भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0

भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0
______
#स्वांत:सुखाय्
#मनुवादी सनातनी लेखन

________
काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो.

बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे.

हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक. आणि गाण्यातील शब्द तर विचारूच नका. एका गाण्यात " तू तेरी अर्थी की तयारी रख ले "

असे शब्द होतो. तिथे मात्र संयमाचा बांध सुटला अन् ड्रायव्हरला म्हणालो - "ह्या सारखे (इतके दळभद्री ) एकही गीत मराठीत शोधूनही सापडणार नाही."

काय हे भाषिक अधःपतन !

हे भाषिक अधःपतन सर्वत्रच आहे. निरर्थक काहीही. अगदी अभिजात मराठीही संपूर्ण कोरडी राहिली आहे असे नाही. मराठीतील दळभद्री गाणी काही कमी नाहीत.

एक नंबर तुझी कंबर !

तांबडी चामडी चमकते उन्हात !!

(असो.अजून अनेक गाणी त्यांच्या कवींची नावे आडनावे देत नाही गहजब नको , अन् उगाच विषयांतर नको).

श्या , काय हे भाषिक अधःपतन !

मला बाबूजींच्या आवाजातील गाणी आठवतात. गदिमांचे गीतरामायण आठवते. पण तसं पाहिलं तर त्या आधीच्या काळातील संगीत नाटकातील गीतं ऐकली तर हेही एकप्रकारे भाषिक अधःपतन च म्हणावे लागेल.

संगीत नाटकं ही सेमी क्लासिकल झालं ना मग तेही अधःपतनच की ! शुद्ध शास्त्रीय संगीतापासून खाली उतरलेले संगीत. पण तूर्तास संगीत राहू दे , फक्त भाषेचे बोलू.

रॅप मध्ये असतो तो निरर्थक मुक्तछंद ,
त्या आधी किमान गेय गाणी,
त्या आधी वृत्तबद्ध कविता,
त्या आधी खोल अर्थ असणारी ओवी , श्लोक , आर्या ...

असं सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर सगळंच भाषिक अधःपतन.

"संस्कृत भाषा देवें केली l मग प्राकृत काय चोरांपासोनी झाली ??"

असा नाथांनी खणखणीत प्रश्न विचारला असला तरी नाथ स्वतः संस्कृत जाणकार होते, माउलींनी देखील भावार्थ दीपिका लिहिली असली तरी ते संस्कृत मधून खाली उतरणे आहे हेच होते. इथे लगेच "काही" लोकांचे अभिनिवेश उफाळून येतील पण त्यातल्या किती जणांना अमृतानुभव , चांगदेव पासष्टी मधील एक तरी ओवी उद्धृत करता येईल ? अभिनिवेश वाल्या लोकांना फक्त " अमुकतमुक की जय" अशा आरोळ्या ठोकता येतात, त्यांना त्या विषयातील काही गमक नसत हे दुर्दैवाने सत्य आहे.
हां , तर तात्पर्य इतकेच की प्राकृत हे संस्कृत च्या परिप्रेक्ष्यातून , शुद्ध मराठीत ज्याला परस्पेक्टीव म्हणतात त्यातून पहिलं तर भाषिक अधःपतन च आहे.

पण फक्त तिथेच का थांबा, अजून मागे जात जात लिमिट n ->0 करू . पहिले भाषिक अधःपतन काय हे शोधू म्हणजे शून्यावे आपोआप गवसेल !

आधुनिक संस्कृत बऱ्यापैकी सहज आहे सुलभ आहे, पण वैदिक संस्कृत हे जितके गूढ गहन अर्थवाही आहे, आधुनिक संस्कृत तितके नाही. हे जाणकारांना नक्की कळते.
गूढार्थ व्यक्त करणे हा भाषेचा मूळ उद्देश. तो कमीत कमी शब्दात व्यक्त करणे , अघळपघळ न बोलता व्यक्त करणे ही खरी कसोटी. ह्या अर्थाने पहिलं तर आधुनिक संस्कृत हे देखील प्राचीन वैदिक संस्कृतचे अधःपतन नव्हे काय !
किंवा ह्याच तर्काने कोणतेही भाष्य हे एक प्रकाराचे अधःपतन म्हणावे लागेल मूळ सूत्रांचे , उपनिषदांचे .

आणि मग सूत्रांच्या आधी काय होतं?

पाणिनि व्याकरण ? पण पाणीनीने ते नियम ज्यांना आपण माहेश्वर सूत्रे म्हणतो कशापासून बनवले ? आणि त्या आधी काय होतं ?

पुराणे ही महाभारत , रामायण ह्या अभिजात स्तरावरून एकप्रकारे खाली उतरणेच की

महाभारत रामायण काय आहेत तर स्मृती ग्रंथानुसार जीवन कसे जगले पाहिजे ह्याची उदाहरणे . अर्थात मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती पराशर स्मृती आदी चे सोदाहरण स्पष्टीकरण.

आणि हे स्मृती ग्रंथ कशातून आले ? तर वेदोक्त उपनिषदपर धर्माचे आचरण कसे करावे ह्याचे नियम. हे एकप्रकारे वेदांच्या उपनिषदांचा स्तरावरून झालेले अधःपतन च की. ज्याला मूळ वेदोक्त धर्म "कळला आहे" त्याला काहीही गरज नाही ह्याची
?
यावानर्थ उदपाने सर्वत: सम्प्लुतोदके |
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ||

"जाणकार" ब्राह्मणसाठी सर्व वेद हे तितकेच उपयुक्त आहेत जितके की तहान भागलेल्या मनुष्यकरता अथांग जलाशय !

पण ह्या वेदांच्या आधी काय होतं ? वेद हे कोठून "अधःपात" पावलेले आहेत ?

ll ॐ ll

गोंदवलेकर महाराज म्हणाले की - "प्रणव हा परब्रह्माचा हुंकार आहे".

हे आहे हे पहिले , the very first , भाषिक अधःपतन!

अरे पण हा हुंकार कोठून अध:पतित झालेला आहे ?

"ते" शून्यावे अधःपतन काय आहे ?

हं?
.
.
.
स:

हंस: सोहं

तो "मी" आहे.

वेद हे ब्रह्मीभूत पुरुषाच्या ब्रह्मअनुभवातून खाली उतरलेले आहेत ! आणि "तो " दुसरा तिसरा कोणी नसून "मीच" आहे !

सोऽहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्बिषः ll

ॐ तद्ब्रह्म ।
ॐ तद्वायु: ।
ॐ तदात्मा ।
ॐ तत्सत्यम् ।
ॐ तत्सर्वम् ।
ॐ तत्पुरोर्नमः ॥ १॥
ॐ अन्तश्वरति भूतेषु गुहायां विश्वमूर्तिषु ।
त्वं यज्ञस्त्वं वषट्कारस्त्वमिन्द्रस्त्वꣳ रुद्रस्त्वं विष्णुस्त्वं ब्रह्म त्वं प्रजापतिः ।
त्वं तदाप आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवः सुवरोम् ॥ २॥
______________

ll जानामि ll

पाहातां पाहातां अनुमानलें । कळतां कळतां कळों आलें ।
पाहातां अवघेंचि निवांत जालें । बोलणें आतां ॥ २२ ॥

ll ॐ ll
______________