# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
__________________________________________
"प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?"
"भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !"
"ख्या ख्या ख्या "
"ख्या ख्या ख्या "
गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा !
तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच ! ( बाकी संवाद हिंदी इंग्रजी मध्ये झाला , तो मराठीत अनुवादित करुन लिहित बसण्याऐवजी तदनुषंगाने झालेले चिंतन लिहुन काढत आहे.)
नेहमी प्रमाणेच स्वान्तःसुखाय !
__________________________________________________________
ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम
एकदा का तुम्ही शांतपणे चिंतन करायला लागलात की वैदिक औपनिषदिक तत्वज्ञान , अध्यात्म , समाजव्यवस्था , धर्मशास्त्र , ह्यातील धागे आपोआप जुळत जातात अन एकामागुन एकेक गोष्टी उलगडत जातात . हा सगळा प्रवास म्हणजे एखादे रहस्यमय पुस्तक वाचण्यासरखा असतो कि ज्यात प्रत्येक पानांवर "ओह्ह , असा अर्थ , असा विचार होता होय ह्याच्यामागे ! " असे voila क्षण मिळत जातात !
सनातन धर्मानुसार प्रत्येक द्विज हा जन्मतःच तीन ऋणां मध्ये बांधलेला असतो. द्विज म्हणजे द्वि + ज अर्थात ज्याचा दोनदा जन्म झाला आहे तो . मौजिबंधन अर्थात मुंज हा सोळा संस्कारातील एक मुख्य संस्कार . त्याचे महत्व इतके आहे की त्याला दुसरा जन्म मानलेले आहे. द्विज अर्थात ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ज्यांचा ज्यांचा मौजिबंधन संस्कार झालेला आहे तो प्रत्येक जण !
आता ही तीन ऋण कोणती आणि ती कशी फेडायची ?
१. पितृ ऋण
२. ऋषी ऋण
३. देव ऋण
१. पितृ ऋण अर्थात आपल्या पिता आणि पितरांप्रती असलेले ऋण . त्यांच्या मुळे आपल्याला ह्या कुळात ह्या गोत्र प्रवरात जन्म मिळाला म्हणुन आपण त्यांचे ऋणी आहोत. मग त्यांचे हे ऋण फेडायचे कसे ? तर ह्या प्रश्नाचे उत्तर सोप्पे आहे, ते गोत्र प्रवर, बोली भाषेत आपले आडनाव पुढे चालु ठेऊन . पुत्रप्राप्ती करुन . पुत्र ह्या शब्दाची व्युतप्त्ती पु: नाम त्रायते इति पुत्रः अर्थात ज्यांना पुत्र होत नाही ते निपुत्रिक लोकं पु: नामक नरकात पडतात अशी धारणा आहे , अशा नरकात पडण्यापासुन जो वाचवतो , तारतो तो म्हणजे पुत्र . पण नुसतेच पुत्र प्राप्ती झाली म्हणजे कर्ज फिटले असे नाही. त्या पुत्राचे देखील मौजिबंधन व्हायला हवे , त्यालाही ही ३ ऋणे कळायला हवीत , आणि त्याला जेव्हा पुत्र प्राप्ती होईल अन त्याच्या पुत्राची अर्थात आपल्या पौत्राची मुंज , मौजिबंधन आपण पाहु तेव्हा आपण आपल्या वडीलांच्या , पितरांच्या पितृऋणातुन मुक्त होऊ.
२. ऋषी ऋण अर्थात ऋषी आणि गुरुंप्रती असलेले ऋण. हे कसे फेडायचे तर आपण स्वतः गुरुंकडुन जे अध्ययन करु , ते ज्ञान , व्यवस्थितपणे पुढील पिढीला सोपावणे आणि त्यांच्याकडुन त्या ज्ञानाचे सात्यत्य राखले जाईल ह्याची शाश्वती करुन ऋषी ऋण फेडले जाईल !
३. देव ऋण अर्थात देवां प्रति असलेले ऋण . सनातन धर्मातील देव ही संकल्पना ही वाळवंटी विचारधारांमधील देव ह्या संकल्पनांपेक्षा पुर्ण भिन्न आहे हेच बहुतांश हिंदुंना , द्विजांना ठाऊक नाही. ज्यांना ज्यांना आपण देव म्हणतो ते ते शिव , शक्ती , गणेश , विष्णु , सुर्य , इंद्र , अग्नि , यम , निऋती ,वरुण , वायु , चंद्र , ईशान हे सर्व च अव्यक्त निर्गुण परब्रह्माची आपण आपल्या आकलना करिता केलेली अभिव्यक्ती आहे. मुळ उद्देश हा अव्यक्त परब्रह्मात विलीन होऊन जाणे , तादात्म्य पावणे हे आहे . ते झाले की देवऋण फिटले !
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! विवाहसंस्कारात भटजी नक्की काय मंत्र हणतोय हेच कित्येकांना माहीती नसते . नवरा मुलगा मुलगी चार बोटे हवेत तरंगत असतात , त्यांचे आई वडील, इतर नातेवाईक ह्यांचे संगीत मानापमान चालु असतात . इतरांचा फॅशन शो चालु असतो आणि काही लोकांची मंगलाष्टके म्हणताना भटजी च्या तोंडात अक्षता कशा टाकता येतील ह्यावर गहन चिंतन चालु असते . त्यामुळे मुळे मुळ संस्कारातील अर्थच लोप पावत चाललाय . रादर लोप पावलाय .
सनातन संस्कृतीत विवाह हा इतका अन ब्रेकेबल बॉन्ड आहे कि द्विजांसाठी डायव्होर्स ही संकल्पनाच नव्हती सनातन धर्मात. मुळात मराठी शब्द जो आहे तो आहे - घटस्फोट ! घट अर्थात मातीचा घडा स्फोट अर्थात फोडणे . माणुस मयत झाल्यावर त्याच्या शवाला चितेवर चढवुन अग्नि द्यायच्या आधी करतात तसा विधी . घट स्फोट . इतका भयंकर शब्द वापरला आहे ! असो ह्या विषयावर नंतर लिहु सविस्तर .
"ओह. ठीक आहे. पण ऋषी ऋण , देव ऋण समजु शकतो ,, पितृ ऋण फेडलेच पाहिजे असं का ? मला नाय लग्न करायची इच्छा . काय फरक पडतो माझा वंश चालला काय कि न चालला काय ! मोक्ष प्राप्त झाल्यावर हे सगळं निरर्थकच नव्हे का ? " ( हा प्रश्न मित्राने खरेच विचारला. एकुणच अशी चांगली माणसे लग्न करण्यापासुन परावृत्त होत आहेत हे फार निराशाजनक आहे :( )
"भाई , सिरियसली , तू नक्की काय वाचत आहेस ? अष्टावक्रगीता ? योगवसिष्ठ ? " मी सखेदाश्चर्याने विचारले .
असो . फरक काय पडतो ते सांग .
तुम्हा सारखे असा विचार करणारे लोकं जर पुत्रप्राप्ति न करता मेले तर हा विचार , ही संस्कृतीच नष्ट होऊन जाईल. म्हणुन आपल्या पुर्वजांनी करुन ठेवलेली रीतसर व्यवस्था करुन ठेवली आहे ती म्हणजे आश्रमव्यवस्था - तुम्ही आधी ब्रह्मचर्य आश्रम करा, ज्ञान प्राप्ति करा, नंतर गृहस्थ आश्रम करा , रितसर उपभोग ह्या सर्व प्रापंचिक सुखांचा . मग कन्यापुत्र झाले की हळु हळु मन काढुन घेत वानप्रस्थ आश्रमाकडे प्रयाण करा . आणि एकदा नातवाची मुंज पाहिली की विधीवत संन्यास घेऊन ह्यातुन बाहेर पडा . तुम्हाला संसार नसेल करायचा तर तुम्ही थेट ब्रह्मचर्यातुन थेट संन्यास घेऊ शकता . पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच , रादर ती जी व्हॉईड ची अवस्था आहे त्यालाच पु: नाम नरक म्हणले आहे. निपुत्रिक अज्ञानाच्या अवस्थेत अविवाहित मेला तर त्याला मुंज्या म्हणातात , ज्ञान असलेल्या अवस्थेत मेला तर ब्रह्मपिशाच्च ! लोकांना ही भुतं वाटतात पण भुत बित काही नसतं ही बस त्या व्हॉईड अवस्थेला दिलेली दुसरी नामाभिधाने आहेत .
"आणि समजा एखाद्याला लग्न परुन पुत्र झालाच नाही तर ? "
का नाही , पुत्राचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ - ८ - प्रकार सांगितले आहेत सनातन धर्माने ह्यातील एक तरी नक्कीच होऊ शकतो . व्ह्यायला हवा ! पण हाही विषय नंतर बोलु कारण त्या आठ चे वर्णन करत बसलो तर तासभर लागेल. कन्या ह्या शब्दाचा अर्थच अविवाहित मुलगी असा आहे , एकदा का तिचे कन्यादान केले कि तिच्या पतीसोबत त्यांच्या परस्परांच्या मोक्षाप्रत जाणार आहेत. तुमचा काय संबंध ? तुम्ही चित्रांगदाने अर्जुनाकडुन चित्रांगदे पासुन उत्पन्न झालेला बभ्रुवाहन स्वतःचा पुत्र मागुन घेतला तसे तुम्ही तिचा पुत्र मागुन घेणार असला तर विषय वेगळा . अन्यथा कन्येचा काहीच संबंध नाही . (बाप मेल्यावर त्याच्या विवाहित मुलीला सुतक तरी लागतं का हाच मुळात प्रश्ण आहे, शोधुन पहावे लागेल ! )
" बरं . पण मग सगळेच असे देव ऋण ऋषीऋण फेडण्यासाठी अध्यात्माचा मार्गाला लागले तर समाज व्यवस्थाच कोलमडुन पडेल ना ! समाजाचं रहाटागाडगं चालणार कसं ? "
एक्झॅक्टली ! आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
आणि कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः अर्थात कर्मानेही नैष्कर्म्य सिध्दी प्राप्त होते जशी की जनकादिकांनी प्राप्त केली होती असे स्पष्ट आश्वासनही दिलेले आहे !
व्यवस्था केली म्हणजे कोणी केली ? मनू ने ? मनू तर नुसतं सांगतोय , तो फक्त नॅरेटर आहे . निर्माता नव्हे .
"चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। ४.१३ ।।"
आतां याचिपरी जाण । चाऱ्ही हे वर्ण ।
सृजिलें म्यां गुण- । कर्मविभागें ॥७७॥
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥७९॥
आहेत सर्वजण चारी वर्ण , चारी आश्रमातील लोकं , मुळात एकच ! फक्त स्वभावधर्माच्या आणि गुणांच्या मुळे ही केवळ वरवर केलेली विभागणी आहे बस.
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥
जो आपापली वर्णाश्रम धर्मानुसार आलेली कर्तव्य कर्मे , विहितकर्मे रीतसर करेल त्याला ज्ञान प्राप्ती अणि तदनुषंगाने मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. मग तो कोणीही का असेना . एकनाथ असो कि नामदेव असो कि गोरा कुंभार असो कि सावतामाळी असो, चोखामेळा असो कि तुकाराम असो !
अरे पण हे ज्ञान जर ब्राह्मणांच्यापुरते सीमीत असेल तर अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे , त्यांची ऋणे फिटणार तरी कशी ? त्यांना वर्णाश्र्रम व्यवस्थेचा काय उपयोग अन् त्यांना साधन तरी काय ?
आणि ह्याचेही उत्तर आधीच देऊन ठेवले आहे तुकोबांनी !
नामस्मरण !
ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि रीती सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥
इतकं सोप्पं आहे हे !! ?? मग ह्या वर्णाश्रम व्यवस्थेची गरजच काय ?
हा हा हा . ह्याला ही उत्तर देऊन ठेवलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी .
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥
अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥
स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥
म्हणोनियां संती अवश्य आचरावे । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥
कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥
प्रत्यवाय आहे अशास्त्री चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥
अगदी जीवनमुक्त पावन अवस्था प्राप्त झाली तरीही कुळीचा कुळधर्म आचार पाळावाच , अनाचार करु नयेच !
असो. ज्याला कळलं तो नामस्मरणात मार्ग शोधेल ! आणि जमेल तितके वर्णाश्रमधर्माचे आचरण करीत आपल्या ऋणत्रयातुन मुक्त होईल !
चरैवति चरैवति ||
||राम कृष्ण हरि||
||श्रीराम जय राम जय जय राम ||
______________________________________________
संदर्भ :
१. https://www.santsahitya.in/namdev/shridyaneshwaranchi-samadhi/
२. https://satsangdhara.net/dn/A04.htm
राम