आम्ही यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकासाठी (२०२५) साहित्य मागवत आहोत.
दिवाळी अंकासाठी लेखन पाठवा असे आवाहन लिहिण्यासाठीच फार वेळ घेतला आणि कालापव्यय केला, तर ते प्रकाशित होणार कधी, तुम्ही त्यानंतर लिहिणार कधी आणि ते आमच्यापर्यंत येऊन आम्ही त्यावर किरकोळ संपादकीय संस्कार आणि सजावट करणार कधी? अशा विचाराने मिपाकर सदस्यांसाठी आणि मिपा वाचकांसाठी हे छोटेसे निवेदन प्रकाशित करत आहोत.
लेखन युनिकोड टेक्स्ट याच स्वरूपाचे असावे. पीडीएफ रूपात किंवा स्कॅन केलेले हस्तलिखित कृपया पाठवू नये.
दर वर्षी तेच तेच नियम आणि अपेक्षा लिहून नेहमीच्या मिपा सदस्यांना त्या पाठ झाल्याच असतील, तरीही खाली चोप्य पस्ते (copy-paste) करत आहोत -
- दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
- कोणत्याही विषयावरचे तुमचे साहित्य व्य,नि.द्वारे साहित्य संपादक आयडीवर पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
- किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
- आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल, तर प्रेषक म्हणून आपला 'मिपा आयडी' लिहायला कृपया विसरू नका.
या अंकासाठी 'AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा एक उपविभाग करण्याचे घाटत आहे. या विषयावर पुरेसे साहित्य प्राप्त झाल्यास तो विभाग शोभून दिसेल.
यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपली मते किंवा त्याविषयी तांत्रिक आणि अन्य विविध प्रकारची माहिती देणारे लेख. एआयचा नोकऱ्यांवर किंवा जनजीवनावर होणारा परिणाम आणि दुष्परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय केंद्रस्थानी असलेल्या कथा-कविता असे सर्व प्रकारचे लेखन अपेक्षित आहे. AI वापरून लिहिलेल्या कथा, कविता, लेख, चित्रे इ. अपेक्षित नाहीत.
दिवाळी अंकाकरिता AI या विषयावर उपविभाग करण्याचे प्रयोजन असले, तरी त्याखेरीज कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी इतर विषयांवरील लेखनाचेही प्रतिवर्षीप्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!
लेख पाठवण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२५.
आम्हालाही थोडा वेळ द्या हो पुढच्या कार्यवाहीसाठी.. अगदी शेवटच्या क्षणी लेखन न पाठवता जितके अगोदर पाठवाल, तितके उत्तम.
वाट बघत आहोत.
मिपा व्यवस्थापन