आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई
हे गाणे श्री गदिमा यांनी एका लहान मुलीच्या तोंडी लिहिले आहे कि लहानपणी आई कसा जाच करते, ते मी तिची आई झाले तर तिला दाखवून देईन या अर्थाने.
आता स्थिती उलटी होऊ घातली आहे. मुलगा किंवा मुलगी आज आईबापांना जास्त दिवस सांभाळतो अशी स्थिती आली आहे
हि आज अनेक घरात दिसणारी कहाणी आहे. सत्य घटनांवर आधारित आहे. नावे अर्थात बदलली आहेत.
शंकरराव पाटील हे खान्देशातील एक बडे प्रस्थ. ते आणि पार्वतीबाई एरंडोल येथे एका मोठ्या वाड्यासारख्या घरात राहत असत त्यांची भली मोठी शेती होती आणि व्यापार होता.
त्यांना वसुधा नावाची एकुलती एक मुलगी. पुढे तिचे लग्न एका सुस्थितीत असलेल्या घरी करून दिले.
जावई वसंतराव आर्किटेकट असून मुंबईत व्यवसाय करत असे. वसंतराव अत्यंत सुस्वभावी हसतमुख आणि मितभाषी होते.
वसंतराव आणि वसुधा याना एक गोंडस मुलगा होता. हे तिघे आपल्या मुंबईतील दोन बेडरूमच्या घरात राहत असत. वसंतरावांचे आईवडील मुंबईतच दुसऱ्या घरात राहत असत.
दुर्दैवाने शंकरराव याना कसला तरी कर्करोग झाला आणि मुंबईत टाटा रुग्णालयात उत्तम उपचार करून केवळ ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पार्वतीबाई गावच्याच घरात राहत होत्या. कारण तेथे त्यांचे भाडेकरू आणि इतर सर्व नोकर चाकर होतेच. शंकरराव गेले तेंव्हा त्यान्चे वय केवळ ४८ होते.
अंगात धमक होती शिवाय सासरचा आणि माहेरचा पैसा होता. मुलगी जावई जाऊन येऊन होते.
करायला कोणी नाही म्हणून गावची शेती विकून टाकली. घर (वाडा) होता तो तसाच ठेवला. कालांतराने भाडेकरू सुद्धा सोडून गेले.
मग वाडा पाडून तेथे दुमजली इमारत बांधली. दोन मोठे फ्लॅट ठेवले आणि बाकी विकून टाकले. पार्वतीबाई एका फ्लॅट मध्ये राहत आणि शेजारचा तसा बंदच होता.
जशी साठी जवळ आली तसे मुलीने निर्णय घेतला आता आईला एकटे ठेवायला नको. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आणि पार्वतीबाई कायमच्या मुलीच्या घरी राहायला आल्या.
कानाला ऐकू कमी येऊ लागले तसे त्यांच्याशी बोलायला इतरांना मोठ्याने बोलावे लागे. यासाठी त्यांना मुलीने एका चांगल्या कानाच्या तज्ज्ञाला दाखवले त्याने कानाला वयपरत्वे कमी ऐकू येऊ लागले आहे त्यासाठी यंत्र लावा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल असा सल्ला दिला.
अर्थात मला काही कमी ऐकू येत नाही आणि मी काही कानाला यंत्र लावणार नाही असे पार्वतीबाईनी ठणकावून सांगितले.
त्यातून जरा चांगले यंत्र पंचवीस हजार रुपयाला येते असे ऐकल्यावर तर त्या कान नाक घसा तज्ज्ञांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला
सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही तसे पार्वती बाईंचे होते. दोन बेडरूम पैकी एक बेडरूम मध्ये त्यांनी आपला डेरा टाकला आणि नातवाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागले.
नातू इंजिनियरिंग ला गेला तसा हॉस्टेल ला गेला त्यामुळे आता घरात पार्वतीबाई मुलगी आणि जावई असे तिघेच.
पार्वती बाईंचा स्वभाव चिडचिडा झाला होता. आपल्या बेडरूम मध्ये त्या दुसरे कोणतेही सामान ठेवू देत नसत. मुंबईत खोल्या लहान म्हणून जातायेता मुलीकडे उद्धार चालू असे. त्यातून आपले सामान बेडरूम मध्ये ठेवले तरी त्या मात्र बाहेरच सोफ्यावर बसत असत.
दिवसभर काहीही काम करत नसत कि बाहेर जात नसत. त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढलेलं होतं त्यामुळे गुढघे दुखीचा त्रास चालू झाला होता. नको तितके खाल्ल्यामुळे आणि वयपरत्वे गॅसेस चा त्रास होता.
त्यामुळे बाहेर सोफ्यावर बसून वेळी अवेळी कायम ओ~~ब्बा अशी भयाण ढेकर देत असत.
दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता त्यांना जेवायला लागायचे. जावई दुपारी एक दीड ला जेवायला आला तरी त्या त्याची वाट पाहत नसत किंवा रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नसे. त्यामुळे मुलीला त्यांना प्रथम वाढून द्यायला लागायचे.
आपण गरम गरम जेवून झालं आणि मुलगी जेवायला बसली कि त्या बेडरूम मध्ये जाऊन ठणठणीत आवाजात अग मला सुपारी आणून दे, माझं औषध आणून दे, पंखा कमी कर, पाणी आणून दे अशी काहींना काही मागणी करून तिला जेवणावरून उठवत.
त्यांनी दीड ला झोपायची सवय लावून घेतली होती. जावई परत गेला आणि मुलगी मागचं आवरून अडीच वाजता झोपायला गेली कि तीन वाजता यांचा गजर सुरु होत असे, अग मला चहा करून दे. चहा बरोबर मारीची बिस्किटं लागत असत.
चहा झाला कि चार वाजता त्या आपल्या जुन्या भ्रमणध्वनीवरून कोणा तरी मैत्रिणीला बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसून फोन करत असत आणि मग अर्धा तास मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं चालत असे.
त्यांना मुलीने सांगितले कि संध्याकाळी जरा बाहेर जाऊन ये चार बायका भेटतील वेळ चांगला जाईल पण नाही माझे गुढघे दुखतात आता चार जिने ( दोन मजले) कोण उतरणार आणि परत चढणार? असे सांगितले. बिचारी मुलगीच संध्यकाळी बाहेर जात असे बाजार करून चार मैत्रिणीना भेटून परत येत असे.
परत आल्या कि मला जळजळ होते आहे जेवायला वाढ हा तगादा सुरु होत असे. मुलगी स्वयंपाक करे पर्यंत त्या टीव्ही वर कुठल्या ना कुठल्या मालिका लावून बसत. आता नीट ऐकू येत नसे म्हणून मोठ्या आवाजात टीव्ही लावला जात असे ज्यामुळे कोणत्याही खोलीत त्याचा भरपूर आवाज येत असे.
सात ला त्या जेवायला बसत. जावई आठ वाजता परत आला तरी सारखं मला हे दे ते दे करत मुलीला नवऱ्याबरोबर चार गोष्टी बोलायला सवड देत नसत.
नातू इंजिनियर होऊन नोकरीला लागला तो नोकरी नंतर रात्री उशिरापर्यंत बाहेरच असे त्यामुळे त्याचे फारसे नडत नसे. पण यथावकाश त्याचे लग्न झाले तेंव्हा नातसुनेला या गोष्टी खटकत असत. यामुळे नातवाने आखाती देशात नोकरी पत्करली आणि तो बायकोला घेऊन तिकडे निघून गेला.
सुटीवर आला तरी तीन चार दिवस घरी येत असे मग आठवडा भर सासरी( पुण्याला) जाऊन परत जाताना एक दोन दिवस राहून परदेशात जात असे.
नातू काही आजी जिवंत असेपर्यंत तिकडची नोकरी सोडून परत आला नाही.
पुढे वयामुळे पार्वतीबाई जास्तजास्त गलितगात्र होत गेल्या पण त्यांचा ताठा कधी कमी झाला नव्हता. शेवटची दोन वर्षे त्या अक्षरशः अंथरुणात होत्या पण मुलीने कधी तोंडातून अक्षर काढले नाही.
जावई भला माणूस होता त्यामुळे किंवा खेड्यातील पार्श्वभूमीमुळे आपल्या आईला वृद्धश्रमात ठेवावे असा विचार मुलीने कधीही केला नाही.
शेवटची आठ नऊ वर्षे त्या परावलंबी झाल्यामुळे वसुधाताईंना कुठे दूर सहलीला किंवा पर्यटनाला जाणे पण अशक्य झाले होते. त्यांची स्वतःची पण साठी जवळ आल्याने त्यांची दमछाक होत असे. अर्थात घरात काही कुरबुरी होती असतील पण त्या आमच्या पर्यंत आल्या नव्हत्या
वसुधा ताईंची चुलत बहीण माझ्या संपर्कात असल्यामुळे यातील काही गोष्टी ज्या अन्यथा बाहेरच्याला दिसल्या नसत्या त्या आमच्या लक्षात आल्या. "पार्वती काकू आपल्या मुलीला फार छळतात" या शब्दात तिने आम्हाला सांगितले तेंव्हा या बाबीचे गांभीर्य आमच्या लक्षात आले
हि स्थिती पार्वती बाईंचे वय वर्षे ८४ मध्ये निधन होईपर्यंत कायम होती.
म्हणजे आईने मुलीला १९ वर्षे सांभाळले आणि मुलीने आईला २४-२५ वर्षे.
आज डॉक्टर म्हणून मी लोकांच्या घरी जातो तेंव्हा या अशा अनेक कथा ऐकायला आणि पाहायला मिळतात.
समाजमन अजूनही अशा वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवण्याच्या बाजूने तयार झालेलं नाही.
घरातच राहून वृद्धांची काळजी घेणारी माणसे मिळू शकतात पण मागच्या पिढीतील लोकांचे अशा गोष्टीवर पैसे खर्च करावे अशी मनोवृत्ती सुद्धा नाही.
या प्रश्नाला नक्की असे उत्तर नाही. प्रत्येक कुटुंबाला आपला प्रश्न आपल्या आहे त्या परिस्थितीतच सोडवावा लागतो.
बऱ्याच वेळेस हे प्रश्न घरच्या बाईलाच सोडवावे लागतात आणि मुंबईत तर जागांचे भाव आभाळाला भिडलेले असल्याने एक अतिरिक्त खोली असणे हि चैन आहे आणि ती बहुसंख्य लोकांना परवडत नाही.