बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

१

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात. आणि ग्रेस यांच्याच सुरेल गीताचे स्वर कानी पडतात...

प्रकाश गळतो हळूहळू
चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती
अंधूक अंधूक दिवे ...

दूर सनातन वृक्षांनाही
हिरवट गंध मूका
दुःख सुरांचा क्षितिजापाशी
मेघ दिसे परका.
..

बस... एका अनवट प्रकाशातून ग्रेसांचे स्मरण सुरु होते. बेसरबिंदीतील सादर झालेल्या कवितांचे,ललितबंधांचे,गीतांचे विषेशत्व जाणवले की, ग्रेस यांच्या नेहमीच्याच प्रसिद्‌ध कवितांपेक्षा वेगळ्या कवितांचा,लेखांचा यात मागोवा आहे.

कार्यक्रमाच्या संहितेमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या सृजनाचे अनेक पैलू स्पर्शित केले गेले. ग्रेसांना प्रिय असलेली भगवी संध्या, आईची गुढ माया, पावसाची निरव रिमझिम, दुःखाची कातरवेळ आणि अजून बरेच काही..

ग्रेसांनी लिहिलेले अनेक ललितलेखन कार्यक्र‌मात सुंदररीत्या गुंफले आहेत. सुरुवातीलाच 'तोडाचा डोह'' काळजाला पिळवटून टाकतो. सादरकर्त्याच्या आव‌ा‌जाची धीर-गंभीरता त्या डोहाच्या वातावरणाचा आभास तंतोतंत उभा करतो.

तांदूळ मोजणाऱ्या मुलींची कथा व्यथा खोल शिरते. एलिझाबेथच्या शेवंतीच्या रोपांनी कशी मानवातील अहंकाराच्या मूळापाशी कधी नेले कळलेच नाही... प्रश्न शेवतींचा नाही एलिझाचा आहे.

नको मोजू माझ्या
मुक्तीच्या अंतरे
ब्रम्हांडाची दारे
बंद झाली ..

माझ्या आसवांना
फूटे हिमगंध
मागे-पुढे बंध
पापण्यांचेstrong>..

ग्रेसांची दग्ध मुलींचे संध्यागीत यात संध्याकाळचे हिरवट दुःखाचे तरंग उमटत राहतात.

पक्षी पक्षी व्याकूळ व्याकूळ
रुतवून काटा उर अभंग
दग्धमुलींचे विरक्त हसणे
संध्येपाशी एक तरंग
..
...
....
मी स्मरणाने गंध अचंबित
संध्यामायेचा कल्लोळ|

ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल -

ग्रेस

अशा या प्रिय ग्रेस यांच्या स्मरणाची संध्या मी अनुभवली ABAA(आबा) 'अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोशिअसन यांच्या अभूतपूर्व सुंदर बेसरबिंदी यां कार्यक्र‌मामधून!

विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या पण २०-२२ वर्ष कलेच्या अनेक रंगी तंतूने जोडलेल्या या गुणी प्रतिभावंत कलाकारांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बेसरबिंदीचा पहिला कार्यक्रम एफ.टी.आय(FTII) ओल्ड मेन थिअटर ,पुणे येथे सादर झाला. यातील सादरीकरण केवळ गीत, लेख यानेच सजलेले नाही तर प्रकाश योजना, नेप्यथ्य याच्या परीपूर्ण साथीने चमकले आहे.

प्राचीताईच्या आंतरजालावरच्या मैत्रीने मी या कार्यक्रमाच्या संगतीत आले. काल प्राचीताई आणि सर्व कलाकारांच्या या 'बेसरबिंदीने' ग्रेस यांच्या स्मरणाचे चांदणं मनभरून स्पर्शून आले.

हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.नक्की पहा!
२
-भक्ती