रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड
=============

--राजीव उपाध्ये

कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?

थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत. मी त्यांच्या पिवायसी जवळील घरातील झाडाच्या कैर्‍या पाडून खाल्ल्या आहेत. त्यांचा आणि आईचा उत्तम परिचय होता. ज्ञानप्रबोधिनीचे अप्पा पेंडसे वडिलांच्या चांगले परिचयाचे. ते ही आमच्याकडे अनेकवेळा येऊन गेले आहेत. वडीलांनी कोटीभास्कर उद्योगसमूह उभा करताना बरीच मदत केली होती. ती लक्षात ठेऊन रस्त्यात वडील दिसले की स्कूटर थांबवून चवकशी करत. मुलाला आमच्याकडे पाठवा म्हणून बजावत असत.

मला आय०आय०टी० मध्ये प्रवेश मिळाला तेव्हा माझा स्वत:वर विश्वास बसला नव्हता. प्रवेश यादी लागायच्या अगोदरच मी "आपण पुण्याला परत जाऊ" असा हट्ट धरला होता. पण मी केलेल्या कष्टांवर माझ्यापेक्षा वडिलांचा विश्वास जास्त. आईवडीलांना झालेला आनंद अजुनही चांगले लक्षात आहे. प्रवेश यादी जाहीर झाल्यावर वडील मला ठाण्याला व्होल्टास मध्ये त्यांच्या डॉ० बत्तीवाला नावाच्या पी०एच०डी० झालेल्या मित्राकडे घेऊन गेले. डॉ० बत्तीवालाने जेव्हा माझे अभिनंदन केले तेव्हा कुठे माझा स्वत:वर विश्वास बसला. माझ्या पी०एच०डी झालेल्या काही ’मित्रा’ना माझी लेक माझ्या पुढे गेली याच्या आनंदापेक्षा मी त्यांच्या तालावर नाचत नाही याचे दु:ख जास्त...

मराठी साहित्याला उत्तेजन देण्यासाठी १ कोटी देणारा सुनील देशमुख माझ्या मामाचा सख्खा मित्र. त्याला आईचे प्रेम फारसे मिळाले नाही म्हणुन तो माझ्या आजीला आईला मानायचा. त्यामुळे तो माझा पण मामा! त्याने आजीला मामाने भारतात परत यावे म्हणून २५ लाख रुपये (चाळिस वर्षांपूर्वी) नवा व्यवसाय उभा करण्यासाठी देण्याचे लेखी वचन दिले होते. आजी तो कागद मला अनेक वेळा दाखवायची. तो कागद उराशी बाळगून आजी मामासाठी झुरत-झुरत गेली.

आज कुणाचाही विश्वास बसणार नाही पण अंनिसला सुनील देशमुखानी पुरस्कार दिला तरी भारतभेटीमध्ये माझ्याकडुन त्यांची पत्रिका तपासून बघत असत. "माझं अमुक-तमुक डिल अडकून पडलं आहे. एक डिल झालं की माझे वीस कोटी सुटतात" असं म्हणायचे.

माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर त्यांनी केलेल्या लिखाणाची थोडी-फार रॉयल्टी मिळाली असती. वडिलांना दारू-सिगरेटचे व्यसन नसल्याने आईने ही रॉयल्टी शिलकीतच टाकली असती. वडिलांच्या डोक्यावर बसून त्यांना योग्य गुंतवणूक करायला भाग पडलं असतं.

पण ही रॉयल्टी त्यांनी दाखवलेल्या ’दूरदृष्टीच्या डिव्हीडण्ड’ इतकी नक्कीच मिळाली नसती. त्या रॉयल्टीमध्ये मला स्वत:च्या अटीवर आयुष्य जगायचा निर्णय घेता आला असता का? माझ्या लेकीचे टॉप-नॉच डिझाईन स्कूलमध्ये शिक्षण पार पडले असते का?

मेट्रोच्या खांबावर काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?