आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.
* * * * *
मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी. किंवा, हा लेख म्हणजे काहीतरी गंमतजंमत असणार असाही काहींचा अंदाज असावा.
वाचकांनो, काही हरकत नाही !
आता इथे आलाच आहात तर पाहूया काय आहे हा आंबट व खारटपणा. या लेखातून तुम्हाला मानवी शरीरासंबंधीच्या एका आगळ्यावेगळ्या संवेदनस्थितीबद्दल काही सांगणार आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत अस्तित्वात असलेली अशी स्थिती ही खरोखरच गमतीशीर वाटणारी आहे. परंतु अशा विचित्र स्थितीचा अनुभव म्हणजे कोणताही आजार वगैरे बिलकूल नाही. समाजातील सुमारे 2%–4% लोकांना असा विशिष्ट अन विचित्र संवेदनांचा अनुभव येत असतो आणि त्याला शास्त्रीय भाषेत Synesthesia असे म्हणतात - syn = एकत्र व esthesia = संवेदनक्षमता. म्हणजेच, दोन भिन्न संवेदनांचे नकोसे असलेले एकत्रीकरण किंवा भेसळ. (शरीराच्या सर्व संवेदना बधीर करणारा anesthesia आपल्याला परिचित असतोच).
एक सोपे उदाहरण पाहू. समजा, ‘पुस्तक’ असा शब्द आपल्यासमोर लिहिलेला असेल तर आपल्याला त्या शब्दापासून फक्त दृष्टीने बोध होऊन मनात त्याचा अर्थ समजतो(आणि फार तर मनात पुस्तकाची प्रतिमा उमटू शकते).
परंतु एखाद्याच्या बाबतीत पुस्तक हा शब्द बघितल्यानंतर जर त्याला तोंडात आंबट चव लागली तर तो झाला synesthesia. वरवर पाहता हे अगदीच विचित्र वाटेल परंतु ते सत्य आहे.
सुमारे दोनशे वर्षांपासून वैज्ञानिक या विचित्र स्थितीचा अभ्यास करत असून तो त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. शरीरपेशींमधील विशिष्ट जनुकीय घटक या स्थितीला जबाबदार असावेत परंतु त्या संदर्भातील संशोधन अद्याप अपुरे आहे.
दैनंदिन जीवनात विविध अनुभूती घेण्यासाठी आपण ५ प्रमुख इंद्रियांचा वापर करतो. त्यांच्याद्वारे अनुभवलेल्या विविध संवेदना अशा आहेत :
डोळे : दृष्टी
नाक : वास
कान : श्रवण
जीभ : चव आणि
त्वचा : स्पर्श.
(या व्यतिरिक्त असलेल्या इतर काही संवेदना बाजूला ठेवू).
वरील प्रत्येक इंद्रियात निसर्गतः विशेष प्रकारच्या संवेदन यंत्रणा (receptors) असतात. त्या प्रत्येक यंत्रणेमार्फत भिन्न प्रकारची संवेदना चेतातंतूंच्याद्वारे मेंदूत पोचवली जाते. या प्रक्रियेदरम्यान विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत संदेशात केले जाते. आपल्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग नेमून दिलेले असतात. अशा शिस्तबद्ध ‘प्रोग्रॅम’मुळेच आपले एखादे इंद्रिय फक्त त्याला नेमून दिलेली संवेदनाच मेंदूत पोचवते आणि आपल्याला तिची जाणीव होते. उदाहरणार्थ, जेव्हा डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला फक्त ‘दिसणे’च अपेक्षित असते.
या उलट मेंदूत संवेदनांची भेसळ झालेल्या व्यक्तींना अनेक प्रकारचे चित्रविचित्र अनुभव येतात. एखाद्याने गिटारचा आवाज ऐकला की त्याच्या डोळ्यासमोर अचानक पिवळा रंग दिसू लागतो. तर अन्य एखाद्याच्या बाबतीत त्याने साध्या काळ्या शिसपेन्सिलने कागदावर काढलेले विविध अंक पाहिले तरी त्याच्या डोळ्यांसमोर काही रंग नाचू लागतात. Solomon Shereshevsky (१८८६-१९५८) या रशियन पत्रकाराचे प्रकरण तर अचंबित करणारे होते. त्याच्या मेंदूत पाचही प्रमुख संवेदनांची मिसळण झालेली होती. त्याने एखादा अंक नुसता मनात जरी आणला तरी त्याच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारची चित्रे तरळत. उदा.,
‘१’ पाहिला असता त्याला एक धष्टपुष्ट माणूस दिसायचा तर ‘२’ च्या विचाराने एक उत्साहाने ओसंडून वाहणारी स्त्री दिसायची. ८७ या अंकाच्या विचाराने एक जाडी बाई आणि मिशा पिळणारा पुरुष एकत्रित दिसायचे. आता बोला !
तर हे झाले संवेदनांच्या भेसळीचे एक अतिरेकी उदाहरण.
आता पाहू एक दृष्टीज्ञान आणि चवज्ञान यांची मिसळण झालेले एका डच स्त्रीचे उदाहरण.
या बाईंना निरनिराळे लिखित शब्द दाखवले असता त्यांना विविध प्रकारच्या चवी किंवा वासाची संवेदना होते. पदवीपर्यंत शिकलेल्या या बाईंचा वैज्ञानिकांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे आणि त्यासाठी मेंदूची एमआरआय तपासणीसारखी आधुनिक साधने देखील वापरली आहेत. या बाईंना वेगवेगळ्या प्रकारचे डच भाषेतील शब्द दाखवण्यात आले आणि प्रत्येक शब्द पाहिल्यानंतर त्यांना कोणत्या चवीची संवेदना झाली याची नोंद घेतली गेली. उदाहरणादाखल त्यातील काही शब्दांची इंग्लिश भाषांतरे आणि बाईंनी अनुभवलेली चव अशी होती :
mine - गोड चव
dive - कडू
lasting - आंबट
woman - खारट
या प्रयोगादरम्यान त्यांच्या उत्तरांमध्ये सातत्य होते. तसेच त्या बाईंनी सांगितलेली माहिती हा निव्वळ ‘भास’ नाही ना, याची देखील खात्री करून घेतली गेली. त्यासाठी बाईंच्या मेंदूच्या विविध भागांची प्रतिमा-तपासणी आणि त्याचे शास्त्रीय पृथःकरण करण्यात आले.
संवेदना मिसळणीच्या असंख्य प्रकारांमध्ये (सुमारे ६०) दोन प्रकारच्या ‘मिसळी’ अधिक प्रमाणात ( > 50%) दिसतात :
१. विविध प्रकारचे आवाज (tones) ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर विभिन्न रंग तरळणे, आणि
२. कुठलाही रंग नसलेले अंक पाहिले किंवा त्यांचा विचार जरी केला तरीसुद्धा डोळ्यांसमोर भिन्न रंग दिसणे.

या व्यतिरिक्तच्या अन्य प्रकारांपैकी फक्त एकाचा ओझरता उल्लेख करतो आणि त्याला mirror-touch synesthesia असे म्हणतात. त्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केला असता त्या दोघांसमोर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला निव्वळ ते दृश्य पाहून आपल्यालाच कोणीतरी स्पर्श करते आहे अशी भावना होते.

अशी मिसळण का होत असावी हा वैज्ञानिकांपुढे यक्षप्रश्न असून त्याच्या स्पष्टीकरणासाठी काही गृहीतके मांडली गेलीत. विविध संवेदना स्वीकारणारे मेंदूचे निरनिराळे भाग गर्भावस्थेतील आयुष्यात एकमेकांशी बऱ्यापैकी जोडलेले असतात. जशी गर्भाची वाढ होऊ लागते तसतसे हे विभाग एकमेकांपासून सुटे होणे अपेक्षित असते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत असे न झाल्यामुळे भिन्न संवेदनांचे प्रदेश एकमेकांशी गरजेपेक्षा जास्त चेतातंतूद्वारा जोडले जातात. आपल्या मेंदूत एकूण 86 अब्ज चेतातंतू असल्यामुळे कधी ना कधी या सगळ्या जटील गुंत्यात (फोनच्या क्रॉस कनेक्शनसारखा) ‘क्रॉस ओव्हर’ असा प्रकार होताना दिसतो. तसेच या लोकांच्या मेंदूच्या अंतर्गत रचनेतही काही बदल दिसून येतात. अशा लोकांपैकी सुमारे 40 टक्क्यांच्या बाबतीत या प्रकाराची आनुवंशिकता आढळली आहे. तर काही जणांच्या बाबतीत BDNF या प्रकारच्या विशिष्ट रसायनाची पातळी अधिक दिसून आली. त्यातून एक नवी थिअरी मांडली गेली. त्यानुसार संवेदना-मिसळण ही एक प्रकारे परम जागृत अवस्था (advanced state of consciousness) असावी आणि त्याला मेंदूचा वेगळ्या अंगाने झालेला विकास (differentiated development) कारणीभूत असावा.
संवेदनामिश्रणाच्या प्रकरणांमागे एक किंवा अधिक जनुकांचा वाटा असू शकेल परंतु ते अद्याप अस्पष्ट आहे. मानवी उत्क्रांतीदरम्यान अशा प्रकारची जनुके टिकून का राहिली असावीत याचे वैज्ञानिकांना बरेच कुतुहल आहे. त्यावरील विचारमंथनातून काही गृहितके मांडली गेली आहेत त्यांची आता नोंद घेऊ :
१. एखाद्या व्यक्तीतील संबंधित जनुकीय बदलामुळे मुळात तिला एक वेगळाच भन्नाट गुणधर्म प्राप्त झालेला असतो आणि त्याचा बायप्रॉडक्ट म्हणून हा संवेदनामिश्रणाचा अतिरिक्त गुण चिकटलेला असतो.
२. वरील मुद्द्यातला वेगळा गुणधर्म कुठला असावा यावरही बराच खल झालाय. काहींच्या मते अशी माणसे सामान्य लोकांपेक्षा अधिक सर्जनशील (creative) असतात. काही गाजलेल्या कलाकारांचे निरीक्षण केले असता त्यांच्यात अशा संवेदनामिश्रणाचे प्रमाण अधिक आढळले आहे.
३. अशा व्यक्तींना अचाट बुद्धिमत्ता (savantism), आकलनक्षमता किंवा अविश्वसनीय अशी अफाट स्मरणशक्ती प्राप्त होऊ शकते.
४. या व्यक्तींचे रंगज्ञान देखील सामान्य लोकांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि तीक्ष्ण असू शकते.
५. अशी मुले शालेय वयात परकीय भाषा आणि संख्याशास्त्र हे विषय इतर मुलांपेक्षा अधिक गतीने शिकतात आणि त्यात प्राविण्य मिळवतात असेही काही संशोधकांचे निरीक्षण आहे.
आतापर्यंत वर्णन केलेला संवेदना मिश्रणाचा गुणधर्म संबंधित व्यक्तीला जन्मतःच मिळालेला असतो. त्याची खातरजमा करण्यासाठी अन्य काही गोष्टींची शहानिशा करणे आवश्यक असते. काही मानसिक आजार किंवा त्यावरील औषधोपचारांच्या दरम्यान संबंधित रुग्णांना चित्रविचित्र प्रकारचे भास (hallucinations) होऊ शकतात. तसेच ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना देखील काही भास होत असतात. त्यांची synesthesia या निसर्गदत्त प्रकाराशी गल्लत होता कामा नये.
अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील मेंदूशास्त्रज्ञ डॉ. David Eagleman यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केलेला असून त्यांच्या संशोधनात त्यांना संवेदनामिश्रण असलेल्या 42,000 खात्रीशीर व्यक्ती सापडलेल्या आहेत. त्यांचे या विषयावरील Wednesday Is Indigo Blue हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
या कुतुहलजनक विषयातले संशोधन अद्याप पुरेसे नसले तरी भविष्यात त्याला गती मिळू शकेल. त्यातून आतापर्यंतच्या गृहीतकांमधून मांडलेल्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. हा शास्त्रीय विषय रोचक वाटल्याने वाचकांपुढे त्याची प्राथमिक माहिती सादर केली. आता सामान्यजन म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो. जर आपल्या पाहण्यात चुकूनमाकून असा एखादा माणूस आलाच, की जो ‘बुवा’ म्हटले असता आंबट आणि ‘बाई’ म्हटले असता खारट चव लागली, असे जर म्हणाला तर त्याला चक्रमबिक्रम न समजता संवेदनांची मिसळण झालेला एक इसम(synesthete) असे समजायला हरकत नाही ! :)

***********************************************************************************************************
संदर्भ :
- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3222625/
- https://en.wikipedia.org/wiki/Solomon_Shereshevsky
- https://www.frontiersin.org/journals/psychology/articles/10.3389/fpsyg.2...
- https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11366591/
- https://www.bbc.com/future/article/20250224-the-people-who-see-foreign-l...