सावध असा !
काल नांदेड सिटी ते माझे घर [मुकुंदनगर] अशी उबर रिक्षा केली होती. ठरल्या लोकेशन ला रिक्षा आली. ड्रायवर चांगलाच आडदांड होता. otp त्याला दिल्यावर तो निघेल अशी अपेक्षा होती. तरी तो मिनिटभर थांबलेला होता, आणि मोबाईल मध्ये तो काहीतरी करत होता. मग तो निघाला. म्हणाला "उबेर परवडत नाही, आम्हाला खूप कमी पैसे मिळतात:" मी काहीच बोललो नाही.
आता नांदेड सिटी ते मुकुंदनगर हा सरळ रस्ता आहे, निदान दांडेकर पुलापर्यंत तरी, पण त्याने रिक्षा धायरी ब्रिज वरन न नेता डावीकडे खाली प्रयेजा कडे रस्ता जातो तिथे नेली. आतापर्यंत मोबाईल मध्ये चॅट करत असेलेला मी मग आता अलर्ट झालो. त्याचा मॅप्स वारजे कडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता सुचवत होते. मग मी त्याला गोड बोलून पुन्हा सिहंगड रस्त्याला रिक्षा आणायला लावली आणि स्वतः रस्ता दाखवू लागलो. "उबेर परवडत नाही, कमी पैसे मिळतात" , "अहो सर तुम्ही कुठले लोकेशन टाकलाय" अशी त्याची किरकिर चालूच होती. ड्रायवर मुळातच आडदांड होता, आणि हा लोकेशन ट्रॅप पूर्ण झाली की कटकट करणार, मनगटशाही करणार हे मला जाणवू लागले.
तितक्यात मला क्लायंटचे दोन फोन आले, मग त्याचा वापर करून मी पोलीस खात्याशी संबंधित आहे हे मुद्दाम त्याला जाणवेल असे बोललो. माझा संबंध पोलीस, कायदा याच्याशी आहे हे जाणवल्यावर तो जरा गडबडला आणि त्याची किरकिर कमी झाली. मग मीच त्याला म्हणालो, "दादा तुमचे उबेरचे जितके पैसे होतील ते मी देईन , काळजी करू नका".
माझ्या फोन वरच्या बोलण्याचा परिणाम चांगलाच झालेला होता. ड्रॉप लोकेशन ला त्याला झालेले पैसे ट्रान्स्फर केले , त्याने चुपचाप घेतले आणि मी घरी आलो.
आता माझे काही अंदाज :
१. उबेर , Ola कॅब चालकांना जे कमिशन देते त्यावर ते समाधानी नसतात. म्हणून उबेर चे लोकेशन प्रवाशाने नीट टाकले असले तरी गुगल मॅप्स वर ते चुकीचे लोकेशन टाकून तुमची रिक्षा किंवा कार त्या रस्त्यावर न्यायची आणि "तुम्हीच चुकीचे लोकेशन टाकले म्हणून नंतर कटकट करायची आणि जास्त पैसे मागायचे असा नवीन फ्रॉड आहे अशी मला शंका आहे.
२. म्हणून तुम्ही उबेर , ओला केली की प्रवास सुरु झाला की सदा सावध असा. आपण प्रवास सुरु झाला की मोबाईल मध्ये किंवा गप्पात गुंततो. हे टाळाच टाळा.
३. शिवाय त्याच्या मोबाईल मध्ये दिसणारे ड्रॉप लोकेशन आणि आपण सिलेक्ट केलेले ड्रॉप लोकेशन बरोबर आहे ना बघा. प्रवासात मॅप वर दाखवत असलेला रस्त्यानेच आपण चाललो आहे ना हे सतत बघत असा.
४. चालक आला की एकंदर व्यक्तिमत्वाचा थोडा मनात आढावा घ्या, हा पुढे त्रासदायक ठरेल का , जर हो तर किती याचा आढावा घ्या.
५. साधारण प्रतिकार करू शकणार नाहीत असे , पांढरपेशे असे लोक ही लोक एका नजरेत ओळखतात, आणि अशा लोकांचीच ते असले खेळ खेळतात.
६. प्रवासात तुमच्या खाजगी, आर्थिक आणि वैयक्तिक गोष्टी वर चर्चा टाळाच टाळा.
७. चालकांबरोबर शारीरिक हाणामारीत उतरू नका त्यांना शिव्या देऊ नका. बहुतेक केसेस मध्ये ते तुम्हाला सहज लोळवतील आणि शिव्यांत हरवतील. कदाचित इतर चालक त्यांची बाजू घेतील आणि तुम्ही एकटेच असाल.
७. उबेर ओला अँप मध्ये एक आपत्कालीन बटन असते, त्याचा वापर करा.
७. एवढे होऊनही जर तुम्ही अशा वादात अडकलात तर सरळ पोलिस स्टेशन ला गाडी न्या.
टीप : मी आजवर हजारदा ओला उबेर ने प्रवास केलाय आणि एखाद दुसरा अपवाद वगळता, माझा अनुभव चांगलाच आहे.
माझा वरील अनुभव असा आहे म्हणून सरसकट सगळे उबेर ओला चालक असे असतात असा माझा आरोप नाही. पण इतरांनी सावध असावे म्हणून हा प्रपंच !