२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.