हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे

यापूर्वीचा भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग १

काल रात्री छान झोप झाली . बंगल्यात गरम पाण्याची तसेच शॉवर वगैरेला चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होती . (नळ उघडताच प्रेशर पंप सुरु होत असावा )
आजच्या कार्यक्रमाविषयी 'चाय पे चर्चा'

येथील डायनिंग टेबलचा उपयोग टेबल टेनिसचा खेळ खेळण्यासही उपयोगात आणता येत होता . थोडासा खेळण्याचा प्रयत्न करून पहिला .

नाश्त्यासाठी थोडा फेरफटका मारून यायचे ठरले . दोन्ही बाजुंनी झाडी, उतरत्या छपराची जुनी घरे , अंगणात फुलांचा बगीचा , कुठे एखादी छोटीशी विहीर अशा मस्त वातावरणात चालायला खूप छान वाटत होते .

साधारण तासाभराने परत आलो तोपर्यंत आमची भटकंतीसाठी ठरवलेली स्विफ्ट डिझायर गाडी येऊन उभीच होती . दहाला बंगला सोडून बाहेर पडलो .

थोड्याच वेळात कार्मोना समुद्रकिनारी पोहचलो. कार्मोना हे गोव्यातील सालसेट जिल्ह्यातील एक गांव. येथील किनारा कमी गजबजलेला , अतिशय शांत व स्वच्छ आहे . यालाच झालोर किंवा झालोर-कार्मोना बीच नावानेही ओळखले जाते . हलकी सोनेरी बारीक मुलायम वाळू , अतिशय स्वच्छ व निळसर उबदार पाणी हि येथील वैशिष्ट्य .
याच कारणांनी विदेशी पर्यटक इकडे आकर्षित होत असावेत. नोव्हेंबर पासून अनेक विदेशी पर्यटक दक्षिण गोव्याच्या किनारी असलेल्या हॉटेल्स किंवा घरांमध्येही वास्तव्यास येतात . नुकताच सिझन सुरु झाला असल्याने या किनारीही पर्यटक दाखल झालेले दिसले .समुद्र किनारी असलेल्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या हॉटेल समोरील बेडवर किंवा वाळूत हे पर्यटक सूर्यस्नान घेत होते . बिकिनीतल्या काही गौर वर्णीय ललना ऊन अंगावर घेत मुलायम वाळूत किनाऱ्याने फेऱ्या मारतांना दिसत होत्या. किनाऱ्यावर पोहचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नसावी किंवा अन्य काही कारण असावे पण आमच्याशिवाय स्थानिक पर्यटक येथे दिसलेच नाहीत .
आम्हीही थोडेसे किनाऱ्यावर फिरून आलो .

काही काळासाठी तट रक्षकाची खुर्ची व छत्री बळकावली .

किनाऱ्यावर सूर्यस्नानासाठी असलेल्या खुर्चीवर बसून लिंबू सोडा घेतला .

बियरचे घोट आणि नेत्रसुख. चेहरे किती खुलले बघा .

अर्धा पाऊणतास थांबून अजून दक्षिणेकडे निघालो . रस्त्याने वऱका, कॅव्हेलोसिम, बेतूल अशी समुद्र किनारे असलेली अनेक ठिकाणे लागली पण आजच्या प्रवासाच्या काळात शक्य होईल इतकीच ठिकाणे बघायची असल्याने थेट 'काबो दी रामा' किल्ला गाठला . या किल्ल्याविषयी मी काय लिहू ? मिपा सदस्य टर्मीनेटर यांनी पूर्वीच या ठिकाणाची सुंदर ओळख करून दिलेली आहे .
येथे वाचू शकता
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

माझ्या काही फोटोंमधूनच किल्ला फिरून येऊया .

माहिती फलक

किल्ल्याच्या बाजूने पूर्वी खंदक होता . कठडे असलेल्या पुलावरून आपण प्रवेश द्वाराजवळ येतो


ग्रुपमधील कोणा एकाचे आधार कार्ड दाखवल्यावर, अ .क्र , प्रवेशाची वेळ वगैरेची रजिस्टर मध्ये नोंद केली जाते . आपला क्रमांक लक्षात ठेवायचा . जातांना बाहेर पडल्याची वेळ लिहिण्यास याची मदत होते .
जागोजागी पडलेल्या तोफा

बुरुजाकडे जाण्याचा मार्ग

बुरुज

बाजूच्या तटबंदीवरुन दिसणारा निसर्ग

चर्चची इमारत

चर्चच्या बाजूने खाली उतरत जाणारी पायऱ्यांची वाट आहे जी पेबल बीचवर जाते

अर्ध्या वाटेत

इतर सर्व किनाऱ्यांवर दिसणारी मुलायम वाळू येथे नाही . दगड गोटे असलेला हा सुंदर पेबल बीच . खडकांवर तोल सांभाळत चालतांना मजा येते .

थोडा वेळ येथील खडकांवरून सागराचे रूप नजरेत साठवून परत फिरलो . अ.क्र. सांगताच रजिस्टरमध्ये आमच्या परतीच्या वेळेची नोंद केल्या गेली . थोड्याच अंतरावर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलला चालकाने गाडी थांबवली .आम्हालाही भूक लागलेलीच होती . जेवून पुढे निघालो . (अंदाजाप्रमाणेच चालकाला यथे जेवण फुकट होते ) बाजूलाच एका कड्यावर 'केप गोवा' म्हणून महागडे हॉटेल आहे . येथून समुद्र किनाऱ्याचे सुंदर दर्शन होते . चालकाने आम्हाला खर्चात न पाडता हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या कड्यावर नेले . खूप सुंदर दृश्य होते .

थोडा वेळ येथे थांबून परत दक्षिणेस प्रवास सुरु केला . थोड्याच वेळात मुख्य रस्ता सोडून गाडी खडकाळ कच्च्या रस्त्याला लागली. जमिनीपासून कमी उंची असलेल्या गाड्या निश्चितच खडकांना आपटतील. साधारण दोन किमी अंतर पार करून आम्ही एका कड्यावर पोहचलो . सर्व गाड्या येथेच पार्क केल्या जातात . काही खाद्य पदार्थांची दुकानेही आहेत . येथून थोडे पुढे गेल्यावर किनाऱ्यावर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . हाच तो कोला बीच जेथे गोड्या पाण्याच्या नदीत कयाकिंग (kayaking) करता येते .

तिकिटाचे दर सध्या वाढलेले आहेत . आठशे रुपये प्रति होडी , दोघांकरिता . थोडी घासाघीस करून दोन होड्यांचे १ ४ ० ० /- रुपये दिले .
पाणी नदीसारखे दिसत असले तरी ते एखाद्या सरोवराचे पाणी येथपर्यंत वाहून येत असावे व ते थेट समुद्रात विलीन होत नसल्याने भरतीचे पाणी यात मिसळत नाही व हे पाणी गोडेच राहते.

सुरुवातीला वल्हे मारायला नीट जमत नव्हते . दोघांचा ताळमेळही जमत नव्हता . त्यामुळे होडी कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जास्तच वळत होती . पण हळूहळू ताळमेळ जमला. पाणी अगदीच उथळ आहे . त्यामुळे पडलो तरी भीती नाही . दोन्ही किनाऱ्यावर ताड - माडाची सुंदर झाडे व त्यामधून स्वत : वल्हवत होडी चालवायची मजाच निराळी .

एक फेरा मारून आलो पण मन भरले नाही . परत एक फेरा मारला . थोडी गर्दी कमी झाली होती त्यामुळे होडीवालेही घाई करत नव्हते . आजचा हा एक वेगळाच अनुभव होता . कड्याच्या पायऱ्या चढतांना थोडी दमछाक झाली . वर आल्यावर लिंबूसोडा , शहाळ्याचे पाणी घेतले व पुढचा प्रवास सुरु केला. पाळोळेच्या साधारण पाच किमी आधी अगोंदा आले . येथील बीच खूप सुंदर आहे असे ऐकले होते पण आज आमच्याकडे वेळ नव्हता . सूर्यास्ताच्या आधी पाळोळे येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे होते . ठरल्याप्रमाणे साडे पाचला आम्ही "Marron Sea View' रिसॉर्टला पोहचलो .
गाडीचे आजचे भाडे ऐंशी किमी साठी २ ६ ० ० /- ठरले होते पण हे लोक परतीचेही अंतर मोजतात त्यामुळे २ ५ किमी जास्त भरले . त्यासाठी वेगळे ५ ० ० रुपये चुकते करून गाडी सोडली . स्वागत कक्षात आवश्यक त्या नोंदी करून रूमवर आलो .
आम्ही सी व्ह्यू कॉटेज निवडल्या होत्या . समुद्राच्या बाजूने खोलीला संपूर्ण काच होती . तेथील दरवाजा उघडून बाहेर आलो तर अगदी बिचवरच पोचल्याचा अनुभव आला .
सूर्य अस्ताला जात होता .

पर्यटक अगदी रूमच्या समोर बसून सूर्यास्ताची मजा अनुभवत होते .

मुलांचा खेळ रंगात आला होता . छोटा गोलकिपर तडफेने समोरून आलेले फूटबॉल चे आक्रमण परतवून लावत होता .

आम्ही कितीतरी वेळ तेथेच बसून सूर्यास्त व सुंदर किनारा न्याहाळत बसलो. त्यांनतर रूममध्ये येऊन थोडे ताजेतवाने झालो व थोड्या वेळात परत बाहेर आलो . अंधार पडायला सुरुवात झाली होती .
किनाऱ्यावर वाळूतच जेवणाचे टेबल मांडल्या गेले. कंदिलात पेटलेल्या मेणबत्या उजळू लागल्या . थोड्या वेळात संपूर्ण किनाराच दिव्यांच्या उजेडात झगमगू लागला .
पेले भरल्या गेले .

जेवणाचा खर्च खोलीच्या बिलात समाविष्ट नसल्याने कोठेही जाऊन जेवलो तर चालणार होते पण आता परत कुठे बाहेर पडायची इच्छा नव्हती . येथेच जेवलो आणि खूप वेळ गप्पा मारून रात्री अकराच्या दरम्यान झोपायला गेलो.

क्रमश :

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ