स्वातंत्र्यदिन झाला, पण नागरीकांना स्वातंत्र्य आहे का?

आधी पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा हा रिपोर्ट पहा:

”पळून गेलेल्या बायकोसाठी आंदोलन… डीवायएसपीची पेकाटात लाथ! पोलिसांना असा अधिकार आहे का?“

जालनाचे पोलिस उपधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार्‍या नागरिकाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ज्या त्वेषाने लाथ मारली ते पाहून एक नागरीक म्हणून रक्त उसळले. त्या कुटुंबातील छोटी मुलगी पण आपल्या काकांना पोलीस धरून नेत असताना असाहाय्यपणे मागे जात असलेली दिसते. तिच्या समोरच कुलकर्णी यांनी हा प्रकार केला. कारण काहीही असो, पण कोणत्याही नागरीकाला जो सराईत गुन्हेगार म्हणून नोंद नाही, त्याला अशी वागणूक देणे अतिशय गैर वाटते. मुळात ही घटना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडली. काय सन्मान आहे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला? त्यांच्याच पैशावर पगार व स्वतः आणि बायको मरेपर्यंत निवृत्तीवेतन घेणारे पोलीस अधिकारी नागरिकांशी असे का वागत आहेत? या दिवशी म्हणे पंकजा मुंडे येणार होत्या व त्यांच्यासमोर हे आंदोलन दिसू नये असाही काही उद्देश असावा असे व्हिडिओत म्हटले आहे. पोलीस अधिकारी कुलकर्णी यांचे म्हणणेही या व्हिडिओत आहे, पण ते पटण्यासारखे आहे का ते तुंम्हीच ठरवा. पोलिसांच्या आचारसंहितेत ही वर्तणूक अजिबातच बसत नाही. सदर अधिकार्‍यावर योग्य कारवाई व्हावी असे राहूल कुलकर्णी म्हणत आहेत.

या प्रकरणाचा पाठपुरावा करणारा व्हिडिओ तर अजूनच अस्वस्थ करणारा आहे.
पळून गेलेल्या बायकोसाठी आंदोलन, डीवायएसपीची लाथ… चिमुरडी काय विचार करत असेल? चौधरी कुटुंब कुठे?
पोलिसांनी आता आंदोलन करणार्‍या संपूर्ण कुटुंबावर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत व त्यांना पोलिस कोठडीत डांबले आहे. त्यांनी लावलेली कलमे इतकी भयंकर आहेत, की अनेक वर्षे त्यांना मानसिक आर्थिक व न्यायालयीन प्रक्रियेचा त्रास सहन करत जीवन बरबाद करावे लागेल. सदर अधिकार्‍याला २०१८ ला राष्ट्रपती पदकही मिळालेले आहे. तसेच औरंगाबाद येथे कार्यरत असताना त्यांच्यावर दागिने चोरीचा गुन्हा न नोंदवल्याप्रकरणी पोलीस प्राधिकरणाने शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देशही पूर्वी दिले गेलेले आहेत. इतर अनेक मुद्देही या व्हिडिओत आहेत.

आता महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदाही मंजूर झाला आहे. त्यात पोलिसांना अनिर्बंध अधिकार देण्यात आलेले आहेत, असे म्हटले जाते. हा कायदा वापरून पोलीस नागरिकांना कशी वागणुक देतील याची कल्पनाही करवत नाही. दोन्ही रिपोर्टमध्ये समोर आलेले वास्तव पाहून असे वाटते की स्वातंत्र्यदिन झाला, पण सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्‍या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का?