बिहार निवडणूका २०२५ आणी प्रशांत किशोर

नमस्कार,
दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील.
निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील.

मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्‍यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख !

भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्‍या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ.

भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या.

जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले.

पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली.

उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही.

वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले).

शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या.

२०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले.
२०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले.
२०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले.

२०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती.
२ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे.

उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत.

त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा.
१. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे.
२. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात.
४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात.
५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात.
६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही.
७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात.

मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्‍यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात.

निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते.

युट्यूबवर त्यांच्या बर्‍याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात.
"इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे.

मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते.
नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे.

प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत.

मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत.

शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो.
मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.