कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता.
साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा. वीक एन्ड ला मस्त जाऊन रिलॅक्स व्हायचं आणि सोमवारी परत पुण्यात फ्रेश पणे जॉब ला हजर.

योगायोगाने त्यांना फेसबुकवर एक पोस्ट त्यांना दिसली.

"कोकणातील दापोली जवळ तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस विकणे आहे" म्हणून.

दिलेल्या फोन वर ललिताने संपर्क केला. फार्म हाऊस चे मालक कायमचे युके ला जाणार होते. त्यामुळे त्यांना फार्म हाऊस विकायचे होते. फार्म हाऊस मेंटेन नव्हते पण थोडा खर्च करून छान वीक एन्ड होम होऊ शकले असते.

एका शनिवारी साहित्य आणि ललिता फार्म हाऊस बघून आले. दापोली कितीसे लांब पुण्यातून ? ताम्हिणी उतरला आणि तीन एक तास गाडी चालवली की फार्म हाऊस.
म्हणजे पुण्यातील साहित्य आणि ललिताच्या हडपसर मधल्या घरा पासून पहाटे ५ ला निघाले की १० ला फार्म हाऊस वर. व्यवहार ठरला, कायदे कानून बघून, अजून थोडे कर्ज घेऊन खरेदी पूर्ण झाली. साधारण ३० एक लाख रुपये खर्चून साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न पूर्ण झाले.

फार्म हाऊस मेंटेन नव्हतं. थोडं गवत कापायला लागणार होते. जवळील गावातून दोन गडी माणूस आणून गवत कापून घेतले. "जनावर" घरात येऊ नये म्हणून खिडक्यांना जाळ्या लावून घेतल्या. जवळील गावातील एक माणूस सांगून ठेवला, की जेणेकरून काही लागले तर पुण्यातून त्याला पैसे देऊन फार्म हाऊस ची काही कामे करायला सांगता येतील. पुढच्या ट्रीपला वीक एन्ड साठी लागतील इतकी चहा पाणी आणि जेवणसाठीची भांडी नेली.

आता साहित्य आणि ललिता दार वीक एन्ड ला त्या फार्म हाऊस वर जाऊ लागले. पावसात तर ताम्हिणी घाट आणि दापोली पर्यंत चा रस्ता म्हणजे निसर्ग सौदर्याची शालच. ...

दर वीक एन्ड ला पहाटे निघायचे, फार्म हाऊस ला पोहोचून झाडपूस करायची, कौलातून कुणी जनावर आत शिरले नाहीना ते बघायचे , मग दुपारी थोडी "एन्जॉयमेंट", संध्याकाळ झोपाळ्यावर एक पेग हातात घेऊन भविष्याच्या गप्पा, आणि रात्री झोप.

रविवार सकाळ चा चहा झाला की दुपारचा स्वयंपाक /किंवा दापोलीत, जवळच्या गावात जाऊन जेवण करून चार ला परत पुण्याकडे निघून रात्री ९ - १० पर्यंत पुण्यात.
सुरुवातीस उत्साह वाटला, पण आता कंटाळा येऊ लागला.

थोड्याच दिवसात फार्म हाऊस च्या देखभालीसाठी ठेवलेल्या माणसाकडून फोन आला की विहिरींची मोटोर जळली, इतके पैसे पाठवा, पाठवले. .....
महिन्याभरात दुसरा फोन की माकडांनी कौले फोडली, पैसे पाठवा.. पाठवले....
मग विहिरीतून घरात येणार पाईप फुटला, पैसे पाठवा .... पाठवले.
आता फार्म हाऊस चे स्वप्न ही त्रासदायक वास्तवता होती.

##
जर तुम्ही कोकणात बॉर्न आणि ब्रॉट अप नसाल तर कोकणात राहणे अवघड असते, आणि पुण्यात राहून कोकणातील घर मेंटेन ठेवणे त्याहून अवघड.
##

मधल्याकाळात वीकएंड ला दुपारी केलेली एन्जॉयमेंट फळाला आली आणि ललिताला मातृत्वाची चाहूल लागली. काही कारणांनी गायनॅक ने ललिताला प्रवास बिलकुल टाळायचा असा सल्ला दिला.

आता दर वीक एन्ड ला दापोलीतील फार्म हाऊस वर जाण्याची जबाबदारी साहित्यवर आली कारण फार्म हाऊस ला मालकाचे जाणे येणे आहे , त्याचे लक्ष आहे याची जाणीव इतरांना व्हावी लागते म्हणूनच .... बाकी सेकंड होम ची मजा बरीचशी विरली होती.. पण प्रेग्नंसीत ललिताला आता साहित्यचा सहवास हवा होता. त्याचे दर वीक एन्ड ला दापोलीत जाणे तिला अस्वस्थ करू लागले. पुण्यातील फ्लॅटचे कर्ज , फार्म हाऊस चे कर्ज आता नको वाटायला लागले.

नीट विचार करून साहित्यने आणि ललिताने निर्णय घेतला आणि फेसबुक वर पोस्ट टाकली. ......

"ओनरला त्वरित ऑनसाईट जावे लागत आहे म्हणून कोंकणातील निसर्ग रम्य वातावरणात दापोली जवळ एक तुमच्या स्वप्नात असते तसे फार्म हाऊस विकणे आहे"

कौस्तुभ पोंक्षे...