र राहण्याचे कारण असू शकते. म्हणजे वेगळे झाल्यावर भांडायला कोणीच नाही एकदम स्मशान शांतता असल्यावर, किमान भांडायला तरी एकत्र येऊया असे म्हणू शकतो ना ? आणि अशा स्मशानशांततेमुळे परत एकत्र येतील तेव्हा त्यांचे सहजीवन जास्त सुसह्य आणि कमी टेन्शन चे असू शकते (?)
पण एखादे जोडपे सहा सहा महिने एकमेकांशी बोलतच नसेल तर औपचारिक घटस्फोटाची फक्त वाट बघत असतं असच म्हणावे लागेल.
बरीच जोडपी वरकरणी मेड फॉर इच आदर वाटतात. अगदी आदल्या दिवशी माझ्याकडे जेऊन गेलेल्या जोडप्यापैकी, पुरुषाने मला दुसऱ्या दिवशी फोन करून "आम्ही आता एकत्र राहू शकत नाही" असे सांगितले आहे. हे जोडपे आम्ही आता एकत्र राहू शकत नाही हे सांगायला तर माझ्याकडे आले नव्हते? आणि मग जेवण चांगलं झालं, आमचा सुखी संसार पाहिला आणि त्यांना ही दुःखद बातमी सांगावीशी वाटली नाही ? बरे जेवताना अगदी दोघात हास्य विनोद चालले होते. एका रात्रीत असे काय घडते? माणूस मरणार असेल तर आजारी पडून मारतो ना ? अचानक धष्टपुष्ट माणूस दुसऱ्या दिवशी कसा काय मरतो ? (अपघात आणि हार्ट अटॅक सोडून द्या ) तसंच काडी मोड होणार असेल तर आधी काही भांडणे होत असतील त्याबद्दल ते आम्हाला न्यायनिवाडा करायला सांगतील, जमतच नाही तर मग ठीकाय, होउदे अलग. पण कालपर्यंत मेड फॉर इच आदर सारखे वागतात त्यांना एका रात्रीत काय अवदसा आठवते?
एक दिवस हा पीटर अत्यानंदाने माझ्याकडे आला आणि म्हणाला की “ती गेली”
मी - कुठे?
पीटर - तिच्या मैत्रिणीकडे गेली, बरं झालं ब्याद गेली.
जाताना याने दिलेली कार घेऊन गेली, हा काहीच म्हणाला नाही.
मी विचारले - आता काय करणार?
तर म्हणे दोघी जणी अजूनही माझ्यासोबत राहायला तयार आहेत, म्हणजे या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला अजूनही संसार करायचा होता.
थोडक्यात इकडे बरेच घटस्पोटीत बाया आणि बापे वाटच बघत असतात. दुसरा कोणी चांगला चांगली (?) भेटतेय का! भेटली कि चालला. आला कंटाळा, बिनसलं ? दे सोडून. दुसरा असतोच.
कोणी गोविंद घ्या , कोणी गोपाळ घ्या.