म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा

म्हटलं तर इडली नाही तर ढोकळा
====================

--राजीव उपाध्ये


परवाच मी धिरडी केली होती. भन्नाट झाली होती. बायकोने तर मिटक्या मारत खाल्ली, मग लेक म्हणाली -"बाबा, या विकेंडला माझ्यासाठी परत करा."

लेकीचा हट्ट पुरवायला काल परत साहित्य जमवायला गेलो तर हवी ती पिठं सापडेनात. म्हणून पर्यायाचा विचार करत असताना हरभरा डाळ आणि पोन्नी तांदूळ शिल्लक असल्याचे लक्षात आले.

मग एखाद्या मुक्तकाव्या प्रमाणे पुढील पाकृ जन्माला आली-

२ वाटी हरभरा डाळ+ १ वाटी पोन्नी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. मग जवळपास ४ वाट्या पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळल्यावर धुतलेले डाळ-तांदूळ त्यात भिजवले आणि झाकून ठेवले.

सुमारे दोन तासांनी सदर मिश्रण बर्‍यापैकी थंड झाल्यावर डाळ-तांदूळ पाणी शोषल्यामुळे खुपच फुलले आहेत, असे लक्षात आले. धिरडी करताना मी पिठे ताकात भिजवतो. इथे तसं आता करता येणार नव्हते, असे लक्षात आल्याने आपली वाट आज चुकल्याचे लक्षात आले.

मग इडली-डोसा अंगाचा राग आळवायला सुरुवात केली...

भिजवलेले डाळ-तांदूळ मग मिक्सर मधून बारीक करून घेतले. तयार झालेल्या बॅटरचे डोसे करावेत का इडली या संभ्रमात असताना मनाने वेगळाच रस्ता दाखवला.

थंडी असल्यामुळे बॅटरमध्ये चिमूटभर (पाव चमच्यापेक्षाही कमी) यीस्ट घातले आणि गरम जागी झाकून ठेवले आणि झोपून गेलो.

आज पहाटे उठलो तेव्हा बॅटरची आठवण झाली. ते छान फुगले होते. परत एकदा इडली की डोसा, असा छापा की काटा टाईप कौल लावला. मन म्हणाले, "बॅटर भरपूर तयार झाले आहे, तेव्हा थोड्या पिठाचे डोसे कर आणि थोड्या पिठाच्या इडल्या कर".

पण मग परत पहाटेच्यावेळी इडली-पात्र शोधा ते धुवा, हे सर्व करताना होणार्‍या आवाजाने इतरांची झोपमोड होणार म्हणून पाकृच्या आलापीत ढोकळ्याचे सूर लावायचे ठरवले.

मग,

अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा हिंग
पाव चमचा दालचिनी पावडर
चवी पुरते मीठ

घालून बॅटर ढवळले. मग एका लंगडीत (आमच्याकडे कुकरच्या भांड्याला लंगडी म्हणतात) सर्व बाजूना तेल लावून ३/४ भांडे भरेल इतके बॅटर कुकरमध्ये शिट्टी काढून उकडायला ठेवले. उरलेल्या बॅटरचे संध्याकाळी डोसे करायचा विचार आहे.

२५ मि०च्या बाष्पसंकारानंतर गॅस बंद केला, सुरीने टोचून व्यवस्थित शिजल्याची खात्री केली. मग लंगडी कुकर मधून बाहेर काढून ठेवली.

आता बर्‍यापैकी उजाडले असल्याने बागेत जाऊन कढीपत्ता आणला आणि हिंग-मोहरीच्या फोडणीची तयारी सुरु केली.

तयार झालेला ’इडला’ आता गार झाला होता. फोडणी कारून ती पसरवून मग तुकडे पाडले आणि एक बारीक तुकडा तोंडात टाकला तेव्हा चव भन्नाट लागली.

पण इडली अंगाचा मस्त रवाळ ढोकळा तयार झाला होता...

टीप- वरील बॅटरमध्ये आलं आणि मिरच्यांचे वाटण घातले असते तर अजून मजा आली असती.