नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक गोष्ट सांगणार आहे.
तर झालं असं की, अलीकडेच माझा वाढदिवस झाला. आता या वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो. अर्थात इतकी "आपली माणसं " असणं आणि त्यांनी आपली आठवण ठेवणं हे बघता आपली याबाबतीतली श्रीमंती मनाला सुखावून जाते हे मात्र खरं! असो. "सेलीब्रेशन " नसलं तरी अहोंनी काही भेटवस्तू आणली नाही असं कधी झालं नाही. (या बाबतीत देखील मी नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही! ) अलीकडे माझ्या चित्रकलेच्या छंदाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय, हे ओळखूनच बहुदा ,अहोंनी वाढदिवसाची भेट म्हणून १२० रंगीत पेन्सिलींचा संच भेट दिला. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठ शस्त्र कोणतं? तर प्रसंगी पटकन हाताशी असेल ते. तद्वत या क्षणी तरी माझ्या छंदाला साजेशी ती भेट बघून इतर कशाही पेक्षा हीच सर्वोत्तम भेट असं म्हणत मी हरखुन गेले.
दुसऱ्या दिवशी हौसेने मांडामांड करून मी चित्र काढायला बसले . रंगवायची घाई अधिक म्हणून पेन्सिलने चित्र रेखाटण्यात वेळ न दवडता काॅम्प्युटरवरुन छापून घेतलं. आता रंगवायचं!लहान मुलाप्रमाणे नवीन पेन्सिली वापरण्यासाठी हात शिवशिवत होते . पण हाय! एक गडबड होती. सगळ्या पेन्सिली दंडगोलाकार खोक्यात अगदी घट्ट बसवलेल्या होत्या. त्यामुळे त्या बाहेर काढणं जरी सोपं होतं तरी पुन्हा खोक्यात बसवणं म्हणजे आव्हानच होतं. मग काय? रंगवायला काढलेल्या पेन्सिलींनी चहाचे कप ठेवायच्या ट्रे मध्ये मुक्काम ठोकला. बरं ,चित्र पूर्ण होईपर्यंत पॅड, त्याच्या डोक्यावर वही, वहीवर पेन्सिल, पट्टी ,रबर, रंगीत पेन्सिलींचा ट्रे, असं सारं
"टीव्ही " च्या युनिट वर . आता आली का पंचाईत! कारण घरच्या मंडळींना जागा हवी असली की माझ्या साहित्याची उचलबांगडी! इकडे माझा जीव थोडा! कारण पेन्सिली गडगडून खाली पडताहेत , टोकं तुटताहेत. छे! छे! काहीतरी व्यवस्था करायलाच हवी. म्हणतात ना जन्माला घातलं की पालनपोषणाचा भार सोसायलाच हवा!
कशा आणि कुठे ठेवाव्यात बरं पेन्सिली, म्हणजे नीट राहतील आणि हाताळायलाही सोप्या पडतील? रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते.पण दोन तीन दिवस डोक्यात हाच विषय घोळत होता. आंतरजालावरच्या युक्त्या, प्रयोगांचे व्हिडिओ धुंडाळून झाले. या ना त्या कारणाने व्यवहार्य ठरत नव्हते म्हणून बाद झाले. विविध उत्पादनांची छाननी करून झाली. एखादं उत्पादन योग्य वाटलं तरी कधी अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे ती बाद झाली तर कधी विक्रेत्यांनी ती घरपोच देणं नाकारलं. विषय काही डोक्यातनं जात नव्हता. अचानक कागदपत्रं ठेवण्याचा एक चपटा प्लॅस्टिकचा डबा घरातच सापडला. चांगला मोठ्या आकाराचा होता. मी हुश्श केलं. कागदपत्रं काय, ठेऊ एखाद्या फाइलमधे घालून ! पण पेन्सिली नीट नकोत का रहायला? मी पटकन तो डबा रिकामा केला . आता प्रश्न सुटला म्हणत पेन्सिली ठेऊ लागले , पण हे काय! जेमतेम ४०एक पेन्सिली राहिल्या. म्हटलं ठीक आहे, आणखी दोन मागवून घेऊ . पण रोजच्या दुकानदाराने हा माल येत नसल्याचं सांगितलं. मग इतर ठिकाणी चौकशी सुरू झाली. अखेर एका ठिकाणी सापडले. किंमत जरा चढी होती. पण आता माझ्या पेन्सिलींचा प्रश्न होता आणि पेन्सिली माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.
दोन तीन दिवसांनी,ठरल्याप्रमाणे हे प्लास्टिकचे डबे आले. जेवणं उरकली आणि मोठ्या उत्साहाने मी पेन्सिली डब्यात भरून ठेऊ लागले .अगदी काळजीपूर्वक रंगछटेप्रमाणे पेन्सिली मांडल्या. आता काय फक्त डबा उघडायचा, छटा निवडायची आणि रंगवायला सुरुवात! पेन्सिलींची मांडणी बघून उगाचच वाटलं आपणही कुणीतरी मोठे........ असो. मनातलं मनातच! लवकरच लक्षात आलं की हे प्रकरण एवढ्यावर संपणारं नव्हतं. आता काय हे डबे एखाद्या पिशवीत ठेवले तरी चालतील म्हणून ठेवले खरे पण डबा उभा करताच छटेनुसार मांडणी केलेल्या पेन्सिली " केशवं प्रतिगच्छति" प्रमाणे एका जागी गोळा झाल्या. कारण साधं होतं. आडव्या स्थितीत प्रश्न नव्हता.पण मोकळी जागा जास्त होती. त्यामुळे पेन्सिलींनी आपली जागा सोडली. प्रश्न सुटला नाही.मग पुन्हा एकदा विचारमंथन सुरू झालं.
मग पेन्सिलींच्या भोवती कागदाचं पॅकिंग करून झालं . मनास येईना. मग पुन्हा विचार मंथन. मग पॅकिंगच्या नमुन्यांचा अभ्यास सुरू झाला. मापं घेणं, कागदावर विविध पद्धतीने आकडेमोड करून झाली. आकृत्या काढून झाल्या.
काही नमुने बनवले
पण मनास काही येईना. रात्री झोप लागेना. पसाराही तसाच टाकलेला होता. " पुरे झाला हं तुझा हा नादिष्टपणा!", "आता या पेन्सिलींपायी तब्येत बिघडून घ्यायची आहे का?" ही आणि आणखी अशीच बोलणी ऐकून घ्यावी लागली. माझी खुमखुमी पण कमी व्हायला लागली होती. " एक जरा आहे डोक्यात, तेवढं फक्त आज रात्री करून बघेन " म्हणत थोडी मुदत घेतली.
पुन्हा एकदा नव्या दमाने आणि अधिक काळजीने मापं घेतली . नवीन आकडेमोड, नवीन आकृत्या काढून सुरवात केली. आणि अखेर जमलं!
एखादा प्रकल्प आकाराला यावा इतका मला आनंद झाला. घ्या आता हवी ती छटा! माझा हा उपक्रम म्हणायला अगदीच किरकोळ. पण मला बरंच काही शिकवून गेला.
एवढं करून चित्र रंगवण्याचं काही जमलं की नाही? मंडळी,तुमची शंका रास्त आहे. पण याचं उत्तर हे चित्र बघून तुम्हीच ठरवा.