महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मिपावर लेख लिहावा अशी बर्याच सदस्यांनी सूचना केल्यामुळे दीर्घ कालावधीनंतर मिपावर लेख लिहीत आहे. एकूण २ लेख लिहिणार आहे. पहिल्या लेखात सद्यस्थिती व दुसर्या लेखात एका वेगळ्या प्रारूपानुसार माझे अंदाज देणार आहे.
_______________________________________________________________________________________
सद्यस्थिती -
राष्ट्रवादी (शप गट)
राष्ट्रवादी (शप गट) हा सर्वात हुशार पक्ष. हवेची दिशा ओळखणे व त्यानुसार आपली भूमिका वारंवार बदलून कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहणे यात शरद पवारांच्या जवळपासही कोणी येऊ शकत नाही. मध्यंतरी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन भाजप, काँग्रेस व उबाठा या पक्षांच्या पोटात गोळा आणला. वयाची ८४ वर्षे पूर्ण होत असताना शरीर थकले असूनही शरद पवारांचा उत्साह व महत्त्वाकांक्षा दुर्दम्य आहे. ते रोज नवीन गावात, शहरात असतात. उठा मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे घरात बसून होते. संपूर्ण राज्य कोरोनाच्या तडख्याने होरपळत असताना, प्रचंड रूग्णसंख्या असताना, लस व प्राणवायू टंचाई असताना, प्रचंड मृत्यू होत असूनही उठांची निद्रा भंग पावली नाही आणि त्यांचे शिलेदार प्रचंड भ्रष्टाचार करण्यात व्यग्र होते. त्या तुलनेत शरद पवार अथक हिंडत होते. भरपूर जागा लढवून थोड्या जिंकण्यापेक्षा हमखास निवडून येतील इत्क्याच जागा घेऊन निवडून आणणे हे त्यांनी अनेकदा करून दाखविले आहे. अगदी २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा कमी जागा लढूनही पवारांनी काँग्रेसच्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये सुद्धा पवारांनी लोकसभेच्या फक्त १० जागा घेऊन ८ जिंकल्या तर उबाठाने हट्टाने २१ जागा घेऊन फक्त ९ जिंकल्या. या विधानसभा निवडणुकीतही पवार ८७ म्हणजे सर्वात कमी जागा लढवित आहे.
वस्तुतः २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर होते. परंतु फडणवीसांनी भाजपतील प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढताना स्वपक्ष ठिसूळ करून ठेवला. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या पाठिंब्यासाठी फडणवीसांनी या दोन्ही पक्षांना प्राणवायू पुरवून जिवंत ठेवले. अजित पवार, शरद पवार, आव्हाड, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, ठाकरे, राऊत, परब, वायकर अश्यांची प्रकरणे बाहेर आणून तडीस नेली असती तर हे पक्ष आज राजकारणात दिसले नसते. परंतु स्वपक्षात अने शत्रू निर्माण करून भविष्यातील पाठिंब्यासाठी फडणवीसांनी विरोधी पक्षातील भ्रष्ट व गुन्हेगारांना कायदेशीर संरक्षण देऊन वाचविले. नुकतेच फडणवीसांनी मान्य केले की सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर माजी गृहमंत्री आर आर पाटीलांनी सही केली होती व त्यावर फक्त मुख्यमंत्र्यांची सही व्हायची होती. अजित पवारांना बोलावून फडणवीसांनी ती फाईल दाखविली. ती चौकशी सुरू न करण्याच्या बदल्यात पाठिंब्याचे आश्वासन मिळाले असणार. सरकारी गुप्त फाईल संशयिताला दाखविणे हा मुख्यमंत्रीपदाचे पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग होता.
____________________________________________________________________
काँग्रेस
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अचानक नवसंजीवनी मिळाली, स्थानिक नेतृत्व दुर्बल असूनही लढविलेल्या १८ पैकी १४ जागा जिंकताना जवळपास १८% मते मिळविली. विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे. लोकसभेत मिळालेले अचानक यश काँग्रेसला पचविता आले नाही. जागावाटपात पुन्हा एकदा ठाकरेंनी दांडगाई करून ताकदीपेक्षा खूप जास्त जागा (म्हणजे ९६) पदरात पाडून घेतल्या व काँग्रेसला जेमेतेम १०२ जागांवर समाधान मानावे लागले. अर्थात जास्त जागा उबाठाला मिळाल्या म्हणून त्या उबाठा जिंकणार असे अजिबात नाही. काँग्रेस चरफडत या जागा पाडणार. काँग्रेसने १०२ ऐवजी किमान १२५-१३० जागा घ्यायला हव्या होत्या.
काँग्रेसने जागावाटपात माती खाल्ली. लोकसभा निवडणुकीत चकदात कामगिरी करूनही फालतू कामगिरी करणार्या उबाठासमोर नांगी टाकली. काँग्रेस फक्त १०२ जागा लढवित आहे तर उबाठाने हट्टाने जवळपास तेवढ्याच म्हणजे ९६ जागा हिसकावून घेतल्या आणि काँग्रेस नेते हताशपणे उबाठाची दांडगाई सहन करीत बसले. उत्तर कोल्हापूरमध्ये मधुरिमा भोसलेंना शेवटच्या क्षणी माघार घ्यायला लावून आपला मूर्खपणा उघड केला.
काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असण्याची बरीच शक्यता आहे, मविआचे सरकार निर्माण होत असेल तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होतील. शरद पवार योग्य वाटाघाटी करून काही काळ काँग्रेसचा मुख्यमंत्री व काही काळ सुप्रिया सुळे मुख्यमंत्री असे काहीतरी मान्य करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
____________________________________________________________________
ऊबाठा गट
शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे. आता शिवसेनेचा मोठा तुकडा शिंदेंबरोबर गेला आहे. या पक्षाला आजवरच्या इतिहासात कधीही कोणतीही विचारसरणी, तत्वे, धोरण, ध्येय, योजना वगैरे नव्हते. दांडगाई, फुशारक्या, कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे एवढेच त्यांनी आजवर केले आहे, २०१९ मध्ये अगदी सहज ३० वर्षांची युती तोडून ते कोंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले. तसे करताना नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना काहीही वावगे वाटले नाह. ज्या सहजतेने ते शिवाजी महाराजांचे नाव घेतात त्याच सहजतेने ते मुस्लिम लीगबरोबर युती करतात आणि अबू आझमीचाही प्रचार करतात., उद्या ते पुन्हा एकदा भाजपचरणी रूजू झाल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी करूनही विधानसभेसाठी तब्बल ९६ जागा हिसकावून घेण्यात उठा यशस्वी झाले हे कौतुकास्पद आहे. शिवसेनेची शिडी वापरून आपण फायदा करून घेऊ या भ्रमात कायम राष्ट्रीय पक्ष राहतात आणि शिवसेनेच्या दांडगाईसमोर मान तुकवून आपलेच नुकसान करून घेतात.
____________________________________________________________________
मनसे
भाजपविरूद्ध असलेल्या नाराजीचा काहिसा लाभ मनसेला होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये मनसेला जेमतेम एक दीड टक्क मते मिळून फक्त १ आमदार निवडून आणता आला होता. या निवडणुकीत मविआविरोधात असलेले परंतु युतीवर नाराज असलेले काही मतदार पर्याय म्हणून मनसेला मत देण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी काही मतदारसंघात एकनाथ शिंदेंची मदत मागितली आह. माहीम व शिवडी मतदारसंघात भाजपने मनसे उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. दोन्ही आघाड्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही, भाजपच्या मदतीने आपले ५-७ आमदार निवडून आणायचे, आपल्या मदतीशिवाय कोणतेही सरकार बनू शकणार नाही व पाठिंब्याची किंमत म्हणून मुलाला मंत्रीपद मागून घ्यायचे व मुलाचे राजकरणात बस्तान बसवायचे अशी राज ठाकरेंची योजना असावी.
____________________________________________________________________
भाजप
२०१४ मध्ये लोकसभेत भाजपने स्वबळावर बहुमत मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास खूप वाढलेला होता. महाराष्ट्रात आपल्याला जास्त मते असूनही विनाकारण शिवसेनेला खूप जास्त जागी सोडणे व शिवसेनेची मुजोरी सहन करणे हा आपला मूर्खपणा होता हे मोदी-शहांच्या लक्षात आले होते. १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेतील काही थोडक्या प्रभागांपलिकडे उर्वरीत महाराष्ट्रात अजिबात स्थान नसलेल्या शिवसेनेला आपल्यापेक्षा मोठे स्थान आपणच मोठे केले व ती घोडचूक आता पुन्हा करायची नाही असा निश्चय करून मोदी-शहांनी सेनेला फारशी किंमत न देता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला होता. २०१४ ची विधानसभा निवडणूक सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढली. भाजपने आपल्या मानेवरील सेनेचे जोखड मानेवरून फेकून दिल्याने भाजप अत्यंत आत्मविश्वासाने निवडणूक लढली व सर्वाधिक मते व सर्वाधिक जागा जिंकून भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष झाला. शिवसेनेही जवळपास सर्व जागा लढवून ६३ जागा जिंकून दुसर्या क्रमांकाचा पक्ष झाला. यात गोम अशी होती काँग्रेस-राष्ट्रवादीला १९९९ प्रमाणे सत्तास्थापनेची कोणतीही संधी मिळू नये यासाठी भाजपने स्वतः दुर्बल असलेल्या काही मतदारसंघात गुपचूप शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करून जिंकायला मदत केली होती. अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित ८३ ऐवजी १०० च्या पुढे गेले असते व शिवसेना ४० पेक्षा कमी राहून काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केला असता. २०१९ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रावादीने एकत्रित ९८ जागा मिळविल्यानंतर धूर्त खेळी करून सत्ता मिळविली व भाजपला १०५ जागा असूनही हात चोळत विरोधी बांकावर बसावे लागले. २०१४ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित ८३ ऐवजी १०० पर्यंत पोहोचले असते तर नक्कीच भाजपला सत्तेत येऊ दिले नसते.
१० वर्षांनंतर परिस्थिती पूर्ण पालटली आहे. स्वतःच्या अनेक घोडचुकांमुळे आत्मविश्वास हरपलेल्या भाजपने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न केव्हाच सोडले असून मित्रपक्षांना झुकते माप देऊन स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीही गरज नसताना १९९० मध्ये युती करून भाजपने १९८५ मध्ये जिंकलेल्या १६ पैकी ४ जागा शिवसेनेला मुर्खासारख्या देऊन टाकल्या. २००९ मध्ये ५ वेळा जिंकलेला गुहागर व ठाणे जिल्ह्यातील अजून एक मतदारसंघ देऊन टाकला. २०१९ लोकसभा निवडणुकीत अनेक वेळा जिंकलेला पालघर सेनेला देऊन टाकला. विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण देऊन टाकला. २०२४ मध्ये १९८० पासून सातत्याने निवडणूक लढलेला व अनेकदा जिंकलेला मुंडेंचा परळी व खडसेंचा मुक्ताईनगर देऊन टाकला. उत्तर कोल्हापूर मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर निवडून आले होते. २०१९ मध्ये ते पडले व काँग्रेसचा आमदार विजयी झाला. परंतु काही काळाने काँग्रेस आमदाराचे निधन झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिवंगत आमदारच्या पत्नीला उमेदवारी दिली ज्या ९७,००० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्याविरूद्ध भाजपच्या जयश्री जाधवांना ८०,००० मते मिळाली होती. अश्या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यायला हवा होता. परंतु आपले नुकसान करून नगण्य पक्षांना मदत करायची या भाजपच्या पारंपारिक धोरणामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाला देऊन टाकला.
अनेक वेळा जिंकलेले आपले हक्काचे मतदारसंघ मित्रपक्षांना देऊन टाकणे आणि कायम समर्थक राहिलेल्या समाजगटांना दुखविणे हे भाजपचे धोरण अनाकलनीय आहे. आत्मविश्वास हरपल्याची ही चिन्हे आहेत. मतदार आपल्याला धडा शिकविण्याच्या प्रतिक्षेत आहेत हे ओळखून सर्व २९ महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, लोकसभा पोटनिवडणूक या सर्व निवडणुका टाळल्या गेल्या. परिणामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका मतदारांनी दिला होता. परंतु त्यातून भाजपने काहीही शिकला नाही. त्याच घोडचुका अजूनही सुरू आहोत. अजित पवारांना बरोबर घेणे ही अतिशय गंभीर व अनावश्यक घोडचूक होती जी भाजपने २ वेळा केली आहे. अत्यंत गंभीर आरोप असलेल्या अनेक नेत्यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन भाजपत किंवा युतीत आणणे हे अनेक भाजप समर्थकांना अजिबात आवडलेले नाही. पवार, संजय राठोड, आव्हाड, मुश्रीफ, गवळी, जाधव, वायकर, राणे, ठाकरे, राऊत . . . अश्या अनेकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. काही जणांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन वाचविले. ब्राह्मणांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे जे वर्षानुवर्षे भाजपला डोळे झाकून मत देत होते. या सर्व चुकांची किंमत विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागणार आहे. उबाठा गट राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर मिसळून जाण्यात नेत्यांना व समर्थकांना काहीच समस्या आली नाही. अबू आझमीचा प्रचार उबाठा गट करतोय हे अगदी नैसर्गिक वाटतंय. तथापि अजित पवार गट भाजपबरोबर जाणे, अजित पवार गटाच्या व शिंदे गटातील पराकोटीच्या वादग्रस्त उमेदवारांना मत देणे भाजप समर्थकांना पचण्यासारखे नाही. अश्यांना मत देण्यापेक्षा ते कोणालाच मत देणार नाहीत किंवा त्यातल्या कमी तापदायक मनसे उमेदवाराला मत देतील.
महायुतीच्या यादीत काही अत्यंत वादग्रस्त उमेदवार आहेत. हसन मुश्रीफ, सना मलिक, नबाब मलिक, धनंजय मुंडे, नजीब मुल्ला, झिशान सिद्दिकी, अजित पवार, भुजबळ (अजित पवार गट), संजय राठोड, अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, नीलेश राणे (शिंदे गट), नितेश राणे (भाजप) हे यातील काही उमेदवार. कट्टर भाजप समर्थकांना यांना मत द्यावे लागणे हे कीव करण्यासारखे आहे. एकंदरीत सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी या उमेदवारांच्या बाबतीत भाजप समर्थकांची अवस्था झाली आहे.
कसब्यात आधी पडलेल्या रासनेंना पुन्हा उमेदवारी देण्यामागे एकच धोरण आहे. ते म्हणजे जागा हरली तरी चालेल पण बापट, घाटे, टिळक अश्या नावाच्या कोणालाही उमेदवारी उमेदवारी द्यायची नाही. पुण्यातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर व पर्वती या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. परंतु ब्राह्मणांना उमेदवारी द्यायची नाही हे धोरण असल्याने एकही ब्राह्मण उमेदवार नाही. लोकसभा निवडणुकीतही मतदारसंघात नाराजी हे कारण दाखवून पूनम महाजनांना उमेदवारी नाकारूण पराभव करून घेतला. परंतु दानवे, संजयकाका पाटील यांना मात्र उमेदवारी पुन्हा दिली. यामागे कारण एकच आहे. याविरूद्ध पुण्यात आवाज उठण्यास सुरूवात झाली आहे. कसब्यात पुन्हा एकदा पराभव होण्याची शक्यता आहे. कोथरूड सुद्धा जाऊ शकते. भाजपने आपले अनेक मतदारसंघ मित्रपक्षांना देण्याची घोडचूक केली आहे. परळी, धुळे (ग्रामीण), मुक्ताईनगर, हदपसर, वडगाव शेरी असे २०१४ आणि २०१९ मध्ये लढविलेले मतदारसंघ इतरंना देऊन टाकणे महागात जाणार आहे. पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युतीअसूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघ धोक्यात आहेत. बोरिवलीत उमेदवार बदलणे कदाचित महाग पडू शकते.
____________________________________________________________________
राष्ट्रवादी (अजित पवार गट)
राष्ट्रवादी (अजित पवार गट) हा सर्व प्रमुख पक्षातील सर्वात दुर्बल आहे. लोकसभा निवडणुकीत जेमेतेम १ खासदार निवडून आला. बहुसंख्य आमदार बरोबर आले असले तरी काकांनी हार न मानता जोरदार प्रचार करून बहुसंख्य मतदार आपलयाबरोबर आहेत हे दाखवून दिले. जुलै २०२३ मध्ये अजित पवारांना युतीत आणणे ही भाजपने पुन्हा एकदा केलेली अत्यंत गंभीर घोडचूक होती. अनेक भाजप समर्थकांना हे अजिबात आवडलेले नाही. अजित पवार हे भाजपसाठी भार आहेत. प्रत्यक्ष शरद पवारांनीच अजित पवारांना मुद्दाम युतीत पाठविले असावे. भाजपच्या मदतीने अजित पवारांनी ३०-४० आमदार निवडून आणायचे, शरद पवार काँग्रेसच्या मदतीने ४०-५० आमदार निवडून आणतील. निवडणूकपश्चात दोघे एकत्र येऊन आपल्या एकत्रित ८०-९० आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद मिळविणार अशी चाल असण्याची शक्यता बरीच आहे. काहीही असले तरी अजित पवारांसाठी ही निवडणूक अतिशय अवघड आहे. काकांनी आधीच रोहित पवार, युगेंद्र पवार यांना पुढे आणले आहे. पार्त पवार, सुनेत्रा पवार यांना पराभूत करून अजित पवारांना कोपर्यात मागे रेटले आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उतरवणे ही मोठी घोडचूक होती. बारामतीत पराभव झाला तर अजित पवार राजकारणात अस्तित्वहीन होतील.
____________________________________________________________________
शिवसेना (शिंदे गट)
एकनाथ शिंदेंची प्रतिमा २ वर्षात बरीच उजळली आहे, विशेषतः अत्यंत वाचाळ असलेल्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत, अंबादास दानवे, अंधारे इ. च्या तुलनेत शिंदेंचा संयम वाखाणण्यासारखा आहे, लोकसभा निवडणुकीतही काही ठिकाणी चुकीचे उमेदवार देऊनही लढविलेल्या १५ पैकी ७ जागा जिंकून आपण अजिबात दुर्लक्षणीय नाही हे शिंदेंनी दाखवून दिले. जरांगेला गुप्त पाठिंबा देऊन फडणवीसांना कायम टांगत्या तलवारीखाली ठेवले. लाडकी बहीण योजना आणून आपली लोकप्रियता वृद्धिंगत केली. अर्थात लाडकी बहीण योजना, शेतकर्यांना निशुल्क वीज, थकलेल्या वीजबिलांना माफी हे निर्णय कर्नाटक, हिमाचल प्प्रदेश प्रमाणे महाराष्ट्राला सुद्ध दिवाळखोरीच्या मार्गाने घेऊन जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकार बनण्याची शक्यता निर्माण झाल्ली तर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.
____________________________________________________________________
____________________________________________________________________
____________________________________________________________________
महारास्।ट्राचे राजकारण ही विविध पक्षांची एक किळसवाणी खिचडी झाली आहे. सत्तेसाठी सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी तत्वे, विचारसरणी, आश्वासने वगैरे केव्हाच कचर्यात फेकून दिली आहेत. या सर्व प्रकाराचा सर्वसामान्य जनतेला प्रचंड उबग आलेला असल्यास आश्चर्य नाही.
अश्या विचित्र परिस्थितीत निकालाविषयी कोणतेही अंदाज व्यक्त करणे अत्यंत अवघड आहे. परंतु मी एका वेगळ्या प्रारूपानुसार निकालाविषयी माझे काही अंदाज पुढील लेखात व्यक्त करेन.