# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु.
आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर.
१. काम
काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो. संस्कृतात एक सुभाषित आहे -
स्त्रीणामष्टगुणः कामः ||
पण हे ऐकुन सामान्य माणुस बावचळुन जातो. स्त्रीयांमध्ये पुरुषांच्या आठपट काम वासना असते असे भाषांतर केल्याने सगळा घोळ होतो . स्त्रीया बहुतांश करुन संभोगाविषयी अनासक्त असतात. आठपट सोडा , पुरुषांच्या इतकी तरी तीव्र कामवासना स्त्रीयांअध्ये असते का हा संशोधनाचा विषय ठरु शकेल ! संभोगातुरता , कामातुरता हा विशेष करुन पुरुषांचा गुणधर्म आहे. कारण स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट सहज शक्य असल्यास आपले मन त्याची वासना धरत नाही , ती गोष्ट प्राप्त करुन घेते. जी गोष्ट मिळवण्यास कठीण आहे , दुर्लभ आहे , त्या विषयीच आपले मन आसक्त होऊन राहते . स्त्रीयांना संभोग मिळवणे हे काही जास्त कष्टप्रद नाही, पुरुषांना मात्र संभोग सुख मिळवण्याकरिता १७६० उपद्वव्याप करावे लागतात, प्रणयाराधन करावे लागते , स्त्रीला भुरळ पाडावी लागते तेव्हा जाऊन कोठे त्याला संभोगसुख प्राप्त होते.
तस्मात काम ह्या शब्दाचा सेक्स , संभोगेच्छा असे भाषांतर चुकीचे ठरते.
काम ह्या शब्दाचे भाषांतर कामना, desires, wants हे जास्त योग्य ठरते. आणि ह्या परिप्रोक्ष्यातुन पाहिल्यास स्त्रीणामष्टगुणः कामः || ह्या सुत्राचा उलगडा होतो.
कसे पहा की पुरुषाची संपुर्ण सांसारिक धडपड , नोकरी मिळवणे , व्यापार करणे, घर घेणे , गाडी घेणे , अजुन मोठ्ठी गाडी घेणे हे सर्व स्त्रीयांना आकर्षित करण्याकरिता चालु असते. अर्थात पुरुषांना खर्या अर्थाने एकाच गोष्टीचे "काम" असते, मात्र स्त्रीयांच्या बाबतीत असे नसते. स्त्रीयांना सोने , दागिने , साड्या , अत्तरे , परफ्युम्स . मेकअप , हे सर्व मिरवायला मोठ्ठे मोठे सण उत्सव , लग्न, बारशी, हळदीकुंकुं, वगैरे , नंतर प्रापंचिक स्थैय , त्यासाठी बॅन्क बॅलन्स , अशा अनेक गोष्टींच्या कामना असतात. ह्या सगळ्या लिस्ट मध्ये , प्राधान्यक्रमात स्त्रीयांसाठी संभोगसुख हे अत्यंत खालच्या पातळीवर असते.
अनेक दाखले देऊन हे विधान सिध्द करता येईल . इथे फक्त २ च दाखले पाहु. जे लोकं लग्नाच्या मार्केट मध्ये आहेत , त्यातील कोणालाही विचारा - मुलींच्या डीमान्ड्स काय असतात , तुम्हाला लगेच उत्तर मिळुन जाईल. मुलींना पुण्यात स्वतःचे घर असलेला नवरा हवाय , नुसतं घर नघे , घराचे कर्ज फिटलेला . घरी आई वडीलांची जबाबदारी नसलेला , ज्याच्या सोबत त्याचेच पैसे मनसोक्त निश्चिंतपणे उडवता येतील असा !
आणि पुरुषांच्या बाबतीत कोणत्याही सुज्ञ पुरुषाला प्रश्न विचारा की - कियारा आडवाणी , अनन्या पांडे , नोरा फतेही किंवा तत्सम कोणीही सुंदर स्त्री साधे पांढरे कपडे , ना मेकप , ना दागिने , ना परफ्युम , अशी तुमच्या समोर आली आणि त्याच वेळेस मायाव दी , ममता दी , सुषमा दी तस्तम कोणी स्त्री भरजरी शालु , किलोभर सोन्याचे दागिने , पावशेर मेकप करुन तुमच्यासमोर आली तर तुम्ही कोणाला निवडाल ? मी अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही.
असो. तर तात्पर्य इतकेच की काम ह्या शब्दाचा अर्थ कामना असा आहे. आणि त्याला रिपु का म्हणले आहे ? तर जो व्यक्ती आत्मतृप्त आहे त्याला कोणत्याच वस्तुची कामना होणार नाही, कारण आहे हे पुरेसे असेल ना ! काही तरी कमी आहे , काही तरी हवंय हा विचारच अपुर्णतेचे प्रतिबिंब आहे , जो मनामध्ये व्याकुळता , आस , ओढ निर्माण करत आहे. म्हणुन काम हा पहिला रिपु !
२. क्रोध
आता एकदा कामना , काम उद्भवला की दोन शक्यता निर्माण होतात - पहिली शक्यता म्हणजे काम पुरा होणे , आणि दुसरी शक्यता म्हणजे काम अपुर्ण राहणे !
काम अपुर्ण राहणे ही शक्यता क्रोधाला जन्म देते. मला एखादी गोष्ट हवी आहे , माझ्या मनानुसार हवी आहे पण ती तशी झाली नाही की जो निर्माण होतो मनाचा विकार तो क्रोध आहे. क्रोध हा स्त्री आणि पुरुषांमध्ये भिन्न भिन्न रुपे घेऊन प्रकट होतो . क्रोध पुरुषांमध्ये रागराग , चिडचिड , शिव्या देणे , मारामारी हिंसादि करणे ह्या रुपाने प्रकट होतो. मात्र स्त्रीयांमध्ये शाररिक क्षमतेचा अभाव असल्याने क्रोध हा अन्य रुपे घेऊन प्रकटतो - जसे की अपमान करणे , कट कारस्थाने करणे , बदनामी करणे , अगदी तेही शक्य नसते तेव्हा क्रोध रडणे आणि निराश होणे, स्वतःला त्रास करुन घेणे , इत्यादी रुपांमध्ये बदल होऊन स्त्रीयांमध्ये अभिव्यक्त होतो.
३. लोभ
पण आता समजा पहिली शक्यता पुर्ण झाली , अर्थात कामना पुर्ती झाली की "अहाहा, कसलं भारी आहे ही जाणीव" असा विचार मनात येतो "मला हे अजुन हवंय" असे जे वाटते तो झाला लोभ ! हाही स्त्रीयां पुरुषांमध्ये वेगवेगळी रुपे घेऊन अभिव्यक्त होतो. स्त्रीया वस्तुंचे संगहण करण्याच्या मागे लागतात, वर्षभरात एखाद दुसर्या सणाला घालतात अश्या कैक साड्या ड्रेसेसने बायकांची कपाटे ओथंबुन भरलेली असतात. कितीही सुवर्णालंकार केले तरी तुम्ही दुसर्या दिवशी स्त्रीला पु.ना. गाडगीळ मध्ये घेऊन जा आणि विचारा - "अजुन काही घ्यायचे का कि मन तृप्त झाले आता काहीही दागिने नकोत ?" "अहाहा , मन तृप्त झालं आता काहीही नको" असे म्हणणारी स्त्री तुम्हाला भेटल्यास तुम्ही जगातील सर्वात सुखी संसारी पुरुष आहात असे समजायला हरकत नाही.
अर्थात हे जनरलायझेशन्स आहेत , स्त्री पुरुषांच्या वैयक्तिक आवडी निवडी नुसार लोभ वेगवेगळी रुपे घेउन प्रकट होतो.
पुरुषांच्या मध्ये राजसत्तेने कृत्रिम अशी १ ची मर्यादा घातली असल्याने पुरुष स्त्री संग्रहण करु शकत नाही , पण ह्याचा अर्थ पुरुषांना लोभच होत नाही असा नव्हे. पुरुषांच्या बाबतीत लोभ हा घरें घेत सुटणे , गाड्या घेणे, अंगवस्त्र बाळगणे , जमीन घेणे , बंदुक घेणे , राजकारण करणे, पॉवर गेम्स खेळणे, व्यसने करणे , ह्या अन इत्यादी अनेक भिन्न रुपात प्रकट होताना दिसतो.
४. मद
हा चौथा रिपु - मद अर्थात उन्मत्तपणा . आहे त्या कामाचे आणि लोभाचीही ओसंडुंन प्राप्ती झाल्यावर लोभाचे रुपांतरण मदात होते. मद म्हणजे काय ह्या संबंधी भगव्द्गीतीत काय सुंदर श्लोक आहेत !
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्।।16.13।।
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी।।16.14।।
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः।।16.15।।
म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया ।
आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥ ३५१ ॥
मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे ।
कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
ही मदाची अभिव्यक्ती आहे.
५. मोह
मोह ह्या शब्दाचे दोन अर्थ लागतात - एक सर्वसामान्य म्हणजे लोभ ह्या अर्थाच्या जवळ जाणारा , "मला हे हवंय" असं मोहित होणे आणि दुसरा अर्थ म्हणजे भ्रमिष्ट होऊन झपाटल्यासारखे काहीबाही करत राहणे . तुम्ही झालात लाख श्रीमंत , पण जेफ बेझॉस च्या पायपोसाला तरी उभे राहु शकाल का ? त्याच्याकडे यॉट आहे, नुसती यॉट नाही तर त्यावर "पाळलेली" माणसे आहेत , मध्यंतरी एकेठिकाणी यॉट जाऊ शकत नाही म्हणुन त्याने व्यवस्थित सरकारी यंत्रणे तर्फे नेदरलंन्ड मधील पुल उध्वस्त केला होता ! ही पैशाची ताकत आहे . आहे का तुम्हाला जमणारं ?
पण तरीही तुम्ही तुमच्या क्षमतेत जे आहे तसले उपद्व्याप करतच राहता, मग तुम्हीही असे झपाटल्यासारखे वस्तुंच्या मागे लागता तो म्हणजे मोह ! आणि एवढं टोकाचे उदाहरण कशाला ? माझ्या पाहण्यात असे कित्येक लोकं आहे ज्यांना त्यांच्या कामातील ताण तणावांमुळे हृदय विकाराचा झटका येऊन गेलाय , अँजिओप्लास्टी करायला लागली आहे , अनेकांना लाईफ स्टाईल विकार जडले आहेत तरीही आहे तो कामाचा उरका पाडतच राहिलेत ! "आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !!
स्त्रीयांमध्ये मोहाचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणजे नानासाहेब पेशवे ह्यांच्या पत्नी - गोपिकाबाई ! ऐश्वर्याच्या वैभवाच्या परमोच्च पदी विराजमान होऊन देखील बाई आयुष्यभर काहीबाही कुरबुरी काढुन पिसाटल्यासारखी वागत असल्याचे निदर्शनास येते . मोठ्ठा मुलगा विश्वास युध्दात गेल्यावर , पती त्या धक्याने गेल्यावर, धाकटा माधव सत्तेत स्थिरस्थावर झाल्यावर देखील त्याचा अभिमान बाळगायचा अन आनंदाने आयुष्य व्यतीत करायचे सोडुन ही बाई माझ्या भावाचा ( माधवरावांनी रास्तेमामाचा) अपमान केला म्हणुन मरेपर्यंत अबोला धरुन राहीली. नुसती कल्पना करा - स्वतःचा पोटचा पोरगा , तोही इतका प्रचंड कर्तृत्ववान तो मरणासन्न अवस्थेत श्रीचिंतामणीपुढे ध्यान धरुन पडुन राहिला आहे अन तरीही ही बाई पुर्वायुष्यातील रुसव्याफुगव्यांमुळे मौन धरुन आहे ! आणि माधवराव मेल्यानंतर देखील रमाबाईंना सती जाण्याविषयी आडवणे तर दुरच राहिले पण काही काही इतिहास साधनांच्या अनुसार चक्क आग्रह धरणारी ही बाई ! ह्या असल्या पिसाटपणाला , भंजाळलेपणालाच मोह , भ्रमिष्टासारखे वागणे म्हणणार नाही तर काय !
६. मत्सर
आणि सर्वात शेवटचा रिपु म्हणजे मत्सर - ही म्हणजे मोहाच्याही पुढील अवस्था ! तो मोह पुर्ण झाला नाही , तर समोरच्या व्यक्तीकडे जे आहे ते माझ्याकडे नाही हे पाहुन त्या अन्य व्यक्ती विषयी वाटाणारा इर्ष्येचा भाव म्हणजे मत्सर !
पुरुषांमध्ये हा त्यामानाने कमी दिसुन येतो कारण ह्या अवस्थेला जाईपर्यंत पुरुष काही तरी हिंसक कृती करुन रिकामा झालेला असतो. पण स्त्रीयां मध्ये मात्र अगदी तीव्र स्तराचा मत्सर प्रकर्षाने दिसुन येतो. ह्या संबंधी आवर्जुन स्मरणारा एक विनोदी प्रसंग म्हणजे - अगं बाई अरेच्च्या ह्या चित्रपटात नायकाला जेव्हा स्त्रीयांच्या मनातील ऐकु येऊ लागते तेव्हा त्याला काही बायका वटसावित्री निमित्त वडाची प्रदक्षिणा घालत असतात तेव्हा एका स्त्रीच्या मनात विचार चाललेला अस्सतो - "ह्या सुर्या बरोबर लग्न होण्या ऐवजी विलास बरोबर झालं असतं तर अमेरिकेत राहिले असते आज " =)))) पण विनोदाचा भाग बाजुला ठेवला , आणि सुक्ष्म दृष्टीने निरिक्षण केले तर ह्या प्रकारचा मत्सर तुम्हाला अगदी सहजपणे निदर्शनास येईल !
------------------------------------
हां तर असे हे झाले षड्रिपु ! पण सुरुवातीला आपण काय म्हणालो - कि जो मनात व्याकुळता निर्माण करतो तो रिपु. अर्थात ह्या सहांना बाजुला सारले की मनात व्याकुळताच निर्माण होणार नाही अन आपण आपल्या आत्मतृप्त भावात तल्लीन राहु शकु !
मला काहीही नकोय . बस्स आता. आहे इतकं पुरेसें आहे.
एखादी गोष्ट मिळाली - ठीक . नाही मिळाली ठीक. जशी रामाची इच्छा !
रागे भरावे कवणासी ? आपण ब्रह्म सर्वदेसी | ऐसी सम दृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा !
जेवढं प्रारब्धात आहे , तेवढं मिळालं आहे , मिळत आहे आणि मिळणारच आहे . मग कसला त्रागा करायचा ?
अरे पण हे कसं शक्य आहे सामान्य प्रापंचिक माणासाला ?
काम क्रोधाचे विकार उठतच राहणार आहेत . तुम्ही लाख व्यवस्थित गाडी चालवाल , पण कोणततरी कधी तरी येऊन तुम्हाला धडकणारच आहे , शिव्या धालणारच आहे, आर.टी.ओ ला चिरिमिरी द्यावीच लागणार आहे , क्रोधाचा विकार उठणारच आहे .
किंवा ऑफिसात किंवा अन्यत्र सोशल सेट अप मध्ये गेल्यावर चित्रांगदा सारखी कोणीतरी स्वर्गीय सुंदर दिसणारच आहे जिला पाहुन - आह, मला ही हवीय असे वाटणारच आहे . लोभ मद ही येणार आहेत काम क्रोधाच्या मागे ! एक घर असुन दुसरं घर घ्यावं वाटणार आहे . स्वतःची उत्तम गाडी असुनही फॉर्च्युनर , इन्डेव्हर , हिलक्स, टेस्ला वगैरे अजुन गाडी घ्यावीशी वाटणार आहे.
आणि आजवर ज्या अचिव्हमेंट केल्या त्याचे स्मरण करुन "मी म्हणजे लय ग्रेट ! " असा विचार कधी ना मनात येणार आहेच ! मोह मत्सराचे आवेग उठणारच आहेत . मग आता काय करता ?
ह्याला माऊलींनी काय सुंदर उत्तर दिले आहे -
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
तु मनात एक नियम कर , तुझ्या ह्या षड्रिपुमुक्त स्वरुपाशी निश्चळ हो , आणि मग ही कर्मेंद्रिये सांसारिक व्यापारात सुखाने गुंतुन राहुदेत , आपला त्याच्याशी संबंध नाही ही मनाशी ठाम धारणा असली म्हणजे झाले , सुटलो.
देह आहे तोवर देहाचे विकार राहणारच , भुक लागणार , तहान लागणार , मल मुत्र शौच विसर्जनादि करावेच लागणार तसेच , कामाचा आवेगही उद्भवणार , इंद्रिये अक्षरशः फरफटत ओढुन नेल्यासारखी मनाला त्या विषयांच्या मागे ओढणारच आहेत . पण ठीक आहे ना , तुला काय फरक पडतो . तू निश्चळ रहा , मग बाकी देहातर्फे काय व्हायचे ते होऊ दे.
देह वैराग्यासारखा अलिप्त राहिला तर ठीक .
देह सामान्य गृहस्थ मर्यादिक उपभोगात रत राहिला तरी ठीक.
आणि देह झपाटल्यासारखे देहोपभोग घेत राहिला तरीही ठीकच .
शुन्य , एक आणि अनेक ह्या तिन्हींना वृत्तीरुपाने पाहिल्यास तिन्हीही समान आहेत !
योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गवीहिनः ।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ॥
आता शेवटचा प्रश्न म्हणजे की हे ब्रह्मणि रमते चित्तं ही अवस्था कशी कायम ठवणार ? कारण ब्रह्म मुळातच अनुभवातीत , आकलनातीत , incomprehensible आहे , only "be" able आहे , त्याचे स्मरण कसे ठेवणार !
आणि ह्या इथे ज्ञानेश्वरमाऊली , नामदेव , एकनाथ , तुकोबा , समर्थ , गोंदवलेकर महाराज, नीमकरोली बाबा आदी सर्वच जण गालातल्या गालात हसुन उत्तर देतील - अरे उपाय आधीच सांगितला आहे - "नामस्मरण".
|| श्रीराम जयराम जयजय राम ||
|| राम कृष्ण हरि ||
|| अलख निरंजन ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||
|| जगदंब जगदंब ||
कुठलंही नाव घ्या , काही हरकत नाही , बस स्मरण राहणे हे महत्वाचे !
नीमकरोली बाबांच्या डायरीतील एक पान :

आता माळाच ओढल्या पाहिजेत अशातला भाग नाही, बस स्मरण राहिलं पाहिजे. तुम्हाला एकदा नाम घेऊन स्मरण टिकत असेल तर उत्तम , स्मरण नसेल टिकत तर करा माळा . शेवटी महत्वाचं काय तर स्मरण !
न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
एकदा का रामाच्या रुपाचे स्मरण राहिले कि तीच सहजावस्था होऊन जाते ! त्यानंतर मग तुम्ही कोण्हीही असा, काहीही करा , कामक्रोधाधिकांचे विकार उमटो अथवा शांत राहो, काही फरक पडत नाही .
कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला ।
मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥
अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥
भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला ।
पाईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥
मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥
द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥
असो. ज्याला समजायचं त्याला समजलं आहे !
देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥
इत्यलम्
______________________________________
राम