आव्वाज कुणाचा?

नमस्कार मंडळी
हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच.

तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता. सॅम पित्रोदांच्या कृपेने १९९२ मध्येच टेलीकॉम क्रांती झाली होती त्यामुळे निदान जागोजागी एस टी डी बूथ असायचे. त्यामुळे मुंबई चेन्नई किंवा मुंबई दिल्ली कॉल सर्रास झाले होते. पण त्याला पैसेही तसेच लागत . शिवाय त्यावेळेस बऱ्याच कंपन्या बी एस एन एल च्या लीज लाईन घेऊन वाईड एरिया नेटवर्कने आपापल्या ब्रॅंचेस जोडत चालल्या होत्या. (एक गमतीशीर आठवण म्हणजे त्यावेळेस मुंबई चेन्नई सारख्या ६४ के बी पी एस लीज लाईनला जवळपास १.५ लाख रुपये १ वर्षाचे भाडे होते.). तर आमची कंपनी हे वाईड एरिया नेटवर्क करून द्यायचीच पण त्यावर "व्हॉइस ओव्हर आय पी " चे प्रोग्रामिंग करून द्यायची जेणेकरून कंपनीला लॉन्ग डिस्टन्स कॉलिंग (जास्त करून बँक हेड ऑफिस आणि ब्रॅंचेस वगैरे) फुकटात करता येई. हे नेटवर्क बी एस एन एल च्या टेलिफोन नेटवर्क पासून वेगळे ठेवावे लागे कारण नाहीतर त्यांचा महसूल बुडेल. असे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हाही दाखल करायची सोय होती. आता हे कसे होई? तर बी एस एन एलची लाईन वापरून मुंबई चेन्नई थेट कॉल करायला समजा १०० रुपये लागत असतील, आणि माझे एक ऑफिस मुंबई आणि दुसरे कोईमतूरमध्ये आहे. जर कोईमतूर ऑफिसात मी एकाच राउटर वर लीज लाईन आणि बी एस एन एल ची लाईन एकत्र आणली तर "टोल बायपास " होऊन मला फक्त कोईमतूर ते चेन्नई बिल लागेल. हा गुन्हा आहे. तरीही काही लोक अशी अनधिकृत एक्सचेंज चालवायचे ज्याला "खाचे का फोन" म्हणत. आणि ती पकडलीही जात.

तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. तोवर रिलायन्स देशभर आपले फायबरचे जाळे विणत होती. ते विणून होत गेले आणि सध्या जशी धूम ए आय ने माजली आहे तसेच काहीसे झाले. एकतर त्यांना परवाने मिळण्यात आणि तांत्रिक गोष्टीत वेळ लागत असल्याने त्यांनी पर्यायी डब्लू एल एल (वायरलेस इन लोकल लूप ) हे तंत्र वापरून आपले सी डी एम ए आधारित मोबाईल बाजारात आणले. ते ज्यांनी वापरले आहेत त्यांना ते कसे गरम व्हायचे , कॉल कट व्हायचे वगैरे आठवतच असेल. पण जे काही असेल ते, त्यांनी मोबाईल सामान्य माणसाच्या हातात पोचवला हे मानायलाच हवे. त्यामुळे व्होडाफोन (त्यावेळचे हचिसन मॅक्स किंवा हच किंवा ऑरेंज किंवा आताचे व्होडाफोन किवां व्ही ), बी पी एल वगैरे कंपनीची तंतरली. तसेच एस टी डी /आय एस डी ची ही मृत्युघंटा वाजली. मोबाईल कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाले आणि सामान्य माणसाला त्याचा फायदा होत गेला. घरटी एक लॅण्डलाइन पासून ते माणशी एक मोबाइलपर्यंत प्रवास होत गेला. पुढे त्याच्यात आयडिया, एअरटेल, एअरसेल, टेलिनॉर, युनिनॉर ,डोकोमो वगैरे अनेक स्पर्धक आले आणि टिकले किंवा गेले.

मात्र अजूनही कॉर्पोरेट कंपन्यात लॅण्डलाइनचा वापर बराच होता. म्हणजे टेबलावर असताना फोन आणि बाहेर असताना मोबाईल असा दुहेरी वापर. कारण किंमत अजूनही आवाक्यात अली नव्हती. समोरच्याला कॉल करून कट करणे, म्हणजे पैसे वाचतील असे प्रकार (विशेषतः: मुलीने मुलाला कॉल करून कट करणे :) चालायचे. हळूहळू किमती कमी होता गेल्या तसे १५-१६ रुपये इनकमिंग /आऊटगोइंग पासून १ रुपयांपर्यंत किमती उतरल्या.

हे साधारण वर्ष २०१० होते. अजूनही लोक बटणाचा नोकिया फोन वापरात होते आणि बाजारात स्मार्ट फोन या प्रकरणाचा प्रवेश झाला. बटनवाले फोन वापरण्यापेक्षा हे भारी होते, किमतीही आवाक्यात होत्या त्यामुळे मागणी वाढत गेली. पण या फोनचे करायचे काय ? हे कोणालाच माहित नव्हते. बहुतेक लोक अजूनही मेल बघायला कॉम्प्युटर आणि कॉल करायला स्मार्ट फोन वापरत होते. फारतर गाणी ऐकायला.

मोबाईल वापरले तरीही परदेशी कॉल करणे कठीण आणि महागच होते त्यामुळे व्होनेज,स्पिंट वगैरे सारख्या इंटरनेट आधारित टेलिफोन सेवा जोरात होत्या . यामध्ये एकदाच महिन्याचे पैसे भरा आणि २४ तास बोला अशी सोय होती. त्यामुळे अमेरिकेत राहून मुली आईला फोन लावून आणि तो कानाला लावून सूचनेबरहुकूम भाजी फोडणीला टाकू की नको, मीठ किती, कांदा हवा की नको वगैरे बिनधास्त बोलू लागल्या. तोवर गुगल याहूनही व्हॉइस सेवा सुरु करून धमाल उडवली पण त्यावरून फक्त देशांतर्गत कॉल करता येत.

मात्र काहीच वर्षात २०११/१२ च्या सुमारास कधीतरी व्हॉट्स अप सुरु झाले आणि तोवर केवळ एस एम एस माहित असलेल्या लोकांना एक नवीनच खजिना सापडला. फोनवर लोक चित्र संदेश पाठवू लागले. तोवर २ जी ३ जी वगैरे क्रांती येऊ घातली होती त्यामुळे दिवसेंदिवस स्मार्ट फोन जास्त जास्त स्मार्ट होऊ लागले आणि त्यावरची ऍप हा एक नावाचं प्रकार उदयास आला. लोक तासंतास ती वापरून आपले बँकिंग, बिले भरणे वगैरे करू लागलेच पण पुढे व्हॉट्स एप वरून जगात कुठेही कॉल करणे सोपे होऊन गेले. नंतर तशीही अनेक एप आली आणि त्यामुळे व्होनेज ची मृत्यूघन्टा वाजली.

मात्र अजूनही कॉर्पोरेट ऑफिसात प्रत्येकी टेबलवर एक फोन असेच. लोकल कॉल किंवा दूरच्या ऑफिसातील कॉल किंवा काही मीटिंग/ ब्रिजेस जॉईन करायला हेच फोन वापरले जात. शिवाय स्मार्ट फोन होतेच. ऑफिसात बॉस लोकांकडे लॅपटॉप आणि बाकीच्यांना डेस्कटॉप अशी पद्धत रूढ होती. आणि मग ......................................

२०२० मध्ये कोविड आला आणि एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. कामाचे मॉडेल पूर्णपणे बदलले आणि आयटीवाले सगळे लोक घरून काम करायला लागले. सगळेच रिमोट म्हणजे सतत बोलणे आले त्याशिवाय काम कसे होणार? आणि सतत मोबाईल वापरून त्याचे बिल कोण भरणार? मग तोवर गपचूप असलेल्या पण तंत्राधारित सेवा देणाऱ्या झूम, वेबेक्स ,टीम्स वगैरे कंपन्या पुढे आल्या. आता तुम्हाला फक्त बोलणेच नव्हे तर व्हिडीओ कॉलही लॅपटॉपवरूनच करता येऊ लागला. देशादेशातला फरकच मिटला. एकाच मीटिंग मध्ये (काळ वेळ जमत असेल तर) एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस अशी कामे सर्रास सुरु झाली. लॅण्डलाइन तर इतिहास जमा झालेच पण आता मोबाईलही इतिहास जमा होतील की कायसे वाटू लागले आहे.

पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? किंवा डी एन ए मध्ये बदल करून ऐकायची सोय वगैरे? माहित नाही. पण माणूस आहे तोवर बोलायची हौस राहणार आणि बोलायची सोयही लागणार. तर मग सांगा आव्वाज कुणाचा?(समाप्त)