मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
असं कुठं लिहिलंय?
उंबऱ्याशी थांबू नये,
गवाक्षी झांकू नये,
प्रेमागंधी गंधू नये,
असं कुठं लिहिलंय?
सावलीं मागे धावू नये,
भूतकाळाशी भांडू नये,
शब्द मागे फिरवू नये ,
असं कुठं लिहिलंय?
हसू ओठी बांधू नये,
आंसू कुणाचे पुसू नये,
सुख दु:ख वाटू नये,
असं कुठं लिहिलंय?
जिवंतपणी मरू नये,
हरवलेलं शोधू नये,
गुंत्यात गुंतुनी राहू नये ,
असेच म्हणेन.
आला सांगावा टाळू नये,
मागे वळून बघू नये.
शिणियर बेतुक्या