यांत्रिक घड्याळे

यांत्रिक घड्याळे

माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८० मध्ये. काहितरी छंद या दृष्टीने एक जुने मनगटी घड्याळ उघडून ,त्याचे भाग सुटे करून जोडले. मग या घड्याळ रिपेंरिंगची हत्यारे, नवीन सुटे भाग कुठे मिळतील याचा शोध घेतल्यावर मुंबईत जे.जे. हॉस्पिटल आणि भुलेश्वर दरम्यान ही दुकाने सापडली. मग याच घड्याळाबरोबर एक गजराचे घड्याळ आणि भिंतीवरचे टोले देणारे घड्याळही उघडले. तर ही सर्व घड्याळे तांत्रिक पद्धतीची होती. डिजिटल जमाना आला १९९५ मध्ये आणि काम बंद झालं. २००५ नंतर मोबाईल येऊ लागले आणि त्यांनी तर बऱ्याच गोष्टींना बाद केलं. टॉर्च, ओडिओ सिस्टम, गजराची आणि हातातली घड्याळे, डायऱ्या , कॅलेंडर, कॅमेरे आणि घरातले किलिंग किलिंग फोन इत्यादी.
माझा हा छंदच होता आणि नोकरीतील फावल्या वेळात जमेल तसे दुरुस्ती करत असे. तो वेळ मिळावा आणि गिऱ्हाईकांनी( शेजारी किंवा नोकरीतील ओळखीचे लोकच) यांनी तगादा लावू नये म्हणून मी चार मनगटी आणि दोन गजराची घड्याळे ठेवली होती ती बदली म्हणून देत असे. एचएमटीची काळ्या आणि पांढऱ्या डायलची काही घड्याळे तर गिऱ्हाईकांनी घेऊनच टाकली.
गजराची घड्याळे - यांची अचुकता चोविस तासांत पाच मिनिटे एवढी मिळाली तरी काम चालत होते. पण हे गजर देण्याचे अचूक काम मोबाईलने अंगावर घेतले. गजराच्या घड्याळाच्या गजरानेच आमच्या मुलांना जाग येते , मोबाईलच्या आवाजाने नाही असे सांगणारेही लोक होते. पण मुंबईत आणि इतर ठिकाणी बॉमस्फोटासाठी या गजराच्या घड्याळांचा वापर सुरू झाला आणि घरात तीन चार गजराची घड्याळे संशयास्पद वाटू शकतील अशी परिस्थिती आली. ते कामच बंद केले आणि घड्याळे वाटून टाकली गरजूंना.
भिंतीवरील घड्याळे- यात तासाला आणि अर्ध्या तासाला ही टोले पडण्याची सोय असे. रचना फारच मजेशिर असे. एक मोठा लंबक हलत राहाणे आणि मोठी तबकडी हे फारच सुंदर दिसे. माझ्याकडे हे एक घड्याळ प्रथम आले दुरुस्तीला. तो मालक ( वयस्कर गृहस्थ) म्हणाला की हे तुम्हाला देऊनच टाकतो. काहीपण करा.आमच्या घरातल्यांना ते जुनाट घड्याळ नको आहे. त्यांनी नवीन बॅट्री सेलवर चालणारी घड्याळे आणून सर्व खोल्यांत लावून टाकली आहेत.
मी ते चालू करून भिंतीवर लावले. बारा वर्षांनी त्या मालकाच्या मुलाने निरोप पाठवला..." बाबांनी तुमच्याकडे एक घड्याळ दिले होते ते असल्यास हवे आहे." मी बोललो "ते आहे माझ्याकडेच, येऊन घेऊन जा." या घड्याळांना मात्र आता antique value आलेली आहे.
____________
मनगटी घड्याळे-
मेकॅनिकल वॉचची अचुकता फार फार तर दिवसाला दहा सेकंद अधिक उणे इतकी जाऊ शकते. पण फडतूस पंचवीस रुपयांचे डिजिटल क्वार्टझ वॉचसुद्धा वर्षाला दहा सेकंद एवढी अचुकता देते. हे झाले आतल्या यंत्राबाबत( movement).

पुन्हा यांमध्ये १.चावी द्यावी लागणारी आणि २.आपोआप चावी बसणारी auto winding असे दोन प्रकार. क्रमांक दोनमध्ये Seiko 5 नावाजलेले होते.

उरले काय तर वरची केस. ती कितीही महाग करतात. टिटानियम मेटलची असेल तर गंजत नाही.
केसच्या आत पाणी न जाणे आणि न गंजणे यासाठी पैसे अधिक देणे ठीक. पण केवळ डायमंड लावणे, सोने वापरणे हे फक्त सौंदर्यासाठी.

डिजिटल मुव्हमेंट एका बॅटरी सेलवर चालते आणि हे सेल उणे दहा सेंटिग्रेड तापमानास किंवा खाली व्होल्टेज देत नाहीत हा मोठा दोष. मेकॅनिकल ओटो वाईंडिंग मात्र उणे चाळीस तापमानापर्यंत चालते आणि केस चांगली वाटरप्रूफ असेल तर पाण्यात वापरता येते . म्हणून साहसी, हिमालयात जाणारे, बोटीवरचे लोक ही घड्याळे पसंत करतात.

घड्याळात पाणी जाते कसे आणि कुठून? मागच्या झाकणातून किंवा चावीतून किंवा वरच्या काचेतून.
भक्कम केसमध्ये मागचे झाकणच नसते. म्हणजे तिथून पाणी जाण्याचा प्रश्न बाद होतो. चावीच्या आतला वाशर चांगला असतो. ओटोवाइंडिंग प्रकारामुळे चावी फिरवली जातच नाही आणि वाशर झिजत नाही. तिथूनही पाणी जात नाही. वरची काच ही खरोखर काच नसते आणि तो एक चांगला क्रिस्टल असतो. तो अप्रतिम आकारात कापून ( फेस टू फेस) केसमध्ये वर मशिनने प्रेस करून बसवलेला असतो.केस टिटानियमची केलेली म्हणजे गंजण्याचा प्रश्न नसतो. तर हे सगळे असेल तरच जास्ती किंमत मोजायला हरकत नाही. तर मग हे घड्याळ मुव्हमेंट केसमध्ये बसवतात/काढतात तरी कसे? मुव्हमेंट केसमध्ये वरून आत ठेवतात, चावी प्रेस करून जोडतात आणि वरून क्रिस्टल दाबतात. तर हे काम फक्त कंपनीच करू शकते. उघडताना मशिन वापरून क्रिस्टल उचकटल्यावरच मुव्हमेंट बाहेर काढता येते.
वाटरप्रूफींग - घड्याळ कोणतेही असो यांत्रिक अथवा डिजिटल क्वार्टझ किंवा स्मार्ट वॉच ते हातात बांधलेले असते आणि त्यात पाणी जाण्याची शक्यता कमी करण्याची गरज असते. मागचे झाकण हे सगळ्यात मोठे दार असते. त्या झाकणाखाली एक वॉशर असतो. झाकण आट्यांवर ( थ्रेडस) फिरवून लावताना तो वॉशर थोडासा चिरडला जाऊ शकतोच. काही ठिकाणी ते झाकण आणि तो वॉशर प्रेस करून दाबून बसवतात. पण ही युक्ती नंतर काम करत नाही. झाकण सैलच बसते. मी तर झाकणाच्या कडेने फेविबॉंडच लावत असे. त्याने बराच अटकाव होतो.

तर वाच कंपनीचं नाव कितीही नावाजलेले असो आणि केसला मागे झाकण असेल तर अधिक किंमत मोजण्यात काही अर्थ नाही. हल्ली चांगल्या केसमध्ये मेकॅनिकल मुव्हमेंट न टाकता क्वार्टझ मुव्हमेंट टाकतात. हे ठीकच आहे पण वापर उणे तापमानास करता येणार नाही.
मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती दिसतात आणि त्यात मेकॅनिकल मनगटी घड्याळे घातलेल्या नामवंतांचे फोटो असतात. ते केवळ एक मार्केटिंग उरले आहे असे मला वाटते.

घड्याळाची सुरक्षितता....
पट्टा अडकवायच्या ज्या दोन दांड्या असतात त्यावरच घड्याळाची सुरक्षितता असते आणि त्या कधीही तुटतात.कारण त्यात एक तकलादू स्प्रिंग असते ती गंजते. एकच नायलान बँड दोन्ही दांड्या वरून नेला असेल तर मात्र एक तुटली तरी दुसऱ्यावर घड्याळ मनगटावर लोंबकळत राहाते. पूर्वी काही घड्याळांत ज्यादाची साखळी असे.
काही घड्याळात कायमची पितळी दांडी लावून टाकायचो.

मी घड्याळ रिपेअरिंग शिकलो कुठे आणि कसे?
नोकरी करत असताना शिफ्ट ड्युटी असत आणि भरपूर फावला वेळ मिळत असे. काहितरी उचापत्या करण्याची आवड होतीच. एकदा एक हेन्री सँडोज कंपनीचे जुने घड्याळ मला भावाने आणून दिले. त्यांच्या ऑफिसातल्या एकाने सांगितले की त्याच्या या घड्याळावर पैसे खर्च करून थकलो आहे , नवीनच घेतो. भाऊ म्हणाला दे मला दहा रुपयांत. त्याने ते दिले लगेच. ते माझ्याकडे देऊन म्हणाला बघ याची काय दुरुस्ती होते का. ती 96 नंबरची मुव्हमेंट ( आतले यंत्र) होती. घड्याळ शिकायला अगदी सोपे असे ते होते. वडलांच्या ओळखीचा एक वॉचमेकर होता दादरला. त्याला वडलांनी विचारले की कोणती हत्यारे लागतील घड्याळ उघडायला आणि पाहायला तर त्याने सांगितले " लेन्स, स्क्रू ड्रायवर अने चिप्प्यो."(= भिंग,स्क्रू ड्रायवर आणि चिमटा). ते बाबा लगेच घेऊन आले. मग माझे रोजचे काम एकच ... रोज ते घड्याळ उघडून सगळे भाग वेगळे करायचे आणि परत जोडायचे. घड्याळाचे सुटे भाग मिळणारी दुकानेही शोधून काढली. दादरमध्ये कोतवाल उद्यानाच्या समोरच एक होते. पण मोठी पेठ जे.जे. हॉस्पिटल - पायधूणीजवळ होती. इब्राहिम रहिमतुल्ला स्ट्रीट आणि अब्दुल रेहमान स्क्रीनवर. एकेक घड्याळ रिपेरिंगची कामे ओळखिच्यांची घेऊ लागलो तरीही अगदी कसबी काम येत नव्हते. तुटलेल्या बॅलन्सचा स्टाफ( मधला दांडा) बदली करणे. कुणाकुणाला वॉचमेकरना विचारत असे परंतू खरी माहिती देण्याचे टाळत. मग प्रश्न पडे की हे लोक शिकले कुठे? ते कळले दादरमधल्याच एका माणसाची( श्री कुलकर्णी)ओळख झाल्यावर. तेही घरूनच काम करत आणि त्यांनी मला एकदा दुकानात पार्टस घेताना पाहिले. तिथे त्यांच्या लक्षात आले की मी नवीन आहे आणि शिकत आहे. मला त्यांनी सांगितले की मी अगदी रोज शिकवू शकणार नाही पण अडचण आल्यास ते काम माझ्याकडे आणा मी सांगेन कसं करायचं ते. मुंबईत मोठी वॉच आणि रेडिओची दुकाने होती त्यात काही लोक नोकरीवर होते. रिटायर झाल्यावर ते बाहेर पडले आणि आपली दुकाने टाकून बसले. त्यांना इत्यंभूत ज्ञान नोकरीतील मिळालेले. पण त्यांच्याकडे शिकायला ठेवलेल्या लोकांना ते प्रथम पट्टे आणि केस साफ करायचं काम देत. नंतर हळूहळू एखादे काम देऊन शिकवत. फावरलूबा दुकानामधून बाहेर पडलेल्या एका मराठी माणसाकडे त्यांनीही उमेदवारी केली होती. एकदा दादर सार्वजनिक वाचनालयात ( छबिलदास हायस्कूलसमोर)विचारले की वॉच रिपेरिंगचे पुस्तक आहे का? त्यांनी एक मराठीतले पुस्तक आणि इंग्रजी पुस्तकं दाखवले. इंग्रजीसाठी दोनशे रुपये अनामत ठेवावी लागेल सांगितलं. आणलं ते. अहाहा... अलिबाबाची गुहाच उघडली. अमेरिकन पब्लिशरचं पुस्तक. संपूर्ण चित्रांसह सर्व दुरुस्ती कामांची स्पष्ट माहिती देणारं पुस्तक होतं. सगळेच प्रश्न सुटले. नंतर ते मराठी पुस्तकही आणलं तर काय आश्चर्य ..त्या फावरलूबा दुकानवाल्यानेच लिहिलं होतं, चित्रे संपूर्णपणे इंग्रजी पुस्तकातून कॉपी केलेली आणि कृती म्हणजे " या भागाची विशिष्ट रचना केलेली असते " अशी मोघम वर्णने होती. सगळी लबाडी.
कामाला खूपच गती आली. इब्राहिम रहिमतुल्ला स्ट्रिटवरचे एक दुकान म्हणजे सर्व स्विस हत्यारे मिळण्याचे ठिकाण होते. बर्जन हा चांगला ब्रँड होता. त्यांची तेलंही मिळायची. इतर स्प्रेअर पार्ट दुकानांपैकी युसुफ वाच सेंटरचा मालक मला खूप मदत करायचा. त्याचा मुलगा युसुफ माझ्याच वयाचा आणि त्याने डिजिटल टेक्निक शिकून बँक गल्लीत नवीन दुकानही टाकले. जे स्प्रेअर पार्ट मी तीन तीन घेत असे तेच अब्दुल रेहमान स्ट्रीटवरच्या दुकानांत बारा मिळत किंवा बारा घ्यावे लागत. भाव अर्थात फारच कमी. इकडे मुंबईतील इतर मोठे दुकानदार खरेदीला येत. पॉलिश पेपर फाइन एक कागद दोन रुपयाला मिळणारा इकडे चार रुपयांना बारा मिळत. सर्व डझनचा होलसेल भाव. चावी रॉड तीन रुपयाला तीन मिळणारे इकडे चार रुपयांना बारा. इत्यादी.
पण ... डिजिटल घड्याळे ९२ त्या आसपास येऊ लागली आणि यांत्रिक घड्याळे त्यांच्या सुनामीत वाहून गेली.
------------
आता कामाची गोष्ट -

बॅटरी सेलवर चालणारी घड्याळे दुरुस्ती अशी करावी?
या घड्याळात दुरुस्ती अशी फारशी नसतेच. एक तर हे घड्याळ अचूक चालते किंवा बंद पडते. बंद पडण्याची कारणं आणि उपाय
- १. बॅट्री सेलची पावर साधारणपणे एक वर्ष असते. तो सेल बदलणे. साधारणपणे 521,621 ,626 या तीन नंबरांचे Sony कंपनीचे सेल होलसेल स्प्रेअर पार्ट दुकानांत मिळतात ते तीन तीन घेतल्यास देतात ते घरी ठेवावेत.( १०-१५-२० /-)या रेंजमध्ये किंमती असतात. त्याच दुकानात ब्लोअर, चिमटा , छोटे स्क्रू ड्रायव्हर आणि भिंगही मिळेल. ही साधने फारशी महाग नसतात शिवाय ती इतर कामांतही उपयोगी आहेत. मग सेल बदलायचे शंभर- दोनशे रुपये देण्यापेक्षा स्वस्त आहे. घरात तीन चार घड्याळे असतातच आणि वर्षांत चार वेळा काम लागतेच तर हे कराच. थोड्या खटपटी नंतर घरीच सेल बदला.
घड्याळाचे मागचे झाकण उघडायचे, ब्लोअरने हवा फुंकून धूळ कचरा उडवायचा,जुना सेल काळजीपूर्वक बाजूला काढायचा आणि त्याच नंबराचा दुसरा टाकायचा. चावी काटे फिरवून आत दाबायची . मग झाकण घट्ट लावायचे. पंधरा मिनिटांचे काम असते.

२. घड्याळात एक इलेक्ट्रॉनिक सर्किट पीसीबी असते ते सर्किट बंद पडते हवेतील दमटपणामुळे. सिटिझनचे सर्किट(2030) यात हा दोष फार म्हणूनच एचएमटी मागे पडले. टाइटन मध्ये नाही.तसेच रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त ( १५०रु/-)इतर चाइनिज घड्याळांतही बहुधा हा दोष नसतो. उपाय नवीन घड्याळ घेणे.
३. क्वार्ट्झ घड्याळाची मुव्हमेंट स्वस्त असते, वरील महाग केस टाकून किंमती वाढवतात. मुव्हमेंट बदलू शकतो पण 2030 नंबरची म्हणजे सिटिझनची अजिबात टाकू नका. पावसाळ्यात बंद पडते. इतर कोणत्याही कंपनीची घ्या.
डिजिटल घड्याळे अचूक चालतात आणि खूप स्वस्त असतात त्यामुळे महागडी घड्याळे घेऊन दुरुस्ती करण्यापेक्षा नवीनच घेणे स्वस्त पडते.
माझ्याकडे बरीच हत्यारे जमा झाली आणि ती आता निरुपयोगी आहेत. त्या सर्वांचा फोटो देऊनही उपयोग नाही. शिवाय त्यांचे रिपेरिंगही नाही.
तर हा लेख घड्याळांची आंतररचना सांगण्यापेक्षा त्यासंबंधी किस्से सांगण्याचाच होऊ शकेल. वाचकांनी यात भर घालावी.फोटो टाकावेत.प्रतिसाद येतील तसा लेख वाढवेन.
( संपादन करून दुरुस्ती करता यावी म्हणून लेख कलादालन विभागात देत आहे.)