जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !

पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण. सन 1860 पर्यंत या प्रकारे बांधणी केलेली अनेक पुस्तके पाश्चात्य जगात बाजारात आलेली होती. बरेच तत्कालीन कायद्याचे रोमन ग्रंथ या प्रकारच्या बांधणीचे होते.

ok
(चित्रसौजन्य : विकी)
. .
कालांतराने असे ग्रंथ वारंवार हाताळणाऱ्या लोकांना काही आरोग्य समस्या जाणवल्याचे लक्षात आले. त्यांना हाताच्या त्वचेच्या जखमा, मळमळ आणि उलट्या तसेच श्वसनाचा त्रास इत्यादी लक्षणे जाणवली. अधिक संशोधनातून हे स्पष्ट झाले की त्या पुस्तकांच्या बांधणीसाठी वापरलेल्या पॅरिस ग्रीनमध्ये Copper acetoarsenite हे घातक रसायन वापरलेले होते. पुस्तके ग्रंथालयात दीर्घकाळ साठवली गेली की त्यांच्या बांधणीत जमा होणाऱ्या सूक्ष्मजंतूंची क्रिया या रसायनावर होऊन त्यातून arsine हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. अर्थातच त्यानंतर पुस्तक बांधणीमध्ये या रंगद्रव्याचा वापर थांबवण्यात आला आणि त्यासाठी aniline dyes सारखे अन्य काही पर्याय शोधले गेले. असेंद्रिय प्रकारातील अर्सेनिक आपल्याला घातक असून त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम खालील चित्रात पाहता येतील
ok
(चित्रसौजन्य : Wellcome Collection)
. .
जुन्या काळच्या अशा ग्रंथबांधणीमध्ये हिरव्या रंगाखेरीज लाल, पिवळा आणि तपकिरी रंगाच्या बांधणी देखील आढळतात आणि त्यामध्ये शिसे आणि पाऱ्यासारखे जड धातू असण्याची शक्यता असते. हे धातू देखील शरीराला घातक आहेत. जगातल्या नामांकित ग्रंथालयात अगदी सोळाव्या शतकापासूनचे असे काही ग्रंथ ऐतिहासिक कारणांसाठी जपून ठेवलेले आहेत . त्यांच्या हाताळणीतून वाचकाला धोका होऊ नये म्हणून त्यांची X-ray fluorescence (XRF) या तंत्राने तपासणी केली जाते. जर त्यात असे काही घातक धातू आढळले तर ते ग्रंथ सुरक्षितपणे वेगळे ठेवले जातात. काही वर्षांपूर्वी डेन्मार्क येथील ग्रंथालयात असा प्रयोग झालेला आहे. तिथे 16 व 17 व्या शतकातील काही ग्रंथांमध्ये अर्सेनिक आढळून आले. त्यानंतर ते ग्रंथ पुठ्ठ्याच्या स्वतंत्र खोक्यांमध्ये ठेवून ती खोकी हवा खेळती राहील अशा कपाटात ठेवली आहेत.वेळप्रसंगी गरजेनुसार दणकट हातमोजे घालूनच ती हाताळली जातात.

अशा महत्त्वाच्या ग्रंथांच्या डिजिटल आवृत्त्या देखील आता तयार केल्या जात आहेत. (19व्या शतकात पॅरिस ग्रीन या रंगाचा वापर पुस्तकबांधणी व्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी केला गेलेला होता जसे की, मुलांची खेळणी, भिंतीवर चिकटवलेले नक्षीदार कागद, विविध सौंदर्यप्रसाधने आणि कृत्रिम फुले. या सर्वांमधून विषबाधा झाल्याच्या घटना इतिहासात नोंदल्या गेल्यात).

इथपर्यंतच्या विवेचनातून लक्षात येईल की पुस्तक बांधणीतून झालेली विषबाधा हे ऐतिहासिक सत्य आहे. यावरून एक काल्पनिक प्रश्न पडू शकतो की, पुस्तकांच्या पानांना जाणीवपूर्वक विष लावून त्यातून विषबाधा घडवता येईल का? तर कल्पना म्हणून हे अगदीच शक्य आहे आणि हीच शक्कल लढवून काही पाश्चात्य रहस्यकादंबऱ्या लिहिल्या गेल्यात. त्यातील खालील दोन कादंबऱ्यांचा अल्प परिचय या कल्पनारंजनाच्या निमित्ताने करून द्यावासा वाटतो. कादंबऱ्या जुन्या व बहुचर्चित असल्याने रहस्यभेदासह त्यांचे वर्णन करतो :
The name of the rose - by Umberto Eco
आणि
The Paris Enigma - by Pablo De Santis
. .

The name of the rose
ही 1980 मधील मुळातली इटालिय कादंबरी. वरवर पाहता ती एक रहस्यकथा वाटली तरी त्यात इतिहास, तत्वज्ञान आणि रहस्यकथेचा सुंदर मिलाफ झालेला आहे. ही कथा सन १३२७ मधील इटलीतील एका मठात घडते. तिथे एका धर्मशास्त्राच्या परिसंवादाच्या निमित्ताने कथानायक आणि त्याचा सहकारी आलेले असतात. त्या मठातील ग्रंथालयातील एका कर्मचाऱ्याचा नुकताच मृत्यू झालेला असतो आणि त्याचा तपास करण्याची कामगिरी नायकावर सोपवली जाते. मात्र त्या नायकाला त्या ग्रंथालयात जाण्यास सक्त मनाई केलेली असते. हा तपास चालू झाल्यानंतर दर दिवशी तिथल्या एकेक कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू होऊ लागतो. सहाव्या दिवशी खुद्द ग्रंथपाल देखील मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बोटांना शाईचे डाग लागलेले आढळतात. त्यावरून नायक असा निष्कर्ष काढतो की हे सर्व मृत्यू एका विशिष्ट पुस्तकाच्या हाताळणीतून झालेले असून ते पुस्तक कुठेतरी दडवून ठेवलेले आहे. दरम्यान मठातील मुख्य साधूकडून या जोडगोळीच्या तपासात अडथळे आणले जातात. त्या सर्वांवर मात करून शेवटी ही तपास करणारी जोडी गुप्तपणे त्या ग्रंथालयात घुसते आणि ते गूढ पुस्तक शोधून काढते.

ते पुस्तक अरिस्टॉटल लिखित काव्यशास्त्राचे असते आणि त्यात हास्यविनोदावरही उत्तम भाष्य केलेले असते. असे चांगले पुस्तक त्या मठाधिपतीने दडवून ठेवण्याचे कारण काय हा प्रश्न वाचकाच्या मनात येतो. तत्कालीन सामाजिक कर्मठपणा आणि धर्ममार्तंडांचे वर्चस्व हे त्याचे उत्तर. त्या अधिपतीच्या मते हास्यविनोद ही एक हीन आणि टवाळ गोष्ट असून समाजात त्याचा प्रसार झाल्याने देवाबद्दलची भीती कमी होते. अशा पुस्तकाला कोणी हात लावू नये म्हणून त्याच्या पानांना विष लावून ठेवलेले असते. एखादे पुस्तक चाळताना अनेकांना बोटाला थुंकी लावून पाने उलटण्याची सवय असते आणि त्यामुळे ते या विषबाधेला बळी पडतात. अखेरीस जेव्हा कथानायकाला पुस्तकाचे रहस्य समजते तेव्हा हा मठाधिपती त्या पुस्तकाची विषारी पाने खातो आणि त्याचबरोबर तो तिथल्या कंदिलावर पडल्याने त्या ग्रंथालयालाही आग लागून सर्व काही भस्मसात होते.

ok
शेरलॉक होम्सची आठवण करून देणाऱ्या या गाजलेल्या पुस्तकाचे इंग्लिश भाषांतरही झालेले आहे. पुस्तक प्रचंड वाचकप्रिय ठरलेले असून आजपर्यंत त्याच्या पाच कोटी प्रती विकल्या गेल्यात. पुस्तकावर आधारित त्याच नावाचा इंग्लिश चित्रपट युट्युबवर मोफत पाहता येईल. त्यात Sean Connery नायकाच्या भूमिकेत आहे.

पुढे या कल्पित कादंबरीवरून त्या संभाव्य विषाबद्दल वैज्ञानिकांनाही उत्सुकता वाटली. पुस्तक चाळता चाळताच वेगाने मृत्यू घडवणारे असे एखादे विष प्रत्यक्षात असू शकेल का, याचे कुतूहल निर्माण झाले. त्यातून विषबाधातज्ञांनी खरोखरीच काही विषारी वनस्पतींचा अभ्यास केला. त्याचा निष्कर्ष असा की, monkshood (Aconitum) या वनस्पतीतील Aconitine हे घातक द्रव्य अगदी कमी डोसमध्ये सुद्धा वेगाने प्राणघातक ठरु शकते.
ok
(चित्रसौजन्य : विकी)
. .

The Paris Enigma
ही 2007मध्ये प्रथम स्पॅनिश भाषेत प्रसिद्ध झालेली अर्जेंटीनी लेखकाची कादंबरी. ती सन १८८९ मधील पॅरिसच्या आयफेल टॉवर उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आहे. तिथे जगप्रसिद्ध गुप्तहेरांचे संमेलन भरले असताना एका मागोमाग एक असे बरेच खून होतात. त्यातला एक खून पुस्तकांच्या विषबाधेतून झालेला आहे. ती रहस्यमय घटना वाचकाला अक्षरशः गुंगवून टाकणारी आहे.

ब्लॉन्देत व प्रोदॅक या दोन प्रतिस्पर्धी विद्वानांची ही कथा. प्रोदॅकपासून आपल्याला धोका होणार असल्याची जाणीव झाल्यावर ब्लॉन्देत घरातून बाहेर पडणे बंद करतो. तर स्वतःला ज्योतिषी समजणारा प्रोदॅक असे जाहीरच करून टाकतो की अमुक एका दिवशी ब्लॉन्देत मरणार आहे ! मग ब्लॉन्देत अजिबात घराबाहेर पडत नाही आणि रोजचा पेपर आणि टपाल या खेरीज त्याच्या घरात कोणालाही प्रवेश नसतो. तरीही त्या विशिष्ट दिवशी तो त्याच्या अभ्यासिकेत टेबलावरील एका मोठ्या पुस्तकावर डोकं ठेवलेल्या अवस्थेत मेलेला सापडतो. पोलीस चौकशीत त्याच्या शरीरात फॉस्फरस सापडते आणि त्याच्या डोक्याखालील पुस्तकाची पानेही फॉस्फरसने माखलेली आढळतात.

संशयावरून पोलीस प्रोदॅकला अटक करतात आणि तो काही महिन्यांपूर्वी आपणच तिथे जाऊन त्या विशिष्ट पुस्तकाला फॉस्फरस लावल्याची कबुली देतो. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुप्तहेराला हा प्रश्न सतावतो की नेमक्या त्याच दिवशी ब्लॉन्देत तेच पुस्तक काढून वाचेल हे प्रोदॅकला कसं समजलं? मग तो त्या दिवशीची सर्व वृत्तपत्रे तपासतो. तेव्हा एका प्रमुख वृत्तपत्रात ब्लॉन्देत ज्या पुस्तकाचा अभ्यास करत असतो त्याच्या संबंधित एक नोंद सापडते. ती मुद्दाम चुकीची दिलेली असून दिशाभूल करणारी असते. त्यामुळे प्रोदॅकचा अंदाज असा असतो की ती चुकीची माहिती वाचल्यानंतर ब्लॉन्देत ते विशिष्ट पुस्तक कपाटातून काढून शहानिशा नक्की करणार; मग वृत्तपत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला खूप राग येणार आणि त्या रागाच्या भरात तो हातातलं पुस्तक जोरात आपटणार व परिणामी फॉस्फरस त्याच्या नाकातोंडात जाणार. अशी ही पुस्तकातून घडवलेली सुनियोजित विषबाधा !

पुस्तके म्हणजे ज्ञान व रंजनाचे मोठे संचित. त्यांच्या इतिहासात दीर्घकाळ छापील पुस्तकांचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यांचे आयुष्य देखील मानवी आयुष्याच्या काहीपट अधिक. जाडजूड ग्रंथांच्या बांधणीतून झालेली विषबाधा हे एक ऐतिहासिक सत्य होते. तर पुस्तकाच्या पानांना चक्क विष लावून खून घडवण्याच्या कल्पित कथा काही लेखकांच्या सुपीक डोक्यातून अवतरल्यात. त्या रहस्यमय कथांतून बिचाऱ्या तारक पुस्तकांना चक्क मारक ठरवले गेले ! असो.

छापील पुस्तकप्रेमींनो,
सध्या आपण हाताळत आणि वाचत असलेली पुस्तके अगदी आरोग्यसुरक्षित आहेत हे बरोबर. तरीसुद्धा पुस्तकांची पाने उलटताना (जर आपल्याला सवय असलीच तर) त्यांना कळत नकळत थुंकी लावलेले बोट न लावणे हे केव्हाही श्रेयस्करच, नाही का? 😀
*************************************************************
पुस्तक/ग्रंथ याविषयावरचे या पूर्वीचे लेख :

पुस्तक परिचय :