म्हातारा न इतूका....
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली. याच हस्तलिखितातले ,मन्ना डे यांनी गायलेले गाणे,"घन वन माला नभी ग्रासल्या,कोसळती धारा",हे अप्रतिम गाणे आपल्याला मिळाले.
आज बाहेर जाता येत नाही,घरातच बसून रहावे लागत आहे वेळ सत्कारणी लागावा म्हणून संत साहीत्य अंतरजालावर चाळत असताना विसाव्याच्या क्षणी दिलासा देणारा तुकोबाराय यांचा अभंग समोर आला.
आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||.
नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २||
आता सर्व स्वानंदा साठी. कुठलीच चिंता नाही. कोणाची काळजी नाही. संत तुकाराम सर्वानाच माहीती आहेत पण त्यांचे जेष्ठ बंधू सावजी सुद्धा तेव्हढेच विरक्त.नेहमी म्हणत, "गोरूये रूखातळी बैसली",गुराख्याने हाकललं की घराकडे चालू लागायचं. खरोखर वडिलांचे दिवस झाले.जेष्ठ सर्वसंग त्यागून कुठे निघून गेले कळाले नाही.
सत्तरी पार केलीय पण वृद्ध नाही झालो. काही महानुभावांना वाटते काही नवीन शिकण्या पलिकडे गेलेला अडमुठा,अडेलतट्टू म्हातारा, पण एक लक्षात घ्या "म्हातारा न इतूका अवघे पाऊणशे वय माझे....".
विरंगुळा म्हणून बाल्कनीत बसून काल अनुभवलेला निसर्ग आज बाल्कनीतून चिंब भिजताना बघत असताना कालचा अनुभव शब्दबद्ध केला.
"आज सकाळी तीन तास जंगलात भटकत होतो.चातकपक्षी आवाज देत होता,दिसला नाही.हा पक्षी हिमाचल मधून स्थलांतर करतो. या पक्षी सोबत अनेक अख्याईका जुडल्या आहेत. दरवर्षीच चातक पक्षी (Jacobin Cuckoo) पावसाळ्यात येतो पण दर्शनासाठी खुप कष्ट आणी चिकाटी लागते.मागील वर्षी बाल नामदेवा प्रमाणे हट्ट धरून बसलो होतो. चार पाच तास प्रतिक्षा केल्यावर महाराज दिसले. डौलदार राजस पक्षी, प्रचि संग्रही आहे.
छोटा पावश्या,कारूण्य कोकीळ(Grey billed Cuckoo,) दिसला. टिपला सुद्धा. हा पक्षी आपल्या जोडीदाराला बोलावण्या साठी जो आवाज करतो तो "वळीव,वळीव"असा ऐकू येतो.
शेतकर्यांचा मित्र,पावश्या(Common Hawck Cuckoo) "पेरते व्हा", म्हणून संदेश देत बरेच दिवसापासून ठाण मांडून बसलाय. इंग्रज याला ब्रेनफिव्हर म्हणतात.
महादेव वाडीच्या जंगलात सुरवंट वयात आले, त्यांची नक्षीदार फुलपाखरे झाली आहेत. पुढे आणखीनच वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं दिसतील.चतुर (ड्रॅगनफ्लाय) आपली पुढची पिढी घडवण्यात रममाण होते.
हायला, निसर्गात बघावे ते आश्चर्यच, भटकत असताना चतूर हवेत समागम,स्वमग्न तरंगताना दिसत होते. एक नाही तर अशी बरीच जोडपी हवेत जोडी जोडीने तरंगत होती.अमेझींग न!
चतूर वेडे राघू चतुरपणे त्यांना भक्ष्य बनवत होते. एकावर एक फ्री टाईप...
चिमण चंडोल,भट चंडोल मस्त किडे टिपत मधूनच लकेर फेकत होते.नेहमीप्रमाणेच सातभाई,फुलचुखी,प्रणयातूर बुलबुल, कोकीळ, कोकीळा,ब्राह्मणी मैना,होला साळुंक्या,कबुतरं स्वमग्न,भक्ष्य टिपत होते.
डोंगरावर नैसर्गिक तलाव आहे. पावसाळ्यात पाणी साचते.या वर्षी पण भरपूर पाणी साठले आहे.,बगळे,हेराॅन,सॅण्डपाईपर, थोरला, धाकला धोबी, पाणकोंबड्या खंड्या,कोतवाल,वेडा राघू असे किटक भक्षी पक्षी इथे हमखास दिसतात,आजही दिसले.एकदिवस तर चक्क एक नागराज तलावावर लपलप करून पाणी पिताना दिसला.काळा कभिन्न कोब्रा होता. सौंदर्य आणी भय असा विचित्र मिश्र अनुभव होता.
माळरानावर भारद्वाज,हुपुप,छोटे शिकारी, कावळे,भटकी कुत्री अशी मांदियाळी.भरपुर झाड झाडोरा,जाणाऱ्या नागमोडी पायवाटा. थोड्या दिवसात रानफुले,पक्षी,रंगबिरंगी फुलपाखरे किटकांची भर पडेल, निसर्ग बहरून येईल आणी आनंद द्विगुणित होईल.
माळरानावर लाल, पिवळ्या टिटव्यांनी पालं टाकलीत.वडार,गडिया लोहार या जमाती प्रमाणे उघड्यावर संसार थाटलाय.अंडी घातली आहेत.काही बाळं जन्मली आहेत.खुप सार्या टिटव्या हिंडत,उडत आहेत.बाळे, अंडी यांच्यावर नजर ठेवून आहेत. सटवी घार, नतद्रष्ट डोमकावळा आणी इतर शिकार्यांची वाईट नजर आहे.त्यांच्या रक्षणार्थ टिटव्यांनी चक्रव्यूह रचलाय. कुत्री,घारी,कावळे,शिक्रे यांना जवळ फटकू देत नव्हत्या.जवळून जाणाऱ्या वाटसरूं वर सुद्धा फायटर जेट सारखी झेप घेत होत्या. जणू राफेल व F सोळाची डाॅग फाईट चालू आहे असेच वाटले.
सगळीकडे हवाहवासा हिरवागार रंग त्यावर टंणटणीच्या फुलांची नक्षी, काय मस्त देखावा होता.मला तर पक्षीदर्शन आणी ध्यान योग (मेडीटेशन) यात साम्य वाटते.सकाळ मस्त गेली. इथून पुढे निसर्गाचा आलेख वर चढत जाणार. आगदी बालकवींच्या कविते सारखे.
हिरवे पिवळे गार गालीचे
हरित तृणांच्या मखमालीचे .....
अतिशय सुखद अनुभव.नादब्रह्मच जणू.दयाळ,शिंपी,कोकीळ कोकीळा, सातभाई यांचे सतत कानावर पडणारे आवाज म्हणजे जुन्या काळा तील मेलडी मेकर्सचा ऑर्केस्ट्रा किवां सिंम्फनी म्हणावे लागेल. घरी परतायचे भान रहात नाही.मात्र दररोजचे वाटसरू याची आठवण करून देतात मग पावले घराकडे वळतात."
टिपलेली छायाचित्रे बघण्यासाठी तू नळीची लिंक दिली आहे.