Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

वारी !!!

जनातलं, मनातलं

वारी !!!

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

किल्लेदार
Tue, 05/27/2025 - 06:42

में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात. रस्त्यांत भेटणारी लहान लहान गावं डोलीत बसून येणाऱ्या आपल्या आवडत्या दैवताची आतुरतेनं वाट बघत असतात. डोली गावात आली की एकच झुंबड उडते. डोलीत बसलेले भोलेनाथ मान वाकवून भक्तांनी प्रेमानं अर्पण केलेले हार- तुरे, लाल-पिवळे शेले स्वीकारतात. डोली वाजतगाजत पुढच्या गावाकडं निघते. मजल दरमजल करत तब्बल पंधरा मैलांचा, डोंगरातला थकवणारा प्रवास करून डोली जेवायच्या वेळेपर्यंत पहिल्या मुक्कामाच्या, रांसी गावात पोहोचते. गावातल्या राकेश्वरी देवी मंदीरात मोठा सोहळा रंगतो. यथासांग पूजा-अर्चा, आरती झाल्यावर भक्तांसाठी भंडाऱ्याची (प्रसादाची) सोय होते. देव दर्शनाने आधीच तृप्त झालेले भक्तगण गरमागरम पुरीभाजी आणि शिऱ्याच्या प्रसादानं आणखिनच तृप्त होतात.

20250527_080151

सकाळी हिमशिखरांमागून सूर्यकिरणं डोकावली की वारी पुढच्या प्रवासाला निघते. उकाड्यानं कासावीस झालेल्या वारकऱ्यांसाठी बुरांश फुलांच्या किंवा माल्ट्याच्या (संत्र्याच्या) शीत पेयांची सोय होते. निसर्गही ठिकठिकाणी झऱ्यांचं गार पाणी आणि रानमेवा पुरवून आपल्या परीनं वारकऱ्यांचा श्रमपरिहार करतो. बाजूच्या खोल दरीतून मध्यमहेश्वर गंगा वारीला सतत सोबत करत असते. जंगलातून जाणारी, चढ उतारांची, फरसबंदी वाट दुपारपर्यंत वारीला गौंडार गावात आणून सोडते. आजचा पाहुणचार भोलेनाथांना याच गावात मिळणार असतो.

20250527_075636-COLLAGE

20250527_094038

20250527_080610

20250527_093716

उजाडू लागताच वारकरी आता शेवटच्या टप्प्यासाठी सज्ज होतात. सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते. छोटी वनतोली, वनतोली, खड्डरा, नानू ही गावं भराभर मागं पडतात. आता खडा चढ सुरू होतो. उत्साहानं वारीत सामील झालेले नवखे भक्त धापा टाकत मागे पडू लागतात. शेवटच्या काही मैलात घनदाट अरण्य, वारकऱ्यांच्या आणि भोलेनाथांच्या डोक्यावर दाट सावलीचे छत्र धरते.

20250527_080758

20250527_094816

20250527_081244

सकाळचे साडे दहा उलटून गेलेले असतात. मध्यमहेश्वर मंदिराच्या अलीकडे चार पाच फर्लांगावर आदल्या दिवशीच येऊन बसलेले गावकरी आणि बाहेरून आलेली मंडळी पहाटे पाच पासून वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. मंदिरातले दोनेक मुख्य पुजारी सोडल्यास पूर्ण गाव रिकामे केलेले असते. भोलेनाथांच्या आगमनाआधी गावात कुणीही थांबू नये असा कडक नियम असतो. उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतांना दुरून ढोल, डमरू आणि रणशिंगाचे आवाज ऐकू येऊ लागतात. अचानक उत्साहाचे उधाण येते. “ हर हर महादेव!” जय भोले!” असा जयघोष होतो. एवढ्या उंचावर येता येता बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.

अतिप्राचीन, काळया पाषाणात घडवलेले मध्यमहेश्वराचे देऊळ भगव्या झेंडूच्या माळांनी मढवून सुशोभित केलेले असते. शंभू महादेव आनंदात आपल्या “समर हॉलिडे होम” मध्ये स्थानापन्न होतात. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळते. सहा महिने शांत, निर्मनुष्य असलेले मध्यमहेश्वर शिवस्तुतिच्या गजरात दुमदुमू लागते.

मध्यमहेश्वर
20250527_092904

बुढ्ढा मध्यमहेश्वर
20250527_091637

  • Log in or register to post comments
  • 5553 views
💬 प्रतिसाद
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा