ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात असलेल्या प्रसिद्ध बॉंडाय बीचवर १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी 'हनुक्का' या ज्यू धर्मीयांच्या प्रकाशाच्या सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. आनंदाने आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला हा परिसर काही क्षणांतच किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्याने भरून गेला. आयसिस या दहशतवादी संघटनेने प्रेरीत झालेल्या अक्रम पिता-पुत्राने केलेल्या या अंधाधुंद गोळीबारात १५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
या हल्ल्यातील सर्वात भीषण आणि मन सुन्न करणारी घटना म्हणजे १० वर्षांच्या चिमुरड्या मटिल्डा ब्रिटवान हिची झालेली हत्या. मटिल्डा आपल्या वडिलांकडे धावत जात असताना एका बंदूकधारी नराधमाने तिच्याकडे पाहिले आणि कोणताही संकोच न करता तिच्यावर गोळ्या झाडल्या. मटिल्डाच्या आईने हा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला. तिने रडत सांगितले की, "तो केवळ अपघाती गोळीबार नव्हता; त्या राक्षसाने माझ्या लेकीच्या डोळ्यात पाहिले, तो हसला आणि त्याने मुद्दाम तिच्यावर बंदूक चालवली." एका निष्पाप बालिकेवर अशा प्रकारे हेतुपुरस्सर गोळी झाडणे, ही या हल्लेखोरांच्या अमानवी क्रूरतेचे जिवंत उदाहरण आहे.
जेव्हा गोळ्यांच्या आवाजाने सगळीकडे गोंधळ उडाला होता, तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता हल्लेखोरांचा सामना केला. दोन पोलीस कर्मचारी या चकमकीत गंभीर जखमी झाले, तरीही त्यांनी हल्लेखोरांना रोखून धरले. एका पोलीस अधिकाऱ्याने झाडाचा आडोसा घेत अचूक निशाणा साधून एका हल्लेखोराला जागीच ठार केले, ज्यामुळे पुढील मोठा नरसंहार टळला. पोलिसांच्या या धाडसामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. यासोबतच अहमद अल-अहमद या एका सामान्य नागरिकाने दाखवलेले शौर्यही कौतुकास्पद आहे, ज्याने निशस्त्र असतानाही एका बंदुकधारी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळाला.
या हल्ल्यातील आरोपी साजिद अक्रम व्हिसावर ऑस्ट्रेलियात आला होता आणि तेथेच राहिला. त्याच्याकडे व्यवसायातील उच्च पदवी होती. अशा प्रकारे सुशिक्षित आणि समाजात स्थिरावलेल्या व्यक्तीने आपल्या २४ वर्षांच्या नावीद अक्रम या मुलासह इतका भयंकर मार्ग का निवडला, हा प्रश्न आता विचार करायला लावणारा आहे.
उच्च शिक्षण असूनही इस्लामिक कट्टरतावादाच्या प्रभावाखाली येऊन स्वतःच्या मुलालाही दहशतीच्या मार्गावर नेणे, हे समाजव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. कट्टरतावादी धार्मिक विद्वेषाचे हे विष सुशिक्षित वर्गापर्यंत कसे पोहोचते, याचे आत्मचिंतन आता सर्व समाजात करण्याची वेळ आता आली आहे.
या घटनेने ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सर्वधर्मीय नागरिक एकजुटीने या संकटाचा सामना करत आहेत. मटिल्डासारख्या निष्पापांच्या बलिदानाची आठवण ठेवून, इस्लामिक कट्टरतावादाची धर्मद्वेषाची ही पाळेमुळे उखडून फेकणे हीच त्या मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.