एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे
===================
-राजीव उपाध्ये
(निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.)
घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य...
गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.
माझ्या आईवडीलांनी काही अपरिहार्यतेतून (इस पार या उस पार) घर बांधायचा निर्णय घेतला. "कर्ज घेणे पाप" या तेव्हाच्या समजूतीमुळे कमीतकमी आणि आवश्यक तेव्हढेच कर्ज घेतल्यामुळे वडीलांचा स्वत:चा खिसा (बचत) पूर्ण साफ झाला. त्याचा परिणाम नंतर पुढे कित्येक वर्षे **भयानक आर्थिक झळ** सोसण्यात गेला.
आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर बसल्याने त्याचा मोठा परिणाम मानसिक/शारीरिक स्वास्थ्य, शैक्षणिक कामगिरी, सामाजिक आयुष्यावर होतो. आम्ही स्वत:च्या घरात राहात होतो तरी खर्चाच्या बाबतीत मी मागे असे. नूमवीतून कोथरूडला एकवेळ बसने आणि एक वेळ चालत जायचो. आईवडीलांना ज्योतिषाने घाबरवून सोडल्याने सायकल चालवायला परवानगी नव्हती.
माझे तेव्हाचे मित्र मला आजही तुच्छतेनेच वागवतात. बर्याच लोकांची अशी इच्छा अशी धारणा असते की तुम्ही काही कारणाने खड्ड्यात पडलात तर तुम्ही कायम खड्ड्यातच राहावे. पण माझी मुलगी मात्र याबाबतीत माझ्यापेक्षा खुप नशीबवान आहे, याचे समाधान खुप मोठे आहे. तिला माझ्यापेक्षा खुप चांगल्या मित्रमैत्रीणी मिळाल्या. मला वैकुंठावर न्यायची जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या मित्रांपेक्षा माझ्या कन्येचे मित्र/मैत्रीण नक्की पुढे येती्ल याचे समाधान मोठे आहे.
स्वत:च्या घरात तुम्ही राहत असला तरी सगळे प्रश्न सुटले असे होत नाही. तुम्ही फ्लॅटमध्ये (भाड्याच्या अथवा स्वत:च्या मालकीच्या) राहात असाल तर फ्लॅटला केव्हाही कुलूप लाऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता. पण स्वत:चा बंगला असेल तर सध्याच्या काळात मात्र असे करता येत नाही. मला स्वत:ला घराच्या काळजीने अनेक स्वप्नाना मुरड घालावी लागली. आजही कुठे पर्यटनासाठी गेलो तरी २-३ दिवस झाले की घराच्या आठवणीने अस्वस्थ होते. घराच्या भिंती कितीही निर्जीव असल्या तरी त्या उभ्या करताना केलेले कष्ट सजीव हातांचे होते, त्यासाठी वापरलेली पै-पै सजीव आणि अस्सल होती, त्यामुळे माझ्या घराबद्दलच्या भावना पण तितक्याच सजीव आणि अस्सल आहेत.
हळुहळु "स्वत:चा बंगला" अनेकांच्या वैषम्याचा विषय बनत जातो. तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. माझे वडिल १९८६ साली निवर्तले तेव्हा यच्चयावत लोकांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता "घर विकून टाका" म्हणून धोशा लावला होता. याला अपवाद माझ्या आय० आय० टी० मधल्या एका प्राध्यापकाचा - त्यांनी निक्षून सांगितले की आता सर्वजण घर "विकून टाका" असा सल्ला देतील पण काहीही झाले तरी "घर विकू नका". साहजिकच मी आणि आईने तो सल्ला शिरोधार्य मानला. आपल्या आतल्या आवाजाला बळ देणारी माणसेच फक्त आपली असतात (त्यांना आपल्या सुखाचे/प्रगतीचे दु;ख होत नाही.)
कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण आजही एकुलती एक मुलगी जर वारस असेल तर अजुनही अनेक जण भयानक अस्वस्थ होतात. मग लुबाडण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले जातात. एका पवित्र गुरुवर्यांच्या हलकट पत्नीने मला निर्लज्जपणे सांगितले, "जावयाला इस्टेट देण्यापेक्षा आम्हाला द्या". राहत्या जागेवर स्कीम करत नाही म्हणून तर अनेकजण बोटं मोडताना दिसतात. त्यांची अस्वस्थता तर कशानेही लपत नाही.
तात्पर्य स्वत:चे घर असले तरी त्याची डागडूजी एव्हढीच जबाबदारी राहत नाही, त्याला सांभाळणे पण तितकेच अवघड असते कारण ते इतरांना वाटणार्या असूयेवर अवलंबून असते...