अमेरिकेचे अध्यक्ष

नमस्कार मंडळी,

भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे आज, २० जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतील. अमेरिकेचे अध्यक्ष आणि संबंधित विषयांमध्ये मला भलताच रस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या विषयावर सगळी एकत्रित माहिती मिपावर असावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. लिहिण्यासारखे खूप काही आहे. मात्र सगळे काही आजच लिहिले तर हा धागा विनाकारण लांबलचक होईल म्हणून आज पहिले पाच मुद्दे लिहिणार आहे आणि साधारण दर दोन दिवसांनी एक नवा मुद्दा प्रतिसादांच्या स्वरूपात लिहिणार आहे. ही सगळी माहिती मी वेगवेगळ्या स्त्रोतांमधून वाचलेली किंवा बघितलेली आहे. या धाग्यात त्या माहितीचे एकत्र संकलन असणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या विषयावर वाचन/ युट्यूब किंवा अन्य ठिकाणी व्हिडिओ/डॉक्युमेंटरी बघणे चालूच असते. त्यातून नवीनवी माहिती गोळा होत असते. जशीजशी नवी माहिती कळेल त्याप्रमाणे प्रतिसादांमधून ते लिहिणार आहे. त्यामुळे हा धागा तसा 'ऑनगोईंग' ठेवायचा प्रयत्न असेल.

सगळे मुद्दे आज लेखाला सुरवात करत असताना लिहित आहे तितक्यात खोलात जाऊन लिहायचा प्रयत्न असेल. तर करूया सुरवात-

मुद्दा १
आज डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील. एकसलग नसलेल्या दोन कारकिर्दींमध्ये अध्यक्षपद भूषविलेले ट्रम्प दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ग्रोव्हर क्लिव्हलँड हे १८८५ ते १८८९ आणि १८९३ ते १८९७ या काळात अनुक्रमे २२ वे आणि २४ वे अध्यक्ष होते. त्यानंतर २०१७ ते २०२१ या काळात ट्रम्प ४५ वे अध्यक्ष होते आणि आज २० जानेवारी २०२५ रोजी ते ४७ वे अध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेत आहेत. ग्रोव्हर क्लिव्हलँड आणि डॉनल्ड ट्रम्प यांचे नाव अध्यक्षांच्या यादीत दोनदा आल्याने ट्रम्प जरी ४७ वे अध्यक्ष असले तरी आतापर्यंत अध्यक्षपद ४५ व्यक्तींनीच भूषविले आहे.

Grover
ग्रोव्हर क्लिव्हलँड- २२ वे अध्यक्ष (१८८५ ते १८८९) आणि २४ वे अध्यक्ष (१८९३ ते १८९७)

१९३३ पूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ४ मार्चला शपथ घेत असत. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीनंतरचा चार महिन्यांचा कालावधी खूपच मोठा असल्याने, १९३७ मध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या दुसऱ्या कार्यकाळापासून शपथविधीची तारीख २० जानेवारी केली गेली. जर २० जानेवारीला रविवार असेल, तर अध्यक्ष त्या दिवशी खाजगी समारंभात शपथ घेतात आणि पुढील दिवशी सार्वजनिक समारंभ होतो. त्यामुळे जेम्स मनरो यांनी ५ मार्च १८२१ रोजी, झॅकेरी टेलर यांनी ५ मार्च १८४९ रोजी, ५ मार्च १८७७ रोजी रूदरफोर्ड हेस यांनी, ५ मार्च १९१७ रोजी वुड्रो विल्सन यांनी, २१ जानेवारी १९५७ रोजी ड्वाईट आयसेनहॉवर यांनी, २१ जानेवारी १९८५ रोजी रॉनाल्ड रेगन यांनी तर २१ जानेवारी २०१३ रोजी बराक ओबामा यांनी वॉशिंग्टन डी.सी मध्ये कॅपिटॉल इमारतीत परत एकदा सार्वजनिक समारंभात शपथ घेतली होती.

कडाक्याच्या थंडीमुळे डॉनल्ड ट्रम्प भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे आज रात्री शपथ घेतील तेव्हा तो समारंभ कॅपिटॉल इमारतीत उघड्यावर न होता आत घेण्यात येणार आहे अशी बातमी आहे. शपथ घेतल्यानंतर राष्ट्राला उद्देशून भाषण करतात ते कसे करणार आहेत ते बघायचे. कारण आतापर्यंत जे शपथग्रहण समारंभ टिव्हीवर बघितले आहेत त्यात आतापर्यंतच्या समारंभांमध्ये भरपूर लोक उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.. जर ट्रम्प राष्ट्राला उद्देशून भाषण बंद खोलीतून करणार असतील तर मग लोक बाहेर जमणार की स्क्रीनवर भाषण बघणार की कसे हे काही तासात कळेल.

मुद्दा २
अध्यक्ष त्या पदावर जास्तीतजास्त आठ वर्षे राहू शकतात असे आपल्याला वाटते. पण अध्यक्ष त्या पदावर जास्तीतजास्त दहा वर्षे राहू शकतात. त्याविषयीचा नियम असा की कोणीही व्यक्ती अध्यक्ष म्हणून जास्तीतजास्त दोनदा निवडली जाऊ शकते. मात्र अध्यक्ष म्हणून निवडली न गेलेली पण अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेल्या कोणीही व्यक्तीने (अध्यक्षांच्या मृत्यूनंतर किंवा राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास तसे होते) तसा कार्यभार दोन पेक्षा अधिक वर्षे पाहिला असेल तर ती व्यक्ती अध्यक्षपदावर एकदाच निवडून जाऊ शकते.

जॉन केनेडींनी अध्यक्ष म्हणून आणि लिंडन जॉन्सन यांनी उपाध्यक्ष म्हणून २० जानेवारी १९६१ रोजी शपथ घेतली. केनेडींची हत्या झाल्यावर लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाले २२ नोव्हेंबर १९६३ रोजी. ते केनेडींचा उर्वरीत कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे २० जानेवारी १९६५ पर्यंत अध्यक्ष होते. हा काळ दोन वर्षांपेक्षा कमी होता. त्यामुळे ते आणखी दोनदा अध्यक्ष म्हणून निवडले जायला पात्र होते. १९६४ ची निवडणुक ते जिंकले आणि १९६८ ची निवडणुक लढवायलाही ते पात्र होते. सुरवातीच्या प्रायमरी त्यांनी लढविल्याही होत्या. मात्र व्हिएटनाम युध्दामुळे जनतेत असलेल्या नाराजीमुळे आपण निवडून येणे तितके सोपे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी १९६८ मध्ये निवडणुक लढविणार नाही अशी घोषणा केली. समजा ते १९६८ ची निवडणुक लढवून जिंकले असते तर ते २० जानेवारी १९७३ पर्यंत म्हणजे ९ वर्षे आणि जवळपास २ महिने अध्यक्ष राहिले असते.

Johnson
लिंडन जॉन्सन (३६ वे अध्यक्ष- १९६३ ते १९६९)

त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प तांत्रिकदृष्ट्या आणखी सहा वर्षे अध्यक्षपदावर राहू शकतील. आज २० जानेवारी २०२५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर २० जानेवारी २०२९ पर्यंत चार वर्षांची आपली कारकिर्द ते पूर्ण करू शकतातच. समजा २०२८ मध्ये जे.डी.व्हान्स किंवा अन्य कोणी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार बनेल त्याचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून समजा डॉनल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवली तर ते उपाध्यक्ष बनतील. त्यानंतर २० जानेवारी २०३१ रोजी २०२८ मध्ये निवडून आलेल्या अध्यक्षांनी राजीनामा दिला तर त्या जागी २० जानेवारी २०३१ ते २० जानेवारी २०३३ पर्यंत डॉनल्ड ट्रम्प राज्यघटनेच्या कोणत्याही तत्वाचे उल्लंघन न करता परत अध्यक्ष राहू शकतील. प्रत्यक्षात तसे होणे फारच कठीण असले तरी तांत्रिकदृष्ट्या तसे करता येणे शक्य आहे.

मुद्दा ३
पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी चार वर्षांच्या दोन कारकिर्दी झाल्यानंतर निवृत्ती स्विकारली आणि तिसर्‍या कारकिर्दीसाठी निवडणुक लढवली नाही. त्यामुळे अध्यक्षांनी जास्तीतजास्त दोन टर्म पदावर राहावे असा पायंडा पडला. मात्र तसा राज्यघटनेत नियम नव्हता. त्यामुळे आठ वर्षे त्या पदावर राहिल्यानंतर काही अध्यक्षांनी परत निवडणुक लढवली होती/ लढवायचा प्रयत्न केला होता.

१८६९ ते १८७७ या काळात आठ वर्षे अध्यक्षपदावर राहिल्यानंतर युलिसिस ग्रँट यांनी १८८० मध्ये प्रायमरी लढविल्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळविण्यात यश मिळाले नाही आणि रिपब्लिकन पक्षाने जेम्स गारफिल्ड यांना उमेदवारी दिली.

१९०१ ते १९०९ या काळात अध्यक्ष राहिलेल्या थिओडोर रूझवेल्ट यांनी १९१२ मध्ये निवडणुक लढवली. अर्थात ते १९०० च्या निवडणुकांमध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले नव्हते. सप्टेंबर १९०१ मध्ये विलिअम मॅकिन्ली यांची हत्या झाल्यानंतर ते अध्यक्षपदावर विराजमान झाले. म्हणजे त्यांनी पूर्ण ८ वर्षे नाही तरी साडेसात वर्षे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांनी १९१२ च्या निवडणुकांमध्ये विद्यमान अध्यक्ष रिपब्लिकन विलिअम हॉवर्ड टाफ्ट आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन यांच्या बरोबर स्वतःची प्रोग्रेसिव्ह पार्टी काढून निवडणुक लढवली. त्यात टाफ्ट आणि थिओडोर रूझवेल्ट या दोघांचाही पराभव झाला आणि वुड्रो विल्सन जिंकले. या निवडणुकांविषयी डेल कार्नेगींच्या How to win friends and influence people या पुस्तकातही उल्लेख आहे.

फ्रँकलीन रूझवेल्ट १९३२ आणि १९३६ च्या निवडणुकांमध्ये जिंकले. नोव्हेंबर १९४० मध्ये निवडणुक आली तेव्हा दुसरे महायुध्द सुरू झाले होते. तसेच १९२९ च्या महामंदीतून अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्ण सावरली होती असे नाही. त्या महामंदीतून सुटका करण्यासाठी फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी न्यू डील या नावाने नवे आर्थिक धोरण आणले होते. अशा स्थितीत सरकारी धोरणांमध्ये सातत्य ठेवायला आपणच अध्यक्षपदी राहिल्यास चांगले या उद्देशाने त्यांनी १९४० आणि १९४४ च्या निवडणुकाही लढवल्या.

१९५१ मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत २२ वी दुरूस्ती करून याआधीच्या मुद्द्यात उल्लेख केल्याप्रमाणे अध्यक्षांची कारकिर्द जास्तीतजास्त १० वर्षे किंवा दोनदा निवडून जाणे अशी मर्यादित करण्यात आली. ही घटनादुरूस्ती सुरवातीला १९४७ मध्ये संसदेत मांडण्यात आली आणि प्रत्यक्षात १९५१ मध्ये संमत करण्यात आली. ही घटनादुरूस्ती आणण्याचे कारण हिटलरसारखा क्रूरकर्मा लोकशाही मार्गाने आफ्रिकेतील कोणत्या बनाना रिपब्लिकमध्ये नाही तर जर्मनीसारख्या सुसंस्कृत देशातून पुढे आला. जे जर्मनीत झाले ते अमेरिकेतही व्हायला नको, कोणीही अध्यक्ष हुकुमशहा बनायला नको या उद्देशाने अध्यक्षांच्या कार्यकाळावर ही मर्यादा घालण्यात आली. अधिक काळ सत्तेत राहिलेला अध्यक्ष हुकुमशहा व्हायची शक्यता जास्त हे त्यामागचे कारण.

मुद्दा ४
अमेरिकेचे अध्यक्ष शपथ घेतात त्या शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे: I, (Name of the person), do solemnly swear (or affirm) that I will faithfully execute the office of the President of the United States and will to the best of my ability, preserve, protect and defend the constitution of the United States. So help me God. आतापर्यंत फ्रँकलीन पिअर्स (१४ वे अध्यक्ष- १८५३ ते १८५७) यांनीच do solemnly affirm अशी शपथ घेतली आहे. इतर सगळ्या अध्यक्षांनी do solemnly swear अशीच शपथ घेतली आहे. फ्रँकलीन पिअर्स हे क्वेकर या ख्रिश्चन पंथाचे होते आणि धार्मिक कारणांमुळे क्वेकर पंथीय व्यक्ती swear असे म्हणणे टाळत आल्या होत्या म्हणून फ्रँकलीन पिअर्स यांनी शपथ solemnly affirm म्हणून घेतली. मात्र रिचर्ड निक्सन हे पण क्वेकर असूनही त्यांनी solemnly swear अशीच शपथ घेतली होती.

काळाप्रमाणे या शपथेच्या स्वरूपात फरक झाले आहेत. सुरवातीच्या काळात शपथ देणारा "Do you (Name of the person) solemnly swear that you will faithfully execute the office of President of the United States...." असा प्रश्न विचारून शपथ घेणार्‍या अध्यक्षांनी केवळ I do किंवा I swear एवढेच म्हणणे अपेक्षित होते. १८८१ मध्ये अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्या हत्येनंतर चेस्टर आर्थर या त्यांच्या उपाध्यक्षांनी शपथ घेतली तेव्हा ते नुसते I do किंवा I swear असे न म्हणता "I will. So help me God" असे म्हणाले. तेव्हापासून So help me God हे चार शब्दही शपथेचा भाग करण्यात आले. अर्थात चेस्टर आर्थर यांनी नक्की ते चार शब्द उच्चारले. काहींच्या मते जॉर्ज वॉशिंग्टन आणि अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांनी शपथ घेतानाही ते शब्द उच्चारले होते. त्यामुळे नक्की कोणत्या अध्यक्षापासून ते चार शब्द शपथेचा भाग झाले याविषयी मतभेद आहेत.

त्यानंतर शपथ आताच्या स्वरूपात- म्हणजे Do you अशी प्रश्नार्थक सुरवात न करता थेट I... पासून सुरवात केली जाऊ लागली आणि शपथ देणार्‍याने एक वाक्य म्हणायचे आणि ते शपथ घेणार्‍या अध्यक्षांनी जसेच्या तसे म्हणायचे या प्रकारची सुरवात झाली. त्यातही थोडेफार फरक करण्यात आले होते. उदाहरणार्थ १९३३ मध्ये अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्टना शपथ देताना मुख्य न्यायाधीश चार्ल्स ह्युजेस यांनी पूर्ण शपथ म्हटली आणि मग अध्यक्षांनी परत तीच शपथ म्हटली. १९६१ मध्ये जॉन केनेडींना शपथ देताना मुख्य न्यायाधीशांनी You John Fitzerald Kennedy do solemnly swear... अशी द्वितीय पुरूषी सुरवात केली. मग जॉन केनेडींनी "I, John Fitzerald Kennedy do solemnly swear..." अशाप्रकारे एकेक वाक्य म्हटले.

अध्यक्ष शपथ घेताना उजवा हात कोपरापासून ९० अंशात उंचावतात. त्यांची पत्नी (आणि पत्नी नसल्यास बहिण किंवा अन्य कोणी स्त्री नातेवाईक) हातात बायबल धरतात. त्या स्त्री नातेवाईकास 'फर्स्ट लेडी' म्हणतात. अजूनपर्यंत अध्यक्षपदावर कोणी स्त्री आलेली नाही. मात्र राज्यांच्या गव्हर्नर पदावर स्त्रिया आलेल्या आहेत. त्यांच्या शपथेच्या वेळेस त्यांचे पती असे बायबल हातात धरतात आणि त्यांना 'फर्स्ट जंटलमन' असे म्हणतात. त्या बायबलवर अध्यक्ष आपला डावा हात ठेवतात आणि शपथ घेतात. अर्थात असे बायबल वापरणे बंधनकारक नाही. १८०१ मध्ये थॉमस जेफरसन, १९०१ मध्ये थिओडोर रूझवेल्ट आणि १९२३ मध्ये केल्व्हिन कुलीज यांनी बायबलचा वापर केला नव्हता. तर १८२५ मध्ये जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांनी कायद्याचे पुस्तक वापरले होते. त्यामुळे भविष्यात ख्रिस्ती नसलेला अध्यक्ष झाल्यास तसा काही प्रश्न येणार नाही.
Trump inauguration
डॉनल्ड ट्रम्प यांचे शपथग्रहण (२० जानेवारी २०१७)

२००९ मध्ये बराक ओबामांनी अध्यक्षपदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी शपथेच्या मजकुरातील शब्द उच्चारताना क्रमात चूक केली आणि ते चुकून I, Barak Hussein Obama , do solemnly swear that I will execute the office of the President of the United States faithfully असे म्हणाले होते. म्हणजे faithfully हा शब्द त्यांनी शेवटी उच्चारला होता. त्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये एका खाजगी समारंभात परत एकदा शपथ देण्यात आली होती.

१९३३ मधील फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी शपथ घेतल्यापासून २०२१ मधील जो बायडन यांनी शपथ घेतल्यापर्यंत सगळ्या अध्यक्षांनी घेतलेल्या शपथा युट्यूबवर https://youtu.be/MCl3iD50ofk?si=355ig7osfzKiHg1d इथे बघता येतील.

मुद्दा ५
अध्यक्षांना शपथ कोणी द्यावी याविषयी काहीही नियम नाहीत. सामान्यतः अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश अध्यक्षांना शपथ देतात मात्र त्यांनीच शपथ द्यायला हवी असा नियम नाही. २२ नोव्हेंबर १९६३ रोजी जॉन केनेडींची टेक्सस राज्यात डॅलस येथे हत्या झाली. त्यावेळेस उपाध्यक्ष लिंडन जॉन्सनही डॅलस येथेच होते. अध्यक्ष म्हणून लिंडन जॉन्सन यांनी लवकरात लवकर शपथ घेणे गरजेचे होते. त्यामुळे केनेडींचे निधन झाले हे डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर ९० मिनिटात डॅलस विमानतळावर अमेरिका सरकारकडून अध्यक्षांना दिल्या जाणार्‍या विमानात (एअरफोर्स वन) डॅलसच्या स्थानिक न्यायालयातील न्यायाधीश सारा ह्युजेस यांनी लिंडन जॉन्सनना अध्यक्षपदाची शपथ दिली होती आणि नवे अध्यक्ष म्हणून लिंडन जॉन्सन वॉशिंग्टनला परतले.
Johnson
लिंडन जॉन्सन एअरफोर्स वनमध्ये शपथ घेताना (२२ नोव्हेंबर १९६३)

त्याव्यतिरिक्त इतरही अनेक अध्यक्षांना मुख्य न्यायाधीश सोडून इतरांनी शपथ दिली होती. सगळ्यात रोचक उदाहरण आहे अध्यक्ष केल्व्हिन कुलीज यांचे. १९२१ मध्ये वॉरन हार्डिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि केल्व्हिन कुलीज यांनी उपाध्यक्षपदाची. १९२३ मध्ये अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांचे सॅन फ्रान्सिस्को येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यावेळेस उपाध्यक्ष केल्व्हिन कुलीज व्हरमाँट राज्यातील प्लायमाऊथ नॉच या ठिकाणी आपल्या घरी होते. त्यांच्या घरी वीज नव्हती आणि फोनही नव्हता. त्यामुळे अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांचे निधन झाल्याची बातमी त्यांना एका निरोप्याकरवी रात्री उशीरा कळविण्यात आली. मग त्यांनी रात्री पावणेतीनला आपल्या घरीच अध्यक्षपदाची शपथ घेतली. आणि त्यांना शपथ देणारे कोण होते? तर त्यांचे वडील जॉन कुलीज. त्यांचे वडील व्हरमाँटमध्ये एका स्थानिक न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश आणि पब्लिक नोटरी होते.

त्याचप्रमाणे १९०१ मध्ये अध्यक्ष विलिअम मॅकिनली यांच्यावर न्यू यॉर्क राज्यात बफेलो या शहरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांचे निधन झाले. अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर उपाध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांना बफेलो येथेच स्थानिक न्यायाधीशांनी शपथ दिली.

अध्यक्षांना मुख्य न्यायाधीश सोडून अन्य न्यायाधीशांनी शपथ द्यायचे इतर प्रसंगही आहेत. त्याविषयी परत कधीतरी.