आले- बदाम वडी

नमस्कार मंडळी.
यंदा मुंबईत कधी नव्हे ती किती मस्त थंडी पडली आहे ना? थंडीच्या मोसमात बाजारात गेलं की अगदी हावरटासारखं होतं. कल्पनेला पंख फुटतात. डोळ्यासमोर गाजर हलवा, गाजराच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, भोगीची भाजी, उंधियु, मटार करंजी, मटार पॅटीस......( आणखी काही न आठवलेलंच बरं!) असे नानाविध पदार्थ तरळू लागतात. पण पूर्वी माझ्या माहेरी आणि सासरी थंडीच्या दिवसात हमखास होणारे पदार्थ म्हणजे मेथी लाडू, डिंकाचे लाडू आणि आले-बदामाच्या वड्या!

सद्य परिस्थितीत,हे पदार्थ (घरी) करणारे आणि खाणारे , दोघांचीही तशी वानवाच. पण अगदीच राहवेना म्हणून घातला आज आले -बदाम वड्यांचा घाट!
माझ्यासारखं कुणाला उफाळून आलं तर मी आज केलेली ही आले -बदाम वड्यांची पाककृती!

साहित्य :खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे

sahitya

करायचं असं की....आलं सोलून चकत्या करायच्या. पाऊण बाऊल पेक्षा थोड्या जास्त चकत्या आहेत. आल्याच्या तिप्पट साखर . बदाम आवडीप्रमाणे पण वडी मिळून यायला उपयुक्त . शिवाय चव आणि पौष्टिकता यासाठी उत्तम !

आलं,बदाम,साखर आणि गरजेनुसार दूध घालून पेस्ट करायची. गरजेनुसार दूध म्हणजे वाटल्यावर फार पातळ होता कामा नये इतकंच . जाड बुडाच्या मोठ्या कढईत वाटलेलं मिश्रण काढून घ्यायचं त्यात साय घालायची आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ढवळायला सुरू करायचं. हे ढवळणं चांगलं २०एक मिनिटे चालू असतं. तेव्हा एकीकडे गाणी ऐकायला मस्त हक्काचा वेळ आहे! फक्त ढवळताना हातावर गरम थेंब उडतील तेव्हढं सांभाळायचं!

साधारण २० मिनिटांत मिश्रण घट्ट होत येतं...प्रवाही श्रीखंडाइतपत म्हणा ना! मग गॅस बंद करायचा. आणि ५ मिनिटं खाली उतरून जरा जलद हातानं मिश्रण घोटायचं . घोटताना एखाद चमचा पिठीसाखर घालायची. मिश्रण गोळा होऊ लागतं... समजतं डोळ्यांना. आधीच तूप लावून ठेवलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये मिश्रण ओतून सारखं पसरायचं. वाटलं तर बुडाला तूप लावलेल्या वाटीनं पसरावं. ओलसरपणा जरा कमी झाला की वड्या आखून घ्यायच्या आणि मग गार होण्यासाठी टुकत बसायचं. दुधाची तहान ताकावर भागवायला कडेचे तुकडे, कढईतली खरवड खायला काही हरकत नाही. या साहित्यात माझ्या लहान आकाराच्या अंदाजे ४० वड्या पडल्या. बदाम असले तरी वड्या आल्याच्याच आहेत त्यामुळे लहानच बऱ्या, नाही का?

तर या माझ्या आले -बदामाच्या वड्या!

vadi

चला,एव्हाना गार झाल्या असतील. डब्यात भरून ठेवायला हव्यात नाहीपेक्षा कोरडवून जातील .
बरंय! निघते मग मी!