गेले काही दिवस सर्वत्र गोव्यातील पर्यटनावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
मुळात गोव्यात येणारे पर्यटक खरोखरच मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत की राज्य सरकार म्हणते त्याप्रमाणे या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून सर्व काही ठीक आहे. जर सगळं सुरळीत चालू आहे तर एकाएकी विरोधी सूर का?
जर पर्यटकांची संख्या रोडावली असेल तर खरी कारणे कोणती असतील?
वेगवेगळ्या ब्लॉगर व यू ट्यूबर यांनी दिलेली काही कारणे अशी:
१ भारतातून सगळ्याच भागातून/ शहरांतून थेट रेल्वे गाड्या आणि उड्डाणे नाहीत. उड्डाणे बदलून जायचं तर वेळ फार मोडतो आणि तिकिटही महाग पडतं. यापेक्षा बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका याच पैशात जाता येईल.
२ हॉटेल चे महागडे दर. यापेक्षा बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका येथे याच पैशात चांगली हॉटेल्स आहेत
३ स्थानिक वाहतूक भयंकर महागडी आणि स्थानिक टॅक्सी संघटनांची दादागिरी व एकाधिकारशाही. ओला उंबर वगैरेंना हाकलून दिले आहे
४ अनेक हॉटेल्स व शॅक्स मध्ये मनमानी दर आणि सुखसोयींचा अभाव तसेच हॉटेल व्यावसायिकांची दादागिरी व प्रसंगी पर्यटकांना मारहाण
५ अनेक रेस्टॉरंट, बार व पब्ज मध्ये फसवणूक
६ भाड्याने मिळणाऱ्या वाहनांच्या मालकांकडून फसवणूक व दादागिरी
गोव्याच्या खर्चात परदेशी गेल्याचा आनंद म्हणून लोक गोव्यात न जाता बॅंकॉक, व्हिएतनाम, श्रीलंका येथे जात असावेत हे तितकसं पटत नाही कारण ही परिस्थिती अनेक वर्षे आहे आणि आजही भारतात सहली काढणाऱ्या यात्रा कंपन्या चांगला व्यवसाय करत आहेत. काश्मीर, हिमाचल, केरळ वगैरे ठिकाणी सुद्धा सगळ्या शहरांतून थेट विमानसेवा नाही आणि उड्डाणे बदलून जायचं तर वेळ फार मोडतो आणि तिकिटही महाग पडतं तरीही लोक मोठ्या संख्येने जातात.
कदाचित परदेशी पर्यटकांची सरबराई करताना भारतीय पर्यटकांना दुय्यम वागणूक, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, स्थानिकांची अरेरावी व पर्यटकांची फसवणूक ही कारणे असतील तर कठीण आहे. उद्या हेच अन्य पर्यटन स्थळांच्या बाबतीत घडू शकेल आणि पर्यटनाधारित अर्थकारण कोलमडून पडेल
मिपाकरांनी आपले अनुभव वा मत सांगावे