नमस्कार मिपाकर्स!
खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली.
आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं.
म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.
माझी कल्पना अशी:
- आंतरजालावरील देशविदेशातील माहिती अन् बातम्यांतून, वर उल्लेखल्याप्रमाणे निवडक आणि उत्तम अशा एक - दोन बातम्या निवडायच्या.
- त्याची माहिती थोडक्यात, एक - दोन ओळींत मराठीत मांडायची (हे महत्त्वाचं!)
- सोबत त्या-त्या बातमीची आंतरजालीय लिंक संदर्भासाठी द्यायची.
दर महिन्यासाठी ताज्या घडामोडींचं सदर असतं, तसंच हेही चांगल्या बातम्यांचं सदर महिन्याकाठी सुरू करायचं.
अटी दोनचः
- राजकारण हा विषय वर्ज्य ठेवायचा. कारण त्यासाठी अनेक लेख अन् त्यावरील वाद/प्रतिवाद मिपावर चालूच असतात.
- बातमी ही चांगली, सकारात्मक असावी. सर्जनशील, प्रेरणादायक असली तर फारच उत्तम.
अर्थात् हा माझा विचार. आपलं सगळ्यांचं काय मत?
राघव