समरसतेची ऐशी-तैशी
===========
--राजीव उपाध्ये
गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे.
संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो. हा बेसावधपणा मग कमकुवत बाजूला उघडं पाडतो.
- केरळातल्या आनंदुची लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्त्या
- कर्नाटकात संघावर बंदी
- संभाजीनगरमध्ये स्वयंसेवक भरतीला झालेला विरोध आणि मग त्याची नंतरच्या घटनांमध्ये परिणती...
समरसतेचं तत्त्वज्ञान किती फसलं आहे, याचे अन्य दूसरे चपखल उदाहरण देता येत नाही.
-जोपर्यंत मनुस्मृतीचा निर्लज्ज पुरस्कार काही धर्माचार्य उघडपणे करत आहेत,
-तसेच जोपर्यंत अर्धवट डोक्याचे स्वयंसेवक जर लोकांच्या घरात घुसून व्यक्तीगत आयुष्यावर ताबा मिळवायचा करत आहेत,
-पश्चिमेच्या ज्ञानाचे फायदे घेऊन त्याबद्दल द्वेष पसरवत आहेत,
-जोपर्यंत टाकाऊ कल्पना परत रुजविण्याचा आटापिटा केला जात आहे,
-आणि सर्वात महत्त्वाचे जोपर्यंत संघाचे शीर्षस्थ नेते आणि तळागाळातले कार्यकर्ते यांच्यात एकवाक्यता नाही,
तोपर्यंत संघाबद्दल आत्मीयता निर्माण होणे शक्य नाही.
या घटना आत्ता खुप छोट्या दिसत आहेत. प्रत्येक ठिणगी सुरुवातीला छोटीच असते. शिवाय शेकोटी पेटवताना एका काडीत पेटेलच याची खात्री देता येत नाही.
माझ्यामते आता संघाला टक्कर फक्त आंबेडकरवादी चळवळच देऊ शकते. फक्त त्यांनी संघाला समांतर अशी "भगवान बुद्ध स्वयंसेवक संघ" अशी संघटना स्थापन करावी आणि चालवावी...मनोज जरांगे सारखी सामान्य व्यक्ती जर व्यवस्थेला घाम फोडू शकते तर "भगवान बुद्ध स्वयंसेवक संघ" काय करू शकेल याची कल्पनाच केलेली बरी...