भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा.
तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात.
परंतु आज जास्तीत जास्त रसिक हे सुगम संगीत ऐकतात. सुगम संगीत हा शब्दप्रयोग कसा उगवला कोण जाणे. पण हे संगीत कोणते हे मात्र आपल्याला ठाऊक आहे. या सुगम संगीतात मात्र शब्द, स्वर, ताल, नाद अशा प्रत्येक पैलूला जास्तीत जास्त वाव देऊन सादरीकरण अधिकाधिक सौंदर्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो.
प्रथम शब्द, उच्चारनाद आणि स्वर एकमेकांचे देखणेपण कसे वाढवतात ते अगोदर पाहूंयात. शब्दांत आपल्या वर्णमालेतले स्वर अणि व्यंजने असतात. व्यंजनांच्या उच्चारांत अक्षरावरील आघाताचा नाद असतो. प्रत्येक व्यंजनाचा नाद वेगळा. न म्हटले की कपावर चमच्याने टिण टिण वाजवल्यासारखे वाटते. ण म्हटले की मनांत मंदिरातली घंटा वाजते. ट चा नाद वेगळा तर ड चा नाद वेगळा. व्यंजनाचा सोबती बदलला की त्याचा नादही बदलतो. चटणीतल्या च नाद वेगळा तर चिमणीच्या च चा नाद वेगळा आणि चंपा वा चंट मधल्या च चे नाद आणखी वेगळे. विरामचिन्ह आले किंवा बदलले तरी व्यंजनाचा नाद बदलतो. काम कर मधला र वेगळा तर हात या अर्थाने कर मधला र वेगळा ऐकू येतो. अशी आहे शब्द आणि नाद यांची नादमय साथसंगत.
अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा इ. शब्दालंकार तसेच अर्थालंकार भाषेचे सौंदर्य कसे वाढवतात ते आपण शाळेंत शिकलो आहोत. नादमय शब्द कवितेचे सौंदर्य वाढवतात. ’आनंदवनभुवनी’, नंदकिशोरा, असा शब्दांचा उच्चार करणेंच किती आनंददायी वाटते. कवीचे कल्पनासौंदर्य मग अशा उच्चारनादसुंदर शब्दांत व्यक्त झाले की मग आपण या मंत्रजालात सापडतों. ’घननीळा लडिवाळा झुलवूं नको हिंदोळा’ अशा ओळी मग मोहमयी बनतात.
प्रतिभावंत कवी अमूर्त भावनांना हळूच शब्दांत पकडतात आणि सुंदर दागिन्यात कलाकुसरीने रत्ने जडवावीत तसे नादमय शब्द कवितेत जडवले जातात. नादमयतेबरोबरच कवितेतले शब्द अर्थगर्भ असतात. गद्यातला शब्द पद्यात जातांना अर्थाच्या नवनव्या मोहक छटा लेऊन जातो. गेय कवितेला व्याकरणातील वाक्यरचनेच्या नियमांची, विरामचिन्हांची गरज नसते. व्याकरणाला मागे सारून कवी शब्दांना वेगळे अर्थ आणि नाद देतो. रसिकाने मग या शब्दयोजनेच्या सौंदर्यपूर्ण नवलाईने विस्मयचकित होऊन नेत्रांनी कविता वाचावी तर कल्पनेत्रांनी शब्दचित्रांचा तो न्यास पाहावा आणि मनकर्णांनी त्यातले मंजुळ स्वर अनुभवावेत.
एखादी सुंदर कविता मग एखाद्या प्रतिभावंत संगीतकाराच्या प्रतिभेला साद घालते, गोंजारते, आपल्या मोहमयी जाळ्यात पकडते. संगीतकार मग स्वतःचा उरत नाही. त्याला कवितेबरोबर सूरही ऐकू येतात आणि त्याच्या मनांतल्या सतारी झंकारूं लागतात. एक गाणे आकार घेऊं पाहातें. गाण्याचे स्वर त्याच्या कानांत गुणगुणूं लागतात, त्याला अस्वस्थ करतात, उत्कट भावनांच्या हिंदोळ्यावर बसवतात.
पण भाव शब्दांतून व्यक्त करायला सुरेल कंठ हवाच. संगीतकाराचे मन मग कवितेतल्या शब्दांना अनुरूप अशा आवाजाचा शोध घेते. मग एखाद्या गायकाचा किंवा गायिकेचा आवाज मनाला गवसला की ते गाणे त्याच्या मनांत रुंजी घालूं लागते. संगीतकार आणि गायक यांचे या गाण्यापुरते मग मस्त मेतकूट जमते. एकमेकांशी बोलतांबोलतां मग ते गाण्याला एकामागोमाग एक सौंदर्यप्रसाधने चढवून असे देखणेपण देतात की रसिकाने केवळ अवाक होऊन ऐकावे. कार्यक्रमाच्या तालमीच्या वा ध्वनीमुद्रणावेळी संगीत संयोजक आणि वाद्यवादक त्या स्वरचित्रात असे काही जडावाचे काम करतात की विश्वसुंदरीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते आहे असे वाटावे. शब्द आणि स्वरविचार यांची साथसंगत अशी जुळून येते.
कविता कवीच्या मनांत फुलत जाते तर आधुनिक काळात चित्रपटाच्या कथानकातील प्रसंगानुरूप भावावस्था संगीतकाराच्या मनांत विविध तरंग निर्माण करते. संगीतकार मग भावोत्कट स्वरमालिका रचतो, तिला तालबद्ध करतो आणि एखाद्या गीताची चाल आकार घेते. गीतकार तालबद्ध स्वरमालिकेला मग हळूच शब्दबद्ध करतो आणि मग एक गीत आकार घेते. संगीत संयोजक आणि वादक नंतर गीतात आणखी स्वररंग भरतात. गीतकारांच्या या अलौकिक प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडीच.
नादमय शब्दांना पहिली साथ असते आवाजाची आणि तालासुरांची. प्रथम शब्दांनी आणि स्वरांनी एकमेकांना केलेल्या साथ संगतीचा मनोहर अनुभव यावा म्हणून दोन भावगीतांची ओळख करून देतो आणि नंतर सहवादकांच्या सवालजबाबांनी रंगत वाढवण्याचे कांही नमुने सादर करतो.
मुग्ध तारुण्य प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच येते आणि या काळातील आठवणी अमोल, अमीट आनंदाचे, बहराचे क्षण देऊन जातात. या पहिल्या दुव्यात गाण्यातली कविता आहे इंदिरा संतांची. इंदिरा संतांच्या या शब्दांबद्दल बोलणारा मी कोण? ते मुळातूनच ऐकावेत. पद्मजा फेणाणीचा आवाज अगदी नवथर किशोरीचा वाटतो. अतिशय स्थिर स्वर प्रकाशमान होऊन त्वरित आपल्या मनाची पकड घेतो. उच्चारातील नादमयता काय वर्णावी? मुग्ध तारुण्यातील भावनांच्या हरकती अशा सुंदर उतरल्या आहेत की मधली सारी वर्षे, विरघळून जावीत, स्थलकालाच्या सार्या सीमा हरवून जाव्यात आणि आपण अत्तर होऊन मुग्ध तारुण्यांत जावे. मनोहर शब्दांत भावनांनी ओथंबून जातां जातां स्वर आपल्याला हलकेच आठवणींच्या कल्पसृष्टीत नेऊन सोडतात. स्वरांच्या दागिन्यात मग शब्दरत्ने आणि कल्पनासौंदर्य अनोख्या प्रकाशातून लकाकत आपल्याला विस्मित करतात.
दुवा १: मराठी भावगीत: ६ (सहा) मिनिटे: पुस्तकातली खूण कराया: गायिका पद्मजा फेणाणी.
https://www.youtube.com/watch?v=GZTIK-1nxPw
शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत विविधतेसाठी ख्यालापाठोपाठ एखादी ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, गीत, नाट्यगीत, भक्तिगीत, भजन वगैरे सादर केले जाते. अनेक वेळा गायक वा गायिकेच्या आवाजाचा पोत, शब्दफ़ेक इ. अनेकदा या आकृतीबंधाला साजेसे नसतात. कौशिकी चक्रवर्तीचे ख्याल गायन मी यू-ट्यूबवर आणि प्रत्यक्ष मैफ़िलीतही ऐकलेले आहे. यूट्यूबवर तिने गायलेले गीत मी ऐकले आणि उडालोच. गीताला साजेसा असा त्यांनी लावलेल्या आवाजाचा धारदार, लवचिक पोत आणि शब्द ठळक करणार्या हरकती, मुरक्या फारच सुरेख घेतल्या आहेत. पुढील दुव्यात अनुभवतां येतील.
दुवा २: सलोना सा सजन: …गायिका कौशिकी चक्रवर्ती: ३ मि. ३९ सेकंद.
https://www.youtube.com/watch?v=pZgN0XtiO3Y
अशी ही शब्द, आवाज आणि स्वरताल यांनी एकमेकांना केलेली साथसंगत आणि त्यांनी मिळून बनवलेले रसायन. या रसायनाची धुंदी ओसरेपर्यंत दुसरे न काही करावे, न काही ऐकावे. भानावर यायला कुणाला काही मिनिटे पुरतील तर कुणाला कांही दिवस वा आठवडे. भानावर आल्यावरच पुढील दुवे ऐकावेत.
तबल्याची साथ ख्यालगायनाला वेगळी, ठुमरीला वेगळी, वाद्यसंगीताला आणखी वेगळी तर नृत्याला अधिकच वेगळी. दीपचंदी, केहरवा, दादरा, क्वचित अद्धा त्रिताल अशा वेगळ्या तालांत ठुमरी सहसा गायली जाते. अद्धा त्रिताल सोडला तर ख्यालगायनातील बंदिशी सहसा या तालांत बांधल्या जात नाहींत. ठुमरीसाथीला वाजणार्या तबल्याचा नखरेल नाद ऐकणे हा देखील एक वेगळा, मस्त अनुभव आहे. एखाद्या सुंदरीचा कलापूर्ण पदन्यास रसिकांच्या डोळ्यांसमोर आणत तबला अणि डग्गा देखील एकमेकांशी आणि लयीशीं नादझिम्मा खेळूं लागतात.
बडे गुलाम अली खां साहेबांनी लोकप्रिय केलेली ’याद पिया की आये… ’ ही ठुमरी बहुतेकांनी ऐकली असेल. पुढील दुव्यात पं. सुधीर नायक संवादिनीवर हीच ठुमरी वाजवताहेत आणि तबलासाथ आहे पं. मुकुंदराज देव यांची. कित्येक वर्षांत ठुमरीला केलेली एवढी सुंदर तबलासाथ मी ऐकली नव्हती. सुरुवातीपासून दुय्यम भूमिका घेतल्यानंतर अकराव्या मिनिटापासून तबलासाथीने ठुमरीला चढवलेला साजशृंगार लाजबाब आहे.
दुवा ३: संवादिनीवर पं. सुधीर नायक: याद पियाकी आये: सुमारे १५ (पंधरा) मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=S_7f9xdACZ4
ठुमरीला केलेली तबलासाथ नखरेल, लयीशी नाचत, मुरकत, लचकत केलेली शिवाशिवी तर गझलेला आणखी वेगळी. पुढील दुव्यात पेशकार्यापासूनच ओजस अधियांचा तबला आपल्या मनाची पकड घेतो, पण गायकाचा अधिक्षेप न करतां बरोबरीची मैत्रीपूर्ण साथ देत.
दुवा ४: अजय पोहनकर यांच्या गझलेला तबलासाथ करताहेत ओजस अधिया:३ मिनिटे १९ सेकंद.
https://www.youtube.com/watch?v=R2Li3_ymFPU
आतां नव्या प्रयोगांविषयीं.
शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधान संगीत. मग ख्यालगायनात स्वरसाथीला संवादिनी, सारंगी वा व्हायोलीन असे स्वरवाद्य घेण्याची आपली परंपरा आहे. पुढील दुव्यात कौशिकी चक्रवर्ती गाताहेत. साथीला संवादिनीसोबत बांसरी पण आहे. खरे म्हटले तर बांसरी हे कंठसंगीताला सर्वांत जवळचे वाद्य. पण ख्यालगायनाला बांसरीची साथ दीर्घकाळ आढळली नव्हती. बांसरीसाथीमुळे या मैफिलीतील स्वरमांडणीचे सौंदर्य निःसंशय खुलले आहे.
या संगीतसाथीच्या प्रयोगात आणखी एक नवा आणि चांगला पायंडा कौशिकीजींनी पाडलेला आहे. आपले सर्व सहवादक – accompanists प्रतिभावान आहेत त्यांना केवळ सहवादक म्हणतां येणार नाही आणि ते एकल वादन – solo ही इतक्याच उत्कृष्ट रीतीने सादर करूं शकतात. मला साथ करणे हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी सुंदर साथ केल्यामुळेंच माझे सादरीकरण एवढ्या उंचीवर गेले आहे आणि त्यांचे हे ऋण मी मान्य करते अशा अर्थाचे वक्तव्य त्या मैफ़िल सुरू असतांना ३५व्या मिनिटाला या ५० मिनिटांच्या ख्यालगायनात करतात.
दुवा ५: ५० (पन्नास) मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=gfCpFMsKGMA
पुढील दुव्यात जगजीत सिंग गाताहेत. सोबत तबला, ढोलक, व्हायोलीन आणि गिटार देखील आहे. जगजीत सिंगांनी वाव दिल्यावर त्यांनी काय धम्माल उडविली आहे याचे शब्दांकन कितीही छान झाले तरी खूपच लांबलचक होईल. आणि बहुतेक वाचकांनी दुव्यातले संगीत ऐकलेले असेल. वाचण्यापेक्षां ऐकण्यात मजा आहे.
यात आणखी एक प्रयोग आहे. जगजीतजींनी एक विनोदी शेर या गझलेत म्हटला आहे. पण कुठेही रसभंग होत नाही. मोतीचूर लाडवात खरपूस लवंग अनोखी चव देऊन जाते तशी मैफिलीची खुमारी वाढतेच.
दुवा ६ : १९ (एकोणीस) मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=dDtLyDxXhvk
पुढील दुव्यात आणखी कांही प्रयोग पाहायला मिळतात. गझलगायनांत मूळ गझलेंत भावार्थोचित शेर म्हणण्याची परंपरा आहे. पुढील दुव्यातील गायिका आहे प्रतिभा सिंग बघेल. यातील पहिला प्रयोग म्हणजे एक गीत म्हणतां म्ह्णतां त्यातला एक स्वर पकडून गायिका दुसरे गीत म्हणूं लागते. फक्त स्वर नव्हे तर गीतातील भाव व्यक्त करणारे शब्द देखील भावाभिव्यक्ती ठळक करीत जातात. सोबत दोन्ही गीतांचे सौंदर्य खुलतें. अशी कांही गीते एकापाठोपाठ जोडली की आपण त्याला मेडले म्हणतो. कांही हिंदी तर कांही मराठी सिनेगीतात मेडलेचा वापर केलेला आहे. परंतु बहुतेक प्रयोगातले मेडले हे जाणकार रसिकांकडून मात्र फारसे नावाजले गेले नाहीत. हा दुव्यातला मेडले मात्र उत्कट भावाभिव्यक्तीमुळे मनाला भिडून जातो. ओरिगामी कलावंताने कागदाच्या एका आकृतीतून जादू केल्यासारखी दुसरी आकृती काढावी, दुसरीतून तिसरी काढावी त्यातून आणखी पुढे असे कांहींसे वाटून जाते.
या मेडलेतील आणखी एक प्रयोग. खरे तर इसराज अणि दिलरुबा ही दोन सारंगीसदृश अशी वाद्यें आजकाल जवळजवळ विस्मरणांत गेलीं आहेत. या दुव्यातील मेडलेला मात्र साथीला चक्क इसराज वाजवलेला आहे. दिलरूबा वाजतांना मी ऐकलेला आहे. इसराज हे वाद्य वाजतांना मात्र मी पहिल्यांदा ऐकले. सारंगी आणि व्हायोलीन या दोन्हींपेक्षां जास्त धारदार, काळजाला भिडणारा ध्वनी ऐकला आणि अंगावर सर्रर्रर्रकन कांटा आला. हृदयात हलकेच रेशमी कट्यार घुसल्यासारखे वाटले. विनायक व्होरा फेम तारशहनाईची आठवण करून देणारा पण कमी कणखर तरीही जास्त तलम पण धारदार असा ध्वनीचा पोत. इसराजची साथीला केलेली निवड अप्रतिमच. अशा रीतीने या मेडलेमधील मेलडी देखील नावीन्यपूर्ण साजसाथीने केवळ अविस्मरणीय सुंदर झाली आहे.
दुवा ७: ८ (आठ) मिनिटे: सिनेसंगीताचा मेडले.
https://www.youtube.com/watch?v=tSU67P9zENg
लिखाणाला जाणकार वाचकांची आणि त्यांच्या प्रतिक्रियांची साथसंगत असेल तर लेखाचे लेखनवाचनही अपार रंगत देऊन जाते. या भावोत्कट क्षणी माझ्या मनांत सुंदर कवितांतल्या शब्दांनी फेर धरलेला आहे आणि वाद्यांचे मधुर स्वर माझ्या मनांत गुंजन करताहेत. अशा या नादमय क्षणीं आपला अमूल्य वेळ देऊन वाचन केल्याबद्दल वाचकांना धन्यवाद देतच या लेखाचा समारोप करतो.
- X – X – X –